December 8, 2022
Poverty not remain in Mahalaxmi residence village
Home » महालक्ष्मीचे वास्तव्य असणारा गाव दरिद्री कसा असेल ?
विश्वाचे आर्त

महालक्ष्मीचे वास्तव्य असणारा गाव दरिद्री कसा असेल ?

ज्या गावांमध्ये अशी लक्ष्मीची देवस्थाने आहेत ती गावे दुर्गम कशी असू शकतील. आरोग्याचा प्रश्नही यामुळे मिटू शकेल. जमीनदारांच्या तावडीतून गोरगरिबांच्या जमिनीही सोडविता येणे शक्य आहे. त्यांचा ससेमिराही कमी करता येणे शक्य आहे. ही निर्धन गावे पुन्हा सधन करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. महालक्ष्मीची सधन गावे निर्धन कधीही होणार नाहीत. हा विश्वास जोपासायला हवा.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

पैं निर्धना घरीं वानिवसे । महालक्ष्मीचि येऊनि बैसे ।
तयातें निर्धन ऐसें । म्हणों ये काई ।। ३६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा

ओवीचा अर्थ – दरिद्री पुरुषाच्या घरी सहज कौतुकाने महालक्ष्मीच येऊन बसेल तर, त्याला दरिद्री असे म्हणतां येईल काय ?

एका गावात जानेवारी उजाडले की पाण्याची टंचाई सुरू व्हायची. उन्हाळ्यात तर खडखडाट असायचा. दरवर्षी पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीत भरच होत होती. गावातील फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर होत्या. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य विचारात घेता महिलांना अनेक आजार जडले होते. लांबलांबून पाणी आणून महिलांना, मुलांना अंगदुखीचा त्रास जडला होता. कूपनलिका ओढून कुणाची कंबर तर पाण्याची घागर घेऊन मानेला दुखापती झाल्या होत्या. दुष्काळ पडला की गावातील जमीनदार मंडळींना मात्र आनंद व्हायचा. गोरगरिबांच्या जमिनी गहाण ठेवून त्यांची लुबाडणूक करण्यावर त्यांचा भर होता. महिलांकडेही तिरक्या नजरेने पाहिले जायचे. आता हा अत्याचार असह्य झाला होता. साऱ्या महिलांनी या विरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेतला. एकत्र येऊन विचारविनिमय सुरू झाला. पण प्रश्नाचे उत्तर काही मिळेना. कूपनलिका खोदल्यात पण त्यांनाही पाणी नाही. दूरच्या नदीवरून पाणी आणले आहे; पण वीज न भरल्याने ही पाणी योजनाही बंद अवस्थेत पडली होती. दुष्काळी परिस्थितीने गावचे उत्पन्न नसल्याने गावाकडे वीज बिल भरण्यासही पैसेही नाहीत अशी अवस्था होती.

करायचे तरी काय? आड आटलेत. विहिरी आटल्यात. पाण्याने बागा जळाल्यात. उत्पन्न नाही. गावातील व्यवहार थंडावलेत. अशा परिस्थितीत महिलांचे हे उपोषण सुरू झाले होते. ही बातमी आता राज्यभर पसरली होती. हंडा मोर्चा जिल्हा मुख्यालयावर पोहोचला होता. पण ही काय एकाच गावची समस्या नव्हती. जिल्ह्यात अशी अनेक गावे होती. डोंगरकपारीत वसलेल्या या सर्वच खेड्यांची परिस्थिती सारखीच होती. प्रश्न सुटणार कसा? ग्रामदेवतेच्या मंदिरातील हे उपोषण सुटावे यासाठी साक्षात महिला जिल्हाधिकारी तेथे आल्या. ग्रामदेवतेचे मंदिर होते डोंगरावर. गाव वसला होता खाली. पण महिलांचे आंदोलन सुटावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः देवस्थानला भेट देण्याचा निर्णय घेतला. या महिला जिल्हाधिकारी मंदिरा जवळ पोहोचल्या. डोंगर कपारीत बसलेले हे मंदिर अनेक शिल्प कलाकृतींनी सजलेले होते. परिसर निसर्गरम्य होता. हिरवीगार वृक्षाची सावली परिसराला गारवा देत होती. या परिसराव्यतिरिक्त गावात अन्यत्र ठिकाणची झाडे पाण्याअभावी मरू लागली होती.

महालक्ष्मीच्या मंदिराच्या दारात प्रवेश करताच उपोषणाला बसलेल्या महिलांनी त्यांचे स्वागत केले. थकलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना पाणी आणून दिले. पाणी पिऊन तृप्त झालेल्या या महिलांचा प्रश्न सोडविण्याचा त्यांनी निश्चय केला. महिलांना आश्वासन त्यांनी दिले. पण हा प्रश्न सोडविणार कसा, हा सर्वांत मोठा प्रश्न होता. आश्वासन देणे सोपे असत; पण आश्वासन पाळणे महाकठीण असते. देवीच्या दारात आश्वासन दिले होते. ते पाळावे तर लागणारच होते. पण प्रश्न सोडवायचा कसा? शेवटी जिल्ह्याधिकाऱ्यांनी देवीलाच साकडे घातले. देवी तुझ्या दारातच मी या महिलांना आश्वासन दिले आहे खरे; पण हा प्रश्न सोडवायचा कसा हाच मोठा प्रश्न आहे.

देवी म्हणाली, अगं सोपं आहे. तू माझ्या इथे आल्यावर किती गोड पाणी पिऊन तृप्त झालीस हे पाणी येथे आले कोठून याचा तर विचार केलास तर तुझा हा प्रश्न कायमचा सुटेल. भारतात जेवढी जेवढी पुरातन मंदिरे आहेत. ग्रामदैवते आहेत तेथे सर्वत्र पाण्याचे जिवंत झरे आहेत. देवाच्या दारात कधीही पाण्याची कमतरता नाही. कोठेही दुष्काळ नाही. ही देवस्थाने जप. हे नैसर्गिक पाण्याचे स्रोत जप आयुष्यात कधीही कोठेही पाण्याची कमतरता भासणार नाही. त्या महिला जिल्हाधिकाऱ्यांनी डोळे उघडले. साक्षात देवीने हा दृष्टांत दिला होता.

देवीचे ते रूप पाहून त्या महिला अधिकाऱ्यांचे डोळेही पाण्याने भरून आले. पाण्याचा स्रोत मिळाला होता. प्रश्नाला उत्तर मिळाले होते. अधिकाऱ्यांनी ताबडतोब त्या जिवंत स्रोतांतून गावात पाणी आणण्याची योजना आखली. ग्रामदैवत उंच डोंगरात होते. तेथून थेट सायफन पद्धतीने पाणी गावच्या पाण्याच्या टाकीत आणण्यात आले. गावाला चोवीस तास पाण्याचा पुरवठा झाला. उन्हाळा असो पावसाळा असो पाण्याची चिंता मिटली. पाणी सायफनने आणल्याने विजेची गरजच राहिली नाही. वीज नाही म्हणून पाणी नाही हा प्रश्नही मिटला. विजेचे बिल भरण्यासाठी कर वसुलीची गरजही भासत नाही. पाणीपट्टीच शून्य झाली.

देवीने साक्षात प्रत्येकाच्या दारात पाण्याची सोय केली होती. जिवंत झऱ्यातील त्या गोड पाण्याने साऱ्या गावात चैतन्य निर्माण झाले. त्या पाण्याच्या वापरावर घरोघरी परसबागा फुलल्या. घराला लागणारा भाजीपाला प्रत्येकाच्या दारातच पिकू लागला. बारमाही भाजीची सोय झाली. उत्पन्न वाढले. काहींनी जनावरे पाळली. दुग्ध व्यवसाय सुरू झाला. मुलाबाळांना ताज्या भाजीपाल्याबरोबरच अमाप दूधही मिळू लागले. कुपोषणाचा प्रश्न मिटला. जनावरांच्या शेणावर गोबर गॅस घरोघरी तयार झाला. इंधनाचा प्रश्नही मिटला. विजेची टंचाईही संपली. गोबरगॅसवर बत्ती चालू लागली. असे स्वयंपूर्ण खेडे उदयास आले.

प्रत्येकाच्या दारात दिवाळी साजरी होऊ लागली. प्रत्येकाच्या घरात महालक्ष्मी साक्षात नांदू लागली. अशी ही महालक्ष्मी प्रत्येकाच्या दारात आहे. प्रत्येकाच्या घरात नांदते आहे. ज्या गावाची ग्रामदेवता साक्षात महालक्ष्मी आहे त्या गावात लक्ष्मी नाही असे कधीही होणार नाही. देवळातली लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात कशी नांदेल याचा विचार हा प्रत्येकाने करायला हवा. महालक्ष्मीचा गाव निर्धन कसा असेल? श्रद्धा आणि भक्ती असेल तर निश्चितच तेथे देवाचे वास्तव्य राहते. डोंगरकपारीतील गावात वसलेल्या या गावांचा असा विकास निश्चितच करता येणे शक्य आहे. ज्या गावांमध्ये अशी लक्ष्मीची देवस्थाने आहेत ती गावे दुर्गम कशी असू शकतील. आरोग्याचा प्रश्नही यामुळे मिटू शकेल. जमीनदारांच्या तावडीतून गोरगरिबांच्या जमिनीही सोडविता येणे शक्य आहे. त्यांचा ससेमिराही कमी करता येणे शक्य आहे. ही निर्धन गावे पुन्हा सधन करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. महालक्ष्मीची सधन गावे निर्धन कधीही होणार नाहीत. हा विश्वास जोपासायला हवा.

Related posts

प्रेम करा आनंदी जीवनासाठी…

विश्वरुपाचे उग्ररुप..

अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । चोख तरी तोचि भांडारी कीजे । (एकतरी ओवी अनुभवावी)

Leave a Comment