September 9, 2024
Stop special article by J D Paradkar
Home » थांबा !
मुक्त संवाद

थांबा !

शासनाच्या वतीने प्रवाशांसाठी बस थांब्यावर उभारण्यात आलेले प्रवासी मार्गनिवारे दिसायला मजबूत असले, तरी प्रत्यक्षात वर्षभरातच त्यांच्या दर्जाचा प्रत्यय येतो. अखेरीस ग्रामीण भागातील माणसं पूर्वी झोपडी वजा कुटी म्हणून उभारत असलेल्या थांब्या वरील निवाऱ्याला भलेही रूप नसेल पण याच्या उभारणीचा हेतू मात्र नक्कीच साध्य होत होता.

थांबा असे कोणी म्हटलं, तर माणूस क्षणभर का होइना जागीच थबकतो. एखादी व्यक्ती घाईघाईने जातेय आणि त्या व्यक्तीकडे आपले काही काम असेल, तर त्याला थांबा ! असा शब्द‌ उच्चारून थांबवावे लागते. थांबा या शब्दांच्या मागे मागे पुढे लावली जाणारी विशेषणे, ही त्या व्यक्तीच्या वयावर अथवा मोठेपणावर अवलंबून असतात. वयोवृद्ध अथवा सन्माननीय व्यक्ती असेल, तर कृपया जरा थांबता का ? असे म्हणावे लागते. एकूणच ‘ थांबा ‘ या शब्दाच्या मागे पुढे विनंती अथवा आर्जव असणं आवश्यक आहे, हे अधोरेखित होते.

आयुष्याची वाटचाल करत असताना देखील योग्य वेळ येताच कोठे थांबायचे, हे ज्याला समजते तो यशस्वी होतो. येथे थांबा या शब्दात संयम, मनावरील ताबा असे अर्थ दडलेले आहेत. एखाद्या प्रसंगी संकट येणार, हे दिसत असतानाही योग्य वेळी थांबता आले नाही, तर नुकसान हे ठरलेलेच असते. परिणामी ‘ थांबा ‘ या शब्दाचा अर्थ योग्य वेळी आणि प्रसंगी लक्षात घेता आला पाहिजे. स्त्रीयांच्या जीवनात ‘सोळावं वरीसं धोक्याचं’ असं नेहमीच म्हटल जातं. ज्या वयात बुध्दीच्या वाढ होत असताना , हार्मोन्सची वाढ देखील झपाट्याने होत असते, त्या वयात तना – मनावर ताबा मिळवता आला पाहिजे. याचाच अर्थ तन जरी ऊसळी घेत असले, तरी थांबायचं कोठे ? हे मनाला कळायलाच हवं. या प्रसंगातील थांबा या शब्दाचा अर्थ, योग्य वेळी लक्षात आला तरच भविष्य उज्वल असतं. योग्य वेळी थांबता आले नाही, तर पश्चातापाची वेळ येते आणि परतीचे सारे मार्गही बंद होतात. अशावेळी नाते संबंधातील कोणत्याही थांब्यावर आश्रय मिळत नाही. वाचकहो, आता जरा आपण थांबा ! मराठी भाषा एवढी सुंदर आहे, की एखादा शब्द आपण कोठे आणि कोणत्या प्रसंगात वापरतोय, त्यावर त्याचा अर्थ अवलंबून असतो. मात्र, आज‌ मी विस्ताराने लिहितोय तो ‘थांबा’ म्हणजे बसची वाट पाहण्याचे विश्रांतीस्थान आहे.

विनंती वरून येथे एस. टी. बस थांबेल. असा फलक पाहिला, की त्या ठिकाणी राज्य परिवहन मंडळाच्या बसचा ‘थांबा’ असल्याचे लक्षात येते. शहरातील हे बस थांबे सुस्थितीत आणि दर्जेदार पद्धतीने उभारलेले असतात. तुलनेत ग्रामीण भागातील बस थांबे म्हणजे, उन्हाच्या तीव्र झळांपासून सुटका व्हावी म्हणून उभारलेली एखादी ‘ कुटी ‘ असते. फेसबुक पहात असताना मुंबई या माया नगरीत डबेवाल्यांचा सन्मान करण्यासाठी एक बस थांबा मुंबईतील डबेवाल्यांच्या जीवन शैलीशी निगडीत असल्याचे पहायला मिळाले आणि मन भरून आले. ही संकल्पना ज्यांच्या मनात आली आणि याचे रेखाचित्र व उभारणी ज्यांनी केली त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेचे. या बस थांब्याचे छत् म्हणजे डबेवाल्यांचा मोठा ट्रे असून त्यामध्ये सर्व डबे ठेवल्याचे दाखवले आहेत. दोन डबेवाल्या व्यक्तींनी हा छतरूपी ट्रे आपल्या डोक्यावर घेतला आहे. बस थांब्याच्या पुढील बाजूस असणारे आधाराचे दोन खांब म्हणजे एकावर एक उबे ठेवून तयार केलेला आकार आहे. या प्रसंगात ‘ थांबा ‘ या शब्दात डबेवाल्यांची संपूर्ण जीवनशैलीच दिसून येते. डबेवाले आणि मुंबईकर यांचे गेल्या अनेक वर्षांचे अतुट नाते आहे. त्यांच्या नात्याला मुंबईतील या बस ‘ थांब्याने ‘ एका विशिष्ट उंचीवर नेवून ठेवले आहे. आपल्यासमोर अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी असतात. मात्र ते हेरण्याची नजर आपल्याकडे असायला हवी. सोशल मीडियावरील बस थांब्यांच्या या दोन छायाचित्रांनी मला थांबा या विषयावर लिहितं केलं.

ग्रामीण भागातील बस थांबे म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील ही एक अविस्मरणीय जागा. या ठिकाणी तरुण असो वा वयोवृद्ध पाच मिनिटे का होईना कधी विसावला नाही, असं होत नाही. फेसबुक वर ग्रामीण भागातील एका बस थांब्याची छायाचित्र पाहिले आणि मला मिरा रोड येथील डबेवाल्यांच्या सन्मानार्थ उभारलेल्या बस थांब्याची आठवण झाली. दोन्ही बस थांब्यात कमालीची तफावत आहे. ग्रामीण भागातील बस थांबे, तेथील माणसांच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे असल्याचे दिसून येते. याउलट शहरातील बस थांबे मात्र आपली शान अधोरेखित करतात. कोकणच्या ग्रामीण भागात आता अनेक गावातून रस्ते पोचले आहेत. गावात अथवा वाडीत रस्ता आला की पाठोपाठ राज्य परिवहन महामंडळाच्या बसची मागणी होते. रस्त्यांच्या जाळ्यांबरोबरच परिवहन मंडळाने वाडी वस्तीवर बस सेवा देऊन ग्रामीण जीवन सुकर केले आहे. लोकप्रतिनिधींच्या निधी मधून प्रवासी मार्ग निवारे उभारण्याच्या आधी ग्रामीण भागातील बस थांब्यावर एक झोपडी वजा कुटी उभारलेली असे . उन्हापासून बचाव करण्यासाठी तसेच बस, थांब्यावर येईपर्यंत काही वेळ आपले बूड टेकण्यासाठी छोटेसे निवारे उभारले जात. गावातीलच सामाजिक जाण असलेली काही मंडळी एकत्र येऊन बस थांब्याजवळ हे निवारे उभारण्याचे काम करत. कोणी जुनी कौले देई, कोणी उभारणीचे खांब, तर कोणी बसण्यासाठी दोन फळ्या दिल्या, की निवारा उभा रहायचा. एकदा उभारलेला निवारा अनेक वर्षे सावली देत उभा असे.

राज्य परिवहन मंडळाच्या बसला थांब्यावर येण्यास विलंब झाला की, या झोपडीवजा निवाऱ्यात गप्पांचे फड रंगत. गप्पा रंगात आल्यानंतर, तोंड रंगवण्यासाठी चंचीच्या नाड्या सुटत. पान सुपारीच्या साहित्याची देवाण-घेवाण होई. आजूबाजूच्या परिसरात पानाच्या लाल पिचकाऱ्या मारत, लाल परीला झालेल्या विलंबावर मोठी दिलखुलास चर्चा रंगे. पूर्वी ग्रामीण भागात दळणवळणाची अन्य कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. परिणामी थांब्यावर कितीही वेळ गेला, तरी बसची वाट पाहण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नसे. गावातील माणसं जशी हळूहळू वृद्धत्वाकडे झुकत तशीच काहीशी अवस्था बस थांब्यावरील या निवाऱ्याची देखील होत असे. एकदा निवारा उभारला, की त्याच्या डागडूजीकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने हे झोपडी वजा निवारे डळमळीत होत. उभारलेला निवारा जरी एका बाजूला कलला, तरी त्याची ठामपणे उभे राहण्याची जिद्द कायम असे. पावसाळ्यात मात्र अशा निवाऱ्यात आसरा घेणे जरी धोक्याचे असले, तरी पर्याय नसल्याने याच निवाऱ्यात उभे राहावे लागे. निवाऱ्यातील बसण्याची व्यवस्था म्हणजे चार दगडावर टाकलेल्या दोन फळ्या. आजूबाजूला थोडीशी वस्ती असेल, तर याच निवाऱ्यात गावातील एखादा तरुण पानाची टपरी उभी करायचा. ही टपरी म्हणजे, ग्रामीण भागातील लोकांचा मोठा आधार असे. बसची वाट पाहण्यासाठी थोडा वेळ बसता यावे, या उद्देशाने उभारलेला हा निवारा आतील टपरी चालकालाही खऱ्या अर्थाने निवारा द्यायचा.

काही वर्षांपूर्वी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांनी खर्च करावयाच्या निधीमध्ये प्रवासी मार्ग निवाऱ्याचा समावेश केला गेला. सुरुवातीला प्रवासी मार्ग निवाऱ्याचे काम करताना, सहा लोखंडी पाईप उभारून त्यावर पत्रे टाकले जात. प्रवाशांना बसण्यासाठी जांभ्या दगडामध्ये बैठक व्यवस्था केली जाई. एका गावातील बस थांब्यावर अशा प्रकारचा मार्ग निवारा उभा राहिल्यानंतर, गावागावातून प्रवासी मार्ग निवारे उभारण्याची मागणी होऊ लागली. सुरुवातीच्या काळात या प्रवासी मार्ग निवाऱ्याच्या उभारणीचे काम दर्जेदार पद्धतीने केले गेले. कालांतराने मात्र याच्या कामाचा दर्जा घसरला आणि वर्षभरातच मार्ग निवाऱ्याची दुरावस्था होऊ लागली. प्रवाशांना बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जांभ्या दगडाच्या बैठकीचे प्लास्टर फुटून पडून गेले. पत्रे हलक्या दर्जाचे असल्याने जोरदार वारा आल्यानंतर उडून गेले. यामुळे प्रवाशांना या मार्ग निवाऱ्यांचा उपयोग होईनासा झाला. कालांतराने आजूबाजूला पडलेले गंजलेले पत्रे, लोखंडी पाईप चोरीला देखील जाऊ लागले. हे मार्ग निवारे उभारण्याची जबाबदारी असणाऱ्या बांधकाम विभागाने यांच्या उभारणीची रचनाच बदलली. तीनही बाजूला जांभ्या दगडाचे पूर्ण बांधकाम करून, या बांधकामाला प्लास्टर आणि वरती लोखंडी पाईप वर पत्रे. मार्गनिवाऱ्यात बसल्यानंतर बस येताना दिसावी म्हणून दोन बाजूला गोल पाईप टाकले जात. मात्र अशा पद्धतीने उभारल्या जाणाऱ्या मार्ग निवाऱ्याचे काम देखील दर्जेदार नसल्याने हळूहळू त्यांची देखील दुरावस्था झाली.

नोकरी व्यवसाया निमित्त शहराकडे गेलेली गावाकडची माणसं शहरातील धकाधकीच्या जीवनाला कंटाळली की म्हणतात, ‘ गड्या आपला गाव बरा ’. या उक्तीनुसार शासनाच्या वतीने प्रवाशांसाठी बस थांब्यावर उभारण्यात आलेले प्रवासी मार्गनिवारे दिसायला मजबूत असले, तरी प्रत्यक्षात वर्षभरातच त्यांच्या दर्जाचा प्रत्यय येतो. अखेरीस ग्रामीण भागातील माणसं पूर्वी झोपडी वजा कुटी म्हणून उभारत असलेल्या थांब्या वरील निवाऱ्याला भलेही रूप नसेल पण याच्या उभारणीचा हेतू मात्र नक्कीच साध्य होत होता. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असायला हवे. ग्रामीण भागातील प्रवासी वर्गाने उभारलेले छोटे छोटे मार्ग निवारे, म्हणजे मनसोक्त गप्पा मारण्याचे एक हक्काचे ठिकाण होते. आजही असे निवारे पाहिल्यानंतर मन भूतकाळात जाऊन रमते. बस थांब्यावर जे फलक लावले जातात, त्यावर विनंतीवरून बस थांबेल, असे लिहिलेले असते. बस येताना दिसल्यानंतर हात दाखवल्याशिवाय ती थांब्यावर थांबत नाही. याचाच अर्थ विनंती केल्यानंतर अनेक गोष्टी साध्य करता येतात. मुंबईत मिरा रोडला जसा डबेवाल्यांच्या सन्मानासाठी बस थांबा उभारण्यात आला, तशा पद्धतीचे कोकणातील विविध विषयांवर आधारित बस थांबे उभारणे शक्य आहे. मात्र यासाठी राजकीय इच्छाशक्तीची खरी गरज आहे. एखादे चित्र वा शिल्प हजार शब्दांचे काम करते, असं म्हटलं जातं. तद्वत कोकणातील विविध विषय आणि कोकणचं सौंदर्य डोळ्यासमोर ठेवून किमान महामार्गावरील बस थांबे शिल्प आणि चित्रांच्या माध्यमातून उभारले गेले, तरीही कोकणच्या पर्यटन वृद्धीला खऱ्या अर्थाने हातभार लागू शकेल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मोदी-3.0 – समोर आर्थिक शिस्त व सुधारणांचे कडवे आव्हान !

साथ दे तू मला

मसापच्या दामाजीनगर शाखेचे पुरस्कार जाहीर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading