संसारात काय अनित्यता आहे. हे जाणणे. ओळखणे व त्यानुसार आपल्या जीवनात बदल करणे हा संन्यास आहे. संसाराचा त्याग करून हिमालयात गेला तरी दररोजच्या जेवणाची चिंता असतेच. यासाठी कष्ट हे करावेच लागतात. हिमालयात गेला तर फक्त वातावरण बदलते इतकाच काय तो बदल होतो. मग घरदार सोडण्याचा फायदा काय? हिमालयात जाऊन जे करणार ते घरात राहूनही करू शकतोच ना? संसारात राहूनही संन्यस्थ जीवन जगता येते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल 9011087406
तैसी संसारा या समस्ता । जाणिजे जैं अनित्यता ।
तैं वैराग्य दडवितां । पाठीं लागे ।। ३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा
ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें या सर्व संसाराला अनित्यता आहे, असे ज्या वेळेला कळेल, त्यावेळी वैराग्याला घालवून दिले तरी, तें वैराग्य आपण होऊन साधकाच्या पाठीमागे लागेल.
मासे जसे पाण्याबाहेर काढल्यानंतर जिवंत राहण्यासाठी तडफडतात. तसे मनुष्य जगण्यासाठी तडफडत आहे. हे सर्वसामान्यांचे जीवन पाहून सम्राटाच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले. साम्राज्याचा त्याग त्याने केला. मिळालेले ऐश्वर्य त्यागणे तितकी सोपी गोष्ट नाही. आरामात जीवन जगताना वैराग्य उत्पन्न होणे सहज घटना नाही. पुढे हा सम्राट बुद्ध झाला.
मुंबईतील लोकलची गर्दी पाहून रेल्वे स्थानकावरूनच खेडूताने गावचा रस्ता पकडला. त्यात आश्चर्यासारखे काही नाही. शहरातील जीवन हे असे धावपळीचे आहे. गावाकडे कष्टाचे जीवन असले तरी अशी धावपळ नसते. त्यात एक शांती असते. समाधान असते. शेतात राबल्यानंतर दुपारची भाकरी खाऊन झाडाखाली निवांत पडले असता गाढ झोप लागते. शहरात असे होत नाही. पण शहराला सोडणे हा त्याग नाही? ही तेथील जीवनाची दगदग पाहून काढलेली पळवाट आहे. हा संन्यास होत नाही. हे वैराग्य तर निश्चितच नव्हे.
कामावरून आले तरी घरात शांतता नसते. एकतर सतत टीव्ही सुरू असतो. शांत पडावे म्हटले तरी पडता येत नाही. तरीही आपण ते जीवन जगतो. त्याचा आनंद उपभोगत असतो. पूर्वीच्या काळीही नगरातील जीवन हे असेच धावपळीचे होते. जगण्यासाठी धडपड होती. संसार म्हटले की चिंता ह्या आल्याच. मुलांची चिंता, आई-वडिलांची चिंता, काही ना काही चिंतेचा विषय जरूर असतोच. कोणी आजारी असेल तर त्याची चिंता. स्वतः आजारी असलो तर स्वतःची चिंता. मन सतत अशाने विचलित होत राहते. काहींना हा विचार इतका मनाला लागतो की ते या संसाराचा त्याग करतात. घरच्या कटकटीतून बाहेर पडावे यासाठी संसाराचा त्याग म्हणजे पळवाट आहे.
संसारात काय अनित्यता आहे. हे जाणणे. ओळखणे व त्यानुसार आपल्या जीवनात बदल करणे हा संन्यास आहे. संसाराचा त्याग करून हिमालयात गेला तरी दररोजच्या जेवणाची चिंता असतेच. यासाठी कष्ट हे करावेच लागतात. हिमालयात गेला तर फक्त वातावरण बदलते इतकाच काय तो बदल होतो. मग घरदार सोडण्याचा फायदा काय? हिमालयात जाऊन जे करणार ते घरात राहूनही करू शकतोच ना? संसारात राहूनही संन्यस्थ जीवन जगता येते. त्यासाठी हिमालयात जाण्याची गरज नाही.
संसार होत असतो तो करावा लागत नाही. परमार्थ मात्र करावा लागतो. दैनंदिन कामकाज हे प्रत्येकालाच करावे लागते. राजा असला तरी त्याला त्याचे काम करावेच लागते. रंकात राहत असणाऱ्या नागरिकालाही काम हे करावे लागते. ते टाळता येणे शक्य नाही. ही दैनंदिन गरज आहे. अमाप संपत्ती असली तरी ती सांभाळण्याचे काम तरी त्याला करावेच लागते ना? हे काम आपोआप होत असते. संसारातील अनित्यता जो ओळखतो तो काही न करता परमार्थाच्या वाटेवर येतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.