February 5, 2023
Dada Jadhavrao Purandar happy birthday special
Home » मराठेशाहीचा वारसा लाभलेला पुरंधरचा लोकशाहीतला वीर!
काय चाललयं अवतीभवती

मराठेशाहीचा वारसा लाभलेला पुरंधरचा लोकशाहीतला वीर!

सुरसिंह उर्फ दादा जाधवराव दिवे घाटाजवळच्या त्यांच्या वाडवडिलांपासूनच्या ऐतिहासिक वाड्यावर निवांत असतात. कालच्या ९ जुलैला त्यांनी वयाची ८७ वर्षं पूर्ण केली. या निमित्तानं त्यांच्या वाड्यावर गेलो होतो.

सुकृत करंदीकर, पुणे

“बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवायचा असतो,” असं माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार पुरंदर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सन २००४ मध्ये बोलून गेले. पुरंदरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत ते बोलत होते. आमदारकीची निवडणूक होती. पवार ज्यांना उद्देशून बोलले ते होते सुरसिंह उर्फ दादा जाधवराव. ‘म्हातारा बैल’ म्हणून पवार ज्यांची संभावना करत होते त्या दादा जाधवरावांचं वय त्यावेळी होतं ६९ वर्षांचं. विशेष म्हणजे पवारही तरुण नव्हतेच. ते होते त्यावेळी ६४ वर्षांचे म्हणजे दादांपेक्षा फक्त पाच वर्षांनी लहान होते. राजकारणात हे चालतं.

पण पवारांनी ‘म्हातारा’ म्हटलं ते त्यांच्या वयामुळं नव्हे.

पुणे जिल्ह्यातला पुरंदर विधानसभा मतदारसंघ पवारांच्या राजकीय वर्चस्वावर मात करत आजवर वाटचाल करत आला होता. चारदा मुख्यमंत्री राहिलेल्या पवारांनी अनेकवार प्रयत्न करूनही जाधवरावांनी पुरंदर त्यांच्या हाती कधी लागू दिला नव्हता. आधीच्या कॉंग्रेस आणि १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत सन १९७२ पासून जाधवरावांनी एकदा-दोनदा नव्हे सहा वेळा पुरंदर जिंकले. पवारांच्या विरोधात उभं राहून तीस वर्षे आमदार होणे ही सोपी बाब नाही. तीही पुणे जिल्ह्यात. बारामतीला खेटून असलेल्या पुरंदर विधानसभा मतदारसंघातून. ही बोच पवारांच्या मनात होती. त्याचा वचपा काढण्यासाठी पवार बोलले होते. २००४ च्या निवडणुकीत पवारांनी जाधवरावांवर जहरी टीका केली. त्याचा परिणाम झाला. सत्तरीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या दादा जाधवरावांचा निसटता पराभव झाला. त्यांचं सक्रिय राजकारण संपुष्टात आलं.

आता जाधवराव दिवे घाटाजवळच्या त्यांच्या वाडवडिलांपासूनच्या ऐतिहासिक वाड्यावर निवांत असतात. कालच्या ९ जुलैला त्यांनी वयाची ८७ वर्षं पूर्ण केली. या निमित्तानं त्यांच्या वाड्यावर गेलो होतो.

पुण्याकडून दिवे घाट चढून गेल्यानंतर थोड्याच अंतरावरचा डाव्या हातचा वळणदार रस्ता जाधवरावांच्या वाड्यावर घेऊन जातो. दाट झाडीनं हा वाडा वेढलेला आहे. तिथं चिंचेची शे-दोनशे वर्षं जुनीपुराणी झाडं स्वागताला उभी असतात. सन १९५७ मध्ये आलेला ‘नया दौर’ हिंदी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरला. दिलीप कुमार-वैजयंतीमाला यांच्या या सुंदर चित्रपटाचं बरचसं चित्रीकरण याच परिसरात झालेलं आहे.

दिवे ग्रामपंचायत चाळीस वर्षं ताब्यात ठेवणारा, ऐतिहासिक पुरंदर मतदारसंघाचे आमदार म्हणून तीस वर्षे विधिमंडळात जाणारे म्हणून दादा जाधवराव यांच्याबद्दल अपार कौतुक आहे. पंतप्रधान पेशव्यांच्या नेतृत्त्वात मराठेशाहीची पताका उत्तरेत फडकवणाऱ्या पिलाजीराव जाधवराव यांचे थेट वंशज हाही एक आदराचा धागा आहेच. दादांच्या दिवाणखान्यात पिलाजीरावांचं छायाचित्र होतं. त्यावरूनच गप्पा सुरु झाल्या.

“आमचे पूर्वज पिलाजीराव मुळचे कोकणातले. महाड जवळच्या गावातून पुण्यात आले. पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत त्यांनी तलवार गाजवली. पहिल्या बाजीरावांपेक्षा वयानं ते मोठे होते. त्यामुळं बाजीराव, चिमाजीअप्पा हे बंधू त्यांना ‘काका’ म्हणून संबोधत. पहिल्या बाजीरावांसोबत त्यांनी उत्तर हिंदुस्थानात अनेक भराऱ्या मारल्या होत्या.” पिलाजीरावांनी पुणे परिसरात वसण्यासाठी पुरंदरची निवड केली. “माझ्या घोड्याच्या टापेला चिखल लागू नये अशी जागा द्या,” असं म्हणत त्यांनी बाजीरावांकडून सासवडजवळची जागा घेतली, असं दादा म्हणाले. कोकणातील पिलाजीराव सासवडजवळ कसे आले त्याचं उत्तर मिळालं.

बुंदेलखंडाच्या राजा छत्रसालानं मोगलांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी बाजीरावाला साद दिली. ती ऐकून बाजीरावही सुसाट वेगानं त्यांच्या मदतीला धावला. पिलाजीराव त्यांच्या सोबत होते. छत्रसालाचं स्वातंत्र्य मराठ्यांनी अबाधित राखलं. त्यानंतर छत्रसालानं मस्तानीशी पाट लावण्याची विनंती बाजीरावाला केली. अनेक सुमार, बाजारू लेखक-दिग्दर्शकांनी कादंबऱ्या-चित्रपटांमधून ‘बाजीराव-मस्तानी’ची कथा अतिरंजित आणि विकृत पद्धतीनं रंगवून ठेवली आहे. कधी शत्रुला पाठीवर घेऊन तर कधी शत्रुचा जीवतोड पाठलाग करत वर्षातून चारदा उत्तर-दक्षिण हिंदुस्थानात घोड्यावरून वेगवान प्रवास करणाऱ्या बाजीरावाची प्रकृती इष्कबाजीत रमणारी अजिबात नव्हती, याचे स्पष्ट दाखले इतिहासाच्या पानांवर उपलब्ध आहेत. त्यामुळं छत्रसालानं दिलेला मस्तानीचा प्रस्ताव बाजीरावानं सहजपणे नाकारला होता.

जाधवराव सांगत होते, “बाजीराव मस्तानीशी विवाह करुन तिला पुण्यात घेऊन यायला तयार नव्हता. मी विवाहीत आहे. मस्तानीला घेऊन जाणं पुण्याला मानवणार नाही. नको तो नवा ताप, असं त्याचं मत होतं. त्यावेळी पिलाजीराव जाधवरावांनी बाजीरावाचं मन परिवर्तन केलं. पुण्यातून दिल्लीवर वारंवार स्वाऱ्या करायच्या म्हणजे उत्तरेत हक्काचा ठिकाणा हवा. सैन्याची रसद, घोड्यांचा चारा-पाणी, शिलकीतल्या सैन्याची ताकद या सर्व दृष्टीनं बुंदेलखंड योग्य आहे. त्यामुळं बुंदेलखंडी सोयरीक जमवली पाहिजे, असं पिलाजीरावांनी बाजीरावांना सांगितंल. त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवरायांचा दाखला त्यांना दिला.”

छत्रपती शिवरायांनी एकापेक्षा अधिक विवाह केले, यामागं संसारात रमणं, वंश वाढवणं इतके किरकोळ उद्देश नव्हते. त्या काळी समाजमान्य असणाऱ्या प्रथेप्रमाणं राजकीय ताकद वाढवण्यासाठी, विरोध कमी करण्यासाठी त्यांनी मातब्बर घराण्यांशी सोयरीकी जुळवल्या होत्या. पिलाजीरावांनी समजुत काढल्यानंतर, आग्रह धरल्यानंतर बाजीराव मस्तानीशी विवाह करण्यास तयार झाला. पिलाजीरावांनी बाजीरावास म्हटले होते त्याप्रमाणे त्यानंतरच्या उत्तर हिंदुस्थानातल्या अनेक मोहिमांमध्ये बुंदेलखंड मराठ्यांसाठी सुरक्षेचं, निवाऱ्याचं ठिकाण म्हणून कामी आलं.

दादा जाधवराव म्हणाले, “बाजीराव-मस्तानी विवाह जुळवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या पिलाजीरावांची जाण छत्रसालानं ठेवली. त्यानं बुंदेलखंडातली पाच गाव पिलाजीरावांना इनाम दिली. ब्रिटीशांच्या सत्तेनंतर ते सगळं गेलं असलं तरी आजही तिथल्या अनेक सात-बाऱ्यांवर जाधवरावांची नावं दिसतील.”

१९६० पासुनची तीस-चाळीस वर्षे म्हणजे पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र पूर्णतः कॉंग्रेसच्या वर्चस्वाखाली असण्याचे दिवस. यशवंतराव चव्हाणांनी सगळे विरोधक एकतर कॉंग्रेसमध्ये सामावून घेतले किंवा संपवले. वसंतदादा पाटील, शरद पवार यांनी हे राजकारण तसंच पुढं नेलं. पण त्यातही गणपतराव देशमुख (सांगोला), दादा जाधवराव (पुरंदर) असे मोजकेच काही गड शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी विचाराचे झेंडे टिकवून होता.

“ग्रामपंचायतीपासून माझी सुरुवात झाली. १९६७ मध्ये पुरंदरमधून मी आमदारकीची निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता पण त्यावेळच्या ज्येष्ठांना डावलून मला तिकीट नको असं मी म्हणालो. नाहीतर १९६७ मध्येच मी आमदार झालो असतो. १९७२ मध्ये मी पहिली निवडणूक लढवली आणि सहज जिंकलो,” अशी सुरुवात झाल्याचं दादांनी सांगितलं.

“पुरंदरवासीयांनी खूप प्रेम केलं माझ्यावर. मीही नेहमी त्यांच्या सुख-दुःखात सहभागी असायचो. खूप फिरायचो. गावं नी गावं, वाड्या-वस्त्या मी कितीदा पिंजून काढली याचा हिशोब नाही. तरी १९८० मध्ये अगदी थोडक्या मतांनी मी पराभूत झालो. तेही फक्त ‘खरं’ बोललो म्हणून…”

म्हणजे ?

“अहो काय झालं. निवडणूक प्रचारासाठी गावोगाव जायचो. आमच्या इथं राख म्हणून गाव आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी तिथं होतो. गावातली तरूण मंडळी मला भेटली. म्हणाली, गावात देऊळ बांधतोय त्याला देणगी द्या. मी म्हणालो, अरे बाबांनो उद्या मतदान आहे. आज मी देणगी दिली तर त्याचा वेगळा अर्थ होईल. उद्याचं मतदान होऊ द्या, मग लगेच मी देणगी देतो. तरुण हट्टाला पेटले. अडून बसले. मग पावती तरी आज फाडा, असं म्हणू लागले. मी काही ते ऐकलं नाही. मी म्हणालो उद्या मतदान संपल्यावर मी देणगी देतो….झालं. नेहमी मला ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान करणाऱ्या त्या गावातून त्या निवडणूकीत मला मतदान झालं नाही. जेमतेम सहाशे-सातशे मतं कमी पडली आणि माझा पराभव झाला.”

“निवडणूक अधिकारी मला म्हणाले की, दादा तुम्ही फेरमोजणीचा एका ओळीचा अर्ज द्या. आम्ही करतो सगळं अँडजेस्ट. तुम्ही विजयी व्हाल. मी त्याला तयार झालो नाही. मी त्यांना निकाल घोषित करायला सांगितलं. मी आयुष्यातली पहिली निवडणूक हरलो. निकालानंतर राख गावातली लोकं भेटायला आली. चूक झाली म्हणाले. मीही म्हणालो, झालं-गेलं विसरून जाऊ. पुन्हा १९८५ च्या निवडणूकीच चांगल्या मतांनी जिंकून आलो,” दादा आठवण सांगत होते १९८० च्या पराभवाची.

पुरंदरच्या मतदारांनी किती साथ दिली याचं आणखी एक उदाहरण दादांनी सांगितलं.

अशाच एका निवडणुकीत यशवंतराव चव्हाण माझ्या विरोधात कॉंग्रेसच्या प्रचारासाठी येणार होते. पण सभास्थानी लोकांनी त्यांचं हेलिकॉप्टरच उतरू दिलं नाही. वीस-पंचवीस मिनिटं त्यांचं हेलिकॉप्टर हवेत घिरट्या घालत होतं. बापट म्हणून वरीष्ठ पोलिस अधिकारी आमच्या तालुक्यात ड्युटीवर होते. त्यांना या प्रकाराची कल्पना असल्यानं त्यांनी आधीच मला त्या गावातून बाहेर जायला सांगितलं होते. ते चांगले अधिकारी होते. ते म्हणाले की, तुम्ही विजयी होणार आहात. उगाच वेगळं वळण लावू नका. त्यावेळी फोन-मोबाईल नव्हते. मग वायरलेसवरून माझ्याशी संपर्क साधला. मी गावकऱ्यांना आवाहन केलं तेव्हा ते शांत झाले. यशवंतरावांचं हेलिकॉप्टर उतरू शकलं. या प्रकारामुळं यशवंतराव संतापले होते. त्यांनी पाच-सात मिनिटंच भाषण केलं. निघून जाताना त्यांच्या उमेदवाराला रागानं ते इतकंच म्हणाले – “लोकांमध्ये राहायला शिका.”

“१९७८ मध्ये ‘पुलोद’ सरकार राज्यात आलं. या सरकारचं मुख्यमंत्रीपद शरद पवारांकडे द्यायला सगळ्यांचा विरोध होता. कारण आमच्या आमदारांची संख्या ११० पेक्षा जास्त होती. पण एस. एम. जोशी आणि मृणाल गोरे यांनी निर्णय घेतल्यानं सगळ्यांनी तो मान्य केला,” असं सांगून दादा पुढं म्हणाले – शरद पवार माझ्या आधी एक टर्म आमदार झाले असले तरी ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेतलं माझं राजकारण त्यांच्या आधी सुरु झालं. त्यांच्याशी वैचारीक मतभेद होते, व्यक्तिगत नाही. या भागात आले की शरद पवार अनेकदा आमच्या वाड्यावर येत. कधी चहापान, कधी जेवण करून जात. पुरंदर विधानसभा मतदारसंघ हा पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातला. त्यावेळी एक पैसा न घेता मी त्यांचा प्रचार केलेला आहे. पण एका निवडणुकीत मी त्यांच्या विरोधात शंकरराव बाजीराव पाटील यांचा प्रचार केला. त्याचं असं झालं की निवडणूक लागली. पवारांनी काही माझ्याशी संपर्क साधला नाही. पण शंकरराव घरी आले. त्यांनी पाठिंबा मागितला. मी त्यांचा प्रचार सुरु केला. त्यानंतर शरद पवार माझ्याशी बोलले. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, की तुम्ही निवडून याल पण मी आता शब्द दिलाय शंकररावांना. मी त्यांचाच प्रचार करणार.

२००४ च्या निवडणुकीत पवारांनी दादा जाधवराव यांच्या पराभवासाठी जंग जंग प्रयत्न केले होते. त्याच पवारांना त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात दुर्धर, कठीण प्रसंगी दादा जाधवरावांची आठवण आली. दादा सांगत होते, “शरद पवारांना कर्करोगाचं निदान झालं, त्यावेळी त्यांच्या भेटीला गेलो होतो. त्यांनी बसवून ठेवलं मला. तीन-चार तास त्यांच्या सोबत होतो. आयुष्यात पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यात पाणी पाहिलं.” पवारांच्या विरोधात ठामपणे उभं राहात सहावेळा आमदार होणारे दादा जाधवराव इतका वेळ पवारांसोबत आत काय करताहेत, याची उत्सुकता बाहेरच्यांना लागून राहिली होती. दादा बाहेर आल्यावर अनेकांनी त्यांना विचारलंही. दादांनी त्यांना काही सांगितलं नाही. राजकारणात आपले कायमचे आपले नसतात. परके कायम परके नसतात. सातत्यानं विरोधी बाकांवर बसायचं, सत्तेची-लाभाची पदं नशिबी नाहीत तरीही पुरंदरचा विरोधी विचारांचा किल्ला तीस वर्षं केवळ स्वतःच्या ताकदीवर लढवणाऱ्या दादा जाधवरावांबद्दल पवारांनाही मनातून आदर नक्कीच असणार. पवारांनी बारामतीमध्ये बसून अनेक करामती केल्या. भल्याभल्यांना पाडलं, नवख्यांना मोठं केलं. पण बारामतीला खेटून असणाऱ्या पुरंदरमध्ये दादा जाधवरावांचा पराभव करण्यासाठी त्यांना तीस वर्षं थांबावं लागलं. स्वतःच्या राजकीय आयुष्यात एकही पराभव न पाहिलेल्या शरद पवारांनी दादा जाधवरावांबद्दल जाहीरपणे आदर व्यक्त न करणं ही पवारांची राजकीय भूमिका असू शकते. पण पुरंदरच्या या शिलेदाराला मनोमन ते नक्कीच सलाम करत असतील.

वयाच्या नव्वदीकडं प्रवास करणाऱ्या दादा जाधवरावांनी १९७२, १९७८, १९८५, १९९०,१९९५, १९९९ अशा विधानसभेच्या सहा निवडणुका सहजी जिंकल्या. एस. एम. जोशी, मधु दंडवते यांच्या आचारविचारांशी सलगी राखली. रामभाऊ म्हाळगी, कृष्णराव धुळप, दि. बा. पाटील, गणपतराव देशमुख अशा त्यांच्यासारख्याच एकांड्यांशी त्यांचे सूर विधीमंडळात जुळले. सत्तेसाठी, पैशांसाठी तडजोड न करता विचारांशी ठाम राहणारी ही मंडळी होती. त्या राजकारणाला पहिला सुरुंग महाराष्ट्रात ‘पुलोद प्रयोगा’ने लागला होता. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची ती सुरुवात होती. सन २०२२ मध्ये तीने आणखी उंची (खरं म्हणजे खोली) गाठली आहे. वयानं विस्मरणाचा शाप दिला असला तरी खुललेल्या गप्पांमध्ये दादांनी त्यांचा काळ प्रयत्नपूर्वक जागवला. आजच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर तो मन प्रसन्न करून गेला.

Related posts

साहित्यनिर्मिती मागील प्रेरणा सांगणारा ग्रंथ

कोमसापतर्फे वाङ्मय पुरस्कारासांठी आवाहन

यंदा तांदुळ अन् उसाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज

Leave a Comment