ज्यांनी जात नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत, तेच साहित्यिक आज जातीनुसार संमेलने आयोजित करीत आहेत.
प्रेमानंद गज्वी,
अध्यक्ष- साहित्य विचार आणि सन्मान संमेलन
समाज असतो म्हणून साहित्याची निर्मिती होते’ असा विचार प्रमाण मानून समाज साहित्य प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) दरवर्षी सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक यांना पुरस्कार देऊन गौरविते. यावर्षीचा हा साहित्य विचार आणि सन्मान सोहळा ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी येथे संपन्न झाला. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, गोवा आणि तळकोकण या भागातील चोखंदळ साहित्य रसिकांचा या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला.
प्रेमानंद गज्वी
ज्यांनी जात नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत, तेच साहित्यिक आज जातीनुसार संमेलने आयोजित करीत आहेत, ही अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी घटना आहे. कलावंत आणि साहित्यिक समाज व देश वैचारिक दृष्ट्या एक, एक पाऊल पुढे घेऊन जात असतात. राजकारणाने त्यांना साथसोबत करणे अपेक्षित असते. मात्र अलीकडले सत्ताधारी लोक समाजाला आणि देशाला मागे घेऊन जात आहेत. आजच्या सत्ताधाऱ्यांनी देशाला अनेक वर्ष मागे नेले. विद्यमान पंतप्रधानांचा यात खूपच वरचा नंबर लागेल.
सुबोध मोरे
इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार माझ्या कामाला देण्यात आला, यापेक्षा माझा दुसरा मोठा सन्मान नाही. मी सतत रस्त्यावरच्या लोकांसाठी संघर्ष करत राहिलो आणि अशा लोकांचं लेखन करणाऱ्या लेखकांनाही समाज साहित्य प्रतिष्ठान पुरस्कार देऊन गौरविते या मागची समाज साहित्य प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची दृष्टी कौतुक करावी अशीच असून अशी दृष्टी साहित्य चळवळीला अपवादाने लाभते.
कथाकार विवेक कुडू
समाज साहित्य प्रतिष्ठानचा काशीराम आत्माराम साटम स्मृति समाज साहित्य कथा पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील पहिला पुरस्कार आहे.मी कमी लेखन करतो.परंतु मला जे वाटते तेच मी लिहितो.अशा कथा लेखनाला मराठीतल्या जाणकार साहित्यिकांनी प्रतिसाद दिला आणि हा आता मराठी साहित्यातला हा महत्त्वाचा पुरस्कार मला मिळाला याचा आनंद होत आहे. या पुरस्काराने माझे बळ वाढवले आहे.
– कवी एकनाथ पाटील
ज्येष्ठ सामाजिक विचारवंत आणि कष्टकरी जनतेचे नेते डाॅ एन.डी. पाटील हे डाव्या – पुरोगामी चळवळींचे खंबीर आधारस्तंभ होते. ‘आरपार झुंजार’ या त्यांच्यावरच्या माझ्या दीर्घकवितासंग्रहाला समाज साहित्य प्रतिष्ठानचा प्रकाश रामचंद्र रसाळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘भूमी काव्य पुरस्कार’ मिळाला, हा माझा मोठा गौरव आहे. वैचारिक बांधिलकी स्वीकारून काम करणाऱ्या या प्रतिष्ठानच्या उपक्रमांमागे एक ठाम भूमिका आहे. समताधिष्ठित समाजरचनेच्या निर्मितीची ही भूमिका अधिक ठळकपणे उजागर करणे, ही काळाची गरज आहे. प्रतिष्ठानच्या भविष्यकालीन उपक्रमांना माझ्या सदिच्छा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.