December 4, 2022
Indian Culture Means Lotus article by Rajendra Ghorpade
Home » भारतीय संस्कृती म्हणजे कमळ
विश्वाचे आर्त

भारतीय संस्कृती म्हणजे कमळ

प्रत्येक मानवानेही कमळाचे हे गुण घ्यायला हवेत. प्रत्येकाच्या जीवनात हा चिखल असतोच. त्या दुर्गंधीत कमळासारखे आपण आपले जीवन फुलवायला शिकले पाहीजे. जीवनात अनेक वाईट घटना घडत असतात. पण त्यातून चांगले तेवढे घेऊन स्वतःचा विकास करायला हवा.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

कमळवना विकाशु । करी रवीचा एक अंशु ।
तेथ आघवाचि प्रकाशु । नित्य दे तो ।। 1376 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ – सूर्याचे केवळ एक किरण कमलवनाचा विकास करण्यास पुरें आहे. असें असतांना देखील कमलाचें निमित्त करून तो सूर्य आपला सर्व प्रकाश जगाला नित्य देत असतो.

परमपुज्य साने गुरुजी यांनी भारतीय संस्कृतीमधील प्रतिकाबद्दल लिहिताना कमळ या फुलाविषयी सुंदर माहिती दिली आहे. साने गुरुजी म्हणतात, कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रधान प्रतिक आहे. सर्व प्रतीकांचा राजा अशी कमळाची ओळख आहे. कमळामध्ये असे कोणते गुण आहेत ? इतके कोणते महत्त्व या कमळामध्ये दडले आहे ?. हे रहस्य काय आहे याबद्दल सांगताना साने गुरुजींनी म्हणतात, कमळ पाण्यात असते. पण ते पाण्याच्यावरच राहाते. ते चिखलात असते पण ते चिखलाच्यावर फुलते. कमळामध्ये ही अलिप्तता आहे. वाईटातूनही चांगले घेऊन स्वतःचा विकास करून घेणे हा महत्त्वाच्या गुण त्याच्यामध्ये आहे. चिखलातून ते रमणीयत्व ते घेते. रात्रंदिवस तपस्या करून ते हृदयात मकरंद भरून ठेवते.

प्रत्येक मानवानेही कमळाचे हे गुण घ्यायला हवेत. प्रत्येकाच्या जीवनात हा चिखल असतोच. त्या दुर्गंधीत कमळासारखे आपण आपले जीवन फुलवायला शिकले पाहीजे. जीवनात अनेक वाईट घटना घडत असतात. पण त्यातून चांगले तेवढे घेऊन स्वतःचा विकास करायला हवा. वाईटात वाईट विचारच घेत राहीलो तर त्या वाईटातच आपण आपले जीवन संपवून जाऊ. यासाठी वाईटात न गुंतता कमळाप्रमाणे चांगले विचार घेऊन ते फुलवण्याचा प्रयत्न करायला हवा. चिखलात कमळ उमलू शकते मग आपल्या जीवनातील चिखलात चांगले विचार का फुलून येणार नाहीत. उलट ते अधिक रमणीय असतील हा विचार आपण करायला हवा.

कमळावर प्रकाश पडताच ते फुलते. प्रकाश जाताच ते मिटते. एक किरण कमलवनाचा विकास करण्यास पुरे आहे. पण त्याच्या फुलण्यासाठी प्रकाश हा असावा लागतो. प्रकाश हा कमळाचा प्राण आहे. गुरु-शिष्याचे नातेही कमळ-प्रकाशासारखे आहे. छोट्याशा प्रकाशानेही कमळ फुलते. कमळाप्रमाणे आपणास फुलायचे असेल तर प्रकाश हा गरजेचा आहे. गुरुंच्या प्रकाशात शिष्याचे जीवनही कमळाप्रमाणे फुलते. यासाठी गुरुंचा सहवास लाभावा. त्यांच्या प्रकाशात आपणही आपले जीवन फुलवायचे असते. सूर्य फक्त कमळालाच प्रकाश देतो असे नाही तर सर्वांना प्रकाश देत असतो. सूर्याप्रमाणे गुरुही निरपेक्षभावनेने नित्य जगाला प्रकाश देत असतात. त्यांच्या या प्रकाशात अनेकांना त्यांचे मार्ग सापडतात. कमळासारखा एखादा शिष्य मग त्यांची परंपरा पुढे नेण्यासाठी फुलत राहातो. यासाठी प्रकाशाचे महत्त्व आपण ओळखायला हवे. भारतीय संस्कृती प्रकाशोपासक आहे. यासाठीच या संस्कृतीचा अभ्यास हा करायला हवा.

भारतीय संस्कृती कधीही स्वतःचे गोडवे गात बसत नाही. उलट भारतीय संस्कृती गाजावाजा न करता फुलत राहील. कमळासारखे फुलत राहील. त्यावर कमळाचे गुणगाण गात शेकडो भ्रमर येतील. पण कमलपुष्प याकडे कधीही लक्ष देत नाही. साने गुरुजी म्हणतात भारतीय संस्कृती आपल्या लेकरास सांगते, कर्मात रमा, निंदास्तुतीवर काटी लावून ध्येयात बुडा. तुम्ही स्वकर्मात इतके तन्मय झालात की कीर्ती आपोआप तुमच्याकडे येईल, आपोआप तुमचे पोवाडे जग गाईल. भारतीय संस्कृती म्हणजे कमळ आहे असे साने गुरुजी म्हणतात. कारण कमळ म्हणते, अनासक्त राहा, प्रकाशाची पूजा करा, अमंलातून मंगल घ्या, तपस्या करा केवळ सत्कर्मात रमा. नवीन नवीन जोडा.

साधना करतानाही हा विचार आपण सदैव ध्यानात ठेवायला हवा. शरीरात कितीही पिडा होऊ दे. त्याकडे लक्ष देऊन विचलित व्हायचे नाही. तर त्या पिडेतून ज्ञानाचे कमल फुलवायचे असते. यासाठी सद्गुरुंनी दिलेल्या प्रकाशात चालत राहायचे आहे.

Related posts

गुरू शिष्याच्या संवादाची अनुभुती

ब्रह्मज्ञानी होण्यासाठीचा मार्ग

कोरोनामुक्तीत अध्यात्माचे महत्त्व…

Leave a Comment