निमशिरगांव : देशातील आजचे वातावरण भयमुक्त करायला साहित्यिकांनी बोलायला पाहिजे. आरक्षणाच्या माध्यमातून जातीची भुतं तयार केली आहेत. जरांगे, भुजबळ आणि सरकारलाही माहिती आहे, की कोणालाही आरक्षण मिळणार नाही. केंद्रातील नेतृत्वाने बाहुल्या नाचवाव्यात तसे नाच सुरू केले आहेत. याबाबत साहित्यिकांनी बोलायला पाहिजे, असे प्रतिपादन कविवर्य रामदास फुटाणे यांनी केले.
निमशिरगाव येथे 26 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
सकाळी महादेव मंदिरातून ग्रंथदिंडीने सुरुवात झाली. डॉ. अतिका पटेल, डॉ. अजित बिरनाळे, डॉ. विश्वनाथ मगदूम, डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या उपस्थित ग्रंथदिंडी सभामंडपात दाखल झाली. पी. बी. पाटील सहित्यनगरित दिप प्रज्वलनाने संमेलनाला सर्वात झाली. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. साहित्य कला, क्रीडा मंचचे अध्यक्ष पद्माकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विश्वनाथ मगदूम स्वागताध्यक्ष होते. साहित्यसुधा स्मरणिकेचे प्रकाशन प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी समाजरत्न पुरस्कार अरवली शिरोडा येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर सीताराम तथा भाई मंत्री यांना, साहित्यरत्न पुरस्कार नीलम माणगावें यांना तर शेतकरी राजा पुरस्कार पैठण येथील प्रयोगशील शेतकरी दीपक जोशी यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी माधवराव माने स्वातंत्र्य लढ्यातील अनेक अनुभव मांडले. त्यांनी नव्या स्वातंत्र्याच्या लढ्याची हाक दिली. तर फुटाणे यांनी आपल्या अनेक भाष्य कवितेतून चालू वर्तमानावर कविता सादर केल्या. यावेळी प्राचार्य हेरवाडे, डॉ. सुनीलकुमार लवटे, भाई मंत्री, नीलम माणगावे, दीपक जोशी, माजी खासदार राजू शेट्टी यांची भाषणे झाली. रावसाहेब पुजारी यांनी आभार मानले.
दुसऱ्या सत्रात राजकारणाचे धिंडवडे : सामान्य माणसाची भूमिका या विषयावर प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. यामध्ये प्रसाद कुलकर्णी, मोहन हवालदार आणि डॉ. महावीर अक्कोळे यांनी सहभाग घेतला. दुपारी विजय जाधव यांचे कथाकथन झाले तर प्रा. अनिलकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले.
यावेळी सरपंच अश्विनी गुरव, उपसरपंच रोहित लोहार, विजयकुमार बेलांके, प्रा. शांताराम कांबळे, अजित सुतार, गोमतेश पाटील, मनोज पाटील, सुमित पाटील, नंदकुमार कुंभार, शिवाजी कांबळे, संजय धनाजी उपस्थित होते. एन. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.