February 18, 2025
Dr Jaisingrao Pawar history writing gives top priority to impartial records and objectivity
Home » डॉ. जयसिंगराव पवार यांच्या इतिहास लेखनामध्ये निष्पक्षपाती नोंदींना, वस्तुनिष्ठतेला सर्वोच्च प्राधान्य – पठारे
संशोधन आणि तंत्रज्ञान

डॉ. जयसिंगराव पवार यांच्या इतिहास लेखनामध्ये निष्पक्षपाती नोंदींना, वस्तुनिष्ठतेला सर्वोच्च प्राधान्य – पठारे

कोल्हापूर: डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या इतिहास ग्रंथाच्या रुपाने महाराष्ट्रासाठी एक पथदर्शक स्वरुपाचा प्रकल्प सादर केला आहे. त्याचे सर्वत्र अनुकरण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक तथा ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांनी ‘राजर्षी शाहू साहित्यमाले’अंतर्गत संपादित केलेल्या ‘कोल्हापूर: ऐतिहासिक व प्राकृतिक’ या कोल्हापूरच्या पंचखंडात्मक इतिहासाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन प्रा. पठारे यांच्या हस्ते आज करण्यात आले. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

प्रा. पठारे म्हणाले, डॉ. जयसिंगराव पवार यांनी या ग्रंथाच्या रुपाने कोल्हापूरचा अनेक दृष्टींनी वेध घेता येईल, असा ऐवज निर्माण केला आहे. कोणत्याही ठिकाणाचा इतिहास जतन करण्याचे काम हे खूप महत्त्वाचे असते. शासनाकडून गॅझेटियरच्या स्वरुपात अशा स्वरुपाचे दस्तावेजीकरण होत असते. मात्र, डॉ. पवार यांनी गॅझेटियरच्या मर्यादेपलिकडे जाऊन इतिहासाचा साकल्याने वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाच्या अशा नेटक्या नोंदी कोणत्याही सृजनशील लेखकासाठी, अभ्यासकासाठी किंवा कोणत्याही विचारी माणसासाठी उपलब्ध असणे ही मोलाची बाब असते. त्या दृष्टीने हे काम अमूल्य स्वरुपाचे आहे.

प्रा. पठारे पुढे म्हणाले, इतिहासापासून धडा घेऊन पुढे जाण्याची भूमिका सजग समाजाने घ्यायला हवी. जातीपातीच्या अथवा कोणत्याही भेदांच्या पलिकडला विचार त्यामध्ये केला जायला हवा. इतिहास जतन करण्याची आपली परंपरा नाही. मुस्लीम चढायांनंतर आपण खबरींच्या आधारावर ‘बखरी’ लिहिल्या. वस्तुनिष्ठ नोंदी त्यानंतरच्या कालखंडात करण्यात येऊ लागल्या. खरे तर इतिहास नोंद करीत असताना त्यात पक्षपात असता कामा नये. प्रत्यक्षात मात्र इतिहास एक तर जेत्यांच्या नोंदींचा असतो किंवा कोणत्या तरी एका बाजूला झुकलेला असतो. डॉ. पवार यांनी मात्र आपल्या इतिहास लेखनामध्ये निष्पक्षपाती नोंदींना, वस्तुनिष्ठतेला सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे. हे त्यांचे इतिहास लेखनाला फार मोठे योगदान आहे.

प्रास्ताविकामध्ये डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या पंचखंडात्मक इतिहास लेखनामागील इतिहास थोडक्यात विषद केला. तसेच या प्रकल्पाचे महत्त्वही स्पष्ट केले. ते म्हणाले, वीस वर्षांपूर्वी अरुण टिकेकर यांनी पुणे शहराचा साद्यंत इतिहास दोन खंडांत लिहीला. तो पाहिल्यानंतर अशा स्वरुपाचे काम कोल्हापूरच्या इतिहासाच्या संदर्भातही करता येणे शक्य असल्याची जाणीव झाली. सन २००५मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी अशा स्वरुपाचे काम आपण हाती घ्यावे, अशी सूचना केली. शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी त्याला सर्वोतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यामधून हा प्रकल्प साकार होतो आहे, अशी कृतज्ञ भावना त्यांनी व्यक्त केली.

डॉ. पवार पुढे म्हणाले, ‘कोल्हापूर: ऐतिहासिक व प्राकृतिक’ या खंडामध्ये कोल्हापूरच्या सुमारे २५०० वर्षांच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यात आला आहे. विविध विषयतज्ज्ञांनी १७ लेखांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या प्राचीन व मध्ययुगीन इतिहासासह प्राकृतिक इतिहासाचाही वेध घेतला आहे. यामध्ये ब्रह्मपुरी, करवीर नावाची व्युत्पत्ती, कोल्हापूरचे कोट, जिल्ह्यातील किल्ले, शिवकाळ, महाराणी ताराबाई, करवीरकर महाराणी जिजाबाई, १८५७ चा स्वातंत्र्यलढा आणि चिमासाहेब महाराज, करवीर रियासत, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती घराण्यातील कुलाचार, संस्थानातील स्वातंत्र्यलढा, कोल्हापूर भूगोल, वनस्पतीसंपदा, प्राणिसंपदा आणि पक्षीसंपदा या विषयांवरील लेखांचा समावेश सदर खंडात आहे. यापुढील खंडांमध्ये साहित्य, सामाजिक आणि कृषी, उद्योग व सहकार या विषयांच्या इतिहासाचा समावेश असेल, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी डॉ. पवार यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू तथा इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. आप्पासाहेब पवार यांचे डॉ. जयसिंगराव पवार हे विद्यार्थी असून आप्पासाहेबांच्या विचार व कार्याचा वसा आणि वारसा अत्यंत जबाबदारीने त्यांनी आपल्या खांद्यावर वाहिला आहे. सन २००७ पासून आजतागायत विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक म्हणून सेवाभावी पद्धतीने ते कार्यरत आहेत. कोल्हापूरच्या पंचखंडात्मक इतिहासाचे काम अधिक गतीने मार्गी लागण्यासाठी डॉ. पवार यांनी त्यांचा आराखडा तयार करून विषयतज्ज्ञांची निवड करावी आणि त्यांच्या लेखन जबाबदाऱ्यांचेही वाटप करावे, अशी सूचना त्यांनी केली. डॉ. पवार यांनी पहिल्या खंडासाठी लिहीलेल्या अत्यंत अभ्यासपूर्ण अशा प्रस्तावनेचे विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन करावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानाचे आणि त्या अभियानाअंतर्गत इतिहास वाचनसंस्कृती विकासामधील डॉ. पवार यांच्या साहित्याचे महत्त्व विषद केले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कोल्हापूर शहरातील अनेक मान्यवर, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading