प्रा. डॉ. भीमराव पाटील यांचा ‘साहित्य संवाद’ हा लेखसंग्रह २०१८ साली प्रकाशित झाला आहे. हा एक ललित लेख संग्रह असेल किंवा साहित्य विषयक क्लिष्ट चर्चा असेल असे सुरुवातीला वाटले होते. पण प्रत्यक्षात वाचायला सुरुवात केल्यानंतर लेखकाने प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे या पुस्तकात वाचन, लेखन, साहित्य, समीक्षा, विचार, भाषांतर, साहित्यिक घडामोडी, व्यक्तिचित्रण अशा विविध अंगांचे चित्रण करणारे व वेळोवेळी लिहीलेले लेख आहेत. यातील प्रत्येक लेखातून आपल्याला काय मिळेल हे शोधण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या कुवतीनुसार जे काही हाती लागले, ते सर्वांसमोर ठेवत आहे. एकूण अठ्ठावीस लेखांचा हा संग्रह म्हणजे साहित्यिक शोभादर्शकच आहे.
सुहास रघुनाथ पंडित, सांगली.
मोबाईल – 9421225491
1…..
सांगली येथे २०१२ साली ९२ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन झाले. या नाट्यसंमेलनाच्या पूर्व तयारीपासून संमेलन संपेपर्यंतचा सविस्तर वृतांत पहिल्याच लेखात दिला आहे. अगदी बारीक सारीक तपशिलासह सर्व गोष्टींचा उल्लेख केला असल्यामुळे संपूर्ण संमेलन डोळ्यासमोर उभे राहते. संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोघे, उद्घाटक अमोल पालेकर यांच्या भाषणातील मजकूर उद्घृत केला असल्यामुळे अगदी थोडक्यात वक्त्यांच्या विचारांची दिशा समजते.
२…..
लोकसाहित्याच्या अभ्यासिका सांगली येथील डॉ. तारा भवाळकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लिहीलेल्या ‘लोकसंस्कृती उपासक ‘ या लेखातून डॉ. भवाळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करुन देण्यात आला आहे. डॉ. पाटील यांच्या मनात डॉ. भवाळकर यांच्याविषयी असलेला आदर हा लेख वाचताना जाणवतो. संथ वाहणाऱ्या कृष्णामाईने सांगलीची भूमी सुजलाम् सुफलाम् केली आहे तर लोककलांची सरिता असणाऱ्या डॉ. भवाळकर यांनी सांगलीवासीयांची मनोभूमी समृद्ध केली आहे असे ते म्हणतात. यातूनच त्यांची आदरभावना व्यक्त होतो व त्याच वेळेला डॉ. भवाळकर यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याची कल्पना येते. डॉ. भवाळकर यांच्या एकंदर साहित्याचा व विचार प्रवाहांचा आढावा घेऊन त्यांच्या लेखनातून स्वतंत्र देशी स्त्रीवाद कसा प्रकट होतो हे दाखवून दिले आहे. डॉ. भवाळकर यांची लोकसंस्कृतीची उपासना समजून घेण्यासाठी हा लेख नक्कीच उपयुक्त आहे.
३…..
मानवी जीवन सदैव सतर्क आणि उन्नत करण्याचं काम मराठी नाटकांनी केल आहे. या नाट्य प्रकारातील एक प्रकार म्हणजे एकपात्री प्रयोग. या प्रकारासंबंधी लिहीताना लेखक म्हणतात ,”भारुड, कीर्तन, पोवाडा यासारख्या लोककलांतूनच एकपात्री प्रयोग जन्माला आला. ते व्यक्तीदर्शनाचे सुंदर आणि प्रभावी माध्यम आहे. पुढे त्यांनी श्री. भोंडे, पु. ल. देशपांडे,आणि सुहासिनी मुळगावकर यांच्या एकपात्रीचा उल्लेख केला आहे. तर प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचा एकपात्री म्हणजे ‘बहुपात्री एक नट’ असे ते म्हणतात. त्यांच्या मते एकपात्री प्रयोग मराठी नाट्यचळवळीच्या विकासाला पूरक ठरला आहे. एकपात्री प्रयोगांनी मराठी माणसांची नाट्याभिरुची वृद्धिंगत केली आहे.
४ , ५…..
पुढचे दोन लेख हे कवितांशी निगडीत आहेत. यापैकी पहिल्या लेखामध्ये श्री. पाटील यांनी विविध कविंच्या पाऊस कविता आपल्यासमोर ठेवून कवितेतील पाऊस पाणी दाखवले आहे. कवी आणि पाऊस यांचे नाते किती जवळचे आहे हे वेगळे सांगायला नकोच. चराचरात चैतन्य भरणाऱ्या पावसाकडे कवी कोणत्या नजरेने पाहतो, तो कसा अनुभवतो, त्याच्या बऱ्या वाईट आठवणी आपल्या मनात कशा साठवतो हे दाखवणारा हा लेख. आधुनिक मराठी काव्यात पावसावर पहिली कविता लिहीणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या काव्यपंक्ती उद्घृत केल्यामुळे सावित्रीबाईना नेमक्या कुठल्या पावसाची अपेक्षा आहे हे आपल्याला समजू शकते. याशिवाय अनेक कवी व कवयित्रींच्या पावसावरील कवितांतील पंक्ती या लेखात आपल्याला वाचायला मिळतात. प्रत्येकाचा पाऊस अनुभवायला मिळतो. पुढच्या लेखात सुप्रसिद्ध कवी प्रा. प्रदीप पाटील यांच्या ‘अंतरीचा भेद’ या काव्य संग्रहाचा आस्वादक परिचय करुन देतानाही वाचकाला रसाळ काव्य पंक्तींचा आस्वाद घेता येतो. लेख वाचल्यानंतर हे लक्षात येते की लेखाच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे प्रा. पाटील यांच्या कविता या लक्षवेधी आणि आशयघन आहेतच. स्वतःच्या मनातील विचार नेमकेपणाने व्यक्त करणे हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे असे म्हटले आहे त्याचा अनुभव वाचकांनी प्रत्यक्ष घेतला पाहिजे.
६…..
मुन्शी प्रेमचंद हे नाव आपण सर्वांनीच ऐकले आहे. हिंदी साहित्यातील प्रसिध्द कथालेखक म्हणून ते शालेय जीवनापासून आपल्याला परिचित असतात. त्यांचेच समकालीन जैनेंद्रकुमार यांनीही हिंदी साहित्यात विपुल प्रमाणात दर्जेदार कथालेखन केले आहे. ‘पत्नी’ ही त्यांची कथा प्रा. पाटील यांनी उलगडून दाखवली आहे. परंतू त्यापूर्वी त्यांनी कथा या साहित्य प्रकाराविषयी केलेले चिंतन खूप मौलिक वाटते. कथालेखनाची उत्पत्ती, आधुनिक साहित्यातील कथेची व्याख्या आणि हिंदी कथा साहित्याचा इतिहास त्यांनी थोडक्यात मांडला आहे. श्री. जैनेंद्रकुमार यांच्या कथाविषय लिहीताना ते म्हणतात, “माणसाच्या अंतरंगातील द्वंद्व मनोवैज्ञानिक शैलीतून उलगडून दाखवण्याचे सर्वात मोठे काम जैनेंद्र यांनी केले आहे.” याचा प्रत्यय देणारी ‘पत्नी’ ही कथा पुढे आपल्याला वाचायला मिळते.
७…..
महान हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांच्या साहित्यिक विचारांचा वारसा जोपासणारे व हिंदी साहित्यात विविध प्रकारचे विपुल लेखन करणारे मधुकर सिंह यांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्याचा योग प्रा. पाटील यांना आला. त्या मुलाखतीवर आधारित एक लेख आपणास येथे वाचायला मिळतो. त्यांचे ग्रामीण जीवनाशी निगडीत साहित्य, भोजपुरी भाषेतील साहित्य, हिंदी कथा साहित्यातील विविध आंदोलने, सामाजिक विचारांची बांधिलकी, मराठी दलित साहित्य अशा अनेक विषयांशी निगडीत प्रश्नांना मधुकर सिंह यांनी सविस्तरपणे उत्तरे दिलेली आहेत. एका अमराठी साहित्यिकाचे विचार समजून घेणे या मुलाखतीमुळे शक्य झाले आहे. “काळाच्या ओघात दीर्घजीवी टिकणारे दर्जेदार लेखनच लेखकाचे अस्तित्व व स्थान निश्चित करत असते. त्यासाठी आंदोलनाच्या कुबड्यांची गरज नसते.” मधुकर सिंह यांचे हे उद्गार सर्वच साहित्य उपासकांनी लक्षात ठेवावे असेच आहेत.
८…..
‘संत तुकारामांची जीवनगाथा’ या लेखात प्रा. पाटील यांनी संत तुकाराम यांच्या जीवनकार्याचा ओळख करून दिला आहे. तुकाराम महाराजांच्या बालपणापासून अखेर पर्यंतचा प्रवास आपल्याला वाचायला मिळतो. त्यांच्यावर झालेले ग्रामीण संस्कृतीतील संस्कार, त्यांच्यावर आलेली कौटुंबिक संकटे, त्यातून निर्माण झालेली उद्विग्नता, भौतिक सुखाबद्दलची उदासीनता, आत्मचिंतनाची ओढ हे सर्व आपल्यासमोर मांडल्यामुळे तुकाराम महाराजांनी जी भूमिका घेतली त्याचा आपल्याला अंदाज येतो. प्रापंचिक जीवनाचा त्याग न करता केलेली आध्यात्मिक वाटचाल समजून घेता येते. कर्मठ धर्मवादाला शरण न जाता विरोधाचा मार्ग स्विकारुन, ‘ कठीण वज्रास भेदू ‘ हे त्यांचेच वचन त्यांनी खरे करुन दाखवल्याची खात्री पटते. त्यांनी मंत्र-गीता हे गीतेवरील मराठीत लिहीलेले भाष्य, त्यांच्या हिंदी रचना याचा उल्लेख लेखकाने केला असल्यामुळे तुकोबांच्या लेखन सामर्थ्याची कल्पना येते. महाराष्ट्रात सामाजिक समता स्थापन करण्यात संत तुकारामांसारख्या श्रेष्ठ संतांचे कार्य हे किती मोलाचे आहे हे स्पष्ट करणारा हा लेख अवश्य वाचावा.
९…..
कविच्या कवितेतून पाऊस बरसत असतो. पाऊस तोच असतो. पण प्रत्येकाला त्याचं दिसणारं रुप वेगळं असतं. या सृजनशील पावसाप्रमाणेच कविंच्या जिव्हाळ्याचा आणखी एक विषय म्हणजे ‘आई’. या आई वर लिहीलेल्या अनेक कविंच्या कवितेतील पंक्ती उद्घृत करुन लेखकाने आईची विविध रुपे आपल्याला दाखवली आहेत. पण त्यापूर्वी लेखाच्या सुरुवातीलाच आई विषयी लिहीताना लेखकाने भावूकपणे जे लिहीले आहे ते अत्यंत काव्यात्मक झाले आहे. या लेखात ज्योती लांजेवार , भीमसेन देठे, वामन निंबाळकर, किरण शिंदे, डॉ. अनिता खेबुडकर, इंद्रजित भालेराव अशा अनेक कवी कवयित्रींच्या काव्यपंक्ती वाचावयास मिळतात. काहींनी स्वतःच्या आईविषयी लिहीले आहे तर काहींनी आई या व्यक्तीमत्वाविषयी लिहीले आहे. परंतू सर्वांनीच आईची उत्तुंगता आपल्या काव्यातून दाखवून दिली आहे. बदललेल्या सामाजिक परिस्थितीत कुटुंबात आईचे स्थान काय आहे याविषयीची चिंता व्यक्त करुन लेखक म्हणतो, ‘प्रत्येकाने स्वतःमध्येच आईपण जागवावयास हवे. कारण, आईला पर्याय फक्त आईच असते. स्वतःमध्ये आई जाणवल्याने याची खरी प्रचिती येते.’
आईचे महात्म्य समजावून देणारा लेख !
१०…..
दशेंद्रियांच्या पलिकडे असणारे मन हे अकरावे इंद्रिय. या इंद्रियांची ओळख करुन देण्याचे काम साहित्यिक करत असतात. समाज स्वास्थ्यासाठी आर्थिक समृद्धी इतकीच साहित्यिक समृद्धीची नितांत गरज असते. या शब्दात साहित्य आणि साहित्यिक यांचे महत्व विशद करुन प्रा. पाटील यांनी एकविसाव्या शतकातील साहित्य स्वास्थ्याचा वेध पुढील लेखात घेतला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आश्चर्यकारक प्रगतीमुळे भौतिक सुखांची रेलचेल आहे. परिणामी,जगण्याची आसक्ती आणि हाव दिवसेंदिवस अनावर होऊ लागली आहे. जगणं सोपं झालं असलं तरी जगण्याचे प्रश्न अधिक क्लिष्ट व गंभीर होत जातील असे लेखक म्हणत आहे. एकविसाव्या शतकातील ज्ञानव्यवस्था, धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यातील संघर्ष, संकरित भाषेची लागण, मराठी भाषेचे भवितव्य अशा अनेक मुद्यांचा या लेखात अत्यंत गंभीरपणे विचार केलेला दिसतो. यांच्या गुणदोषांसकट चर्चा करुन लेखक पुढे म्हणतो की हे जरी खरं असलं तरी माणसातील माणूसपण जीवंत ठेवण्यासाठी साहित्याची नितांत गरज भासणार आहे. कला ही हृदयाची भाषा आहे. जोपर्यंत हृदय, मन आहे तोपर्यंत मनाची भूक भागवून माणसाला माणूसपण देणारे साहित्य चिरंतन असणार आहे.
११…..
स्वतःची प्रगती करुन आपण कितीही पुढे गेलो तरी आपण आपल्या मातीला, माणसांना विसरु नये. यानुसार वागणारे प्रा. पाटील म्हणूनच आपल्या येडेनिपाणी या गावासंबंधी लेख लिहू शकतात.
सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी हे सरांचे मूळ गाव. अगस्ती ऋषींपासूनचा इतिहास सांगत ते आजच्या काळात येऊन पोचतात. आजची खेड्यांची अवस्था सर्वत्र जवळजवळ सारखीच आहे. पण प्रत्येक गावाचे एक वैशिष्ट्यही असते. तसे वसंत व्याख्यानमाला हे येडेनिपाणीचे वैशिष्ट्य आहे. १९९०पासून चालू असलेल्या या व्याख्यानमालेविषयी त्यांनी भरभरुन लिहीले आहे. ते वाचताना व्याख्यानमालेविषयीचा त्यांचा अभिमान आणि ती सातत्याने चालवणाऱ्या कार्यकर्ते व संचालक याविषयी असणारे प्रेम शब्दाशब्दांतून दिसून येते.
१२…..
सांगली येथील डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात ज्ञानाने कार्य करत असताना ‘ज्ञानभारती ‘ या नियतकालिकातच्या संपादकीयातून युवा लेखकांशी साधलेला संवाद एका लेखातून अनुभवायला मिळतो. पारंपारिक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधावा अशी त्यांची नवोदित लेखकांकडून अपेक्षा आहे.
१३…..
वाचन हे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात उपयोगी पडते. वाचनाचे फायदे काय, कशासाठी वाचायचे हे सांगून वाचनाचा पाया मजबूत असायला हवा असे ते आवर्जून सांगतात. कारण वाचाल तरच (आयुष्यात) वाचाल ! असा हा तेरावा लेख आहे.
१४…..
राजकारणात असूनही सुसंस्कृत व्यक्तिमत्व लाभलेली काही व्यक्तिमत्वे महाराष्ट्रात होऊन गेली. त्यातील एक म्हणजे श्री.यशवंतराव चव्हाण. त्यांचा साहित्यविषयक दृष्टिकोन काय होता हे मांडणारा लेख या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो. साहित्यिक म्हणून त्यांची जडणघडण कशी झाली हे समजते. त्यांनी जणलेले शब्दांचे सामर्थ्य, साहित्याची त्यांनी केलेली व्याख्या, त्यांच्या साहित्यकृती या सर्वांची माहिती आपल्याला या लेखातून मिळते.
१५…..
बहुजात कथावाड्मयात चित्रित झालेली स्त्रीप्रतिमा वाचकांसमोर ठेवताना प्रा. पाटील यांनी स्त्रीवादी कथा साहित्याचा विस्तृत मागोवा घेतला आहे. बहुजात साहित्य म्हणजे काय ? हे विषद करुन पुढे स्त्रीवादी कथासाहित्याचा कालबद्ध आढावा घेतला आहे. १८९६ ते १९५०, १९५० ते १९६०, १९६० नंतरचा कालखंड, कालानुरूप बदलत जाणारे लेखक – लेखिका, स्त्री विषयक समस्या व प्रश्न यांची विविधता हे सर्व वाचकाला दाखवून दिले आहे. दलित साहित्य, त्यातील स्त्री प्रधान कथा यांचीही चर्चा केली आहे. कथा साहित्याचा असा आढावा घेतल्यानंतर, ‘सर्व स्त्रियांना पुरूषांच्या नजरेतून हवे तसे घडविले जाते’ या
निष्कर्षाप्रत ते येतात.
१६…..
लोकसंस्कृती या लेखात प्रा. पाटील यांनी लोकगीते आणि लोककथा यांच्या माध्यमातून लोकसंस्कृतीचे जतन करणाऱ्या पारंपारिक लोककलांविषयी लिहीले आहे. या लेखात त्यांनी भेदिक, सोंगी भजन, गोंधळ, धनगरी ओव्या व शाहिरी या कलांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. त्या सादर करण्याची पद्धत, त्यासाठी लागणारी तयारी, लोकजीवनातील त्याचे महत्त्व विषद केले आहे. या कलांची व कलाकारांची आजची अवस्था मात्र बिकट आहे याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
१७…..
मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे अनेक साहित्यिक सांगली जिल्ह्याने महाराष्ट्राला दिले आहेत. लेखक, लेखिका, कवी, कवयित्री, नाटककार, शाहीर अशा सर्वांची यादी करायची म्हटली तर ती खूप मोठी होईल. जिल्ह्यातून वाहणाऱ्या कृष्णेने सकस मातीतून कसदार शब्दांचे शिवारही फुलवले आहे. या शिवारातून दर्जेदार पीक काढणारे प्रा. वसंत केशव पाटील यांच्याबद्दल प्रा. भीमराव पाटील लिहीतात तेव्हा सरांबद्दल असणारा आदर, त्यांच्याबद्दल असणारा पूज्य भाव शब्दाशब्दांतून व्यक्त होताना दिसतो. प्रा. वसंत केशव उर्फ व. के. सरांना त्यांनी सांगलीचा साहित्य वसंत असे म्हटले आहे ते खरेच आहे. व. कें. च्या व्यक्तीगत आयुष्याचा पट मांडत असताना त्यांची साहित्यिक जडण घडण कशी झाली याचा ते उलगडा करतात. व. के. यांनी परिस्थितीवर मात करुन अखंड साहित्य साधना केल्यामुळे आज ते भारतीय साहित्यातील अधोरेखित लेखक, साक्षेपी अनुवादक आणि चौरस चिंतनशील कवी म्हणून चिरपरिचित आहेत, असे लेखक म्हणतात. वकेसरांचे लेखन वास्तवदर्शी आणि हृदयस्पर्शी झाले आहे. वके.सरांचे मन टीपकागदासारखे असल्यामुळे जे पाहिले, अनुभवले ते ते सर्व ते टिपून घेतात असे लेखकाचे निरीक्षण आहे. वके नेमके आहेत कसे या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना लेखकाने वकेंच्या आत्मनिष्ठा आणि तत्त्वनिष्ठा या दोहोंचा स्वीकार करण्याच्या वृत्तीचा आवर्जून उल्लेख केला आहे. व. कें. ची साहित्यसंपदा ही खेडे आणि शहर या दोन्ही संस्कृतींची नाळ जोडणारी आहे. माझ्या जीविकेची साधना कविता आणि कविताच आहे ‘ असे व. के. म्हणतात. याची प्रचिती देणाऱ्या आणि आयुष्याकडे डोळसपणे पाहताना आतून स्फुरलेल्या व.के.यांच्या अनेक काव्यपंक्ती उद्घृत केल्यामुळे लेखाचे लालित्य वाढले आहे. वकेंची शब्दांबद्दलची सजगता आणि चोखंदळपणा, साहित्याच्या अनुवादातून त्यांना मिळणारा आनंद, माणसाची सर्वात मोठी भूक कोणती या प्रश्नाचे वकेंनी दिलेली उत्तर, त्यांचे बहुभाषिकत्व, अशा अनेक मुद्यांचा परामर्श घेत घेत गुरुतुल्य वकेंच्या साहित्याच्या फुललेल्या वसंताचे सौंदर्य चितारणारा हा लेख वकेंच्या बहुपदरी व्यक्तीमत्वाचे दर्शन घडवतो.
१८…..
पुढील लेखात प्रा. पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रीमुक्तीविषयक विचार वाचकांसमोर मांडले आहेत. हजारो वर्षे केवळ ‘ पायांची दासी ‘ असणाऱ्या स्त्रीला ज्ञानसाधना, व्यक्तिस्वातंत्र्य आणि समानता या तत्त्वांच्या आधारे उन्नत करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांची माहिती या लेखात मिळते. त्यापूर्वी प्रा. पाटील यांनी मध्ययुगीन स्त्रीविषयक अवस्थेचा आढावा घेतला आहे. तसेच आधुनिक युगात स्त्रीमुक्ती चळवळीचा पाया घालणारे महात्मा जोतिराव फुले यांचे विचार व कार्य थोडक्यात कथन केले आहे. डॉ. आंबेडकरांनी गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले यांना गुरू मानले असल्यामुळे या तिघांच्या विचारांचा पडलेला प्रभाव बाबासाहेबांच्या कार्यावर दिसून येतो. स्त्री मुक्ती आणि समानतेसाठी बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग, मनुस्मृतीचे दहन, हिंदू कोड बील, राज्यघटनेतील तरतुदी, दलित महिला परिषद, कुटुंब नियोजनाचे महत्व पटवून देणे अशा विविध मार्गांचा अवलंब करत आपले उद्दिष्ट साध्य केले.
१९…..
‘भावानुवादाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार’ या लेखात प्रा. पाटील म्हणतात की एका भाषेत व्यक्त केलेला विचार दुसऱ्या भाषेत व्यक्त करण्याची प्रक्रिया म्हणजे भाषांतर. एकविसावे शतक हे भाषा आणि भाषांतराचे शतक आहे. त्यामुळे भाषांतरीत किंवा अनुवादित साहित्याच्या महत्वाकडे लक्ष वेधून घेताना त्यांनी प्रामुख्याने प्रा. वसंत केशव पाटील यांचा संदर्भ दिला आहे. जागतिकीकरणामुळे भाषांतरीत साहित्याला गती येणार आहे असे ते म्हणतात. याबरोबरच भाषांतरासाठी अनुवादकाची काय तयारी असली पाहिजे, त्याची स्वतःची शैली व व्यक्तिमत्त्व, निरनिराळ्या भाषांमधील म्हणी व वाक्प्रचार यांचे ज्ञान, या सर्व मुद्यांचा परामर्श घेत त्यांनी ‘ भाषांतर हे भाषांतर वाटता कामा नये’ हा दृष्टिकोन महत्वाचा आहे असे आवर्जून सांगितले आहे.
२०…..
हिंदकेसरी मारुती माने यांच्याबरोबर झालेली बातचीत लेखकाने एका लेखातून आपल्यासमोर आणली आहे. कवठेपिरान हे आपले गाव न सोडता, प्रतिकूलतेशी सामना करुन पै. मारुती माने यांनी मिळवलेल्या यशाची ही गाथा आहे. तरुणांनी, विशेषतः नव्या मल्लांनी आवर्जून वाचावी अशी ही मुलाखत आहे.
२१…..
उर्दू भाषेला ज्ञानपीठ प्राप्त करुन देणारे सुप्रसिद्ध उर्दू शायर शहरयार यांच्या साहित्यिक कारकीर्दीचा आढावा घेणारा पुढचा लेख आहे. गालिबचं अनुयायित्व स्विकारुन गझल लेखन करणारे शहरयार यांना साहित्य अकादमीनेही सन्मानित केले आहे. त्यांच्या गझलांमधून मानवी जीवनाला आत्मशोधाचं रुप देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. परिवर्तनाचा आशावाद सोडून न देणाऱ्या या शायराचा अल्पपरिचय आपल्याला या लेखातून होतो.
२२…..
यापुढचा लेख हा एका वेगळ्या विषयावरचा लेख आहे. एका अघोषित लढाईची ही कहाणी आहे. फारशी कुणाला माहित नसलेली. स्वतंत्र पाकिस्तान आणि स्वतंत्र भारत या दोन राष्ट्रांच्या निर्मितीचा इतिहास आपल्याला माहित आहे. पण या इतिहासातील अनेक प्रसंग, घटना अशा आहेत की ज्या अजूनही प्रकाशात आलेल्या नाहीत. अशाच एक प्रसंगाचा सविस्तर वृतांत ‘ते बेचाळीस दिवस ‘ या लेखात आपल्याला वाचावयास मिळतो.
२३…..
भावनांना मुक्तपणे वाट मोकळी करुन देणारा काव्य प्रकार म्हणजे भावगीत. भाव जपणारं आणि खुलवणारं. मराठी माणसाची भावगीतांची भूक ही न संपणारी आहे. अशा भावपूर्ण गीतांची निर्मिती ज्यांनी केली त्यातील प्रमुख नाव म्हणजे पी. सावळाराम ! मूळात निवृत्ती पाटील असणारे पी. सावळाराम कसे झाले,त्यांची कौटुंबिक परिस्थिती व त्यातून झालेली जडणघडण, शैक्षणिक प्रवास, राजाराम महाविद्यालयातील बहराचे दिवस, कवी,गीतकार, कथा, पटकथा, संवाद लेखन असा व्यापक होत गेलेला कार्यपट आपल्याला समजून घेता येतो. राजकवी असतात हे आपल्याला माहित आहे. पण हा कवीच लोकप्रियतेमुळे ठाणे शहराचा ‘राजा’ होतो . हे सर्व वाचणे खूप रंजक आहे.
२४……
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधीवादाने प्रेरित होऊन देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे जे लढवय्ये होऊन गेले त्यात सांगली जिल्ह्यातील पाडुरंग गोविंद पाटील उर्फ पांडूमास्तर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागले. त्यांची महात्मा गांधी यांच्याशी झालेली भेट व त्यामुळे त्यांच्या जीवनाला लागलेले वेगळे वळण ,अन्य क्रांतिकारकांसमवेत केलेली जनजागृती, इस्लामपूर येथील लढ्याचे नेतृत्व या सर्व घटनांचा तपशील देणारा ‘धगधगता अंगार ‘ या लेखात वाचायला मिळतो.
२५…..
जीवनाची वाट वेगळेपणाने चालणाऱ्या अनेक व्यक्ती समाजामध्ये असतात. त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली पाहिजे. बालवयात छंद म्हणून व पुढे जीवनकार्य म्हणून निसर्गातील पशू व पक्षी यांचे जतन, संरक्षण व संवर्धन करणारे निसर्गप्रेमी प्रा. सुरेश गायकवाड हे अशांपैकीच एक. त्यांच्या वेगळ्या प्रकारच्या कार्याचा परिचय करुन देणारा लेख म्हणजे,’ एक निसर्गप्रेमी अवलिया’. आधुनिक समाज निसर्गापासून दूर जात असताना, प्रा. गायकवाड यांनी मात्र निसर्ग निरीक्षणाचा जडलेला छंद जिवापाड व अखंडपणे जपला. त्यातूनच एक निसर्गरक्षक व वन्यजीवरक्षक उदयाला आला. दुर्मिळ फुलपाखरांचे संकलन करणे, सर्पमित्र म्हणून कार्य करणे, वन्यजीव सर्वेक्षण, देशभरातील जंगलातून भटकंती व निरीक्षण, उत्कृष्ट छायाचित्रण अशा विविध आघाड्या सांभाळत असताना आपल्यातील संशोधक व सृजनशील वृत्ती सरांनी जपून ठेवली आहे हे विशेष. अशा या वसुंधरा पुत्राची यशोगाथा या लेखातून समजते.
२६…..
तमाशा या लोककलेचा थोडक्यात इतिहास सांगून त्यानंतर सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील सुप्रसिद्ध तमासगीर खाडे बंधू म्हणजेच सर्व परिचित ‘काळू-बाळू’ यांच्याशी झालेल्या गप्पांचा वृतांत प्रा. पाटील यांनी पुढील लेखात दिला आहे. काळू बाळू यांना तमाशाकडे का वळावेसे वाटले, सुरवातीच्या काळात त्यांना कोणते अनुभव आले, त्याकाळातील व आजचे तमाशाचे स्वरुप, तमाशा खरोखरच अश्लील असतो का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यातून मिळतात.शिवाय त्यांच्या एकंदर कारकिर्दीची कल्पना येते. त्यांचे यश, पुरस्कार, सन्मान हे सारे वाचून थक्क व्हायला होते. तमाशाने आपल्या कलेची उंची टिकवली नाही याची खंत मात्र काळू बाळू बोलून दाखवतात.
२७…..
साहित्याच्या विविध विषयांवरील लेख वाचल्यानंतर आपल्याला विनोदी साहित्याविषयी एक लेख वाचायला मिळतो. या लेखात लेखकाने सांगली येथील लेखिका प्रतिभा जगदाळे यांच्या ‘मिश्किली’ या विनोदी लेख संग्रहाचा परिचय करुन दिला आहे. परंतु त्यापूर्वी मराठी साहित्यातील विनोदी लेखनाची पार्श्वभूमी, पुरुष व स्त्री विनोदी साहित्यिक, विनोदी साहित्य लेखिका कमी आहेत का ? व का ? अशा अनेक मुद्यांवर आपले विचार व्यक्त केले आहेत. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या व बिघडणाऱ्या अनेक घटना असतात. त्यातूनच विनोद निर्मिती होत असते. आयुष्याकडे मिश्किलपणे पाहिल्यास समाजातील उणीवा, दोष, विकृती विनोदी पद्धतीने टिपून घेता येतात. असा मिश्किलपणा सौ. जगदाळे यांचेकडे असल्यामुळे त्यांनी छोट्या – मोठ्या घटनांतून विनोद टिपला आहे. संग्रहातील प्रत्येक लेखाचा विषय व आशय थोडक्यात सांगितल्यामुळे लेखसंग्रहाचा परिचय खूप छान झाला आहे. सौ. जगदाळे यांची मिश्किली ही अस्वस्थतेतून अंतर्मुख करणारी आहे असे प्रा. पाटील यांनी म्हटले आहे.
२८…..
महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. इथे स्वकर्तृत्वावर स्वतःचे स्थान निर्माण करुन त्याचा उपयोग समाजासाठी करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. त्यातील अलिकडच्या काळातील एक म्हणजे डॉ. पतंगराव कदम. डॉ. भीमराव पाटील यांनी संग्रहातील शेवटचा लेख कदम यांच्या कार्य कर्तृत्वाविषयी लिहीला असून त्याद्वारे त्यांना वाटणारा आदरभाव व्यक्त केला आहे. अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन व कोणताही राजकीय किंवा शैक्षणिक वारसा नसताना अत्यंत थोड्या अवधीत डॉ. कदम यांनी अफाट कार्य केले आहे. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी भारती विद्यापीठाची पुणे येथे स्थापना केली. आज त्याचे रुपांतर अभिमत विद्यापीठात झाले आहे. शिक्षणाबरोबरच राजकारण, अर्थकारण, सहकार, बॅन्कींग, उद्योग अशा अनेक क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. हे सर्व कशामुळे शक्य झाले, त्यांचे कोणते सद्गुण त्यांना यशाच्या शिखराकडे घेऊन गेले, हे सर्व वाचण्यासारखे आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नेमका वेध घेणारा हा लेख आहे.
लेखक प्रा. पाटील म्हणतात की हा संग्रह म्हणजे साहित्यिक आणि वाचक यांच्यामधील सेतू आहे. खरेच, संवादाचा सेतू पार करुन आपण लेखकाच्या जवळ जाऊन पोचलो आहोत असेच शेवटी वाटू लागते. हे पुस्तक खरोखरच वाचकांच्या जाणीवा रुंदावणारे आहे यात शंकाच नाही. प्रत्येकाने हा सेतू एकदा तरी पार करावा असे आवर्जून सांगावेसे वाटते.
पुस्तकाचे नाव : साहित्य संवाद
लेखक: डॉ. भीमराव पाटील, मोबाईल – 9421133172
प्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर 7387736168
मूल्य : २०० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.