June 18, 2024
Book review of Shabdachi Navlai by Prof Ramdas Kedar
Home » भाषा समृद्ध करणारी कविता : शब्दांची नवलाई
मुक्त संवाद

भाषा समृद्ध करणारी कविता : शब्दांची नवलाई

मराठी भाषा ही इतर भाषेच्या तुलनेत वेगळी असून ती अलंकाराने नटलेली आहे. शब्दसौंदर्य आणि अर्थसौंदर्य हा या भाषेमध्ये गोडवा निर्माण करतो. याचा योग्य वापर व प्रयोग करून कवी एकनाथ आव्हाड यांनी शब्दांची नवलाई या कवितेतून आपली मातृभाषा कशी समृद्ध होत जाते आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
प्रा. रामदास केदार, उदगीर

एकनाथ आव्हाड यांचे बालसाहित्य लेखनासाठी मोठे योगदान असून त्यांचे ‘बोधाई’, ‘गंमत गाणी’, ‘अक्षरांची फुले’, ‘हसरे घर’, ‘मज्जाच मज्जा’, ‘तळ्यातला खेळ’, ‘पंख पाखरांचे’, ‘आभाळांचा फळा’, ‘खरंच सांगतो दोस्तांनो’ हे बालकविता संग्रह, ‘मजेदार कोडी काव्यकोडी’ संग्रह, निष्फळ भांडण, ‘राजा झाला जंगलाचा’, ‘थेंबे थेंबे तळे साचे’, ‘जरा ऐकून तर घ्या’, ‘आनंदाची बाग’, ‘एकदा काय झालं’ हे बालकथासंग्रह, ‘नव्याने बहरावे’, ‘बालकोश’, ‘बालनिसर्गायन’, ‘प्रिय हा भारत देश’ हे इत्यादी पुस्तके प्रकाशित झाले आहेत. चैत्रेय, टाँनिक, बालनिसर्गायन चे संपादन त्यांनी केले असून बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितेचा समावेश झाला आहे. बालभारतीच्या अभ्यासक्रम समितीवर त्यांनी सदस्य म्हणून कार्य केले आहे.

एकनाथ आव्हाड हे मराठी बालसाहित्यात सातत्याने वेगवेगळा प्रयोग करत असतात. मुलांच्या मनात मातृभाषेची गोडी निर्माण करु पाहतात. कवितासंग्रहाचे शिर्षकच ‘शब्दांची नवलाई’ असे आहे. मराठी भाषा ही जशी वळवावी तशी वळते. एका शब्दांचे अनेक अर्थ घेता येतात. मराठी भाषा विनोदी, आनंदी तर आहेच पण सौंदर्यपूर्ण ही आहे. हे एकनाथ आव्हाड यांचा हा कविता संग्रह वाचल्यानंतर लक्षात येते.

म्हणी, वाक्प्रचार, क्रियापदे , विरामचिंन्हे, व्याकरणदृष्टया शब्दांच्या छटा ही नाविन्यपूर्ण नवलाई कवितेत अवतरलेली आहे. एका शब्दाला तीन अर्थ असतात. हे आमच्या बाई कशा सांगतात – आमच्या बाई एका शब्दाचे अर्थ सांगतात तीन अरण्याला म्हणतात जसे वन, रान, विपीन दुधाला म्हणतात त्या दुग्ध, पय, क्षीर पाण्याला म्हणतात त्या जल, अंबू, नीर अशी असंख्य उदाहरणे एकनाथ आव्हाड यांच्या कवितेतून आलेली आहेत. यामुळे मुलांना अशा कविता आवडतात. मुलांच्या ज्ञानात भरही पडते.

कवीने कवितेत वाक्प्रचाराचा योग्य प्रयोग केलेला आहे ते ‘आई म्हणते..’ कवितेत लिहितात. आई म्हणते संकटांना नेहमीच तोंड द्यावे लहानथोर साऱ्यांशीच तोंड भरून बोलावे तोंड देणे, तोंड भरुन बोलणे. अशा वाक्प्रचार ओळीचा प्रयोग केलेला आहे. यामुळे मराठीची भाषेची गोडी मुलांना लागते. कवितेतील आशय, भावार्थ, सौंदर्य मुलांना लवकर समजायला लागते. हातावर तुरी देण्याच्या मारु नका बाता, जिभेचा पट्टा चालवणे बंद करा, आता नाकाने कांदे सोलणे शहाणपणाचे नाही, पोटात कावळे ओरडले की जेवायची घाई मुलांना ही कविता वाचल्यानंतर हातावर तुरी दणे, जिभेचा पट्टा चालवणे, नाकाने कांदे सोलणे, पोटात कावळे आरडणे या वाक्प्रचाराचा अर्थ समजून घेण्यासाठी डोके चालवू लागतात. अशा वेळी वेगवेगळी उदाहरणे मुलांना देता येतात.

‘घरांची नवलाई ‘ या कवितेत प्रत्येकांच्या घरांचे वेगळेपण सांगितलेला आहे. सुगरणीचा खोपा, घुबडाची ढोली, पोपटाचा पिंजरा, मुंग्याचे वारुळ, मधमाश्यांची पोळी, कोळ्यांची जाळी, कोंडीचा खुराडा, उंदराची बीळ, गायीचा गोठा, ही सारी निवाऱ्याची नवलाई आहे. अशा कवितेतून मुलांना शब्दांची खाणच सापडते. म्हणीमुळे भाषेची गोडी कशी वाढते ते कवी लिहितात. कोल्हाला द्राक्षे आंबट म्हणतात बरं सारे, खाण तशी माती शंभर टक्के खरे भाषेला सुंदर फुलवण्यांचे काम या म्हणी करत असतात. याचा उलगडा कवी मुलांना करून देतो.

वेगवेगळ्या शब्दकोड्यांचा कवितेत प्रयोग केला तर मुलांना ते खूपच आवडते आणि मजेशीरपणे उत्तर शोधण्याचा प्रयत्नही करु लागतात. शब्दकोड्यांचा नवखा प्रयोग कविने केलेला आहे. मराठीत चिन्हांचा खेळ कसा असतो हे कवी लिहितो. वाक्य पुर्ण झाले हसून सांगे पूर्णविराम, दोन छोट्या वाक्यांना सहज जोडे अर्धविराम अशी अनेक उदाहरणे या बालकवितेत आहेत. मुलांना रंजन करत प्रबोधनाचे धडे देणारी ही उदाहरणे आहेत.

अशा कविता वाचल्यानंतर भाषिक कौशल्य मुलांना समजणे खूप सोपे होते. मुलांनी आणि शिक्षकांनी आवर्जून हा कवितासंग्रह वाचावा. अशा बालसाहित्यात प्रयोग करणे म्हणजे मुलांच्या मनात भाषेची गोडी निर्माण करणे हे होय. अशीच मुलांमध्ये गोडी निर्माण करणारी एकनाथ आव्हाड यांची कविता आहे. डॉ. सुरेश सावंत यांनी आशयात्मक आणि विवेचनात्मक कवितेला न्याय देत सुंदर अशी प्रस्तावना लिहिलेली आहे. तर संतोष घोंगडे यांनी आकर्षक मुखपृष्ठ आणि आतील मांडणी केलेली आहे.

पुस्तकाचे नाव – शब्दांची नवलाई (बालकविता संग्रह)
लेखक/कवी – एकनाथ आव्हाड
प्रकाशक – दिलीपराज प्रकाशन, पुणे
पृष्ठे – ६४, मूल्य – १५०

Related posts

रत्नाकर काव्य पुरस्कार जाहीर

शिवरायांच्या स्वराज्याची गौरवगाधा !

मराठेशाहीचा वारसा लाभलेला पुरंधरचा लोकशाहीतला वीर!

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406