प्रत्येक व्यक्ती एकमेकांना माऊली असे संबोधते. एकमेकाचे चरण स्पर्श करते. एकमेकांना आधार देते. आपल्याबरोबर आपल्या सहकार्यांचीही काळजी घेते. या पाचही पालख्यांचा कुणी नेता नसतो. कुणी नियंता नसतो. प्रत्यके जण उत्स्फुर्तपणे व स्वयंशिस्तीने या वारीत आपली अध्यात्मिकता जपत लोशाहीच्या मार्गाने चालत राहतो.
डॉ. श्रीकांत पाटील
महाराष्ट्राला फार मोठी अध्यात्मिक परंपरा लाभली आहे. इथल्या जनमानसात अध्यात्मिकतेची बीजे रुजवून ती फुलविण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने केलेले आहे. पंढरपूरच्या भिमातिरी अठरापगड जातीतील संतजनाचा मेळा हा आषाढीला गोळा होतो. आपले वय विसरुन आणि तहानभूक हरपून वारकरी विठू नामाचा गजर करतो. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन टाळ आणि चिपळ्यांच्या साथीने देवाचे भजन पूजन करतो. भक्तीरसात न्हाऊन निघत परमोच्च आनंद मिळवतो. भिमातिरी एक प्रकारे अध्यात्मिक लोकशाहीचा मेळावाच भरलेला असतो.
‘येथ जाती कुळ वर्ण अप्रमाण’
या न्यायाने अठरा पगडजातीतील संतजन सुमारे वीस-बावीस दिवसांचा पायी प्रवास करून आळंदी, देहू, पैठण, सासवड, मुक्ताईनगर येथून पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. “ज्ञानोबा माऊली तुकाराम” चा जयघोष करतात अन् वेगवेगळ्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची पालखी ही आळंदीहून पुणे, सासवड, वाल्हे, जेजुरी, लोणंद मार्गे पंढरपूरात येते तर जगद्गुरु तुकोबांची पालखी देहू, पुणे, बारामती, इंदापूर मार्गे पंढरपूरात येते. सासवड होऊन सोपानकाकांची पालखी निघते. तर मुक्ताई नगरातून मुक्ताबाईची पालखी निघते. पैठणहून एकनाथांची पालखी निघते. ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्या सर्वप्रथम पुण्यात व पुढे वाखरी येथे एकत्र येतात. यामध्ये आबालवृध समाविष्ट झालेले असतात.
प्रत्येक पालखीच्या पुढे नगारखाना पालखीचे अश्व असतात. त्यानंतर पालखीमध्ये संतश्रेष्ठांच्या पादुका असून त्यांच्या दर्शनासाठी भक्तांची अक्षरशः झुबंड उडते. लहान थोर, स्री-पुरुष, सुशिक्षीत – अशिक्षीत, गरीब – श्रीमंत लोक यात सहभागी होत असतात. एवढेच नव्हे तर अलिकडच्या काही वर्षापासून विदेशी लोकांचाही वारी सोहळ्यातील सहभाग हा वाखाणण्यासारखा आहे. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, रशिया या देशातील काही नागरीक कधी उत्सुकतेने, कधी अभ्यासक म्हणून तर कधी संशोधक म्हणून यामध्ये सहभागी होताना दिसतात.
यातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना माऊली असे संबोधते. एकमेकाचे चरण स्पर्श करते. एकमेकांना आधार देते. आपल्याबरोबर आपल्या सहकार्यांचीही काळजी घेते. या पाचही पालख्यांचा कुणी नेता नसतो. कुणी नियंता नसतो. प्रत्यके जण उत्स्फुर्तपणे व स्वयंशिस्तीने या वारीत आपली अध्यात्मिकता जपत लोशाहीच्या मार्गाने चालत राहतो. खऱ्या अर्थाने वारी हा अध्यात्मिक लोकशाहीचा महन्मंगल असा सोहळा आहे.
कधी आठ-दहा तर कधी बारा कि.मी. चा प्रवास करून नियोजित ठिकाणी दररोज पालख्या विसावतात. अन्नदाते अन्नदान करून पुण्य मिळवतात. तर भाविक भक्त वारक-यांना जमेल तसे दान करून, त्यांची सोय करून वारीतील आपला सहभाग नोंदवितात. वारीमध्ये विसाव्याच्या ठिकाणी पुन्हा अध्यात्मिक उन्नतीसाठी किर्तन, प्रवचनाबरोबर भारुडेही सादर करून प्रबोधन आणि रंजन करून दिवसभराचा शिणवटा घालवितात.
वारीमध्ये रिंगणसोहळ्याला अतिशय महत्वाचे स्थान आहे. इंदापूर, अकलूज, वाखरी, तरडगाव येथे होणारे उभे रिंगण आणि गोल रिंगण सोहळे डोळ्याचे पारणे फेडणारे आहेत. मंदिर, मशिद, शाळा, खुली जागा बघून दिंडीनिहाय रोजचे पालखी विसावतात. रात्रीची क्षणभर विश्रांती घेऊन भल्या पहाटे पुढिल प्रवासाला मार्गक्रमण करतात. सगळ्या जातीधर्माचे लोक यात एकोप्याने सहभागी होत असल्याने राष्ट्रीय एकात्मतेचे सदृढ दर्शन आपणास वारीमध्ये अनुभवावयास मिळते.
आषाढी एकादशी सर्व पालखी व त्यासोबतच्या दिंड्या पंढरपूरात आल्यानंतर चंद्रभागेत स्नान करुन विठ्ठलाचे दर्शन घेऊन लोक पावन झाल्याचे समाधान मिळवितात. किमान महिनाभर कुटुंबापासून, प्रापंचिक ताणतणावापासून लांब रहात विठ्ठलाशी एकरूप होत परमेश्वराकडे सुख, समाधान, समृद्धीची आशा करून आपल्या गावाची परतीची वाट पकडतात. जगाच्या पाठीवर असा देखणा सोहळा इतरत्र कुठेही नाही.
डॉ. श्रीकांत पाटील
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.