October 14, 2024
rendalkar-library-literature-award-announcement
Home » Privacy Policy » रेंदाळकर वाचनालयाचे साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

रेंदाळकर वाचनालयाचे साहित्य पुरस्कार जाहीर

  • रेंदाळकर वाचनालयाचे साहित्य पुरस्कार जाहीर
  • कोरोनामुळे गेल्या दोन वर्षातील पुरस्कारांचे एकत्रित वितरण
  • उल्लेखनीय साहित्य योगदानाबद्दल साहित्यिकांचा सन्मान
  • कविता संग्रह, कादंबरी, कथा संग्रह व बाल वाङ्मय या साहित्य प्रकारांचा पुरस्कारात समावेश

रेंदाळ येथील कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर वाचनालयाचे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदा 2019 व 2020 मधील साहित्य पुरस्कार रविवारी (ता. २१) देण्यात येणार आहेत. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष आर. एम. पाटील व सचिव सुरेश पाटील यांनी दिली आहे.

2019 चे साहित्य पुरस्कार असे –

ग्रंथ पुरस्कारामध्ये पद्मरेखा धनकर (चंद्रपुर) यांच्या फक्त सैल झालाय दोर या कवितासंग्रहाचा, महेंद्र कदम (टेंभुर्णी) यांच्या तणस या कांदबरीचा तर आबा गोविंदा महाजन (जळगाव) यांच्या खानदेशी गाव या बालवाङ्मयाचा समावेश आहे. या पुरस्कार निवड समितीसाठी डॉ. रणधीर शिंदे , डॉ. गिरीश मोरे आणि डॉ. रफीक सूरज यांनी काम पाहिले. या पुरस्कारांसाठी सुमारे ७० लेखक- कवींनी आपली पुस्तके पाठविली होती.

उल्लेखनीय साहित्य योगदानाबद्दल अनुवादक आणि बालवाङ्मय लेखिका मेघा पानसरे व ज्येष्ठ नाटककार , कवी आणि कादंबरीकार जयसिंग पाटील यांना सन्मानित करण्यात येणार आहे. जयसिंग पाटील हे दीर्घकाळापासून पत्रकार म्हणून कार्यरत असून, त्यांचे ‘मंथरक आणि इतर एकांकिका’ (एकांकिकासंग्रह), ‘…कुंभाराचं काय झालं ?’ (नाटक) आणि ‘नामशेष झालेला माणूस’ (कादंबरी) इत्यादी विविधांगी साहित्य प्रकाशित आहे. अनेक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धांतून त्यांच्या नाटकांना- एकाकिकांना लेखनविषयक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. डॉ. मेघा पानसरे या शिवाजी विद्यापीठात विदेशी भाषा विभागात प्रमुख आणि रशियन भाषेच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची ‘सिर्योझा’, ‘तळघर’, ‘गाणारे पीस’, ‘सोवियत रशियन कथा’ या अनुवादित साहित्यकृती बरोबरच काही संपादने प्रकाशित झाली आहेत.

2020 चे साहित्य पुरस्कार असे –

ग्रंथ पुरस्कारामध्ये राजू देसले (नाशिक) अवघेचि उच्चार या कविता संग्रहाचा, संतोष जगताप लोणविरे (सांगोला) यांच्या वीजेने चोरलेले दिवस या कादंबरीचा तर सुचिता घोरपडे यांच्या खुरपं या कथासंग्रहाचा व एकनाथ आव्हाड (मुंबई) यांच्या शब्दांची नवलाई या बालवाङ्मयाचा समावेश आहे. या पुरस्कारांसाठी सुमारे १००हून अधिक लेखक- कवींनी आपली पुस्तके पाठविली होती.

उल्लेखनीय साहित्य योगदानाबद्दल  ज्येष्ठ कवी – अनुवादक – पत्रकार विजय चोरमारे व व्या पिढीतील आश्वासक नाटककार – कवी आशुतोष पोतदार यांना सन्मानित करण्यात येणार आहे. विजय चोरमारे हे दीर्घकाळापासून पत्रकार म्हणून कार्यरत असून, त्यांचे ‘पापण्यांच्या प्रदेशात’, ‘शहर मातीच्या शोधात’, आणि ‘आतबाहेर सर्वत्र’ हे तीन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. हिंदी कवी प्रियदर्शन यांच्या ‘नष्ट कुछ भी नहीं होता’ या कवितासंग्रहाचा त्यांनी मराठी अनुवाद केला आहे. याबरोबरच त्यांचे अनेक संशोधनपर आणि संपादित ग्रंथ प्रसिध्द आहेत. त्यांच्या अनेक साहित्यकृतींना आणि पत्रकारितेतील योगदानाबद्दल राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. पटना(बिहार) येथील ‘नई धारा’ नियतकालिकातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित ‘नई धारा रचना पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला आहे. डॉ. आशुतोष पोतदार हे इंग्रजी भाषेचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांची ‘आनंदभोग मॉल’, ‘पुलाखालचा बोंबल्या मारुती’, ‘F1/105’, ‘सिंधू, सुधाकर आणि इतर’ ही नाटके प्रकाशित आहेत. त्याबरोबरच जाँ जने या फ्रेंच नाटककाराच्या ‘द मेड्स’ या नाटकाचे ‘कामवाल्या बाया’ या नावाने मराठी रूपांतर केले आहे. याशिवाय अलिकडेच त्यांचा ‘खेळ खेळत राहतो उंबरा’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading