आणि पुन्हा रांगण्याची आठवण झाली…🚩
पन्हाळगड महोत्सवात रांगणागडच्या माहितीपटाला द्वितीय क्रमांकच बक्षीस मिळालं.आणि पुनः तो थरारक प्रवास आठवला.
आम्ही मावळे
@ सुदेश सावगावकर
@ पद्माकर लोहार
@ प्रविण पाटील
@ दुर्गकन्या गीता खुळे
रांगणा हा शिलाहार दुसरा राजा भोज यांनी बांधलेला दुर्गम आणि रांगडा किल्ला. पहाटे तीन वाजल्यापासून सुरू झालेला हा आम्हा चौघांचा प्रवास संपायला काळोख पडला. जाताना ओबड धोबड रस्त्यातून केलेला जीप प्रवास म्हणजे अरुंद रस्ते, दुतर्फा झाडी आणि जीप एका बाजूला कलल्यामुळे आम्ही पडू की काय अशी स्थिती. त्यानंतर गड आणि गडाची रचना पाहणं हा रुळलेल्या वाटेवरचा प्रवास इतर गडांसारखाच.
पण, हत्ती सोंड माचीकडे जाणारा प्रवास मात्र आव्हान होतं. तेही पहिल्यांदा जाणाऱ्यासाठी.. अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी साठलेलं पाणी, कमरेएवढं गवत आणि त्यात पायाखाली सतत येणारे साप, काही ठिकाणी सपाट माळ रान त्यात पडलेलं भन्नाट उन त्या उन्हात लांबून कोणता तरी प्राणी समोर दबा धरून बसला आहे अस वाटणारा भास. तर काही ठिकाणी सावली देणारं असल तरी भयंकर जंगल. अचानक कोणततरी श्वापद समोर येईल ही सतत वाटणारी भीती. स्वतःची शिदोरी सोबत होतीच पण फोनला नेटवर्क नाही. त्यामुळे मॅप आणि सर्वांनीं एकत्र सोबतीने प्रवास केला. येताना सूर्यास्ता आधी मुख्य द्वाराकडे यायचं होतं. पण अंदाजे खाली यायला बराच वेळ लागला.
अगदी अंधार पडला. दिवसाही जिथं ऊन उतरायला घाबरतात तिथं रात्रीची काय कथा. त्यामुळे भीतीने मनात जागा करायला सुरुवात केली. ज्यांची जीप होती ते दादा खालीच वाट पाहत होते.
बराच वेळ होऊनही आम्ही परतलो नाही म्हणून ते आणि त्यांचे मित्र आम्हाला शोधायला गडाकडे निघाले. बराच वेळ होऊन आम्ही सापडलो नसतो तर शेजारील गावातील लोकांना घेऊन ते ही शोध मोहीम सुरू करणार होते. पण नशीब☺️शिल्लक राहिलेल्या मोबाईलच्या उजेडात एकमेकांना आवाज देत त्या आवाजाला प्रतिसाद देत आम्ही त्या जंगला बाहेर आलो.
आमच्याकडं मॅप होता. सूर्यास्तापर्यंत परतू अशी खात्री होती. पण संपूर्ण गड शूट करता करता नवख्या वाटावर चालता चालता त्या वाटा कधी मोठ्या झाल्या,सूर्यास्त कधी झाला आणि रुळलेल्या या वाटांवरचा दिवस कधी फक्त एका मोबाईलच्या उजेडा पुरता राहिला समजलंच नाही.
पण, आज ही तो प्रसंग, मनुष्य आवाजाला नवखी असणाऱ्या त्या वाटा, पहिल्यांदा जाणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आणतात…त्याकाळी इतका दुर्गम आणि रांगडा किल्ला औरंगजेबाला का जिंकता आला नसावा याचा प्रत्यय मात्र आला. तरी मावळ्यांनी राखून ठेवलेला हा छत्रपती शिवरायांचा आवडता गड मनात ठेवून आम्ही सुखरूप परतीचा प्रवास सुरू केला..
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.