November 14, 2024
Social thinking of Annabhau sathe novel writing
Home » अण्णाभाऊंच्या कादंबरी लेखनाचे समाजचिंतन
मुक्त संवाद

अण्णाभाऊंच्या कादंबरी लेखनाचे समाजचिंतन

असं म्हटलं जातं , की चांगल्या साहित्याचे निकष काळाबरोबर बदलत जातात; परंतु ते चुकीचे आहे. चांगले साहित्य हे नेहमीच माणसाच्या विवेकबुद्धीला आवाहन करत असते. म्हणूनच ते मुळात चांगले असते. त्यामुळे ते कोणत्याही काळात समकालीन असते. मात्र दुर्दैवाने मराठीत चांगल्या साहित्याचा निकष या पद्धतीने लावला गेला नाही.

अजय कांडर

‘लोकल पण ग्लोबल’ हे शब्द शब्दश: लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यलेखनाला लागू होतात. अस्सल जीवनानुभव साहित्य लेखनात मांडले गेले तर ते अनुभव मांडणारा लेखक आपल्या भूभागाच्या सीमापण ओलांडून सातासमुद्रापार पोहोचतो. अण्णाभाऊंचे लेखनही आपल्या देशाच्या सीमा ओलांडून इतरत्र पोहोचले. शिक्षणाची तोंडओळख असणारा हा महान कलावंत आपल्या विविध लेखन गुणांनी इतिहास निर्माण करतोच; परंतु त्यांचं कादंबरी लेखन म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय भौगोलिक, कौटुंबिक संघर्षमय जीवन जगणाऱ्या माणसांच दस्तऐवजीकरण आहे. लेखक प्रा. सोमनाथ कदम यांनी ‘अण्णाभाऊंची कादंबरी, आशय आणि समाज चिंतन’ या संपादित केलेल्या ग्रंथामध्ये सदर दस्तऐवजीकरण कशा प्रकारचे आहे, याबद्दल अभ्यासकांनी सखोलपणे आपली अभ्यासपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत.

असं म्हटलं जातं , की चांगल्या साहित्याचे निकष काळाबरोबर बदलत जातात; परंतु ते चुकीचे आहे. चांगले साहित्य हे नेहमीच माणसाच्या विवेकबुद्धीला आवाहन करत असते. म्हणूनच ते मुळात चांगले असते. त्यामुळे ते कोणत्याही काळात समकालीन असते. मात्र दुर्दैवाने मराठीत चांगल्या साहित्याचा निकष या पद्धतीने लावला गेला नाही. तो अभिजन वर्गाला अभिप्रेत असणारा निकष लावला गेल्यामुळे समग्र जगण्याचं भान देणार साहित्य अशा अभिजन वर्गाच्या वाचनापासून दूर राहिले. पण याचा अर्थ ते साहित्य लेखन दुय्यम दर्जाचे आहे असे म्हणता येत नाही. म्हणूनच अभिजन वर्गाने नाकारलेले साहित्य काळाच्या पुढे टिकले आणि जेवढा संघर्ष जीवनाचा वाढत गेला तेवढे ते अधिक वाचक प्रिय झाले.

अण्णा भाऊंची अशीच उपेक्षा अभिजन वर्गाने केली हे सर्वश्रुत आहे. अपवाद वगळता अगदी अजूनही अभिजन वर्गातील जो वाचक स्वतःला अभिजात वाचक समजतो, त्या वाचकांपासून अण्णाभाऊंचं साहित्य दूर आहे. हे मराठी वाचन संस्कृतीच सूक्ष्म निरीक्षण केल्यावर लक्षात येते;परंतु जगण्याच्या कोलाहलात अण्णा भाऊंचे साहित्य अधिक महत्त्वाचे वाटू लागले आणि अण्णा भाऊंचे लेखन बघता बघता जगभर पोहोचले. आपल्याला या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रा. सोमनाथ कदम यांनी संपादित केलेल्या ‘अण्णा भाऊंची कादंबरी आशय आणि समाजचिंतन ‘ या ग्रंथाचा विचार करावा लागतो.म्हणूनच हा ग्रंथ महत्वाचा आहे.

‘अण्णा भाऊंची कादंबरी, आशय आणि समाजचिंतन’ या ग्रंथात महादेव कांबळे, शिरीष लांडगे, मिलिंद कसबे, अनिल सकपाळ, गिरीश मोर, कैलास अंभुरे, नारायण भोसले, प्रतिभा टेंभे, सूर्यकांत कापशीकर, विवेक खरे, सुशीलप्रकाश चिमोरे, शिवाजी जवळगेकर, बबन इंगोले, सतीश म्हस्के, प्रमोद गोराडे, जी.के. ऐनापुरे, सतीश कामत, दत्ता घोलप, राजाभाऊ भैलुमे, विठ्ठल, भंडारे, संजय शिंदे प्रकाश नाईक, मारोती कसाब, मनोहर सिरसाट, सोपान खुडे, शरद गायकवाड, अनिल फराकटे, पी. विठ्ठल, सहदेव चव्हाण, वैशाली बेटकर आदी अभ्यासकांच्या लेखनाचा समावेश करण्यात आला आहे.

१९५१ ते १८६९ या काळातील अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र कादंबरीचे वाङ्मयीन दृष्टीकोनातून समाजचिंतनपर अवलोकन आणि चिकित्सा मांडण्याचा प्रयत्न या ग्रंथाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यापूर्वी अण्णा भाऊंच्या कादंबऱ्यांवर समीक्षा लेखन झालं. त्याचं ग्रंथ संपादनही झालं. मात्र सर्वच कादंबरीवर समीक्षा लेखन एकत्र संकलित करण्याचा हा पहिलाच महत्त्वाचा प्रयत्न आहे. त्यामुळे अण्णा भाऊ साठे यांच्या सर्व कादंबऱ्यांना एकत्र न्याय देण्याचा आणि त्यांच्या सर्व कादंबऱ्यांचा सम्यक विचार करायला लावणारा हा ग्रंथ अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीवर नव्याने अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना एक महत्त्वाची उपलब्धी आहे.

अण्णा भाऊंनी व्यवस्थेचा मुळातून विचार केला. त्यामुळे ते स्वतःची अशी स्वतंत्र मांडणी करतात. त्यांचं व्यवस्थेबदलचे आकलन थक्क करणारे आहे. त्यांच्या लेखणीवर मार्क्स आणि बाबासाहेबांचा प्रभाव जाणवतो. त्यामुळे साहजिकच समाजातला शेवटचा सर्व जाती धर्मातील शोषित – ‘ ‘नाही रे वर्गातील घटक’ त्यांना आपला वाटायचा. म्हणून त्यांनी दलित या शब्दाची व्याख्या व्यापक केली होती. जो विविध जातीतून शोषणाच्या पातळीवर आहे तो दलित आहे, असं त्यांना वाटे. अण्णाभाऊंचं एकूण कादंबरी लेखन आणि त्यावरील अभ्यासकांचं हे चिंतन लक्षात घेतलं,की ही व्याख्याही त्यांनी किती समजून केली आहे; त्यांची जगण्याची समज किती सखोल आहे हे आपल्याला जाणवते.

कोणताही द्रष्टा लेखक द्रष्टा का असतो हे येणाऱ्या काळानंतर स्पष्ट होते. त्या लेखकाच्या पाठीमागेच त्या द्रष्टेपणाचं मोठेपणही लक्षात येतं. अण्णा भाऊ साठे हे खरे अर्थाने द्रष्टे लेखक होते. सदर कादंबरी लेखनावरचं चिंतन वाचताना असं लक्षात येतं, की अण्णा भाऊ कादंबरी लेखनाच्या माध्यमातून जे भाष्य करतात त्यामागे त्यांचा दूरगामी विचार असतो. पण हा विचार फक्त ठरवून त्यांनी केलेला असं जाणवत नाही, तर समाजस्तरातील भेदाच्या त्यांच्या अस्वस्थतेमधून तो नकळत त्यांनी मांडलेला आहे.

आता हेच बघा,अण्णा भाऊ रामराज्य नाकारतात. कारण रामराज्य हे पुरुषसत्ताक व ब्राह्मणशाहीचे प्रतीक होते. अर्थात ते खरंच आहे. माणसाने आपला विवेक शाबूत ठेवून निखळ माणसाकडून माणसाकडे जाण्याचा विचार केला, की अण्णा भाऊंचं रामराज्याचं प्रतीक नाकारणे किती योग्य होते हे आता पटतं. उलट रामराज्या ऐवजी अण्णा भाऊ ‘जनराज्य’ शब्दाचा प्रयोग करतात. पण जनतेच्या मतांनी निर्माण होणारे हे राज्य ‘जनराज्य’ कधीच न होता, काही मूठभरांचे झालेले आहे आणि आता तर ते पूर्णपणे भांडवलदारांच्या हाती गेलेले आहे. हा अनुभव आपण आता घेतो आहोत; पण अण्णा भाऊंनी कित्येक वर्षांपूर्वी रामराज्य ही संकल्पना नाकारून आपली दूरदृष्टी प्रकट केली होती. अण्णा भाऊंच्या कादंबरी लेखनातून अशी व्यवस्था नाकारण्याची त्यांची सम्यक वृत्ती दिसून येते.हेच सदर ‘अण्णा भाऊंची कादंबरी :आशय आणि समाजचिंतन ‘ या ग्रंथाचे मोल आहे.असे आपण खात्रीने म्हणू शकतो!

( लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत. ९४०४३९५१५५ )


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading