इस्लामपूर, ता. १० : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा इस्लामपूर तसेच राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनी यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्करांची घोषणा करण्यात आली आहे.
लेखक नितीन गणपत शिंदे यांच्या डी. पी. होता म्हणून या कादंबरीला तर लेखक गणेश मुळे यांच्या पिंजरा आणि बाईच्या कथा या कथासंग्रहांची निवड करण्यात आली आहे. कवितासंग्रह विभागात कवी विलास माळी यांचा झांझरझाप व धनाजी घोरपडे यांच्या जामिनावर सुटलेला काळा घोडा या कवितासंग्रहांना विभागून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. शामराव पाटील व शाखेचे अध्यक्ष डॉ. दीपक स्वामी यांनी ही घोषणा केली. रविवारी (ता. १२) इस्लामपूर येथे साहित्यिक प्रवीण बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या २९ व्या मराठी साहित्य संमेलनात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
इस्लामपूर शहर आणि वाळवा तालुक्याच्या ग्रामीण भागातील साहित्य व सांस्कृतिक चळवळीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद इस्लामपूर शाखा कार्यरत आहे. दरवर्षी कथा, कादंबरी, कविता, ललित या साहित्य प्रकारांना लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीही त्याला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रविवारी (ता. १२) २९ वे मराठी साहित्य संमेलन सावंतवाडी येथील साहित्यिक प्रवीण बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. डॉ. संजय थोरात संमेलनाचे उद्घाटक आहेत. प्रा. डॉ. सुरज चौगुले स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाचे उद्घाटन, विविध पुरस्कारांचे वितरण तसेच अध्यक्षीय भाषणाचा कार्यक्रम होईल. प्रा. डॉ. भीमराव पाटील लिखित शब्दशिल्प या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे.
दुसऱ्या सत्रात डॉ. सुनीलकुमार लवटे यांची डॉ. श्रीकांत पाटील मुलाखत घेणार आहेत. तिसऱ्या सत्रात कवयित्री वर्षा चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. कवी साहिल कबीर सूत्रसंचालन करणार आहेत. जिल्ह्यातील साहित्यरसिकांनी संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दीपा देशपांडे, दशरथ पाटील, सुनील पाटील, अर्चना थोरात, सुभाष खोत, आनंदहरी, श्रीकांत भोसले, सुरेश साळवे, कालिदास पाटील, उत्तम सावंत, संदीप पाटील, उदयसिंह पाटील, प्रकाश जाधव, धर्मवीर पाटील आदी संयोजन करत आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.