July 27, 2024
Book Review of Navnath Rankhambe Jivan Sangharsh
Home » जीवनातील अनुभव कवितेच्या रुपात
मुक्त संवाद

जीवनातील अनुभव कवितेच्या रुपात

शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शिक्षणासाठी प्रोत्साहन करणारा ” बा ” दिसतो . आपल्या मुलाने “भीमाच्या चळवळीचा शिलेदार ” व्हावं हे बाळ कडू आपल्या मुलाला पाजतांना बा कवितेत दिसतो. आणि कवितेतला बाप प्रोत्साहन देत काळजाला हात घालतो…..

कामिनी धनगर

दहीगाव, मुरबाड

कवी नवनाथ रणखांबे यांच्या “जीवन संघर्ष ” कविता संग्रहातील कविता विविध विषयाने विविध प्रतिभा, प्रतिमा आणि कल्पनेने फुललेल्या आहेत. प्रत्येकाच्या मनाच्या गाभाऱ्यात कविता असते. कवीच्या आयुष्यात कधीतरी घडलेल्या घटना प्रसंग त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनुभवलेले जीवन संघर्ष कुठेतरी मनावर कोरलेले असतात. कवीने जीवनात खूप संघर्ष केला आहे. आणि हा संघर्ष करीत असताना माझा स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. किंवा कधी कोणा पुढे वाकणार नाही. असा बाणा जपला आहे.

कविता ” मोडेल कणा “……

अन्याया विरुद्ध पेटून उठला श्वास
न्यायासाठी जीवनाने संघर्ष केला खास

पेरलं तेच उगवलं…
जश्यास तसेच उरलं ….

काळाच्या छाताडावर मी उभा ताठ
अंधारातून शोधतो मी उजेडाची वाट

लढताना मोडेल कणा माझा
स्वाभिमान अन्यायापुढे वाकणार नाही

मी चळवळीचा वसा माझा
शेवटच्या श्वासापर्यत सोडणार नाही

समाजात अन्याय खूप मोठ्या प्रमाणात होत होते आणि होत आहेत. हे कवीला सहन होत नाही. जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. कवी या कवितेत असं सांगतो की आपण समाजात जे विचार पेरतो, आपण समाजात जसे राहतो, वागतो आणि इतरांशी बोलतो तसेच परत येते. प्रेम दिले तर प्रेम मिळते. द्वेष पेरला तर द्वेष मिळतो. ज्या वातावरणात माणूस राहतो तसाच घडतो. जसे जमिनीवर पेरतो तेच उगवते. अंधश्रद्धेने ग्रासलेला निकृष्ठ विचार असलेल्या या समाजातील वाईट प्रवृत्तीला कवीचा विरोध आहे. कवीला विश्वास आहे, समाज प्रबोधनात तो नक्कीच यशस्वी होईल. अन्यायाविरुद्ध लढताना पाठीचा स्वाभिमान रुपी कणा मोडला तरी चालेल पण मी माझा स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. माझा स्वाभिमान मी सोडणार नाही. मी माझे विचार माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यत समाजात पोहचवता राहिल. ”

आयुष्याच्या पहिल्या प्रेमात ” या कवितेच्या ओळी….

तुच मनाच्या गाभाऱ्यात
आयुष्याच्या पहिल्या प्रेमात
माझ्या प्रेम जीवनात

यात कवी असं सांगतो की माझ्या जीवनात पहिले प्रेम तू आहेस. माझ्या मनाच्या कप्यात फक्त तू आहेस. तुझ्या शिवाय माझ्या मनाच्या घरात कोणी घर करू शकत नाही. या कवितेतून पुढे कवी म्हणतो….

जीवनात माझ्या दुसरी असणार नाय
जीवनाला माझ्या दुसरी आवडणार नाय

आता काय पण होवू देत
तुझ्या हातातला हात सोडणार नाय

माझा श्वास अखेर पर्यत
तुझ्या साथीला….साथ सोडणार नाय

कवी या कवितेतून सांगतो आहे प्राणसखे आता आयुष्याच्या रणसंग्रामात काहीही होवू दे. तुझा मी विश्वासाने घेतलेला तुझा हात आणि तू विश्वासाने दिलेला तुझा हात रुपी विश्वास, मी कधीच सोडणार / तोडणार नाही. माझा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यत आपला जीवन प्रवाह एकमेकांच्या जोडीला राहिल. हा विश्वास कवी या ठिकाणी देतो .

” बानं शिकवलं ” या कवितेत कवी शिक्षणाचे महत्त्व समाजात किती आहे हे सांगतो. शिक्षणाने विकासाची आर्थिक प्रगती आणि सामाजिक प्रगतीचे सर्व दारे खुली होतात. हे पटवून देत आहेत.

बानं शिकवलं

शिक्षणाने माझ्या पुढचं शिक्षण घेवून व्हावं मोठं
कुटुंबाचा आधार बनून घराण्याचं नाव करावं मोठं
स्वप्नांची माझ्या स्वप्ने पूर्ण करण्यासाठी
गावाला सोडून त्यानं मायावी नगरीत धाडलं

“जीवन संघर्ष” या काव्य संग्रहात कवीच्या वडिलांनी माझ्या मुलाने शिक्षण घेऊन मोठे व्हावे. स्वतःचे आणि घराण्याचे नाव मोठे करावे. आपली प्रगती करून वडिलांची स्वप्ने पूर्ण करावीत हे सर्व करण्यासाठी कवीच्या वडिलांनी कवीला आपल्या काळजावर दगड ठेऊन त्याला शिक्षणासाठी शहरात धाडलं आहे. पुढे कवितेत शहर आणि गाव यात शिक्षण घेत संघर्षमय जीवनाचा प्रवासात गुंतलेले भावस्पर्शी मनाची कविता डोळ्यापुढे उभा राहते. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शिक्षणासाठी प्रोत्साहन करणारा ” बा ” दिसतो . आपल्या मुलाने “भीमाच्या चळवळीचा शिलेदार ” व्हावं हे बाळ कडू आपल्या मुलाला पाजतांना बा कवितेत दिसतो. आणि कवितेतला बाप प्रोत्साहन देत काळजाला हात घालतो….. त्या कवीच्या कवितेतील ओळी पुढीलप्रमाणे ……

(बानं शिकवलं)

कधी हिंमत हारु नको
पुस्तक वाचणे सोडू नको

पुस्तक माझे सर्वस्व आहे
कधी एकटा समजू नको |

शिक्षण वाघिणीचं दूध आहे
भीमाच्या चळवळीचा गाभा आहे

लोकांसाठी तुझं………
जगणं हेच तुझे जीणं आहे.

भीमाच्या चळवळीचं…….
नवनाथ शिलेदार तुल बनणं आहे !

” माजोऱ्या पाऊसा” या कवितेत जीवनात आलेले अनुभव कवी मांडले आहेत…

माजोऱ्या पाऊसा

दुष्काळ येतो ओला ,
सजीवांना हानी पोचवतो…..अन विध्वंस सारा …..
२६ जुलै २००५ चा दिवस कोण विसरतो !

मुसळधार पावसामुळे जीवन सृष्टीवर कशी अवकळा आली. अचानक ढगफुटी झाली. जिकडे तिकडे पाणीच पाणी, निसर्गाचा कोप झाला. मुंबईकरांचे खूप हाल झाले. रेल्वे बंद. रस्ते बंद. शेतीचे नुकसान झाले. प्रत्येकाच्या तोंडचा घास हिरावून गेला. नागरिक सर्व जात धर्म पंत सोडून माणसाला माणुसकीचे दरवाजे खुले करून मदत करत होते. हा भयानक प्रसंग डोळ्यापुढे न विसरण्या सारखा नाही. असे कवी सांगतो .

२६ जुलै २००५ ची ही घटना मी डोळ्यांनी पाहिली आहे. या कवितेमुळे या आठवणी ताज्या झाल्या. तो प्रसंग डोळ्यापुढे उभा राहतो. कवी नवनाथ रणखांबे हे तासगाव तालुक्यातील असून एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याची ते आपल्या कवितेतून व्यथा मांडत आहेत. “माजोऱ्या पाऊसा” या कवितेतून कवी पाऊसाची दिशा स्पष्ट करताना कवी लिहितो

जिथे गरज , तिथे नाहीस
जिथे नको , तिथे आहेस
तुझी हानी , सहन होत नाय
सोसल्या शिवाय पर्याय नाय

शेतकरी शेतात पोरा बायकासह राब राब राबतो. शेतकरी कष्ट करतो म्हणून आपल्या सर्वांना भाकरी मिळते. ओला आणि कोरडा दुष्काळ पडल्याने शेतकऱ्याचे खूप हाल होतात. शेतीचे नुकसान होते. ते सोसल्या शिवाय कांही पर्याय नसतो. असे या कवितेत वर्णन केल्याचे दुसून येते.
मनातील भाव व्यक्त करणारी शब्दांची कला म्हणजे कविता. कधी ही कविता आनंद देते तर कधी डोळ्यातून आश्रू उभे करिते. कधी प्रेम करायला शिकवते. कवी नवनाथ रणखांबे यांच्या कवितेमधला गर्भित अर्थ मनाला स्पर्शून जातो.
कविता “उपाशी पोटं” मध्ये ते म्हणतात

उपवास मानवाला बोले
उपवास आजही ….उपाशी पोटं करतात
उपाशी दिडविताच्या पोटासाठी….
जीवन संघर्ष करतात,
उपाशी पोटं आजही….
भुकेच्या तृप्तीला शोधतात !

कवीने आपल्या कवितेतून जातीय प्रथेवर खडसून टीका केली आहे. “जातीचे ग्रहण ” या कवितेत कवी म्हणतो …

मळभ होती प्रेमालाही जातीची
उतरंड होती प्रेमातही जातीची

प्रेम हे पवित्र बंधन आहे जातीच्या नावाखाली ते ही मलिन झाले आहे. जीवन संघर्ष कविता संग्रहातील कविता या वाचनीय आहेत.

पुस्तक : जीवन संघर्ष
कवी : नवनाथ रणखांबे
पाने : ८०
स्वागत मूल्य -: ८० ₹
प्रकाशन : शारदा प्रकाशन ठाणे
पुस्तक परीक्षण लेखिका -: कामिनी धनगर , दहीगाव / मुरबाड, ठाणे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

आत्म्यापासून वेगळे असणारे छत्तीस तत्त्वांचे क्षेत्र

सांत्वनाच्या जेवणाची नासाडी

मराठवाड्यात चांगल्या पावसाची प्रतिक्षा कायम

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading