July 27, 2024
Stories of Agriculture Scientist book by Dr V N Shinde
Home » कृषी क्रांतीचे शिलेदार – कृषि शास्त्रज्ञांच्या गाथा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषी क्रांतीचे शिलेदार – कृषि शास्त्रज्ञांच्या गाथा

शेतीच्या इतिहासात अनेक संशोधकांनी मोलाचे कार्य केले. यंत्रे शोधली. नव्या पद्धती शोधल्या. त्यातून मानवाचे कष्ट कमी झाले. या संशोधकांच्या कार्याचा आढावा आणि त्यांचे जीवन मांडण्याचा प्रयत्न डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी ‘हिरव्या बोटांचे किमयागार’ या ‘शेतीप्रगती’ मासिकातील लेखमालेतून २०१४ पासून २०२१ पर्यंत सलग सहा वर्षे घेतला. एखादी लेखमाला एवढी वर्षे चालवणे हेच मुळी कौतुकास्पद आहे. त्यातही कृषी संशोधकांच्या कार्यावर मराठी मासिकातून प्रसिद्ध झालेली ही पहिलीच एवढी दीर्घ लेखमाला असावी. या लेखमालेतील २५ संशोधकांवरील लेखांचे संकलन करून त्यांनी त्याच नावाचे पुस्तकही २०१८ मध्ये प्रसिद्ध केले. पुस्तक प्रसिद्ध झाले तरी, त्यांचा हा शोध थांबला नाही. या लेखांसाठीच्या वाचनातून त्यांच्या निसर्गविषयक जाणिवा विस्तारत गेल्या असाव्यात. त्यांना हेही जाणवले की केवळ शेती करून मानव आणि पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचणार नाही; तर, जल, जंगल आणि जमीन यांचा समतोल राहणे हे अत्यंत आवश्यक आहे. मागील काही वर्षातील त्यांच्या लेखनातून याबद्दलची जाणीव सतत प्रतिबिंबित होत आहे.

तसे ते भौतिकशास्त्राचे विद्यार्थी मात्र विज्ञान, कृषी आणि पर्यावरण यावर २०१४ पासून ते सातत्याने लेखन करत आहेत. त्यांच्या लेखनात मानवाच्या मूलभूत गरजा या अन्न, वस्त्र आणि निवारा नसून अन्न, पाणी आणि हवा या असल्याचे ते वारंवार सांगत आहेत. खरे तर, आपण आजही ‘अन्न, वस्त्र आणि निवारा’ या मानवाच्या मूलभूत गरजा असल्याचे शिकवत आहोत. मात्र वस्त्र आणि निवारा या पूरक गरजा असल्याचे ते सांगतात. आणि ते खरेही आहे. या तीनही गोष्टी निसर्ग आपणास देतो. या गोष्टींची पुरेशी उपलब्धता असणे, मानवासाठी आणि अन्य जीवांसाठी आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी पुढील लेखन केले आहे. याच लेखमालेतील उर्वरित ३६ लेखांचे संकलन ‘कृषी क्रांतीचे शिलेदार’ या पुस्तकामध्ये संकलित होत आहे. अशा प्रकारे कृषी आणि निसर्गविषयक कार्य करणाऱ्या लोकांचा जीवनपट उलगडून दाखवणारी पुस्तके आज उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे कार्य अभिनंदनीय आहे.

मानवाच्या स्वत:चे कष्ट कमी करण्याच्या विचारात, त्याच्या हातून कळत नकळत निसर्गाचे मोठे नुकसान होत राहिले. शेतीवर त्याचे अनिष्ट परिणाम होत राहिले आहेत. निसर्गाचा लहरीपणा वाढला आहे असे ठोकळेबाज विधान कानावर पडत असते. मात्र हा निसर्गाचा लहरीपणा वाढण्यास मानवाचा निसर्गातील अवाजवी हस्तक्षेप कारणीभूत असल्याचे दुर्लक्षित केले जाते. हे केवळ सामान्य मानवाच्या हातून घडते असेही नाही. अनेक प्रगत राष्ट्रांचे प्रमुखही या गोष्टींकडे काणाडोळा करतात. त्या पार्श्वभूमीवर अनेक संशोधकांनी दिलेले इशारे आणि सुचवलेल्या उपायाप्रमाणे कार्य करणारे अनेक महामानव कार्यरत आहेत. मात्र त्यांचेही प्रयत्न अपुरे पडतात. तरीही अशा लोकांचे कार्य समाजापुढे दीपस्तंभाप्रमाणे असते. हे कार्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.

पुस्तकाची विभागणी पाच भागात होते. यातील पहिल्या भागामध्ये शेतीमध्ये मोठे बदल करणाऱ्या संशोधकांची माहिती येते. १९७२ च्या भीषण दुष्काळानंतर आपल्या कार्याने ‘भारतीय हरित क्रांतीचे जनक’ अशी ज्यांची ओळख निर्माण झाली ते एम. एस. स्वामिनाथन, तांदळावर संशोधन करून ज्यांनी ‘अ’ जीवनसत्त्व असलेल्या तांदळाची निर्मिती केली ते इंगो पॉत्रीकस, शेतीतील पीक कापणीचे यंत्र बनवणारे अल्फ्रेड रसेल वॅलेस, रेव्हरंड पॅट्रिक बेल, जनुकीय बदल करून नवे संकरित वाण बनवणारे इवान मिचुरीन, मक्याचे नवे वाण शोधणारे डोनाल्ड फोरशा जोन्स, मेंडेलच्या संशोधनानंतर त्याचा विकास करणारे विल्यम बॅटसन, महिला शिक्षणाला विरोध होत असलेल्या काळात स्वत:चे संशोधन पुढे नेटाने सुरू ठेवणाऱ्या इंडिथ रिबेका साँडर्स, तृणधान्यावर कार्य करणारे डॉ. फिलीप नेल्सन, अल्पशिक्षित असूनही आंब्यावर विविध प्रयोग करून अनेक जाती विकसित करणारे कलिमउल्लाह खान, रताळ्यासारख्या कंदमुळावर संशोधन करणारे रॉबर्ट वांगा, रशियामध्ये अन्नधान्याची सुबत्ता यावी यासाठी प्रयत्नशील असणारे संशोधक निकोलाय वाविलाव, नव्या हरित क्रांतीसाठी प्रयत्नशील संजय राजाराम, चीनचा अन्नदाता युआन लालपिंग, जनुकीय बियाण्यांवर आजही कार्यरत असणाऱ्या मेरी डेल शिल्टन यांच्या कार्याचा समावेश केला आहे. बार्शी तालुक्यातील गोरमाळे नावाच्या खेड्यातील नवनाथ कसपटे नावाची व्यक्ती सीताफळाकडे आकर्षित होते आणि कोणतेही शास्त्रीय शिक्षण नसताना सीताफळाचे नवे वाण विकसित करते. नांगरणीविना शेती करणारे प्रताप चिपळूणकर हे तर अवलिया व्यक्तिमत्त्व. अशा समाजासमोर न आलेल्या अनेक व्यक्तींच्या महत्त्वपूर्ण कार्याची माहिती मिळते.

शेतीसाठी पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक. निसर्गात पाण्याची उपलब्धता प्रामुख्याने पावसामुळे होते. या पाण्याच्या उपलब्धतेसाठी झाडांची भूमिका ही महत्त्वाची असते. झाडे असतील त्या भागात पर्जन्यमान चांगले असते असे मानले जात असे. आता निसर्गास आपण बदलायला भाग पाडल्यामुळे पाऊस कोठेही आणि कसाही पडतो, हे खरे असले तरी, झाडांचे महत्त्व मोठे आहे. दुसऱ्या भागामध्ये वृक्ष लागवडीसाठी कार्य करणारी व्यक्तिमत्त्वे भेटतात. अब्दुल करीम नावाच्या केरळमधील व्यावसायिकाने केवळ घराभोवती जंगल असावे या भूमिकेतून एका टेकडीवर जंगल वाढवले आणि त्यामुळे दहा किलोमीटर भागातील कोरडे पडलेले जलस्रोत पुन्हा पाण्याने भरले, ही माहिती वाचनीय आहे.

सालूमर्दा थिमक्का या महिलेला मुले होत नाहीत म्हणून हिणवले जात होते. तिने मुले दत्तक घेण्याऐवजी झाडे लावण्याचा वसा घेतला. स्वतःच्या मुलाप्रमाणे झाडांवर प्रेम कसे करते, याची माहिती वाचनीय झाली आहे. लवकर झाडे वाढवण्यासाठी वृक्ष, रोपांची लागवड करण्याची पद्धती शोधणारे अकिरा मियावाकी या पुस्तकात भेटतात. खरे तर, दगडांची शिल्प बनवायचा रामय्यांचा व्यवसाय. मात्र दगडात पाने, फुले, फळे कोरता कोरता ते कधी झाडमय झाले आणि स्वत:ची ‘झाडवाला रामय्या’ ही ओळख निर्माण केली, हे त्यांना कळलेच नाही. रोपे चोरणारा विष्णू लांबाही असाच अवलिया. जादव पायेंग यांनी तर प्रतिसृष्टी निर्माण केली. या झाडांवर प्रेम करणाऱ्या महामानवांच्या कथा कृत्रिमरीत्या पेटलेल्या वणव्यांच्या बातम्या वाचताना संवेदनशील मनावर फुंकर घालतात.

पाणी, दूध व्यवस्थापन अशा विषयातील अनेक रत्ने यामध्ये शब्दबद्ध केली आहेत. एकूणच हे पुस्तक प्रत्येक निसर्गप्रेमी, कृषिप्रेमीने आपल्या संग्रहात ठेवावे, असे आहे.

पुस्तकाचे नाव – कृषी क्रांतीचे शिलेदार
लेखक – डॉ. व्ही. एन. शिंदे, कोल्हापूर
प्रकाशक – तेजस प्रकाशन
पृष्ठे- २५६, किंमत ३०० रूपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

छत्रपती शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन

दहा वर्षाच्या संदीपचे १३ गोष्टींचे पुस्तक प्रकाशित

संन्यास कशाचा अन् कशासाठी करायचा ? 

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading