॥ पाराशर आणि कश्यप ऋषींची शेती ॥
पाराशर यांनी लिहिलेला ‘कृषीपाराशर’ आणि कश्यप यांनी लिहिलेला ‘काश्यपीय कृषीसुक्ती’ हे दोन संस्कृत ग्रंथ पूर्णपणे शेतीवर केंद्रित आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर हे ग्रंथ म्हणजे त्या त्या काळातलं कृषीविज्ञानच आहे. खरं तर आपण शेतीचा इतिहास पाहत आहोत. त्यात हे कृषीविज्ञानाचे ग्रंथ घेण्याचं तसं कारण नाही. पण तरीही त्या त्या काळातल्या कृषीविषयक काहीएक धारणा त्यातून प्रकट होतातच. म्हणून आपण या दोनही ग्रंथाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
इंद्रजीत भालेराव
‘कृषी पाराशर’ हा ग्रंथ इसवीसनपूर्व शंभर वर्षापूर्वी म्हणजे आज पासून २१०० वर्षापूर्वी पाराशर ऋषींनी सियालकोटमध्ये, ज्याला पूर्वी तक्षीला म्हणत असत, त्या ठिकाणी लिहिलेला आहे. या ग्रंथात पाराशर सुरुवातीलाच शेतीचं महत्व सांगतात. त्यात त्यांनी समाजातल्या सर्व स्तरात राहणाऱ्यांचं शेतीशिवाय भागणं कसं शक्यच नाही हे सांगितलेलं आहे. चारी वेद आणि सहा शास्त्रात निपुण असलेल्या ब्राह्मणालाही गरिबी आणि भूक जखडते तेव्हा त्यालाही शेतकऱ्यांपुढच हात जोडावे लागतात. शेती शिवाय कुणीच या जगाचा प्रवक्ता होऊ शकत नाही. शेती करणारा माणूस कुणी एकटा असला तरी खऱ्या अर्थाने तोच भूपती असतो, असं पाराशर म्हणतात
सोन्याचांदीचे पुष्कळ दागदागिने आणि श्रीमंती थाटाचे कपडे घालणाऱ्यानेदेखील हात जोडून शेतकऱ्यालाच शरण गेले पाहिजे. सर्वांगावर दागिन्यांनी मढलेल्यांनाही जेवण नाही केलं तर भुकेनं तडफडावं लागतं. अंगावरचे दागिने त्याची भूक भागवू शकत नाहीत. भोजन हेच जीवन आहे. भोजनानेच शक्ती प्राप्त होऊन माणूस जिवंत राहतो. देवता, असुर आणि मानव सगळे अन्नावरच जिवंत आहेत आणि अन्न शेतीशिवाय इतर कुणीच देऊ शकत नाही. म्हणून सर्वांनीच शेतीला शरण जाऊन राबले पाहिजे. शेती पवित्र आहे, शेती श्रेष्ठ आहे, हे सगळं पाराशर आपल्या ग्रंथाच्या सुरुवातीला सांगतात.
शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्यामुळे पाराशरांनी सुरुवातीला पावसाविषयी सविस्तर लिहिलेले आहे. एका अर्थानं हे तेव्हाचं हवामान शास्त्रच आहे. कोणत्या ऋतूत कोणत्या तिथीला पर्यावरणात काय घडले म्हणजे कसा पाऊस पडतो याचे भरपूर तपशील या ग्रंथात आलेले आहेत. काय घडलं म्हणजे पाऊस पडतो आणि काय घडलं म्हणजे दुष्काळ पडतो याविषयी देखील सविस्तर लिहिलेला आहे. हा ग्रंथ वाचताना पुष्कळ वेळा आपणाला सहदेव भाडळीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अर्थात हे जुनं हवामान शास्त्र निसर्ग निरीक्षण आणि पंचांगावर अवलंबून आहे. पाराशरांनी दोन हजार वर्षापूर्वीचं उपलब्ध ज्ञान आणि साधनांच्या आधारे हवामान शास्त्राचा फारच सूक्ष्म अभ्यास केलेला दिसतोय. तो आज जरी कुणाला मान्य होणार नसला तरी तेव्हा तो कालसुसंगतच होता, असं मानायला हरकत नाही.
शेती व्यवस्थापनाबाबतही पाराशर नेमका सल्ला देतात. शेतीचं योग्य नियोजन ज्याला जमतं त्यालाच शेती पावते. नाही तर तो सगळा आतबट्ट्याचा व्यवहार होतो, असं पाराशरांना वाटतं. त्यामुळे ते म्हणतात, ‘घराचं सगळं व्यवस्थापन बापावर सोपवलं पाहिजे. स्वयंपाकघराचं व्यवस्थापन आईवर सोपवलं पाहिजे. गाई, गोठ्याचं व्यवस्थापन समवयस्क मित्रावर सोपवलं पाहिजे. पण शेतीचं व्यवस्थापन मात्र कुणावरही न सोपवता शेतकऱ्यानं ते स्वतःच केलं पाहिजे. शेती, गुरं, व्यवसाय आणि बायको या गोष्टी दुसऱ्यावर सोपवल्या की सत्यानाश झालाच म्हणून समजा.’ असं पाराशर सांगतात
सर्वांग परिपूर्ण माणसांनीच शेती करावी. शेती ही येरागबाळ्याचं काम नाही असं पाराशरांनी सांगितलं आहे. आज आपण नेमकं याच्या उलट करतो. ज्याला काहीच जमत नाही त्याला आपण शेतीत घालतो आणि हुशार मुलांना आपण आधी शेतीबाहेर काढून शिक्षणात पाठवतो. इकडे येऊच नको, असं त्याला आपण सांगत असतो. पाराशर म्हणतात हुशार माणसं शेतीत आली तरच शेतीचं कल्याण होईल. पर्यायाने जगाचंही कल्याण होईल. नाहीतर सगळ्यांचं अकल्याण ठरलेलं आहे. पशुधनाविषयी देखील पाराशरांनी फार सूक्ष्म सूचना केलेल्या आहेत. अगदी गोठा कसा असावा इथपासून सुदृढ बैलाचीच शेती असावी इथपर्यंत सगळं पाराशर सांगतात. त्यांचं म्हणणं मरतुकड्या रोगट बैलांची शेती ही कंगालच असणार.
कश्यपांनी लिहिलेला ‘काश्यपीय कृषी सुक्ती’ हा दुसरा संस्कृत ग्रंथ इसवीसनाच्या सातव्या ते आठव्या शतकात लिहिला गेला असावा, असा अंदाज सांगण्यात येतो. यात प्रामुख्याने साळीच्या पिकाची संपूर्ण शास्त्रीय माहिती सांगण्यात आलेली आहे. याचा अर्थ तेव्हा साळीचे पीक हेच आपल्या देशात प्रमुख पीक असावं. या ग्रंथात आधीच्या ग्रंथासारखे तिथी, वार, पंचांग, मुहूर्त याला महत्व दिलेले नाही. हा ग्रंथ आधीच्या ग्रंथापेक्षा आठशे ते नवूशे वर्ष उशिरा लिहिलेला आहे. साळीच्या शेतीशिवाय या ग्रंथात अन्यही काही विषय त्रोटक स्वरूपात आलेले आहेत. राजाची कृषीविषयक कर्तव्यं, ब्राह्मणांनी शेती केली पाहिजे, कडधान्य, भाजी, फळे, मसाले या पिकांची लागवड, शोभिवंत झाडे व बागबगीचांची रचना, शेतमालाची विक्री, खनिजांचे खोदकाम आदी विषय कश्यप यांनी या ग्रंथात हाताळलेले आहेत.
शेती विकासासाठी मदत करणं हे राजाचं आद्य कर्तव्य आहे, असं कश्यप म्हणतात. राजाने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काय करावे, याचे तपशीलच या ग्रंथात देण्यात आलेले आहेत. करांच्या वसुलीच्या वेळी, खनिजे खोदताना, वनविकास करताना, वजने मापे प्रमाणित करताना, बाजारपेठा निर्माण करताना, लोकांना उपजीविकेची खात्री देताना, बी बियाणे उपलब्ध करताना, जलसंधारणासाठी तलाव खोदताना, अशा प्रत्येक वेळी राजाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतले पाहिजे, असं कश्यप सांगतात. हे सगळं आजही जशाला तसं लागू करायला हरकत नाही. शासनानं प्रत्येक निर्णय शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन करावा हेच कश्यप सांगतात.
शेती हा व्यवसाय पवित्र आहे, असं कश्यप पुनःपुन्हा सांगतात. म्हणूनच शेती सर्व जातीच्या लोकांनी केली पाहिजे असं त्यांना वाटतं. त्यामुळे श्रमाची प्रतिष्ठा वाढेल, असंही त्यांना वाटतं. शिवाय सर्वांनी शेतीत लक्ष घातलं तर समाजाची अन्नाची गरज चांगल्या प्रकारे भागेल, असंही कश्यप लिहितात. मनूने आपल्या मनुस्मृतीत ब्राह्मणांनी शेती करू नये, असा नियम केला होता. काश्मिरी पंडित मेधातिथी यांनीही मनूच्या या म्हणण्याला दुजोरा दिलेला होता. पण या पार्श्वभूमीवर कश्यप मात्र ब्राह्मणांनी शेती करायला पाहिजे असं सांगतात. हे त्या काळाच्या मानानं धाडसाचं आणि क्रांतिकारकच होतं.
उत्तम शेतकरी आणि ग्रामीण अधिकाऱ्यांचे गुण सांगताना कश्यप म्हणतात, ‘शेतकऱ्यांनी द्वेषापासून मुक्त असावे. परस्परांना मदत करावी. सत्यवचनी असावे. समाजाविषयी दयाळू असावे. प्राण्यांविषयी मायाळू असावे. पाहुण्यांविषयी अतिथ्यशील असावे. रागीट, आळशी, लोभी नसावे. मुलानातलगांविषयी प्रेमळ असावे. राजाविषयी राजनिष्ठ असावे.’ बाकी उत्तम शेतीला आवश्यक असणाऱ्या सर्व सुचना ग्रंथात पाहायला मिळतात. खानपानाचे नियमही पाहायला मिळतात. शेतीविषयक सारासार विचार केलेला या ग्रंथात पाहायला मिळतो.
या दोन्ही ग्रंथांचे अवलोकन केल्यावर आपल्या लक्षात येतं की, आपले पूर्वज शेतीविषयी किती सूक्ष्म विचार करत होते. सामान्य शेतकऱ्यांकडं शेतीविषयक पारंपारिक अत्युच्च ज्ञान होतं. पाराशर आणि कश्यप यांनी ते ज्ञान संकलित करून त्याला ग्रंथाचा दर्जा दिला. शेतीचं महत्व प्रस्थापित केलं. फक्त देवधर्मच श्रेष्ठ, तेच केवळ ग्रंथाचा विषय होऊ शकतात, अशा दृढनिष्ठा असलेल्या काळात शेती हाही तेवढाच महत्त्वाचा विषय आहे, यावरही ग्रंथ लिहावा असं वाटणं ही गोष्ट महत्त्वाचीच आहे. असे आणखीही काही ग्रंथ त्या काळात लिहिले गेले असावेत. काळाच्या ओघात ते नाहीसे झाले असावेत. प्रातिनिधिक रूपात हे दोन ग्रंथ उपलब्ध आहेत. असे ग्रंथ धार्मिक स्वरूपाचे नसल्यामुळे ते नित्य पठणात नसतात. त्यामुळे ते टिकवून ठेवण्याची कुणाला फारशी गरज वाटत नाही. त्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट जास्तच महत्त्वाची आहे.
सिकंदराबादेत राहणाऱ्या यशवंत लक्ष्मण नेने नावाच्या मराठी माणसाने ‘एशियन ऍग्रो हिस्ट्री फाउंडेशन’ स्थापन करून त्या फाउंडेशनच्या वतीने अशा दुर्मिळ ग्रंथांचा शोध घेतला. त्याच्या संशोधित आवृत्ती प्रकाशित केल्या. याचीही जाण आपण ठेवली पाहिजे. म्हणून ही नोंद मी आवर्जून लिहीत आहे. नेने आता जिवंत नाहीत. दोन वर्षांपूर्वी हैदराबादेत मी धाकट्या भावाकडं दिवाळीनिमित्त गेलो असताना प्रयत्नपूर्वक सिकंदराबादमधील त्यांचं घर शोधून काढलं होतं. त्यांनी प्रकाशित केलेले कृषी विषयक दहा प्राचीन ग्रंथ घेऊन आलो होतो. त्यांचा उपयोग मला ही नोंद लिहिताना झालेला आहे.
संदर्भ
१. काश्यपीय कृषी सुक्ती – मराठी अनुवाद – डाॅ. वा. ब. राहुडकर, एशियन ॲग्री हिस्ट्री फाउंडेशन, सिकंदराबाद (२०१२)
२. कृषी पाराशर – हिंदी अनुवाद – डाॅ. सुनीलकुमार खंडेलवाल, डॉ. शिवचरणलाल चौधरी, एशियन ॲग्री हिस्ट्री फाउंडेशन, सिकंदराबाद (२०११)
३. कृषीशासनम् – मराठी अनुवाद – डॉ. वा. ब. राहुडकर, एशियन ॲग्री हिस्ट्री फाउंडेशन, सिकंदराबाद (२०११)
४. विश्ववल्लभ – मराठी अनुवाद – उमाशशी भालेराव, एशियन ॲग्री हिस्ट्री फाउंडेशन, सिकंदराबाद (२०११)
५. लोकोपकार – मराठी अनुवाद – उमाशशी भालेराव, एशियन ॲग्री हिस्ट्री फाउंडेशन, सिकंदराबाद (२०१२)
६. उपवन विनोद – मराठी अनुवाद – उमाशीशी भालेराव, एशियन ॲग्री हिस्ट्री फाउंडेशन, सिकंदराबाद (२०१४)
७. भारतीय कृषी का प्राचीन इतिहास – डॉ. सुनील कुमार खंडेलवाल, डॉ. देवेंद्र जैन, अशियन ॲग्री हिस्ट्री फाउंडेशन, राजस्थान अध्याय, उदयपूर (२०२१)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.