March 29, 2024
Usavan Book Review by Umesh Mohite
Home » आधुनिकीकरणाने उद्धवस्त झालेल्या शिंप्याची करुण कहाणी : ‘ उसवण ‘
मुक्त संवाद

आधुनिकीकरणाने उद्धवस्त झालेल्या शिंप्याची करुण कहाणी : ‘ उसवण ‘

एकरेषीय कथानक असलेली ही कहाणी पारंपरिक रीतिने शिंपी व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकाच्या जगण्याची झालेली परवड मराठवाडी बेाली भाषेत आणि ओघवत्या शैलीत लेखकाने मांडल्यामुळे भावस्पर्शी झाली आहे.

परीक्षण : उमेश मोहिते,
मो.७६६६१८६९२८

उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर येथील युवा कादंबरीकार देवीदास सौदागर लिखित ‘ उसवण ‘ ही पहिलीच कादंबरी असून त्यामध्ये आधुनिकीकरणाच्या हव्यासातून लोकांच्या जीवनपद्धतीत झालेल्या बदलामुळे गावातल्या विठू नांवाच्या एका गरीब शिंप्याच्या आयुष्याची झालेली पडझड आणि कोसळण समग्रतेने व्यक्त झाली आहे. पत्नी गंगा आणि दोन मुले असे चौकोनी कुटुंब असलेला विठू गावातल्या लोकांचे कपडे शिवून आपल्या छोट्या कुटुंबाची गुजराण करीत असतो ; परंतू हळुहळू गावातल्या लोकांचा तालुक्याकडे ओढा वाढतो. त्यातच त्याच्या गावातही रेडिमेड कपडयांची दुकाने होतात.

शिवणकाम नसल्याने त्याला दुकानाचे भाडे देणेही अवघड होऊन बसते. लोकांची जुनी – पानी कापडं शिवत बसण्याची वेळ विठूवर येते. बऱ्याचदा त्याला उधारीवरही कपडे शिवून द्यावे लागतात आणि गावातली काही बडी मंडळी पारंपरिक बलूतेदारीच्या मानसिकतेतून त्याची मानहानी करून कमी पैसेही देतात. यातच गावात घोंघावणाऱ्या गटा-तटाच्या राजकारणाचाही तो बळी ठरतो. यातच गावातल्या लक्ष्मीआईच्या यात्रेवेळेस गावातल्या काही टारगट पोरांसोबत वर्गणीसाठी त्याचे भांडण होते.

पुन्हा विविध रंगांचे (पक्षांचे ) झेंडे शिवून देतेवेळेस त्याच्या दुकानातच दोन गटांची हाणामारी होते आणि त्याला या प्रकरणात पोलीस स्टेशनच्याही वाऱ्या कराव्या लागतात. शेवटी मागे लागलेल्या साऱ्या शुक्लकाष्ठाला कंटाळून तो जड अंतःकरणाने दुकानच बंद करतो. असे एकरेषीय कथानक असलेली ही कहाणी पारंपरिक रीतिने शिंपी व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकाच्या जगण्याची झालेली परवड मराठवाडी बेाली भाषेत आणि ओघवत्या शैलीत लेखकाने मांडल्यामुळे भावस्पर्शी झाली आहे.

यासोबतच गावातल्या राजकारणाचे हिडीस रूप, पारंपरिक सरंजामी मानसिकतेतून घडणारे गावातल्या धनिकांचे बेमूर्वत वर्तन, चंगळवादी मानसिकतेमधून उसवत जाणाऱ्या नातेसंबंधाची वीण आदींचेही नेमके चित्र इथे दृग्गोचर झाले आहे. या सर्व बाबींमुळे जेष्ठ लेखक डॉ. आनंद यादव यांच्या ‘ गोतावळा ‘ कादंबरीची आठवण करून देणाऱ्या ‘ उसवण ‘ मधील कथानायक विठूच्या आयुष्याची झालेली ‘ उसवण ‘ वाचक मनाला अस्वस्थ करून जाते, हे नक्की ! हेच या कादंबरीचे यश आहे.

पुस्तकाचे नाव – उसवण – ( कादंबरी )
लेखक – देवीदास सौदागर
प्रकाशक – देशमुख आणि कंपनी प्रा.लि. पुणे. (९३७०८४९०५६ )
पृष्ठे – ११६
मूल्य – १६० रुपये
मुखपृष्ठ – कौस्तुभ घाणेकर

Related posts

तुळसीचे संवर्धन फायद्यासाठी नव्हे तर जैवविविधता जोपासण्यासाठी व्हावे

चांगली निर्यात क्षमता असलेल्या 50 कृषी उत्पादनांची सारणीः अपेडा

सण, उत्सवात हवी योग्य आध्यात्मिक बैठक

Leave a Comment