अध्यात्म हे परावलंबी जीवनातून मुक्त होण्याचा मार्ग शिकवते. याचा अर्थ स्वयंतेचा विचार अध्यात्म सांगते. स्वावलंबी जीवन जगण्याचा आचार-विचार अध्यात्मात आहे. अध्यात्म हे आत्मनिर्भर बनवणारे शास्त्र आहे. तशी मानसिकता आपणमध्ये उत्पन्न करणारे हे शास्त्र आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
उदयिला आकाशी । रवीचि रवीतें प्रकाशी ।
हे नामव्यक्ती तैसी । ब्रह्म करी ।। ४०४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा
ओवीचा अर्थ – आकाशात उगवलेला सूर्यच जसा सूर्याला प्रकाशतो त्याप्रमाणे ॐ तत् सत् या नामाचा उच्चार ब्रह्माला प्रकाशित करतो.
स्वतःच स्वतःला प्रकाशित करायचे. म्हणजेच स्वयंपूर्ण होणाचे, आत्मनिर्भर होण्याचे, स्वयंसिद्ध होण्याचे ज्ञान अध्यात्म देते. आपणामध्येच हे ज्ञान तत्व दडलेले आहे. त्याची ओळख आपण करून घ्यायची आहे. आत्मा हा देहात आल्याने तो आत्मा देहाचा वाटत आहे. देह हा आत्मा आहे असा आपला समज अज्ञानाने झाला आहे. हे अज्ञान दूर सारून आत्मज्ञानी व्हायचे आहे. यासाठीच स्वतःच स्वतःला जाणायचे आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या मानसिकतेचा आपण अभ्यास करायचा आहे.
स्वतःमध्ये अनेक चांगले गुण दडलेले असतात. पण वाईट गुणांच्या प्रभावाने हे गुण आपल्यात सुप्तावस्थेतच राहातात. ते चांगले गुण जागृत करायचे आहेत. त्याला आवश्यक खत, पाणी घालून त्याची चांगली वाढ करायची आहे. स्वतःच स्वतःशी यासाठी संघर्ष करायचा आहे. सद्गुरु फक्त याची जाणीव करून देतात. जाणून करून देणारे ॐ तत् सत् या नामाचे बीज सद्गुरु आपणामध्ये लावतात. या बीजातून उत्पन्न होणाऱ्या रोपट्याचे संगोपन हे आपणासच करायचे आहे. तरच त्याला ब्रह्मज्ञानाची फळे लागतील अन् ती चाखायला मिळतील.
अध्यात्म हे परावलंबी जीवनातून मुक्त होण्याचा मार्ग शिकवते. याचा अर्थ स्वयंतेचा विचार अध्यात्म सांगते. स्वावलंबी जीवन जगण्याचा आचार-विचार अध्यात्मात आहे. अध्यात्म हे आत्मनिर्भर बनवणारे शास्त्र आहे. तशी मानसिकता आपणमध्ये उत्पन्न करणारे हे शास्त्र आहे. यासाठीच स्वावलंबी जीवनाचे महत्त्व अभ्यासायला हवे. आपला देश इंधनासाठी अन्य देशावर अवलंबून आहे. हे देश आपली पिळवणूक करतात. यासाठी आपला कल हा इंधनात स्वयंपूर्ण होण्याकडे असायला हवा. यासाठीच अन्य उर्जेच्या स्त्रोत्रांचा शोध हा घेतला जात आहे. इंधनाला पर्याय शोधले जात आहेत. इलेक्ट्रिक, सौर उर्जा असे पर्याय हे यातूनच पुढे येत आहेत. वीजेवर चालणाऱ्या वाहणांची संख्या यासाठीच वाढवण्यावर भर दिला आहे. म्हणजेच आपण परावलंबीत्व झुंगारून स्वावलंबी होण्याकडे, आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण होण्यावर अधिक भर देत आहोत.
स्वदेशीचा विचार हा यासाठीच महत्त्वाचा आहे. अध्यात्म हेच शिकवते. स्वयंपूर्ण व्हा, आत्मनिर्भर व्हा, स्वयंसिद्ध व्हा. स्वतःच स्वतःचा विकास करायचा आहे. स्वतःच स्वतःला जाणायचे आहे. स्वतःची ओळख स्वतःच करून घ्यायची आहे. स्वतःच स्वतःला सिद्ध हे यासाठीच करायचे आहे. आपणच आपणाला ओळखून आत्मज्ञानी व्हायला हवे अन् इतरांनाही आत्मज्ञानी करायला हवे.