February 29, 2024
Forgetting the body is the first step to self-realization
Home » देहाचा विसर हीच आत्मानुभूतीची पहिली पायरी
विश्वाचे आर्त

देहाचा विसर हीच आत्मानुभूतीची पहिली पायरी

म्हणौनि तूं आणि आम्ही । हें दिसताहे देहधर्मी ।
मग याचां विरामी । मीचि होसी ।। १३६७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – म्हणून एक तू व एक आम्ही, असे द्वैत देहाच्या उपाधीमुळे दिसत आहे. मग देहाचा निरास झाल्यावर तू मद्रुपच होशील.

देहाचा विसर ही मानसिक कल्पना आहे. मनातून देहाला विसरायला हवे. देह आणि आत्मा हे वेगळे असल्याचा अनुभव मनास व्हायला हवा. म्हणजे आपले देहावरील प्रेम कमी होईल. देहामध्ये गुंतून राहाणे थांबेल. त्यानंतरच आपली वाटचाल आत्मानुभूतीकडे अर्थात आत्मज्ञानाकडे होईल. देहाचा विसर पडल्याने आत्मज्ञानाची अनुभूती कायम राहील. पण यासाठी मनाची एकाग्रता महत्त्वाची आहे.

देहाला विसरायचे याचा अर्थ देहाला त्रास द्यायचा असे नाही. देहाची काळजी घ्यायची नाही असा नाही. देहाला त्रास देऊन साधना करायची नाहीये. उलट देहाला त्रास दिल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम आपल्या मनावरच होतो. यासाठीच हा विचार समजून घ्यायला हवा. देहाला होणाऱ्या त्रासाचा मनावर कोणताही परिणाम होता कामा नये. त्रासाकडे सुद्धा सुखद अनुभूतीने पाहायला हवे. साधनेत देहाला होणाऱ्या त्रासाची अनुभूती घेऊन सुखी व्हायचे आहे. त्या त्रासात गुंतून राहायचे नाही. म्हणजेच तो त्रास विसरून पुढे जात राहायचे आहे. देहातील आत्म्यावर मन केंद्रित करायचे आहे.

एखादी विपरित घटना घडली किंवा शरीरात अचानक काही बिघाड झाला किंवा एखादा आजार झाला तर आपण अस्वस्थ होतो. आपल्या मनात भीती उत्पन्न होते. मनात नको त्या शंका येऊ लागतात. यामुळे कधी कधी आपण पूर्णतः खचून जातो. अशावेळी आपण देहाचा विचार न करता आत्म्याचा विचार करायला हवा. देहाचा विसर पडायला हवा म्हणजेच आपणाला होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळेल. ओढवलेल्या परिस्थितीवर आपण सहज मात करू शकू.

आत्म्याचा विचार करताना आपण प्रथम आपल्या श्वासावर मन केंद्रित करायला हवे. त्यावर नियंत्रण मिळवायला हवे. घाबरलेल्या अवस्थेमुळे श्वासाचा वेग वाढलेला असतो. तो नियंत्रणात आणायला हवा. म्हणजेच आपण सोहम साधनेत आपले मन गुंतवायला हवे. अशा बिकट परिस्थितीत आपण आपले मन साधनेत रमवू शकलो तर आपण सहजच प्राप्त परिस्थितीवर मात करू शकू. आपणाला आत्मानुभूती येईल. ही अनुभूतीच आपले मन खंबीर करते. आपणाला विश्वास देते. असे करणे म्हणजेच देहाचा विचार सोडून आत्म्याचा विचार करणे आहे.

आपण कोण आहोत ? आपले मुळ स्वरूप काय आहे ? या अनुभूतीने आपला विश्वास दृढ होतो. देहरूपी विचार जाऊन आत्मरूपी विचार मनात स्थिर होऊ लागतो. गुरूंच्या कृपेने आपण आत्मज्ञानी होतो. यासाठीच साधनेचे महत्त्व आहे. साधना मनापासून करायला हवी. विश्वासाने, दृढनिश्चयाने, भक्तीने, दृढ संकल्पाने करायला हवी. तरच ती फलद्रुप होईल.

Related posts

‘काटेरी पायवाट’ : एक प्रेरणादायी दस्तऐवज

वायू तूं अनंता । यम तूं नियमिता । प्राणिगणीं वसता । अग्नि जी तूं ।। ( एकतरी ओवी अनुभवावी)

संत साहित्याचे मूळ भगवगद् गीतेमध्येचः रामचंद्र देखणे

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More