पहिल्या साहित्य-संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर तर प्रमुख पाहुणे संगीत अभ्यासक माधव गावकर
4 जानेवारी रोजी कणकवली आचरेकर प्रतिष्ठान नाट्यगृहात संमेलनाचे आयोजन
संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण, निमंत्रक सुभाष भंडारे यांची माहिती
कणकवली – सिंधुदुर्ग साहित्य-संगीत मित्र मंडळातर्फे शनिवार 4 जानेवारी रोजी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान नाट्यगृह कणकवली येथे एक दिवशीय साहित्य – संगीत संमेलनाचे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी आणि चित्रपट गीतकार अजय कांडर यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संगीत अभ्यास माधव गावकर यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण आणि निमंत्रक सुभाष भंडारे यांनी दिली.
एक कला दुसऱ्या कलेला पूरक असते. साहित्य आणि संगीत यांचं नातं या अर्थाने अधिक जवळच आहे. या पार्श्वभूमीवर सदर साहित्य संगीत संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संगीत मैफल, पुरस्कार वितरण, साहित्य – संगीत याविषयी मार्गदर्शन आणि निमंत्रितांचे कविता वाचन असे स्वरूप या संमेलनाचे आहे. संमेलनाध्यक्ष अजय कांडर हे मराठीतील आजचे महत्त्वाचे कवी असून त्यांनी काही चित्रपटांची गाणीही लिहिली आहेत. सुरेश वाडकर, देवकी पंडित, शौनक अभिषेकी, शाहीर संभाजी भगत आधी दिग्गज गायकांनी त्यांनी लिहिलेली गाणी गायली आहेत. त्यांनी लिहिलेल्या आणि देवकी पंडित यांनी गायलेल्या गाण्याला राज्य शासनाच्या चित्रपट विभागातील पुरस्कारांमध्ये नॉमिनेशनही प्राप्त झाले होते.
महाराष्ट्र फाउंडेशन, जैन फाउंडेशन, विशाखा, कुसुमाग्रज, यशवंतराव चव्हाण, इंदिरा संत आदी प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. अकरा विद्यापीठे आणि एका शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे. हिंदी, उर्दू, मल्याळम,कानडी, दख्खनी बोली, इंग्रजी, पंजाबी, गुजराती आदी भारतीय भाषांमध्ये त्यांच्या कविता भाषांतरित झाल्या आहेत.तर संमेलनाचे प्रमुख पाहुणे माधव गांवकर हे कोकणातील ज्येष्ठ संगीत अभ्यास असून त्यांनी कोकणातील अनेक कवींच्या कवितांना संगीतबद्ध केले आहे.
संगीत शिक्षण घेणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांना ते संगीताचे मूलभूत शिक्षण देत असून त्यानी स्वतः संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा कार्यक्रम अनेक ठिकाणी सादर करण्यात आला आहे. त्यानी संगीतबद्ध केलेली कोकणातील कवींची ‘बिल्वदल’ ही ध्वनीफित लोकप्रियही झाली होती.तिचे प्रकाशन गायक सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मैत्र साहित्य, मैत्री संगीत आणि मैत्र कला पुरस्कार देऊन अनुक्रमे कवयित्री संध्या तांबे, गायिका नेत्रा पाचंगे प्रभुदेसाई आणि चित्रकार सुमन दाभोलकर यांना गौरविण्यात येणार आहे.तर कवयित्री प्रमिता तांबे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
यात नामदेव गवळी, ऋतुजा सावंत भोसले, किशोर वालावलकर, मधुकर मातोंडकर, प्रगती पाताडे, प्रज्ञा मातोंडकर, योगिता शेटकर, मंगल नाईक जोशी, रीना पाटील, ॲड.मेघना सावंत, ॲड.प्राजक्ता शिंदे, प्रियदर्शनी पारकर, सत्यवान साटम, विशाल मराठे, दिशा राणे, प्रा.आर. के. हेदूळकर, श्रवण वाळवे, मुझफ्फर सय्यद, आर्या बागवे, संगीता पाटील, रीमा भोसले, निलेश केरकर, ॲड. अर्चना गव्हाणकर, पल्लवी शिरगावकर, संतोष जोईल, किशोर कदम, धर्माजी जाधव, नरेंद्रकुमार चव्हाण, नीकेत पावसकर, हर्षल तांबे, जमील अन्सारी, श्रवण वाळवे, वैष्णवी सुतार, रिया परब, समिक्षा चव्हाण, समिक्षा गोसावी आदी कवींचे कविता वाचन होणार आहे.
तरी साहित्य संगीत रसिकांनी संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन श्री चव्हाण आणि श्री भंडारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – मो. नं.99605 03171
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.