November 22, 2024
चिंतनशीलतेचे दाट रेषासंदर्भ '
Home » श्रीधररेषामध्ये अंभोरे यांच्या चित्रशैलीचे वाचन
मुक्त संवाद

श्रीधररेषामध्ये अंभोरे यांच्या चित्रशैलीचे वाचन

चिंतनशीलतेचे दाट रेषासंदर्भ ‘

शब्दशिवार’ प्रकाशनाच्यावतीने नामवंत चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्या चित्रांविषयींचे महावीर जोंधळे लिखित ‘श्रीधररेषा’ हे पुस्तक प्रकाशित झालेआहे. या पुस्तकाला आरंभी काही शब्द लिहावेत, असे इंद्रजित घुले यांना वाटले. त्यांच्या अगत्यशील आग्रहामुळे या पुस्तकाविषयी आरंभीचे काही शब्द. वस्तुतः मी चित्रकलेचा प्रशिक्षित विद्यार्थी नव्हे. चित्राविषयीचे कुतूहूल आणि प्रथमदर्शी रंग-रेषा, आकारांच्या कुतूहलापोटी लिहिण्याचे धाडस करत आहे.

प्रा. रणधीर शिंदे ९८९०९१३०३१

एक हरहुन्नरी अवलिया कलावंत म्हणून श्रीधर अंभोरे महाराष्ट्राला परिचित आहेत. सृष्टी आणि माणसांविषयी अपार कुतूहल श्रीधर अंभोरे यांना आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या प्रदेशांशी श्रीधर अंभोरे यांचा जवळून सबंध आला. त्यांचे चित्रकलेविषयी औपचारिक शिक्षण वा गुरुगंडा बांधणी झालेली नाही. कलेविषयीची आंतरिक प्रेरणा आणि सृष्टीवाचनातून स्फुरलेले आकारक्षण चित्रबद्ध करण्यात त्यांना धन्यता वाटते. त्यामुळे त्यांची चित्ररेषा महाराष्ट्रातील चित्रकलापरंपरेशी फटकून आणि ‘स्व’तंत्र राहिली. या चित्ररेषेचे पूर्व आणि उत्तर घराणे नाही. अहमदनगर येथे पोस्टात काम करत असताना त्यांनी काही साहित्यविषयक उपक्रम केले. ‘आदिम’ व ‘दिंडी’ ही नियतकालिके सुरू केली. यामध्ये सदाशिव अमरापूरकर, अरुण शेवते यांचा सहभाग होता. याचबरोबरच त्यांनी वाङ्मयीन नियतकालिकांची मुखपृष्ठे व रेखाटने केली. बहुविध स्वरूपाचे वाचन आणि सृष्टीवाचनातून झालेल्या शहाणीवाच्या जोरावर त्यांनी त्यांची स्वतंत्र चित्रशैली निर्माण केली. वयाच्या तेहेतिसाव्या वर्षी त्यांना फाय फाऊंडेशन सारख्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आजही ते आवडलेल्या कलाकामासाठी मनःपूर्वक भटकंती करतात.

श्रीधररावांचं रेषाधर हे नावच मला सर्वार्थांनी जास्त समर्पक वाटतं. श्रीधरावांचं मन म्हणजे विद्युतरेषांचं निबिड जंगल ! चित्र काढतात तेव्हा
ते या जंगलातील चिमूटभर वीजा कागदावर पिसारून ठेवतात. त्यातील अनोखे लयलावण्य मग आपल्या डोळ्यांमध्ये मुक्कामीच येते. हा रेषानायक रेषांचीच भाषा बोलत राहतो. रेषा हीच या रेषावीराची मातृभाषा होते आणि या मातृभाषेचा मोर त्याच्या अस्तित्वाचा समानार्थ होऊन जातो. आपणासही या रेषासम्राटाच्या रेषांमध्ये गुंतलेला आपला जीव अपूर्व सौंदर्याच्या बातम्या देत राहतो. ही गुंतवणूक मोठ्ठीच आनंददायी असते. या रेषांचं संगीत आपल्यातही उमलत राहत. या रेषांच्या स्पर्शोत्सवात आपणही कधी मोहरून आलो ते आपल्यालाही कळत नाही.

यशवंत मनोहर

चित्रनिर्मितीतील मनस्वी आनंद हा त्यांच्या प्रज्ञेचा आविष्कार! त्यामुळेच नियमबद्ध व व्यावसायिक स्वरूपाची कामे श्रीधर अंभोरे यांनी केली नाहीत. इतरेजणांच्या सांगण्यावरून ते चित्रे काढत नाहीत. आवडलेल्या विषयांवर काही पुस्तकांची मुखपृष्ठे व रेखाटने केली. दबलेल्या इच्छांचा आविष्कार चित्रात असतो, असे त्यांना वाटते. चित्रनिर्मितीत साधना आणि रियाजाला ते महत्त्व देतात. लोकांताऐवजी एकांतातील आंतरिक प्रेरणा आणि त्याक्षणीची सत्प्रवृत्ती अंभोरे यांना महत्त्वाची वाटते. त्यामुळेच चित्रांकडे ते विशुद्धतेच्या, निर्मळतेच्या भावनेने पाहतात. शतकानुशतके वाहत आलेल्या नेणिवेतील आधिभौतिकाचे अंभोरे यांना कमालीचे आकर्षण आहे. त्यामुळे त्यांच्या चित्ररेषेचे नाते आदिमतेशी आहे. सृष्टीतील ओबडधोबड आकार व आकारविहीन अवकाशाचे त्यांना पराकोटीचे आकर्षण आहे. गडद रंगांच्या सरमिसळीऐवजी कृष्णधवल रंग ही त्यांची प्रियतम अवकाशभूमी आहे. त्यामुळेच या कृष्णधवल प्राथमिक रंगभूमीवर त्यांनी चित्राकारास सजवले आहे. छोट्या-मोठ्या दगडांचे अवाढव्य आकार, झाडांचे, बुध्यांचे अनियमित वेल्हाळणे, विविध वास्तू, पशुपक्षी, प्राणी व मानवी जग यांच्या ‘असण्या’ची रेषासंस्कृती त्यांनी निर्माण केली. श्रीधर अंभोरे यांच्या चित्रशैलीला दार्शनिक चिंतनशीलतेचे दाट संदर्भ आहेत. पिंपळवृक्ष, पिंपळपानांची सळसळ, पक्ष्यांचे थवे, फांद्यांच्या चमचमणाऱ्या क्षण गुणगुणीचे नाते बुद्धकाळाशी आणि चिंतनाशी आहे. या अर्थानेही अंभोरे यांच्या चित्रशैलीचे वाचन होऊ शकते.

अंभोरे यांच्या चित्रशैलीत निसर्ग आणि सृष्टीच्या ‘असते’पणाला विशिष्ट स्थान आहे. त्यांच्या रेषाचित्रांमधील आकारांची खेचभूमी ही निसर्ग आणि जंगल आहे. भारतातील अनेक वनोपवने त्यांनी अंतःकरणपूर्वक पाहिली, अनुभवली आहेत. त्यांच्या चौफेर आणि संवेदनशील मनाने निसर्गाच्या ‘असते’पणाला अंतःकरणात साठवले आहे. या आकारांना ते चित्रबद्ध करत आले आहेत. सुनियोजित, चिरेबंद आकार, घाटांऐवजी विमुक्त आदी आकारांचे त्यांना जादुई आकर्षण आहे. निसर्गाला ते गुरू मानतात. लहानपणी गावाकडे पाहिलेल्या ‘बाभुळबना’ने त्यांना खूप काही दिले आहे. सृष्टीच्या या चौकटविरहित सळसळण्याला त्यांनी त्यांच्या रेषा चित्रांमध्ये मध्यवर्ती स्थान दिले. त्यामुळे अंभोरे यांच्या रेषाचित्रातील विलोभनीय अशा निसर्गसृष्टीतील नात्यांमधले परस्परसंबंध जाणून घेणे हे आनंददायी आहे.

त्याचबरोबर अंभोरे यांच्या चित्रशैलीत मानव प्रवासाची रूपे आहेत. मानवी रूपांना चित्रांकित करण्याचे वेगळे सामर्थ्य त्यांच्या रेषाचित्रांमध्ये आहे. याठिकाणी सुधीर पटवर्धन आणि श्रीधर अंभोरे चित्रांमधील ‘मानवी’ रेखाटने पाहणे उद्बोधक आहे. सुधीर पटवर्धनांच्या मानवी चित्रांतील पराकोटीची अभावग्रस्तता व करुणा ही महानगर जीवनातून आली आहे. तिचे म्हणून एक वेगळे स्थान आहे. एक अनागर अशा माणसांच्या करुण आणि केवील चेहऱ्याच्या समूहसंस्कृतीने अंभोरे यांच्या चित्रशैलीला वेगळे परिमाण लाभले आहे.

श्रीधर अंभोरे यांची स्वतःची एक चित्ररेखाटन शैली आहे. ती त्यांनी स्वतंत्ररित्या घडवलेली आहे. या चित्रात मानव संस्कृतीच्या आदिखुणांचे ठसे आहेत. गडद हिरव्या- पोपटी रंगांची डेरेदार झाडं, मातट रंगाचा बुंधा, झाडाच्या डहाळ्यांवरले चिमुकले धवलपक्षी, चेहराविहीन स्त्री आणि पुरुष, गाय आणि बैलांनी त्यांची चित्रसृष्टी सजली आहे. पाठमोरे विशाल पसरलेले गडद निळे फिकट नीलरंगी नभांगण, समुद्ररंग आणि आकाशरंग एकमेकात मिसळून गेलेले पाहणे विस्मयजनक आहे. त्यांच्या चित्रातील दृष्टिबिंदूतून संथ विराम पावत गेलेले, मिटत गेलेले आकाश मनात नवे अर्थध्वनी निर्माण करते. त्यांच्या चित्रांतील मोठ्या अवकाशाच्या पार्श्वभूमीवर जमिनीवरील एक स्थिरचित्राचे प्रभावीपणे साक्षांकन आहे. रंगांच्या ताजेपणाचा, टवटवीतपणाचा प्रत्यय देणारा आल्हाददायक अनुभव अंभोरे यांच्या रंगचित्रात आहे. कमळफुलांचे आकार, झाडापानांचे अनंत नक्षीकाम, त्यातल्या वेल्हाळ लयबद्ध रेषांच्या पुजवळणांनी बहार आणली आहे. कमळ, विविध पानेफुले, पक्षी, चंद्रकोर, मोर आणि मानवी चेहरे आणि ऊर्ध्वगामी हातांबोटांचे आकाशाकारांना वेगळे स्थान आहे.

अंभोरे यांच्या चित्रांत मानव संस्कृतीचे एक वेगळे चित्रांकन आहे. समूहगर्दी, चेहऱ्याची विशिष्ट भरड ठेवण, त्यातली अभावग्रस्तता, आजूबाजूचा अस्ताव्यस्त परिसर, फुटकीतुटकी भांडी, समूह, डोईवर ओझे बाळगणारे स्त्री- पुरुष, स्त्रियांच्या कटीवरील लहान मुले, शेळ्या मेंढ्या असा कृतिशील मानव समूह त्यांच्या चित्रांत आहे. कष्टकरी, श्रमण संस्कृतीची ही चित्रे आहेत. खूप तपशील न भरता मानवी जगण्यातील अभावग्रस्तता व त्यातली करुणा या चित्रांतून पाझरते. निसर्ग भावस्थितीच्या वेगवेगळ्या मूडस् त्यातला अवकाशपैस पकडणारी रेषाचित्रे आहेत. कमीत कमी रेषा, त्यांची एकमेकातील अनेक प्रकारची गुंतवळ, काळ्या- पांढऱ्या रंगाळच्या प्रभावी वापरातून इतकी अर्थघनता आणली आहे. त्यांच्या रंगचित्रांत आणि रेखाचित्रांत मानव आणि निसर्ग यातल्या आदिम भावावस्थेच्या छटा आहेत. त्यामुळे श्रीधर अंभोरे यांच्या चित्रशैलीचे वाचन एका वेगळ्या समज-उमजेकडे घेऊन जाते.

महावीर जोंधळे यांचे अंभोरे यांच्या रेषाचित्रांविषयीचे हे मुक्त स्वरूपाचे चिंतनलेखन आहे. ते मोठ्या प्रमाणात आस्वादात्मक व भावदर्शी आहे. अंभोरे यांच्या रेषाचित्रांचा त्यांच्या मनावर जो ठसा उमटला आहे, त्याला काहीएक प्रमाणात चौकटबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. अंभोरे यांच्या चित्रवाचनातून त्यांच्या मनावर झालेल्या परिणामांच्या नोंदी व त्यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये जोंधळे यांच्या लेखनात आहेत. अंभोरे यांच्या चित्रांची काहीएक मीमांसा आहे. अंभोरे यांच्या रेषाचित्रांचे वाचन, आकलन आणि त्यांना जाणवलेले अर्थ नोंदविले आहेत.

या चित्राकारांचे आकारसौंदर्य, तत्त्वे आस्वादात्मक पद्धतीने मांडले आहेत. ‘त्या त्या चित्रात,’ ‘सूचक भावनिर्मिती,’ ‘एकतत्त्व शैली’, ‘उभं आडवं आणि तडक,’ व ‘अमेरिकेतही श्रीधर’ या पंचसूत्रातून जोंधळे यांनी चित्रवैशिष्ट्ये नोंदवली आहेत. जोंधळे यांच्या चित्रअन्वयार्थास खास अशा प्रशिक्षित चित्रकला मीमांसेचे संदर्भ नाहीत; परंतु जोंधळे यांच्या सूक्ष्म अशा रेषाचित्र पाहणीतून त्यांच्या मनावर त्या त्या चित्राचे जे संस्कारठसे उमटले, त्याचे दिलेले हे शब्दरूप आहे. मात्र या चित्रअर्थात चित्रांविषयी, कलावंताविषयी जाणवलेल्या अर्थाची काहीएक संगतवार निरीक्षणे व चित्रविशेष आहेत.

आरंभी त्यांनी श्रीधर अंभोरे यांच्या रेषाचित्रांची व्याप्ती व पसारा सांगितला आहे. ‘रेषालय’ केंद्रवर्ती ठेवून अभिव्यक्तीला प्राधान्य देणारी उज्ज्वल चमक असणारी ‘श्रीधररेषा’ त्यांना वाटते. ‘साधनं कमी आणि साधना जास्त’ या शब्दांत अंभोरे यांच्या कलेचे वेगळेपण सांगितले आहे. श्रीधर अंभोरे यांच्या सुट्या सुट्या चित्रांमधील जाणवलेली अर्थसंगती शोधली आहे. या चित्राकारांतील मानवीपण, लोकभावना, निसर्गाकार, समाजसंस्कृतीचे संदर्भ, भूमिनिष्ठा, लयबद्धता, ताजेपणा, कल्पनाशीलता व सर्जनशीलतेची रूपे उलगडून दाखविली आहेत. अंभोरे यांच्या आकारचिंतनामागे असणाऱ्या कलावंताच्या जाणीव-नेणीव व विचारशीलतेची रूपे ते सांगतात. या चित्रांमधील ‘पंखहीन समाजाती खरेखुरे अबोली अर्थ व माणूसकेंद्री दृष्टीची वैशिष्ट्ये ‘त्यांची चित्रे सर्वहारा संस्कृतीकडे अधिक झुकलेली आहेत.’ हे त्यांचे निरीक्षण महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर श्रीधर अंभोरे यांच्या चित्रांतील ‘काळ्या’ रंगाच्या दाट उपस्थितीच्या संदर्भक्षेत्राचा नोंदवलेला अन्वयार्थ महत्त्वाचा आहे.

‘अमेरिकेतही श्रीधर’ या टिपणात अंभोरे यांचा संक्षिप्त चरित्रांश सांगितला आहे. ‘श्रीधररेषा’ जाणून घेण्यासाठी तो महत्त्वाचा आहे. श्रीधर अंभोरे यांचे व्यक्तिमत्त्व, संवेदन स्वभाव, मानवी गोतावळा, खुली-उमदी विमुक्त दृष्टी, कमालीचे साधेपण, फिरस्ती, सर्जनशील वेडेपण व ‘रेषाइमाना’ची संक्षिप्त सूत्रे सांगितली आहेत.

महावीर जोंधळे यांच्या चित्रवाचन लेखनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील आस्वादपरता. त्यांनी आवडलेल्या, भावलेल्या चित्राची संगतवार वैशिष्ट्ये भावभाषेत सांगण्याला महत्त्व दिले आहे. चित्रवाचनाच्या एकांत मग्नतेतून आलेला प्रत्यय नोंदविला आहे. त्यात भावलेली मनःपूर्वकता आहे. त्यामुळे हा रेषागौरव अधिक जास्तीच्या आत्मप्रत्ययी भाषेत नोंदवला आहे. ‘ही चित्रगाथा म्हणजे आईनं जात्यावर म्हटलेली ओवी वाटते.’ ‘त्यांचे चित्र एक कविता असते आणि कथाही.’ ‘डोळे तप्त होतात आणि निवतातही’ अशी चित्र आस्वादरूपे आहेत. एका अर्थाने ही मुक्तचित्रचिंतन शैली आहे. अंभोरे यांच्या ‘चित्रगाभ्यात शिरून हळूहळू मन अगारू झाले की, असाधरणेतचा अर्थ उकलत जातो.’ या भावनेने त्यांनी लेखन केले आहे.

एकंदरीत, महावीर जोंधळे यांनी श्रीधर अंभोरे यांच्या रेषाचित्रांचे अर्थ व वैशिष्ट्ये शोधली आहेत. कलावंतांच्या संदिग्ध प्रमेयवाटांची अर्थसंगती त्यात आहे. अंभोरे यांच्या चित्रात समाज-संस्कृती व विचारांचे अंश आहेत. त्याचबरोबर या चित्रांचे सौंदर्याकार नोंदवले आहेत. कोणत्याही कलावंतांची बेसरबिंदी (ग्रेस यांचा शब्द) शोधणे हे महाकठीण काम असते. कलावंतांच्या रंगरेषाकाराचे अर्थ- अनर्थ व साहचर्य संबंधाचा संगतवार उलगडा करणे कठीण असते. मराठीत चित्रसमीक्षा व चित्रांवरील लेखन फारसे होत नाही. या पार्श्वभूमीवर या लेखनाचे मोल आहे. हा चित्रवाचनाचा प्रारंभिक टप्पा आहे. हरेक चित्ररसिकांच्या मनात सापेक्ष चित्रवाचनाचे ब्रह्मांड अर्थ असतात. त्याला ध्वनित केले तर ‘चित्रसमजे’ची वृद्धी होईल. या वाटेवरून चित्रवाचनाची संस्कृती अधिक वर्धमान व्हावी. तिला असंख्य फांद्या फुटाव्यात. यासारख्या प्रयत्नातून अंभोरे यांच्या रेषा-चित्रांच्या आकलन-अर्थाच्या वाचक/सापेक्ष अनेक कक्षा प्राप्त होतील, असा विश्वास वाटतो. चित्रवाचनाची अशी खुली भूमी अशा लेखनातून प्राप्त व्हावी.

पुस्तकाचे नाव – श्रीधररेषा
लेखक – महावीर जोंधळे
प्रकाशक – शब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा, जि. सोलापूर मोबाईल – ९४२३०६०११२
पृष्ठे – ८१, किंमत – १०० रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading