जन्माने ज्यू, मुस्लिम तरूणाशी लग्न अन् मराठीत कायम मग्न असे त्यांचे व्यक्तित्व आहे. त्यांचे संपूर्ण नाव यास्मिन अझीझ अहमद शेख असून पूर्वाश्रमीच्या त्या जेरूशा जॅान रूबेन आहेत. ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांनी त्यांच्या लग्नासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या वडिलांची नोकरी फिरतीची असल्याने त्यांचे शालेय शिक्षण नाशिक, व नंतर पंढरपूरच्या आपटे प्रशालेत झाले. तेथे त्यांना मराठीची आवड निर्माण झाली.
व्याकरण सल्लागार प्रा. यास्मिन शेख यांनी २१ जून २०२४ ला आयुष्याची शतकी वाटचाल करणाऱ्या शंभरीत पदार्पण केलेल्या शेख बाईंना पहाण्याचा, भेटण्याचा, सोहळ्याला उपस्थित राहून त्यांचे आशीर्वाद घ्यायचा व त्यांचे विचार ऐकायचा योग आम्हांला आला. त्यांचा हसऱ्या सुरकुत्यांनी भरलेला गोरापान नितळ चेहरा, बोलके डोळे, हसरे व शांत व्यक्तिमत्व, शंभरीतही टवटवीत स्मरणशक्तीने हृदयात स्थान निर्माण केले. त्यांच्याकडे पाहाताच त्या संपूर्ण आयुष्य सकारात्मक पध्दतीने व आनंदाने जगल्या हे लक्षात आले. ‘धर्म, जात, पंथ एक, मानतो मराठी’ मानवता व माणुसकी हाच खरा धर्म मानणाऱ्या विदुषीला जवळून पहाता आलं यापेक्षा मोठे भाग्य नाही. ‘मराठी अचूक लिहा हा संदेश देत ‘यास्मिन शेख -मूर्तीमंत मराठीप्रेम’ हा त्यांचा गौरव ग्रंथही प्रकाशित झाला. त्यांनी त्यांच्या दोन मुलींना मराठी माध्यमात शिकवले पण आज मराठी शाळा बंद होत आहेत, पालक मुलांना इंग्रजी माध्यमातच घालतात याची त्यांना खंत आहे.
आपल्या समाजात एखादी व्यक्ती जात, धर्म, पंथ हे सारं विसरून आयुष्यभर मराठीची सेवा करते ही गोष्ट जाहीरपणे अभिमानाने सांगावी अशीच आहे. मराठीवर प्रेम करणाऱ्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भाषाशास्त्र आणि व्याकरणाचं संचित त्यांनी हयातभर वाटले, आजही वाटत आहेत. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’, ‘मराठी शब्दलेखात कोश’ यासारखी अनेक पिढ्यांना पुरून उरेल अशी पुस्तकांची शिदोरी दिली. बालभारतीच्या काही पुस्तकांवर त्यांचे नाव वाचले होते. पण त्यांचा जास्त परिचय झाला तो मराठीतील एक दर्जेदार मासिक ‘अंतर्नाद’ मुळे. या मासिकाचे सलग २० वर्ष त्यांनी व्याकरण सल्लागार व मुद्रित शोधक म्हणून काम पाहिले. अनेक पुस्तके त्यांनी आवडीने व आस्थेने मुद्रित शोधन करून दिली.
मातृभाषा मराठी हे त्या अभिमानाने सांगतात. याविषयीचा एक किस्सा त्यांनी सांगितला. जनगणना करायला महापालिकेचे लोक आले असताना त्या फॅार्ममधे मातृभाषा मराठी असं त्यांनी सांगितले. तर ‘कसं शक्य आहे.? तुम्ही उर्दू सांगायला हवं.’ असे तो म्हणाला. यावर बराच वाद करून त्यांनी मराठी लिहायला भाग पाडले. मराठीवर त्यांचे नितांत, निर्व्याज, निर्मळ प्रेम. महाराष्ट्रात राहाणाराला, जन्मलेल्या प्रत्येकाला मराठी लिहिता, वाचता व अचूक बोलता आलीच पाहिजे. मराठीला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे. त्यांचे मराठीसाठी जगणे हे अभिमानास्पद व अनुकरणीय आहे.
वयाची ९९ पूर्ण केली तरीही आजही त्या उत्साही व आनंदी आहेत. गुलाबाच्या फुलाची उपमा त्यांना सारेजण देतात इतक्या त्या टवटवीत आहेत. विशेष म्हणजे आजही त्या बिना चष्म्याचे वाचतात, त्यांचे कान व दात अजूनही उत्तम आहेत यांचे आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. जन्माने ज्यू, मुस्लिम तरूणाशी लग्न अन् मराठीत कायम मग्न असे त्यांचे व्यक्तित्व आहे. त्यांचे संपूर्ण नाव यास्मिन अझीझ अहमद शेख असून पूर्वाश्रमीच्या त्या जेरूशा जॅान रूबेन आहेत. ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांनी त्यांच्या लग्नासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या वडिलांची नोकरी फिरतीची असल्याने त्यांचे शालेय शिक्षण नाशिक, व नंतर पंढरपूरच्या आपटे प्रशालेत झाले. तेथे त्यांना मराठीची आवड निर्माण झाली. शालेय जीवनातच त्यांना स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव झाली.
तुम्ही देशस्थ की कोकणस्थ?’
त्यांना एका मुलीने नाव विचारले तर त्या म्हणाल्या, ‘जेरूशा’. यावर ती म्हणाली, ‘असलं कसलं नाव?’ त्या प्रचंड गोऱ्यापान, सुंदर, हसमुख त्यामुळं असंच एकदा वर्गातील ब्राह्मण मुलीनं विचारलं, ‘तुम्ही देशस्थ की कोकणस्थ?’ यावर त्या म्हणाल्या, ‘दोन्हीही’. ‘माझी मम्मा कोकणातली व वडील देशावरचे म्हणून दोन्हीही.’ हे सांगताना त्या आजही हसतात.
आपल्याकडे आजही कोणत्याही विषयात कितीही विद्वत्ता कमावली. नाव कमावले तरीही जात व धर्म शोधणे सुरूच आहे. पण आपण शेखबाईंचे जगणे, वागणे, अनुभव ऐकले तर चकित होऊन जातो. महाराष्ट्रात राहिल्याने मराठीतच बोला व वाचा तेही अचूक हा प्रचार प्रसार त्यांनी कायम केला. इतकेच नव्हे तर त्यांचे वडील व आईसुध्दा भरपूर वाचायचे. त्यांचे घरी प्रचंड मराठी ग्रंथसंपदा. आपण मोठमोठ्या लेखकांची नावे आज ऐकतो त्या प्रा. श्री. म. माटे हे त्यांचे स. प. महाविद्यालयातील मराठीचे शिक्षक, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, नाथमाधव अशा नामवंत लेखक त्यांनी वाचलेले. पूर्ण मराठमोळ्या संस्कृतीत त्यांचे बालपण गेले.
बी. ए. बी.टी. व एम. ए. पूर्ण झाल्यावर त्यांनी औरंगाबाद येथे २ वर्ष अध्यापन केले. नंतरची २५ वर्ष त्यांनी मुंबईच्या शीव येथे एस. आय.ई.एस. या महाविद्यालयात मराठीचं अध्यापन केलं. निवृत्तीपूर्वी ६ वर्ष त्यांनी तेथे मराठी विभागप्रमुखाचा पदभार सांभाळला. त्यानंतरची १० वर्ष त्यांनी आय.ए.एस. च्या विद्यार्थ्यांना व्याकरण व भाषाशास्त्र शिकवले.
त्या सुरूवातीला जेव्हा नोकरीला लागल्या तेव्हाच्या गंमती सांगताना त्या खूप आनंद घेतात. मराठी शिकवायला शेख बाई म्हटलं की, मुलं म्हणत, या आणि मराठी ? संतसाहित्य या कसं शिकवणार ? आता त्या बुरखा घालून येणार का ? वगैरे. परंतु त्यांनी जरी मुस्लीम माणसाशी लग्न केले तरीही मुस्लीम धर्म स्वीकारायची सक्ती त्यांना झाली नाही. त्यांनी कधीच बुरखा घातला नाही. त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी पुरोगामी होती. अहमद शेख यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंतिम इच्छेनुसार वैकुंठात दहन करायचे होते. मुस्लिम परंपरेप्रमाणे दफन नाही. तेव्हा मनपा अधिकाऱ्यांशी बराच वाद करून त्यांचे वैकुंठात दहन केले. तसेच त्यांच्या आंतरधर्मीय विवाहाचा वारसा पुढे त्यांच्या दोन मुलींनीही चालवला. मानवता धर्म सोडून त्या कोणताच धर्म मानत नाहीत. हा आदर्श आज आपण सर्वांनीच घेण्याची गरज आहे.
परंतु त्यांना शेख आडनावामुळे काही कटू प्रसंगांचा सामना करावा लागला. पंढरपूरला विठ्ठल मंदिर पहाण्यासाठी त्या कुटुंबियांसमवेत गेल्या होत्या. त्यांचा रंग व कपडे यावरून स्थानिक पुजाऱ्यांना लक्षात आले की या हिंदू नाहीत. त्याने प्रतिबंध केला. समाजात अशा विषमतावादी प्रथा आहेत याची जाणीव त्यांना बालपणीच झाली. निवृत्तीनंतर पुण्यात फ्लॅट घेताना शेख आडनाव समजताच बिल्डरने फ्लॅट उपलब्ध नाही असे सांगितले. अशा काही कटू आठवणी आहेत पण त्यांनी याविषयी मनात कधीच कटुता ठेवली नाही.
त्यांची नव्वदी साजरी केली तेव्हा डॅा. दत्तप्रसाद दाभोळकर म्हणाले होते की, ‘’नाइंटी तो झॅांकी है । सेंच्युरी अभी बाकी है ।’’ पण आज शंभरीत पदार्पण करतानाही त्या अतिशय शांत, संयमी, कार्यरत आहेत. आता त्या मुलीसोबत राहातात तरीही त्या म्हणतात, ‘मी एकटी आहे असं एक मिनीटही वाटत नाही. मी साठीनंतरच्या लोकांना हेच सांगेन की, दुःख कुरवाळत बसू नका. दुःख तर असंतच; पण आनंदही असतो. मला काय दुःख नव्हती का ? वेदना नव्हत्या का ? होत्या. पण तेच कुरवाळत बसायचं का ? जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघा. स्वतःला आवडीच्या कामात गुंतवा. कामाचा आनंद घ्या. मला लहानपणापासून ‘हसरी जेरूशा’ म्हणायचे. आजही लोकांना असं वाटत नाही की, आता या म्हातारीला कशाला भेटायला जायचं?’ मला वाटतं जगणं असं हवं. एक वेगळाच आदर्श शेखबाई आपल्या जगण्यातून आपल्याला देतात.
‘’भाषेला धर्म नसतो. भाषेला जात नसते. मराठी माझी मातृभाषा आहे. माझं माझ्या भाषेवर जिवापाड प्रेम आहे. मराठी भाषा फक्त हिंदूंची नाही. ती महाराष्ट्रात जन्मलेल्या, तेथे वास्तव्य करणाऱ्या सर्वांची भाषा आहे. आपण माणसं आहोत आणि माणुसकी हा आपला एकमेव धर्म आहे, असं जर आपण स्वीकारलं, तर मानवी समाज किती सुखी होईल नाही? ’’ असा विचार आजही त्या मांडतात.
प्रा. यास्मिन शेख यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. अचूक मराठी लिहिणे, वाचणे व बोलणे यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत. त्यांना शंभरीतील पदार्पणाच्या भरपूर शुभेच्छा..!
ॲड. शैलजा मोळक
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.