रायगड : केंद्र आणि राज्य सरकार शेतकरीविरोधी आहे, या सरकारचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी ९० दिवसांच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानाची सुरुवात शनिवारी (ता. १) रायगडावरून करत आहोत. राज्यातील शेतकऱ्यांना ऊस, कापूस आणि सोयाबीनच्या नफ्या-तोट्याचे गणित माहिती पुस्तक आणि सभाद्वारे समजावून सांगणार आहोत. हा कालावधी झाल्यानंतर मात्र राज्यव्यापी आंदोलनातून राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाग पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी (ता. १) येथे केली.
स्वाभिमानी संघटनेच्या वतीने रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे व पुतळ्याचे दर्शन घेऊन अभियानास प्रारंभ केला. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. श्री शेट्टी म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या गवताचेही महत्त्व ओळखून त्यांना सुखी ठेवण्याचे धोरण राबवले, मात्र त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे धोरण राबवले आहे. गेल्या पाच वर्षांत ऊस उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे, त्या तुलनेत नफा मात्र वाढला नाही. उपपदार्थांपासून कारखाने पैसे मिळवत असताना यातील शेतकऱ्यांचा वाटा मात्र दिला जात नाही. कापूस व सोयाबीनचे गणितही तसेच आहे. १५० रुपयांच्या कापसापासून दोन हजार रुपयांचा शर्ट तयार होतो. कापसावर प्रक्रिया करणारे घटक मालामाल होत असताना मात्र कापसाला भाव मिळण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे हे मोठे दुर्दैव आहे, असेही श्री शेट्टी यांनी सांगितले.
या वेळी डॉ. जालंदर पाटील, संदीप जगताप, महेश खराडे, तात्या बालवाडकर, पोपटराव मोरे, पूजा मोरे, वैभव कांबळे, सुभाष शेट्टी, अमर कदम, संदीप जगताप, जनार्धन पाटील, रवी मोरे, विठ्ठल मोरे, सागर शंभुशेट्टे, शैलेश चौगुले, शैलेश आडके आदी उपस्थित होते.