September 8, 2024
The Curse of Cross Voting in Legislative Council Elections
Home » क्रॉस व्होटिंगचा शाप
सत्ता संघर्ष

क्रॉस व्होटिंगचा शाप

आपला विजय झाला की, तुम्हाला तुमची मते संभाळता आली नाहीत म्हणून अभिमानाने सांगायचे आणि आपला पराभव झाला की, त्यांनी आमदारांना वीस-पंचवीस कोटी दिले म्हणून ओरडा करायचा ही फॅशनच झाली आहे. राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणुकीत उघड किंवा पडद्याआड घोडेबाजार होणार असेल तर अशा निवडणुकीतून समाजापुढे काय आदर्श ठेवत आहोत,

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाआघाडीने ४८ पैकी ३१ जागांवर विजय मिळवला आणि महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले. महाआघाडीला लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पचवता आले नाही आणि महाआघाडीच्या विशेषत: शरद पवार यांच्या पाठिंब्यावर आणि भरवशावर निवडणुकीत उतरलेले शेतकरी कामगार पक्षाचे दिग्गज नेते जयंत पाटील यांना पराभव पत्करावा लागला. विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीचे ९ जण विजयी झाले व आघाडीचे २ जण निवडून आले. खरे तर आपली ताकद, क्षमता व संख्याबळ नसताना महाआघाडीने तिसरा उमेदवार विधान परिषदेच्या निवडणुकीत कशासाठी उभा केला होता ? जयंत पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे ताकदवान व धनाढ्य उमेदवार आहेत. ते काहीही करून व कसेही करून निवडून येतील असा कयास महाआघाडीच्या नेत्यांनी बांधला असावा. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकजूट आणि रणनिती महाआघाडीला भारी पडली. देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्यनितीने भाजपने आपले पाचही उमेदवार निवडून आणले. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या घटक पक्षांचे सर्व अधिकृत उमेदवार निवडून आले म्हणून महायुती खूश आहे.

महाआघाडीची मते कशी फुटली, जयंत पाटील यांचा पराभव कोणामुळे झाला याची सवंग चर्चा चालू आहे. उबाठा सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यावर जयंत पाटील यांच्या पराभवाचे खापर फोडले जात आहे. महाआघाडीला आपल्या आमदारांना सांभाळून ठेवता आले नाही ही जशी नामुष्की आहे तसेच महाआघाडीची मते फोडून महायुतीचे उमेदवार विजयी होणे हे काय अभिमानास्पद आहे काय ? गुप्त मतदानाने होणारी निवडणूक हा सत्ता व पैशाचा खेळ आहे हे सर्वश्रूत आहे. मतदानापूर्वी सर्वच प्रमुख पक्षांना आपल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबईतील पंचतारांकित ह़ॉटेलमध्ये व्यवस्था करावी लागते हे काय भूषणावह आहे का ? आपल्याच पक्षाच्या आमदारांवर पक्षाच्या नेतृत्वाचा विश्वास नसेल तर सर्वसामान्य मतदार निवडणुकीच्या वेळी या राजकीय पक्षावर व त्यांच्या उमेदवारांवर कसा विश्वास ठेवतील ? बिनविरोध निवडणूक झाली असती तर आमदारांची सरबराई करण्याचा व त्यांना सुरक्षित ठेवण्याचा पंचतारांकित खर्च वाचला असता. जे चार- सहा दिवस आमदारांना सांभाळण्यासाठी व खूश ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले ते कोणी केले ? जी दहा- बारा आमदारांची मते फुटली ती काय उदारमनाने किंवा नि:स्वार्थी पणाने इकडून तिकडे गेली का ? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ पासून सांगत आहेत की, ‘मै नही खाऊंगा और खाने नही दूंगा’ मग महाराष्ट्रात २०२२ आणि २०२४ मध्ये राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीच्या वेळी काय घडले ?.

विधान परिषद निवडणुकीत आमदारांच्या मतांच्या खरेदी-विक्रीचा भाव वीस ते पंचवीस कोटी होता व काहींना दोन-दोन एकर जमिनीचा वादा केला गेला, अशाही पुड्या सोडल्या गेल्या. विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून येण्यासाठी किमान २३ मतांचा कोटा निश्चित होता, प्रत्येकाला वीस-पंचवीस कोटी कोणी स्वप्नात तरी देईल का ? एका आमदारकीसाठी कोणी पन्नास-शंभर-दोनशे कोटी खर्च करील का ? आपला विजय झाला की, तुम्हाला तुमची मते संभाळता आली नाहीत म्हणून अभिमानाने सांगायचे आणि आपला पराभव झाला की, त्यांनी आमदारांना वीस-पंचवीस कोटी दिले म्हणून ओरडा करायचा ही फॅशनच झाली आहे. राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणुकीत उघड किंवा पडद्याआड घोडेबाजार होणार असेल तर अशा निवडणुकीतून समाजापुढे काय आदर्श ठेवत आहोत, याचे कुणी तरी भान ठेवायला नको काय? सन २०२२ मध्ये महाराष्ट्रातून झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार व माजी महापौर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. तेव्हा झालेल्या क्रॉस व्होटिंगचा मोठा बोलबाला झाला. काँग्रेस पक्षाने तेव्हा कुणावरच कारवाई केली नाही, त्याचा परिणाम म्हणून यंदाच्या विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांची हिम्मत वाढली का ?

तेव्हा चंद्रकांत हंडोरे झाले, आता तीच पाळी शेकाप पक्षाचे जयंत पाटील यांच्यावर आली. तेव्हा आमदारांची मते फुटली होती, यंदाही मते फुटली. प्रत्येक राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होते आहे. सन २०२२ मध्ये झालेल्या राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत वीसपेक्षा जास्त मते फुटली होती, सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार याची ती इशारा घंटा होती. काही तासांतच त्याचा परिणाम दिसला व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी सुरत, गुवाहटी, गोवा अशी प्रदक्षिणा करीत पुन्हा मुंबई गाठली. एवढी मोठी फूट पडल्यानंतर ठाकरे सरकार कसे कोसळले हे संपूर्ण देशाने बघितले. नंतर अजित पवार यांनी त्यांच्या काकांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवला. अर्थात एकनाथ शिंदे व अजित पवार यांना दिल्लीश्वरांचे आशीर्वाद होते म्हणून ते एवढे धाडस करू शकले.

यापूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे अनिल देशमुख यांना मतदान करायला मिळाले नव्हते. ते जेलमध्ये होते. शंभर कोटींची खंडणी वसूल केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. नबाब मलिक हे जेलमध्ये असतानाही त्यांना मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी सोडले नव्हते. मात्र यंदाच्या निवडणुकीत जेलमध्ये असलेल्या भाजपाचे कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी विधान भवनात येऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यांना कोणी अडकाठी केली नाही. जेलमध्ये असताना अनिल देशमुखांना एक न्याय व गणपत गायकवाडांना दुसरा न्याय का, याची उत्तरे कधीच मिळणार नाहीत.

भाजपचे पाच व महायुतीचे एकूण नऊ आमदार विधान परिषदेवर विजयी झाले. पण सर्वत्र चर्चा शेकापच्या जयंत पाटील यांच्या पराभवाची होत आहे. बदलत्या काळानुसार शेकाप पक्ष हळूहळू लयाला चालला आहे. सोलापूर व नांदेडमध्ये तो संपल्यात जमा आहे आणि आता जयंत पाटील यांच्या पराभवाने तो रायगड जिल्ह्यातही संपुष्टात येत आहे. गेली काही वर्षे जयंत पाटील यांच्या रूपाने शेकाप पक्ष हा एकखांबी तंबू होता. सन २००२ पासून जयंत पाटील हे विधान परिषदेवर आमदार होते. तेव्हा निदान विधानसभेत शेकापचे पाच आमदार होते.

आता तर विधानसभेत व विधान परिषदेतही कोणी नाही. २०२४ च्या विधान परिषद निवडणुकीत आपल्या हक्काचे एकही मत नसताना जयंत पाटील हे महाआघाडीतील पक्षांच्या भरवशावर उभे राहिले हाच मोठा जुगार होता. निवडून येण्यासाठी ते तेवीस मते कुठून आणणार होते? लोकसभा निवडणुकीत शेकाप महाआघाडीत असूनही त्या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)च्या सुनील तटकरेंना मदत केली. मग उबाठा सेना त्यांची मते जयंत पाटील यांना कशी देणार ? रायगडमध्ये शेकापने काँग्रेसला नेहमीच विरोध केला मग काँग्रेस जयंत पाटील यांना मदत कशी करणार? शरद पवारांकडे बारा मते होती, पैकी एक फुटलेच. मग जयंत पाटील निवडून कसे येणार? जयंत पाटील यांचा पराभव झाल्यावर शिवसेनेचे अलिबागमधील आमदार महेंद्र दळवी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पावसात, पाण्यात व चिखलात लोळून जल्लोष साजरा केला. म्हणजे एकनाथ शिंदेंनीही शेकापचा गेम केलाच…. क्रॉस व्होटिंग कोणी केले हे फार काळ लपून राहात नाही, तसे करणाऱ्या आमदारांची व त्यांच्या पक्षाची बदनामी होत असते. तरीही आर्थिक प्रलोभने, दाखवलेली अामिषे व दिलेली आश्वासने यांना काही जण बळी पडतात हे प्रत्येक निवडणुकीत घडत असते. क्रॉस व्होटिंग हा राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीला लागलेला शाप आहे. त्यातून मु्क्तता कधी व कशी होणार हा लाखमोलाचा प्रश्न आहे.

डॉ . सुकृत खांडेकर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

पारिजातकाला भरपुर फुले येण्यासाठी काय कराल ?

मराठी भाषेची गंमत…

मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading