February 6, 2023
throne-of-immortality-article by Rajendra Ghorpade
Home » अमरत्वाचे सिंहासन कोणाला मिळते ?
विश्वाचे आर्त

अमरत्वाचे सिंहासन कोणाला मिळते ?

जनतेला अज्ञानात ठेवून सत्ता भोगणे, हे सध्याच्या राज्यकर्त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अशाने नेमका कोणता विकास साधला, हेही एक गूढच आहे. जनतेचे अज्ञान दूर करून जो राज्यकर्ता प्रगती साधतो, तोच खरा समाजसेवक असतो. त्याचेच नाव अमर होते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

जेथ अमरत्व हेंचि सिंहासन । ऐरावतासारिखें वाहन ।
राजधानी भुवन । अमरावती ।। 320 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ – ज्या स्वर्गात न मरणे हेच सिंहासन आहे. ऐरावत हत्तीसारखे वाहन आहे व अमरावतीनगर ही राजधानी आहे.

सद्गुरू कृपेनंतर नराचा नारायण होतो. अज्ञानाच्या अंधकारातून तो बाहेर पडतो. आत्मज्ञानाच्या सिंहासनावर तो विराजमान होतो. त्याला अमरत्व प्राप्त होते. मुळात तो अमरच असतो, पण अज्ञानामुळे तो भरकटतो. सध्या देशात नवनवीन तंत्रज्ञानाने बराच विकास झाला आहे. तसेच त्यात प्रगतीही होत आहे. आपला देश आता महासत्तेकडे वाटचाल करत आहे, असे सांगितले जाते; पण दुसरीकडे दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्याही वाढत आहे, असेही स्पष्ट केले जाते. मग नेमके आपण आहोत कोठे ?

जनतेला अज्ञानात ठेवून सत्ता भोगणे, हे सध्याच्या राज्यकर्त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अशाने नेमका कोणता विकास साधला, हेही एक गूढच आहे. जनतेचे अज्ञान दूर करून जो राज्यकर्ता प्रगती साधतो, तोच खरा समाजसेवक असतो. त्याचेच नाव अमर होते. स्वातंत्र्यपूर्व काळात असे राज्यकर्ते होते म्हणूनच आपण स्वतंत्र झालो. स्वार्थ त्यांच्यामध्ये नव्हता. निःस्वार्थी वृत्तीने त्यांनी देशासाठी स्वतःचा त्याग केला. देशाचे स्वातंत्र, देशातील जनतेला स्वातंत्र हेच त्यांचे ध्येय होते. यासाठी त्यांनी स्वतःच्या प्राणाचीही पर्वा केली नाही. सत्तेसाठी खुर्चीसाठी त्यांनी कधीही राजकारण केले नाही.

दुसऱ्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी इतरांना दुखावलेही नाही. त्यांच्या मनात अहिंसा नांदत होती. अहिंसेच्या मार्गाने ते लढले. सत्याचा आग्रह मात्र त्यांनी सोडला नाही. म्हणूनच ते महात्मा झाले. अमर झाले. अमरत्वाच्या सिंहासनावर ते विराजमान झाले. अशा राज्यकर्त्यांची सध्या देशाला गरज आहे. जनतेला ज्ञानी करणारे राज्यकर्ते हवेत.

अध्यात्मातही तसेच आहे. स्वार्थ सोडायला हवा. त्यागाचा मार्ग अवलंबला पाहिजे. अहिंसेचा मार्ग स्वीकारून मनाची शांती टिकविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सत्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सत्याचा आग्रह धरायला हवा. सद्गुरू शिष्याला सत्य काय आहे, याची अनुभूती देतात. शिष्याचे अज्ञान दूर करून त्याला त्यांच्या पदी बसवितात. अमरत्वाचे हे सिंहासन ते देतात. तेच खरे सद्गुरू असतात. त्यांची परंपरा पुढे चालते. आदिनाथापासून सुरू झालेली संत परंपरा आजही तशीच पुढे सुरू आहे. ती अमर आहे.

Related posts

लोकराजा राजर्षी शाहू यांना आदरांजली

Photos : श्री सद्गुरु दादा माधनवाथ महाराज समाधी पुजा

नैसर्गिक क्रियेतूनच आत्मज्ञानाचा प्रकाश

Leave a Comment