December 2, 2023
Need for change in degree education system for employment entrepreneurship growth
Home » रोजगार, उद्योजकता वृद्धीसाठी पदवी शिक्षण पद्धतीत बदलाची गरज
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

रोजगार, उद्योजकता वृद्धीसाठी पदवी शिक्षण पद्धतीत बदलाची गरज

यशस्वी उद्योजकांच्या भेटी व त्यांचे व्याख्याने व प्रश्नोत्तरे यामुळे पदवीधरामध्ये उद्योगधंद्याविषयी आवड व तळमळ निर्माण होण्यास मदत होईल. भारत देशातील सर्वोत्तम आदर्श व यशस्वी उद्योजक रतन टाटा यांची ऑनलाईन व्याख्याने पदवीधरांना ऐकवली पाहिजेत त्यासाठी लागणारी सादरीकरणाची व्यवस्था महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून दिली पाहिजेत. इंड्रस्ट्रियल व्हिजीटच्या माध्यमातून पदवीधरांना त्यांच्या शाखेनुसार प्रशिक्षण दिले पाहिजेत.

महादेव ई. पंडीत
लेखक स्थापत्य अभियांत्रिकीचे पदवीधर असून व मुंबई येथे व्यावसायिक आहेत.

आज उत्तम शेती, दुय्यम धंदा व कनिष्ठ नोकरी हा पारंपरिक व्यावसायिक क्रम आता कूस बदलून सध्या उत्तम नोकरी, दुय्यम धंदा व कनिष्ठ शेती असा पहायला मिळतो. बदललेल्या क्रमामुळे नोकरीसाठी बहुतांश लोक शहराकडे आकर्षित होऊ लागले आहेत पण सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना तसेच नवीन पदवी पदविका धारकांना मेट्रोपोलिटीयन शहरात स्थायिक होणे तसेच त्या शहरात स्वतःचे घर घेणे अत्यंत जिकेरीचे होऊ लागले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वडिलोपार्जित शेतीवाडीमध्ये म्हणावा तितका जमिनीचा हिस्सा मिळत नसल्यामुळे गावाकडे सुद्धा सामान्य पदवी धारकांना कोणताही नवीन प्रकल्प साकारणे व त्या ठिकाणी स्थाईक होणे म्हणजे अगदी तारेवरची कसरत आहे, तर मग आता करायचे काय? हा प्रश्न डोळ्यासमोर तरळतो. शेती, धंदा व नोकरी ह्या पारंपारिक व्यावसायिक क्रमातील पहिला व तिसरा विभाग सोडला तर दुय्यम धंदा हा पर्याय प्रत्येकासमोर शिल्लक राहतो आणि म्हणूनच आज पदवी धारकांनी रोजगार निर्मिती व व्यवसायाकडे वळले पाहिजेत आणि त्यासाठी लागणारे शिक्षण व प्रशिक्षण अगदी महाविद्यालयीन पातळीवरच सुरू केले पाहिजेत.

विद्यापीठांनी व शैक्षणिक संस्थानी या बाबींचा सर्वांगीण विचार करून अभ्यासक्रमामध्ये व्यावसायाभिमुख शिक्षण, प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे धडे शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत करणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. महाराष्ट्रात दरवर्षी अंदाजे १४ लाख विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात मग इतक्या मोठ्या संख्येला सरकारी किंवा खाजगी नोकरी मिळणे आजच्या तारखेला अतिशय कठीण झालेले आहे, त्याप्रमाणे सध्या निसर्गाच्या अनियमितपणामुळे व सरकारच्या फसलेल्या हमी भाव योजनेमुळे शेती उद्योग सुध्दा खूप कठीण झालेला आहे आणि म्हणूनच आता पदवीधरांनी रोजगार निर्मितीकडे वळले पाहिजेत. रोजगार निर्मितीमुळे राज्यातील तसेच देशातील बेरोजगारी कमी होण्यास खूपच मदत होईल आणि महाराष्ट्र राज्य येणा-या १० वर्षात खूप पुढारलेले प्रगत राज्य म्हणून भारत देशात नावा रूपाला येईल आणि म्हणूनच येणा-या शैक्षणिक पंच वार्षिक कार्यक्रमात सरकारने पदवीधरांच्या अभ्यासक्रमात व्यावसायाभिमुख अभ्यास प्रणाली अंमलात आणली पाहिजेत.

आज पदवी प्राप्त प्रत्येक विद्यार्थी सरकारी, निमसरकारी अथवा खाजगी नोकरीकडे आकर्षिला जातो. आकर्षणाचे मुख्य कारण सरकारी नोकरांचे भले मोठाले पॅकेज व सुविधा हे आहे. पण आज राज्य तसेच केंन्द्र सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी नोकर भरती जवळजवळ बंदच असल्यासारखी आहे. व्यवसाय करणे खूप कठीण आहे आहे त्यामध्ये खूप अडी अडचणी आहेत तसेच खूप मोठ्या भांडवलाची गरज लागते त्याच प्रमाणे व्यवसाय म्हणजे आळवावरचे पाणी अशी पारंपारिक म्हण प्रचलित असल्यामुळे प्रथमता पदवीधर मंडळी उद्योग धंद्याविषयी तितकीशी उत्सुक नसते. पण सध्या बाजारात पदवी धारकांची संख्या खूपच जास्त असल्यामुळे नोक-यांची कमतरता जाणवू लागली आहे त्यामुळे बरेच पदवीधारक तसेच अभियंतेसुद्धा अगदी तुटपुंज्या पगारावर रात्रं दिवस काम करत आहेत. ब-याच प्रकल्प स्थळी व कारखान्यामध्ये पदवीधर नोकर मजूरांपेक्षाही कमी वेतनावर काम करत आहेत आणि ही बाब अगदीच मनाला बोचणारी आहे.

काही प्रकल्प स्थळावरील व कार्यालयातील वरिष्ठ सुध्दा त्यांना सध्या प्रशिक्षणाची व अनुभवाची खूपच गरज आहे तसेच त्याना कामाविषयी काहीही येत नाही आणि त्यासाठी त्यांना मोठाला पगार देण्याची काहीच गरज नाही असा शेरा सरसकट मारतात आणि पदवीधर नोकरांच्या जखमेवर मीठ चोळतात. बहूतांशी मालकांना व व्यावसायिकांना काही विशिष्ठ बाबींचे तांत्रिक शिक्षण नसताना सुध्दा भांडवलाच्या पाठबळावर ते मोठमोठाले व्यावसायिक म्हणून प्रस्थापित झालेले आहेत. भांडवलाच्या बळावर प्रस्थापित झालेला मालक नवख्या पदवीधर नोकरांना ब-याचवेळा खूपच अपमानास्पद वागणूक देत असतात आणि म्हणूनच आज पदवीधारकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे व रोजगार निर्मितीकडे वळले पाहिजेत. मग हे उद्योग धंद्यासाठी लागणारे शिक्षण, प्रशिक्षण मिळणार कुठे? हा गहन प्रश्न नव्या को-या पदवी धारकांसमोर उभा राहतो.

आज आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये १०+२+३ किंवा १०+२+४ हा शैक्षणिक पॅटर्न बहूतांशी राबविला जातो. पारंपारिक शिक्षण पद्धतीमध्ये थोडा फार बदल करून व्यावसायाभिमुख शिक्षण प्रणाली आमंलात आणणे आजच्या घडीला अत्यंत आवश्यक आहे. सर्व साधारणपणे १२ वी नंतर प्रत्येक विद्यार्थी महाविद्यालयामध्ये एका विशिष्ट आवडत्या क्षेत्राकडे वळतो आणि जवळजवळ त्याच क्षेत्रामध्ये सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी नोकरी पकडतो आणि म्हणूनच महाविद्यालयाच्या प्रवेशानंतर नोकरीची मानसिकता बदलण्यासाठी विद्यापीठानी, शैक्षणिक संस्थानी तसेच मार्केटमधल्या प्रस्थापित व्यावसायिकांनी पुढाकार घेतला पाहिजेत तसेच विद्यार्थ्यानी सुध्दा पुढाकार व अपार मेहनत घेण्याची तयारी ठेवली पाहिजेत.

विद्यार्थ्यानी इयत्ता १२ वी नंतर आवडत्या शाखेत प्रवेश घेतल्यानंतर त्या शाखेचा पदवीपर्यंतचा महाविद्यायीन अभ्यास कसून करणे अत्यंत आवश्यक आहे आणि आपली ज्ञानाची बॅंक पूर्णपणे भरून घेतली पाहिजेत. आज कोणताही व्यवसाय करायचा ठरविला तर प्रथमता दोन बाबींची अत्यंत गरज भासते. त्या दोन बाबी म्हणजे पहिली भांडवल व दुसरी बाब म्हणजे त्या व्यवसायाचे पुर्ण तांत्रिक ज्ञान. पदवी धारकांची ज्ञानाची बॅंक पुर्ण भरलेली व समृध्द तसेच अद्यावत असेल तर त्या पदवी धारकाला त्याच्या संबंधित शाखेमध्ये व्यवसाय करणे खूपच सोपे जाईल. महाविद्यालयीन अभ्यासक्रमात नव उद्योजकांना तसेच प्रस्थापित उद्योजकांना त्यांच्या वेळेप्रमाणे भेटण्याचा व मुलाखतीचा विषय अभ्यासक्रमात अंर्तभुत करणे आवश्यक आहे त्यामुळे व्यवसायात येणा-या अडी अडचणी, कर्जाचा व कामाचा ताण कसा सुलभ त-हेने सोडवायचा याचे प्रशिक्षण महाविद्यालयीन लेव्हललाच प्राप्त होईल. व्यवसायाबद्दलचा प्रामाणिकपणा कसा जोपासायचा ह्याचे प्रशिक्षण देण्यासाठी शहरातील प्रमुख व नावाजलेल्या व्यावसायिकांचे सेमिणार महाविद्यालयीन शैक्षणिक कालात आयोजित केले पाहिजेत. व्यवसायामधील प्रामाणिकपणा व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

कोणत्याही शाखेच्या पदवीधरांने आपले अंर्तमन काय बोलते आहे? याचा अचूक व काळजीपुर्वक अभ्यास केला पाहिजेत तसेच महाविद्यालयीन पातळीवर कल चाचणींचे आयोजन केले पाहिजेत. अनन्या मामून यांनी दिग्दर्शित केलेला मेकअप हा मराठी सिनेमा सन २०२० मध्ये प्रदर्शित झालेला आहे, ह्या चित्रपटाचे चित्रीकरण महाविद्यालयीन विद्यार्थ्याना दाखविले पाहिजेत. मेकअप म्हणजे चेह-याला फेस पावडर किंवा फेस क्रिम लावणे असा नसून अंर्तमन व बाह्यमन यांचे चेह-यावरचे प्रदर्शन म्हणजेच ‘मेकअप’. उद्योजक बनण्यासाठी प्रत्येक पदवीधर विद्यार्थ्याला स्वतःला मेकअप करता आले पाहिजेत यासाठी महाविद्यायांनी सुट्टीकालीन अवधीमध्ये उद्योगासाठी लागणा-या कौशल्यांचे प्रात्यक्षिक आयोजित करणे गरजेचे आहे.

कॉलेज कॅपंस मध्ये नव नवीन प्रोजेक्ट करण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले पाहिजेत आणि त्या प्रत्येक प्रोजेक्टचे मार्केटिंग व सादरीकरण केले पाहिजेत आणि या सर्व गोष्ठींना महाविद्यालयाने प्राध्यान्य दिले पाहिजेत. मा. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली मधील काही महाविद्यालयांमध्ये नव नवीन प्रोजेक्ट करण्याचे प्रयोग केले आहेत आणि महाविद्यालयीन पदवीधरांनी त्यांच्या ग्रुपमार्फत ते मॅाडेल्स प्रस्थापित व्यावसायिकांना प्रदान करून त्यांच्याकडून रॅायल्टी कॉलेजला मिळवून दिली आहे आणि त्या रॅायल्टी मधील मेजर पार्ट त्या पदवीधरांना मिळालेला आहे.

उद्योजक बनण्यासाठी प्रत्येक पदवीधरांचे आवश्यक असणारी कौशल्ये महाविद्यालयीन शिक्षणामध्येच रूजविली पाहिजेत. प्रत्येक व्यावसायिकाला प्रारंभीच्या काळात सेल्समन, मार्केटिंग ऑफीसर, मालक, नोकर, अगदी ऑफीसबॅाय, टेक्नीकल एक्पर्ट, डिझायनर, तांत्रिक सल्लागार, मॅनेजर व चेअरमन इत्यादी रोल सादर करता आले पाहिजेत आणि या ठिकाणी मेकअप सिनेमा उपयोगी पडेल. महाविद्यालयीन पातळीवर विविध प्रात्यक्षिके सादर करुन पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या प्रकारचे कौशल्य आहे ते ओळखणे सोपे होईल, त्याच प्रमाणे इतर कौशल्य रूजविण्यासाठी लागणारे प्रशिक्षण प्रात्यक्षिकां मार्फत देता येईल. आजच्या घडीला उद्योजक बनण्यासाठी तसेच उद्योगात प्रगती करण्यासाठी बांधिलकी, चिकाटी, विनयशीलता, एकाग्रता, दुस-याला समजून घेण्याची वृत्ती, त्याला आपल म्हणंन पटवून द्यायची क्षमता, व्यवसायावरील निष्ठा, प्रामाणिकपणा इत्यादी गुण असायला हवेत. मग हे सर्व गुण महाविद्यालयीन शैक्षणिक कालखंडातच पदवीधरांच्या नसानसात उतरविणे व रूजविणे सोपे आहे. शैक्षणिक कालखंडात मार्केटमधील यशस्वी उद्योजकांची व्याख्याने आयोजित करूण वरील गुणधर्माचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले पाहिजेत आणि अश्या प्रकारची व्याख्याने व प्रात्यक्षिके महाविद्यालयानी तसेच सिनियर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आयोजित केली पाहिजेत.

यशस्वी उद्योजकांच्या भेटी व त्यांचे व्याख्याने व प्रश्नोत्तरे यामुळे पदवीधरामध्ये उद्योगधंद्याविषयी आवड व तळमळ निर्माण होण्यास मदत होईल. भारत देशातील सर्वोत्तम आदर्श व यशस्वी उद्योजक रतन टाटा यांची ऑनलाईन व्याख्याने पदवीधरांना ऐकवली पाहिजेत त्यासाठी लागणारी सादरीकरणाची व्यवस्था महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून दिली पाहिजेत. इंड्रस्ट्रियल व्हिजीटच्या माध्यमातून पदवीधरांना त्यांच्या शाखेनुसार प्रशिक्षण दिले पाहिजेत. विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य, नेतृत्व, मुलाखतींचे तंत्र, निविदा स्पर्धा , विविध खेळ अश्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा व कार्यशाळा महाविद्यालयांनी सुट्टीकालीन वेळेत आयोजित केल्या पाहिजेत. रतन टाटा यांचे आत्मचरित्र, तसेच बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य व्यावसायिक बी. जी. शिर्के, यांत्रिकी व्यवसायातील सुप्रसिद्ध व्यावसायिक लक्ष्मणराव किर्लोस्कर, हॅाटेल व्यवसायातील प्रसिध्द व्यावसायिक श्री विठ्ठल कामत तसेच जागतिक किर्तीचे मायक्रोसॉफ्ट उद्योजक बील गेट्स या सर्वांची आत्मचरित्रे तसेच त्यांनी केलेल्या परिश्रमाचे व अनेक प्रयोगांचे टाचन विद्यार्थ्यांच्या शाखेनुसार अभ्यासक्रमात अंर्तभुत केले पाहिजेत, त्यामुळे यशस्वी उद्योजकांमधील कौशल्ये कशी रूजवायची याची कल्पना महाविद्यालयीन पातळीवरच पदवीधरांच्या लक्षात येतील.

बुधवार दिनांक २७ जूलै २०२२ रोजी लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार सन २०१४ ते २०२२ या कालखंडामध्ये सरकारी नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या २२.०५ कोटी इतकी आहे. गेल्या आठ वर्षात भारत देशामध्ये किती सरकारी पदे भरती केली आहेत त्याचा तपशील खाली दिला आहे.

वर्ष : सरकारी नोकरींची संख्या

२०१४-१५ : १३०४२३
२०१५-१६ : १११८०७
२०१६ -१७ : १०१३३३
२०१७ -१८ : ७६१४७
२०१८-१९ : ३८११०
२०१९-२० : १४७०९६
२०२०-२१ : ७८५५५
२०२१ -२२ : ३८८५०
व आता पंतप्रधान मोदी साहेबांनी पुढील दोन वर्षात १० लाख सरकारी नोकरींचे उदिष्ठ्य ठेवले आहे. मग सांगा अंदाजे १४० कोटी इतकी महाकाय लोकसंख्या असलेल्या भारत देशात ह्या तुटपुंज्या सरकारी नोकर भरतीमध्ये किती लोकांना सरकारी नोकरी मिळेल? नोकर भरतीच्या वरील तपशीलावरुन आपल्या लक्षात येईल की पदवीधर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळविणे किती कठीण झाले आहे आणि म्हणुनच महाविद्यालयामध्ये आता व्यावसायाभिमुख शिक्षण प्रणाली सुरु करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

आज केंन्द्र सरकार व राज्य सरकार यांच्या राजकीय अनास्थेमुळे कित्येक सरकारी कार्यालयातील नवीन नोकर भरतीच बंदच केलेली आहे तसेच रिक्त पदे आस्थापित केलेली नाहीत त्यामुळे नवीन पदवीधरांना आज सरकार दरबारी नोकरी मिळणे फारच दुरापास्त झालेले आहे. विविध शाखेतील पदवीधर महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच केंन्द्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत स्पर्धात्मक परिक्षा देण्यासाठी खूप उत्सुक असतात त्याचप्रमाणे ते विद्यार्थी तीन चार वर्षे सलग अभ्यास करत असतात. सरकार दरबारी कागदपत्रे लवकर हालत नसल्यामुळे पदवीधर विद्यार्थी वर्षानुवषें खूप मेहनतीने अभ्यास करून स्पर्धा परिक्षेची व स्पर्धा परीक्षेच्या निकालाची चातकासारखी वाट पहात असतात. परीक्षेत उत्तीर्ण झालेले पदवीधर, सरकारी कार्यालयीन पोस्टींग व काहीवेळा परिक्षेचा निकाल ह्या दोन बाबीं साठी लागणा-या कार्यप्रणालीच्या विलंबामुळे नैराश्याकडे वळतो आणि काही वेळा आपल्या कौटुंबिक समाधानाला कायमचा मुकतो आणि भविष्यात असे विचित्र प्रकार घडू नयेत यासाठी पदवीधरांना अनेक संधी उपलब्ध करूण देण्यासाठी दुय्यम धंदा या पारंपारिक व्यावसायिक क्रमातील स्थानाला कायमची तिलांजलि देऊन उत्तम धंदा, दुय्यम नोकरी व कनिष्ठ शेती असा नवा व समृद्ध क्रम प्रचलित करूण,आमंलात आणण्यासाठी सरकारने पदवीधरांच्या शैक्षणिक कालखंडात नव उद्योजक तयार करण्यासाठी आवश्यक असणारी मुल्ये, शिक्षण, प्रशिक्षण व प्रात्यक्षिके अभ्यासक्रमात अंतर्भूत करणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे त्यासाठी लागणारी व्यवस्था सरकारने उपलब्ध करून देणे खूपच गरजेचे आहे.

Related posts

समाजरंजन करणारी लोककला दंडार

कै. विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा…

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More