जुन्या झालेल्या मंदिरांचाही जीर्णोद्धार केला जातो. प्रत्येक वास्तूच्या कालामर्यादा या ठरलेल्या असतात. त्यानंतर त्या पाडून नव्याने त्यांची उभारणी करण्याची गरज असते. या नव्या वास्तूमुळे विचारातही नाविन्य येते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् ।
गीतेमधील दहावा अध्यायातील ३१ व्या श्लोकामध्ये श्री रामांचा उल्लेख आढळतो. वेगवान वस्तूमध्ये वायु मी आहे. शस्त्रधाऱ्यांमध्ये राम मी आहे. असा या श्लोकाचा अर्थ आहे. परमेश्वरी अंश असणाऱ्या ७५ विभूतींचा उल्लेख भगवान कृष्णांनी केला आहे. त्या विभूतीमध्ये श्रीरामांचाही समावेश आहे. विभूती म्हणजे अलौकिक, अतिमानवी शक्ती. गीतेतील या श्लोकावर टीका करताना संत ज्ञानेश्वरांनी दहाव्या अध्यायामध्ये २५१ ते २५५ अशा पाच ओव्या लिहिल्या आहेत. त्या अशा…
तयां वहिलियां गतिमंतां- । आंतु पवनु तो मी पांडुसुता । शस्त्रधरां समस्तां-। माजीं श्रीराम तो मी ।। २५१ ।।
जेणें सांकडलिया धर्माचेनि कैवारें । आपणपयां धनुष्य करूनि दुसरें । विजयलक्ष्मीये एक मोहरें । केलें त्रेतीं ।। २५२ ।।
पाठी उभें ठाकूनि सुवेळी । प्रतापलंकेश्वराची सिसाळीं । गगनीं उदो म्हणतया हस्तबळी । दिधली भूतां ।। २५३ ।।
जेणे देवांचा मानु गिंवसिला । धर्मासि जीर्णोद्धार केला । सूर्यवंशी उदेला । सूर्य जो कां ।। २५४ ।।
तो हतियेरुपरजितयांआतु । रामचंद्र मी जानकीकांतु । मकर मी पुच्छवंतु । जळचरांमाजी ।। २५५ ।।
ओवीचा अर्थ – त्या अत्यंत वेग असलेल्यामध्ये जो वारा आहे, अर्जुना तो माझी विभूती आहे. ज्या रामचंद्राने संकटात पडलेल्या धर्माचा कैवार घेऊन, आपल्यास काय तें दुसरें धनुष्यच मदतीला घेऊन त्रेतायुगात विजयरूप लक्ष्मीस आपल्या एकाकडेच वळविले. नंतर ज्या रामचंद्रानें सुवेळ पर्वताच्या माथ्यावर उभे राहून, प्रतापवान् असा जो लंकेचा राजा रावण, त्यांची मस्तके आकाशांत उदो उदो म्हणणारी जी पिशाच्चें त्यांचे हातात बळी म्हणून दिली. ज्या रामचंद्राने देवाचा गेलेला मान शोधून काढला व धर्माचा जीर्णोद्धार केला. सूर्यवंशात जो प्रतिसूर्यच उदयास आला. असा जो जानकीनाथ रामचंद्र तो शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये माझी विभूति आहे.
जीर्ण झालेल्या वस्तू टाकून द्यायच्या असतात. त्याची विल्हेवाट लावायची असते. घरात अशा जीर्ण, जुन्या वस्तू खूप असतात. अशा या वस्तूंमुळे घरात अडचण अन् अस्वच्छताही खूप झालेली असते. यासाठीच दसऱ्याच्या आगमनापूर्वी घरोघरी स्वच्छता केली जाते. जुन्या वस्तू टाकून देऊन नव्याने त्यांची जागा घेतली जाते. घरातील देवांचीही जुने वस्त्र काढून टाकून नव्या वस्त्रावर बसवले जाते. वर्षातून एकदातरी अशी स्वच्छता करावी म्हणजे घरात अस्ताव्यस्त पडलेल्या गोष्टी जाऊन नव्याने घरात प्रसन्नता येईल. अस्वच्छतेमुळे मनातील विचारातही विकार उत्पन्न होतात. यासाठी मनातील विचारांचीही स्वच्छता गरजेची आहे. स्वच्छ विचारांमुळे मनाला प्रसन्नता लाभते. जुन्या झालेल्या मंदिरांचाही जीर्णोद्धार केला जातो. प्रत्येक वास्तूच्या कालामर्यादा या ठरलेल्या असतात. त्यानंतर त्या पाडून नव्याने त्यांची उभारणी करण्याची गरज असते. या नव्या वास्तूमुळे विचारातही नाविन्य येते. प्रसन्नता येते. तसेच धर्माचे आहे. धर्माचा सुद्धा जीर्णोद्धार करावा लागतो. असाच जीर्णोद्धार श्रीरामांनी केला. काळाच्या ओघात विचारावरही धूळ बसते. ती धूळ झटकून तो विचार स्वच्छ करावा लागतो. त्याची नव्याने मांडणी करावी लागते. तेंव्हाच तो धर्माचा विचार जनमानसात रुजतो. अन् सुराज्य स्थापन होते. यालाचा रामराज्य म्हटले जाते. अशा राजाचा उदय पुन्हा पुन्हा व्हावा लागतो. धर्माच्या रक्षणासाठी, धर्माच्या जीर्णोद्धारासाठी असा राजा होत असतो हीच भारतीय संस्कृती आहे.
रावणाचे दहन म्हणजे वाईट विचारांचे दहन. देशामध्ये जेंव्हा अशा रावणांची संख्या वाढते तेंव्हा रामाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अशी ही अलौकिक, अतिमानवी शक्ती पुन्हा जन्म घेते अन् रावणाचे अर्थात वाईट विचारांचे दहन करते. प्रत्येकात रावण आहे अन् प्रत्येकात रामही आहे. आपल्यातील रावणाला रामाच्या रुपाने मारायचे आहे. म्हणजेच स्वतःच्या मनातील वाईट विचार हे स्वतःच मारायचे आहेत. साधनेत हे वाईट विचार अडथळा करतात. यासाठीच रामाच्या विचारांनी या रावणाचा वध करून साधनेतील अडथळे दूर करायचे आहेत. यासाठी मनातील विचारांचा जीर्णोद्धार करायचा आहे. तेंव्हाच आत्मज्ञानाची अनुभूती येऊन आत्मज्ञानी होता येईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.