सध्या पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधून दर शनिवार हा ‘दप्तराविना शाळा’ असा घेतला जातो. तेव्हा अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास साधताना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील गुरू शिष्य नाते अधिकच दृढ होण्यास मदत होते. शिवाय गैरहजेरीचे प्रमाण कमी होताना दिसत आहे.
सौ. ज्योती सुजित महाजन,
उपशिक्षिका, विद्यानिकेतन क्र ६, येरवडा, पुणे
मराठी महिन्यांपैकी सर्वात जास्त सण असणारा एक महिना म्हणजे श्रावण . धूप -दीपांचा दरवळ, व्रत- वैकल्यांचा महिना म्हणजे श्रावण. देवदेवतांचे पूजनाने निर्माण झालेले अध्यात्मिक, अल्हाददायक वातावरण निर्माण करणारा महिना म्हणजे श्रावण. ऊन- पाऊस – पाठशिवणीचा खेळ खेळणारा खटयाळखोर महिना म्हणजे श्रावण. निसर्ग सौंदर्याची उधळण करणारा महिना म्हणजे श्रावण. साहित्यिकांच्या लेखणीला भुरळ घालणारा महिना म्हणजे श्रावण.
श्रावण महिना हा हिंदू पंचांगांनुसार मराठी वर्षातील पाचवा महिना आहे . या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव मिळाले आहे. आपण जर दिनदर्शिका पाहिली तर , असे दिसते की , श्रावण महिन्याच्या आरंभापासून ते समाप्तीपर्यंत प्रत्येक वारी कोणत्याना कोणत्या देवतेची पूजा केली जाते . रविवार -आदित्य पूजन, सोमवार- शिवपूजन, मंगळवार -मंगळागौरी पूजन, बुधवार- बुधपूजन, गुरुवार -बृहस्पति पूजन , शुक्रवार- जरा -जिवंतिका पूजन , शनिवार – अश्वत्थमारुती पूजन. तसेच पंचमीला नागपंचमी, पौर्णिमेला नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन, अष्टमीला श्रीकृष्ण जयंती आणि गोपळकाला आणि अमावस्येला बैलपोळा हे विविध अंगांनी नटलेले सण श्रावण महिन्यात येतात. श्रावणी पौर्णिमेला ‘पौती पूनव’ तर श्रावणी अमावस्येलाच ‘पिठोरी अमावस्या’ असेही म्हणण्याचा प्रघात आहे.
या सणांनिमित्त भूतदया, निसर्गाबद्दलची कृतज्ञता, एकजुटीची भावना, नात्यांमधील घट्ट विण इ. मानवी भावनांचे प्रकटीकरण करणारा हा महिना पूर्वापार चालत आलेल्या परंपरांना आधुनिकतेची जोड देऊन आनंदाने साजरा करू या.
आमच्या शाळेत देखील आम्ही यानिमित्त विविध उपक्रम राबवून आपल्या सांस्कृतिक परंपरा वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत असतो. जसे की नागपंचमीच्या अगोदर मेंदी स्पर्धा, मातीचा नाग बनविणे, रक्षाबंधनाच्या अगोदर राखी बनवून ती सुंदर पद्धतीने सादरीकरण करणे, दहीहंडी, मातीचे बैल बनवणे, कुंडीतील बागकाम इत्यादी. सध्या पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधून दर शनिवार हा ‘दप्तराविना शाळा’ असा घेतला जातो. तेव्हा अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास साधताना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील गुरू शिष्य नाते अधिकच दृढ होण्यास मदत होते. शिवाय गैरहजेरीचे प्रमाण कमी होताना दिसत आहे.
अर्थातच जीवन आणि शिक्षण यांचा समतोल साधण्यासाठी अभ्यासाबरोबरच या सहशालेय उपक्रमांची जोड लाभददायकच ठरणारी आहे. श्रावणासरी झेलताना झाडे लावण्याचाही आनंद आम्ही लुटला आणि नागपंचमी निमित्ताने विद्यार्थीनींनी आपापल्या हातावर काढलेली मेहंदी पाहूनही धन्य वाटले.
मेंदीच्या स्पर्धांना तर विद्यार्थिनींशी संवाद साधताना जाणवले की त्या श्रावण महिन्यातील सणावाराला आपली आई, ताई, आत्या, मावशी, काकू शिवाय शेजारणींच्याही हातावर मेहंदी काढतात. म्हणजेच आबालवृद्ध, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष अशा सर्वांनाच जोडून आनंदाची धमाल उडवून देणारा महिना म्हणजे श्रावण होय!
काय मग? तुम्हीही सामील होणार ना या आनंदाच्या उधळणीसाठी ?
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.