पिंपळाचे झाड शेतातील पिकांचे कीडीपासून संरक्षण करू शकते. पिंपळाच्या झाडामुळे कीडीचे नियंत्रण कसे होऊ शकते याबाबत माहिती सांगणारा पीक संरक्षण तज्ज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांचा हा लेख..
पूर्वी शेताच्या बांधावर नैसर्गिक पिंपळाची झाडे होती. आज गावात, सार्वजनिक ठिकाणी, मंदिराच्या आवारात राखीव पिंपळाची झाडे नजरेस पडतात. या झाडांवर रात्री अनेक पक्षी आराम करण्यासाठी येत असतात. नव्हे पिंपळाचे झाड म्हणजे पक्षांसाठी हक्काची आरामाची जागा आहे.
पक्ष्यांची सवय बघा दिवस मावळला की खाण्याचे बंद करतात आणि पहाटे भूक लागली की चिव चिव करत खाणे शोध मोहीम सुरू होते. त्यांच्या याच नैसर्गिक सवयीचा उपयोग कीड नियंत्रणात करून घेतला पाहिजे.
आपल्या बांधावर पिंपळाचे झाड असेल त्याच्या आजूबाजूच्या शेतात पक्षांमार्फत किडी खाल्ल्या जातात. कीड नियंत्रण होते आणि कीडनाशकांवरील खर्च कमी होतो. डहाणू तालुक्यात भाऊराव पाटील (सरावली, कैनाड) यांच्या शेतात चिकू बागेत मधोमध खूप जुने (५० वर्षापेक्षा जास्त वयाचे) पिंपळाचे झाड आहे. संध्याकाळी या झाडावर खूप पक्षी आरामाला येतात. झाडाखाली पक्षांची विष्टा पण खूप पडते. यापासून आयतेच शेताला खत मिळते. आणि महत्वाचे म्हणजे बागेतील किडींचे नियंत्रण करायला मोठी मदत होते. निसर्गाच्या या शक्तीचा योग्य वापर केला जात आहे असे वाटते.
आपण काय करावे?
पक्षांना शेतात आमंत्रित करण्यासाठी या गोष्टी कराव्यात.
१) उन्हाळ्यात ठराविक ठिकाणी शेतात पक्षांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्यात नियमित पाणी टाकावे.
२) त्याच ठिकाणी सुरुवातीचे काही दिवस सकाळी पक्षांना खाण्यासाठी नियमित दाणे टाकावे. म्हणाजे पक्षांना शेतात रोज यायची सवय होते.
३) भाजीपाला पीक असेल तर पक्षी बसण्यासाठी लाकडाचे छोटे छोटे मचान उभे करावे. काही दिवस सकाळी शिजलेला भात यावर ठेवा. यावर सकाळी पक्षी बसतात. आणि आजूबाजूचा असलेल्या किडी आणि अळ्या खातात.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.