थक्क होऊन जावे असा हा अरुण कोलटकर कवितापट
अनेकविध गोष्टीमधून धावत आलेले एकटेपण आणि सादरीकरणाचा तटस्थपणा कोलटकर कवितेचा स्थायीभाव होता का. कोलटकरांची कविता ही भारतीय कविता परंपरेतील अतिशय महत्वाची कविता आहे. संदिग्ध अर्थांची इतकी भरगच्च अर्थवलये तीमध्ये आहेत. त्यांच्या कवितेला स ह. देशपांडे यांनी ‘ ‘ सिनिकल गारठयाची ‘ उपमा दिली आहे.रणधीर शिंदे
अरुण कोलटकर या शीर्षकाचा ग्रंथ अलीकडेच मॅजेस्टिक प्रकाशनाने अतिशय देखण्या स्वरूपात प्रकाशित केला आहे. (संपादक प्रफुल्ल शिलेदार, सल्लगार चंद्रकांत पाटील व अरुण खोपकर) ग्रंथरुप आणि मांडणी विकास गायतोंडे. इतके सुबक, आल्हादायक दिसणारी निर्मिती, मुद्रण आणि मांडणी असणारा असा ग्रंथ मराठीत अपवादभूत. ग्रंथ आकार, छपाई, छायाचित्रे, अक्षररेखांकन, कागदाचा रिकामा अवकाश याची अतिशय दक्ष, जागरुक सौंदर्यदृष्टी असणारे हे पुस्तक आहे. अशी पुस्तके पाहणे, हाताळणे हा मोठा सुखद अनुभव असतो. ‘युगवाणी ‘या नियतकलिकाचा जुलै- डिसेंबर २०२१ च्या अरुण कोलटकर विशेषांकाचे हे ग्रंथरूप. मुखपृष्ठावर केवळ गडद काळ्या रंगातील आर्ट पेपरवर फिकट सोनेरी रंगातील धावत्या पळत्या गतीतील लिखावळ शैलीतीले केवळ ‘अरुण कोलटकर ‘ एवढे दोनच शब्द आहेत.
हे पुस्तक हाती आल्यानंतर ग्रंथात अरुण कोलटकर यांचे काही फोटो पहिले. एकतर कोलटकर यांची छायाचित्रे फारशी कुठे आढळत नाहीत. तसेच त्यांचा सार्वजनिक वावरही फारसा नव्हता. त्यांनी आत्मपर लेखन केले नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी अपार कुतूहल होते. ग्रंथातील सलग फोटो एकत्र पाहात गेल्यानंतर कोलटकर आणि त्यांची कविता अशा काही गोष्टी जाणवत राहिल्या.
वृंदावन दंडवते, नितीन दादारावाला, शांता बेनेगल, प्रल्हाद जाधव, चंद्रकांत पाटील, रेखा शहाणे, संदेश भंडारे यांनी काढलेले हे फोटो आहेत. ती विविध प्रसंगपरत्वे. तेही जास्त नाहीत. पण अरुण कोलटकर यांचे ‘असणे ‘त्यातून प्रतिबिंबित झाले आहे.
या छायाचित्रांत कोलटकरांच्या भावमुद्रा कमालीच्या तटस्थ, शुष्क आणि स्थिर आहेत. काही कृष्णधवल तर काही रंगीत फोटो आहेत. तरुणपणीचे, मधल्या प्रौढ अवस्थेतील तर काही वृद्धपकाळातील. तरुणपणातील मानेपर्यंटचे केस, मिशा लांबवर झुकलेल्या अवस्थेत खाली सोडलेल्या. डोळे कायम भावहीन . कधी त्या काळातील सिनेमा प्रभावित अँग्री यंग मॅन सारखे. बेल बॉटम टाईप . टी शर्टवर जॅकेट, हातात कडे, चेहऱ्यावर मिश्किल तिरका भाव असे काही फोटो. तर काही गर्दीतले पण एकाकी, एकटे वाटणारे. वृद्धापकाळातील क्लोज अप आणि तटस्थ. चेहऱ्यावर गडद सुरकुत्यांची दाटी. चेहऱ्यावर एका बाजूला मंद उन्हाची पिवळसर छाया तर दुसऱ्या बाजूला हलकीशी कृष्णछाया. बळवंत बुवांवरील फोटोत देहबोली बदलेली. चेहऱ्यावर जिज्ञासेचे भाव. जाणून घेण्याचे कुतूहल आहे. त्यांनी फार पुरस्कार स्वीकारले नाहीत. एक दोन स्वीकारले असतील. पुरस्कार स्वीकारतानाही त्यांचा फोटो निर्विकार आणि कोरडा आहे.
या सर्व फोटोत कोलटकर एकटे जणू काही आपण इथले नाहीतच अशा भावमुद्रा दर्शविणारे. त्यांच्या कवितेतही हा कमालीचा एकटेपणा, कोरडा तटस्थपणा आहे. अर्थात त्याच्या मिती आणि अर्थपरिमाणे वेगवेगळी आहेत.
अर्थाचा घनदाट प्रत्यय असणाऱ्या कोलटकर कवितेत ‘मुखदुर्बळ झाडे ‘आहेत. ‘ जणू काही डोंगरदऱ्यात / वाट चुकलेल्या धाडसी प्रकाशाची ‘ ही चित्रे आहेत. ‘ एका भिंतीवर टांगलेल्या आरशात/ दुसरीच स्थिरचित्रं ‘असावीत त्याप्रमाणे . त्यांच्या कवितेत ‘कागदी पंखाचा कापडी पोपट ‘ भेटतो. निर्विकार गर्दीत ‘ आडगावच्या वाटेवरील माणूस ‘ भेटतो. ‘सुन्या शरीरात चिखलाचा हात ‘ असतो. ‘ ‘रिकाम्या फुलदाणीवर कॅमेरा चमकतो. ‘ बेडकाचा पुखराज डोळा घालतो, प्रकाशाच्या झोताला ‘ किंवा
‘ तुझ्या उभेपणात, कसलीच शोभा नव्हती, पाणी तापवायच्या बंबासारखी, तु केवळ उभी होतीस.’
‘ फुलांच्या गणिताआढ दाढा दळतात कोरडया फोडी, आणि नजर शांत ‘. ‘ तुझ्या उदास दिवसांचा उदास हिंदोळा ‘ हिंदोळत राहतो. ‘एकच वाट होती ‘ त्याच वाटेने जावे लागले. ‘
वाटेनेच वाटा काढल्या, दिशांच्या काठांवर नागवा रहाट ‘.
‘ गावाबाहेर पडलो , झाडाखाली पोट भरले , पण तहान भागली नाही.’ अशी अधुरी तृष्णा.
‘इंडिया में रख्खाही क्या है.’ म्हणत
‘आटव माझे प्राण ‘.
‘ आपली आणि त्याची नजरानजर झालेली असत नाही.’
‘ म्हणजे मला निदान, सकाळ होईपर्यंत छताकडं तरी बघता येईल, निवांतपणे.’ अशी तऱ्हा.
‘ तेव्हा सार्वजनिक अंधारात, एका ओळखीची भीती ‘. वाटत रहाते.
‘डोळ्यावरनं पट्टी बांध, आणि आरामखुर्चीत बसून ऱ्हा,
राजासारखा ‘. या प्रकारच्या भावना.
‘स्वतःशीच खेळे चंद्रबिंब,
स्थिरावला हार, वाळली पाकळी, गुंतली फासळी निर्माल्यात ‘. अशी कोलटकर दृष्टी.
अशा अनेकविध गोष्टीमधून धावत आलेले एकटेपण आणि सादरीकरणाचा तटस्थपणा कोलटकर कवितेचा स्थायीभाव होता का. कोलटकरांची कविता ही भारतीय कविता परंपरेतील अतिशय महत्वाची कविता आहे. संदिग्ध अर्थांची इतकी भरगच्च अर्थवलये तीमध्ये आहेत. त्यांच्या कवितेला स ह. देशपांडे यांनी ‘ ‘ सिनिकल गारठयाची ‘ उपमा दिली आहे. कोलटकरांच्या कवितेत पराकोटीची ‘ भावना विरहितता आहे. हे खरे मात्र या भावना विरहिततेमागे प्रचंड कोलाहल आणि स्फोटकता आहे. थक्क होऊन जावे असा हा कोलटकर कवितापट आहे . त्यांच्या फोटोतील भावमुद्रा आणि कविता यातील काही संगती शोधण्याचा हा प्रयत्न. अर्थात ही काही समीक्षा वगैरे नाही. या ग्रंथातील कोलटकर फोटोंमुळे जाणवलेले काही ठसे. एकेरी अवतरणातील ओळी ‘अरुण कोलटकरच्या कविता ‘ या संग्रहातील.
रणधीर शिंदे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.