December 7, 2022
Home » कचऱ्याकडे संपत्ती म्हणून पाहा…काय मिळते कचऱ्यातून?
नव संशोधन आणि तंत्रज्ञान

कचऱ्याकडे संपत्ती म्हणून पाहा…काय मिळते कचऱ्यातून?

कचरा जाळल्यानंतर निर्माण होणाऱ्या उष्णनेतून वीज निर्मितीचेही प्रयोग केले जात आहेत. यामध्ये विषारी वायूचे उत्सर्जनामुळे काही मर्यादा आहे. पण मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हे गरजेचे आहे.

राजेंद्र घोरपडे 

वाढता कचरा हा मानवी आरोग्यासाठी धोक्‍याचा इशारा आहे. त्यासाठी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. त्यावर सध्या विविध प्रयोग होत आहेत. कचऱ्यावरील प्रक्रियेवरूनच घनकचऱ्याचे चार मुख्य प्रकार पडतात. सेंद्रिय कचरा, रुग्णालय कचरा, विषारी कचरा, पुर्नवापर करता येणारा कचरा असे हे प्रकार आहेत. 

सेंद्रिय कचऱ्यामध्ये अन्न, फुले, पाने, फळे आदींचा समावेश होतो. या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्‍य आहे. रुग्णालयातील कचऱ्यामध्ये वापरलेले मास्क, कापूस, मृत टिशू, रक्ताचे कपडे, पीपीई किट आदीचा समावेश होतो. विषारी कचऱ्यामध्ये टाकावू औषधे, रसायने, बल्ब, बॅटरी आदींचा समावेश होतो. पुर्नवापर कचऱ्यामध्ये पेपर, काच, प्लास्टीक वस्तू यांचा समावेश होतो. अशा या कचऱ्याचे करायचे काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यावर मात करण्यासाठी याचा पूर्नवापर किंवा प्रक्रिया करून याची विल्हेवाट लावणे आवश्‍यक आहे. त्यातून अनेक चांगले उपक्रम आता पुढे येताना पाहायला मिळत आहेत. रोजगार निर्मितीसह यांतून उद्योगही उभे राहू शकतील. 

सेंद्रिय कचऱ्यापासून खत निर्मितीचा उद्योग विकसित होत आहे. शहरामध्ये गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून खत निर्मिती करून त्याची विक्रीही केली जात आहे. बिहारमधील महाबोधी मंदिरात देवास अर्पण केलेल्या फुलांपासून नैसर्गिक रंगाची निर्मिती केली जात आहे. यासाठी कचऱ्याकडे संपत्ती म्हणून पाहायला हवे. पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर समस्या सहज सुटू शकतात. 

कचरा जाळल्यानंतर निर्माण होणाऱ्या उष्णनेतून वीज निर्मितीचेही प्रयोग केले जात आहेत. यामध्ये विषारी वायूचे उत्सर्जनामुळे काही मर्यादा आहे. पण मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हे गरजेचे आहे. टाकावू टायरपासून पायरोलायरीस प्रक्रियेतून इंधन निर्मितीही करता येते. सुमारे 45 ते 50 टक्के इंधन, 10 ते 15 टक्के स्टील वायर तर 30 ते 35 टक्के कार्बन पावडर टायरीपासून मिळते. अंड्याच्या कवचापासून हायड्रोझायपेटाईट प्रक्रियेतून कृत्रिम हाडांची निर्मिती शक्‍य आहे. अंड्याचे कवच म्हणजे CaCo3 याची TiO2 ची संयोग करून CaTiO3 मिळवता येऊ शकते याचा उपयोग न्युक्‍लिअर कचऱ्यावरील प्रक्रियमध्ये करता येणे शक्‍य आहे. 

प्राचीन रंग पर्यावरणपूरक टिकावू 

प्रा. डी. एस. भांगे

शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. डी. एस. भांगे यावर माहिती देताना म्हणाले, प्राचिन काळात वनस्पतीच्या पाने, फुलांपासून रंग तयार केले जात होते. ठराविक प्रकारच्या चिकणमातीबरोबर फुले उकळल्यास किंवा तापवल्यास मिश्र किंवा संकरित रंगद्रव्य बनते. प्राचिन माया संस्कृतीमध्ये माया निळ किंवा माया ब्लू नावाने रंगद्रव्य हे अशाच प्रकारचे होते. ही रंगद्रव्ये प्रकाश, रासायनिक द्रव्ये आणि उष्णता विरोधी असतात. हे रंग फारकाळ टिकतात. वेगवेगळ्या चिकणमातीचा वापर करून अशा पर्यावरणपुरक, टिकावू रंगांच्या निर्मितीसाठी सखोल संशोधनाची गरज आहे. सर्व प्रकारच्या कचऱ्यातून अशीच नवनिर्मिती शक्‍य आहे, यात संशोधनाच्या मोठ्या संधीही आहेत.

Related posts

गडावरील जैवविविधता जोपासण्याची गरज; भुदरगडावर ३०० च्या वर प्रजाती

कोष्टी साप खातात…! आकाराच्या तीस पट मोठे साप कोष्टींचे खाद्य…

नायट्रोजनचे प्रमाण घटतेय ! व्यापक धोरणाची गरज

Leave a Comment