June 25, 2024
Ravindra Jatrakar No More article by Alok Jatratkar
Home » ‘वचन’ दाता गेला…
मुक्त संवाद

‘वचन’ दाता गेला…

रवींद्र हे खरं तर सख्खे नसले तरी नात्याने माझे काका… माझ्यावर निरतिशय प्रेम करणारे, माझ्याबद्दल अतीव आदरभाव असणारे… ‘जन्मदात्यांनी जन्माला घातलं, चळवळीनं घडवलं आणि साहित्यानं जगवलं,’ असं त्यांनी स्वतःच त्यांच्या जगण्याचं वनलाइनर सूत्र सांगितलेलं आणि ठरविलेलं… ते खरंही होतं… अक्षर तर सुलेखनाच्या वहीत छापल्यासारखंच… अशी उच्च दर्जाची प्रज्ञा लाभलेला हा माणूस… नुकताच अकाली गेला… कर्करोगानं त्यांना आमच्यातून हिरावून नेलं…

अलोक जत्राटकर

‘वचन’दाता गेला…
भोगत यातना चढलो मी
शाळेची पायरी
शिकलो नाही मी
ग ग गणपतीचा
भ भ भटजीचा
त्याच्याही पुढे शिकलोय मी
ग ग गतकाळाचा
भ भ भविष्याचा
ब ब बुद्धाचा, बाबासाहेबांचा
शाळेची एक एक पायरी चढताना
मी वचन दिलंय बाबासाहेबांना
मी वचन दिलंय क्रांतीबा फुल्यांना
मी वचन दिलंय संत कबीरांना
मी वचन दिलंय गौतम बुद्धांना
त्यांची प्रज्ञाज्योत तेवत ठेवण्याचं!’

कवी रवींद्र जत्राटकर यांची ‘मी वचन दिलंय…’ या काव्यसंग्रहातील शीर्षक कवितेच्या या काही ओळी… रवींद्र हे खरं तर सख्खे नसले तरी नात्याने माझे काका… माझ्यावर निरतिशय प्रेम करणारे, माझ्याबद्दल अतीव आदरभाव असणारे… ‘जन्मदात्यांनी जन्माला घातलं, चळवळीनं घडवलं आणि साहित्यानं जगवलं,’ असं त्यांनी स्वतःच त्यांच्या जगण्याचं वनलाइनर सूत्र सांगितलेलं आणि ठरविलेलं… ते खरंही होतं…

बाबासाहेबांच्या निपाणीतील १९५२ सालच्या सभेतील उपदेशानं भारावलेल्या गरीब परिस्थितीतल्या आईवडिलांनी आपल्या लेकरांना कष्टानं शिकविण्याचं ठरवलं… त्या भावंडातला रवीकाका एक… प्राथमिक शाळेत शाळा सुटली, पण शिकण्याची आस नाही सुटली… कष्ट करीत, सूतगिरणीत कामं करीत, आईवडिलांना हातभार लावत, जमेल तसं, जमेल त्या वेळेला शिक्षण घेत मुक्त विद्यापीठातनं त्यांनी एस.वाय. पर्यंतचं शिक्षण घेतलं… पण, शाळा-कॉलेजातल्या शिक्षणापेक्षाही जगातल्या आणि ग्रंथालयातल्या शाळेत त्यांचं जीवन घडलं… खूप वाचलं त्यांनी… बंधू सुरेश जत्राटकर यांचा आदर्श घेऊन लिहीण्याचाही छंद जडला त्यांना… सूतगिरणीत काम करताना

‘सटाSSक पटाSSक सटाSSक पटाSSक
एकतेचं, समतेचं गाणं गाणाऱ्या
पॉवरमागला अन् विणकरांना काय माहीत
देशाची लाज अब्रू
विषमतावादी वेशीवर टांगतायत म्हणून…’
हा समतेचा विचारच त्यांच्या मनात सुरू असायचा…

किराणा मालाच्या दुकानात पुड्या बांधता बांधता कागदांवर कविता उतरायची-
‘सांभाळताना दुकान चांगले वाईट अनुभव यायचे
अगरबत्तीप्रमाणे विचार धुपायचे
नि कापराप्रमाणे मन जळायचे
चालू केलं दुकान मी अनिच्छेनं
कविता मात्र करतोय स्वइच्छेनं
बुद्ध भीमाच्या प्रेरणेनं…’

वाचनातून, जगण्यातून आलेले अनुभव त्यांच्या कवितांचा विषय व्हायचे; बुद्ध, फुले, आंबेडकरांची प्रेरणा त्यातून प्रकटत राहायची… ती प्रेरणा हे त्यांच्या जगण्याचं मर्म होतं… त्या प्रेरणेचा प्रसार हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं… विविध क्षेत्रांतील उत्तम जाणकारांचा लोकसंग्रह करणं, हा त्यांचा छंद होता… लोकांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना जाणून घेणं, याची गोडी त्यांना होती… त्यातूनच कुटुंब, नातेवाईकांच्या पलिकडंही खूप मोठा गोतावळा त्यांना लाभलेला होता… लौकिक शिक्षण त्यांनी सांगितलं तरच समजायचं… पटायचं नाही ते, इतके वेगळे विषय, ताजे संदर्भ त्यांच्या बोलण्यात येत असत… ओथंबून बोलत असत… अक्षर तर सुलेखनाच्या वहीत छापल्यासारखंच… अशी उच्च दर्जाची प्रज्ञा लाभलेला हा माणूस… नुकताच अकाली गेला… कर्करोगानं त्यांना आमच्यातून हिरावून नेलं… सूतगिरणीत तीस वर्षांहून अधिक केलेल्या कामानं त्यांच्या जीवनाचा धागा मात्र कमकुवत करून टाकला… निर्व्याज, दिलखुलास आणि चेहऱ्यावर सदैव मंदस्मित घेऊन माझ्यासमोर येऊन उभा ठाकणारा हा काका येथून पुढे भेटणार नाही; काही लिहीलेलं वाचलं, रेडिओवर ऐकलं की आवर्जून येणारा त्यांचा फोन आता येणार नाही, ही कल्पनाच साहवत नाहीय… एक अत्यंत प्रेमाचं माणूस गमावल्याची भावना आणि आयुष्यभराची पोकळी निर्माण झालीय त्यांच्या जाण्यानं…

Related posts

भिंतीवरचे घड्याळ कशाने बंद पडले ?

मनुष्य अन् त्याचे पाळीव प्राणी यांच्यातील बंधांचा शोध घेणारा चित्रपट सीएते पेरोस (सेव्हन डॉग्स)

जागतिकीकरणानंतरच्या पोवार समाजाचे अन् पोवारी बोलीचे वास्तव

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406