गुजरातला सामनाच न व्हायला पाहिजे हूता. शकून अपशकुनंच तर पेवच फुटलय. उशीत तोंड खूपसलेल्या पोराला बाप सांगतोय ऊठ कामधंद्याचं बघ आणि त्या फटांगड्या ठेव पुढच्या वर्ल्डकपला.
रवी राजमाने 7709999860
ravirajmane51@gmail.com
माझं माझ्या देशावर प्रचंड प्रेम आहे व मला वाटत होतं काल माझा देश जिंकावा तरीही…
ह्यो रडला त्यो रडला. त्याची बायको गळ्यात पडून रडली. होम हवन केलं. मग का नाही जिंकलो… रात्री सातला मेसेज पडला अजूनही ग्रहताऱ्यांचा योग दिसतोय. शहर ओस पडली. खेडी सुनसान झाली. क्रिकेटमध्ये भारत माझा देश आहे अन तो हरला. फक्त आजच्या दिवशी गलबलून येत.
जसं काही भारतात अन जगात दुसरा खेळच नाही. ब्रिटिशांनी काम न धंदा म्हणून चेंडू-फळी शोधून काढली. आम्ही मात्र रात्रंदिवस त्याच्यामागे लागलो. जगातली सगळ्यात मोठी स्टेडियम बांधली.
आयपीएल सुरू करून 12 न 12 तास पोरं गुंतवून टाकली. खेळ नव्हे राजकारण्यांचा, उद्योगपतींचा, सेलिब्रिटींचा, जाहिरातदारांचा या सर्वांना सांभाळून आपलं पोट भरणाऱ्या मीडियाचा धंदा झालाय. सामान्य माणसाचा किमती वेळ मात्र वाया जातोय. आणि पदरी पडते निराशा… मलाही काही काळ चेंडू फळीच वेड होतं. पण देशासाठी खेळणारे खेळाडू, करोडो लोकांच्या विशेषता मुलींच्या हृदयाची धडकन वाढवणारे खेळाडू मॅच फिक्सिंग करतात.हे जेव्हा कळलं तेव्हापासून चेंडू आणि फळीला बाय बाय केलं.
ज्यावेळी खेळायची गरज असते तेव्हा आमचे खेळाडू कच खातात हा अगदी ९० पासूनचा माझा अनुभव आहे व हे जिवंत उदाहरण आहे. जे खेळले ते स्वतःच्या विक्रमासाठी. जवागल श्रीनाथ, श्रीकांत, कुंबळे, राहुल द्रविड दिवार बनून खेळत होते. पण त्यांचा गवगवा फार झाला नाही.
शमी सुद्धा तो कोणत्या धर्माचा आहे यापेक्षा भारतीय आहे हे सर्वात महत्त्वाचं.
चांगला खेळ झाला, अगदी ऑलम्पिकमध्ये पदक जिंकलं तर आमच्या धर्माचा, जातीचा ठरवतात. कुठलाही धर्म आणि जात त्याला अपवाद नाही. खेळाडू, कलाकार हे त्या देशाचे प्रतिनिधी व फक्त माणूस असतात. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे.
जगामध्ये ५०ते ६० प्रकारचे खेळ खेळले जातात विकसित देश अमेरिका, चीन, जपान, कोरिया, अर्जेंटिना, ब्राझील कुठे क्रिकेट खेळतात.आपली पोरं मात्र रात्रंदिवस गुंतून आहेत. आपल्या देशात ७० टक्के लोकसंख्या खेड्यात राहतात पण खेड्यातल्या एकाही मुलाची निवड राज्याच्या किंवा देशाच्या संघात होत नाही. ग्रामीण भागातली एक ही टीम जिल्हास्तरावर जात नाही. व असेलच एखादी शाळा तर पुढे येऊ दिल जात नाही. हा खेळ आपल्या देशात फक्त श्रीमंत बापाची मुलं व शहरातल्या मुलांचा आहे मुळात ते महागडे किट घ्यायचीच ग्रामीण भागातल्या पोरांची आर्थिक स्थिती नाही. तरी वेड्यासारखं क्रिकेट…. क्रिकेट… आणि क्रिकेट…
दुसरा धंदाच नसतो.
आज लाखो शाळा आहेत. किती शाळांना खेळाच मैदान आहे. किती मुलांना खेळाची साधने उपलब्ध आहेत. यावर संशोधन झालं पाहिजे. पोलीस भरतीची पोरं रस्त्यावर पळतात. किती गावांनी ग्रामसभेत निर्णय घेऊन मैदान तयार केली. सरकारने किती क्रिडांगणे बांधली. प्रत्येक गावातल्या गायरान जमिनी मुलांना खेळायला का दिल्या जात नाहीत???
प्रत्येक गावात चांगल्या शाळा, चांगले दवाखाने, खेळाची प्रशस्त मैदान उभारली का जात नाहीत. आपण कोणाला ?? कोणत्या लोकप्रतिनिधींना निवडून देतो. देशाच्या एकूण अर्थसंकल्पामध्ये खेळासाठी तरतूद किती आहे आपण कधी विचारलय???
आपलं प्रतिष्ठेच्या मागे पळतोय हे मात्र खरं. विश्व ऑलम्पिकमध्ये आपण कुठे असतो. कितव्या क्रमांकावर असतो. याचा विचार तरूण पिढीने करायला करायला हवा. अथलेटिक्स मधले खेळाचे प्रकार, जिम्नॅस्टिक, तिरंदाजी, फेन्सिंग, कुस्ती, कबड्डी कित्येक खेळ आपण विकसित का करत नाही???
शाळात खेळाचे शिक्षक नाहीत आणि असलेच तर खेळाचे तास नाहीत. आम्ही मुलांना सांगतो राज्याला खेळलास तर पोलीस होशील.आम्ही त्याला ऑलम्पिकची स्वप्न का नाही दाखवत ?? तो धावणार कसा?? वेगवेगळ्या संस्था, स्पोर्ट्स क्लब चौकात मुलांची पोस्टर लावतात कुंग फू मध्ये आंतरराष्ट्रीय पदक?? काय ही फालतुगिरी आहे…. कीव येते पोस्टर लावणाऱ्यांची. वेगवेगळ्या देशांच्या खेळांडू ची पोस्टर आपल्या शहरात लागतात. पण खेळ, खेळाचे प्रशिक्षक, खेळाची साधने, खेळाची मैदान, सरकारच खेळ विषयक धोरण यावर मात्र कोणी बोलायला तयार होत नाही.
टॉसच जिंकाय पाहिजे हूता. गुजरातला सामनाच न व्हायला पाहिजे हूता. शकून अपशकुनंच तर पेवच फुटलय. उशीत तोंड खूपसलेल्या पोराला बाप सांगतोय ऊठ कामधंद्याचं बघ आणि त्या फटांगड्या ठेव पुढच्या वर्ल्डकपला.
रेल्वेत एक म्हातारा बोलत होता.
“आरं मर्दानो, त्यो खेळ हाय ज्यो जिद्दीन खिळील त्यो जितणारच.”