मुलुंड येथील केळकर वझे महाविद्यालयातील प्रा. अमोल पवार यांनी डॉ श्रीकांत पाटील (कोल्हापूर ) यांच्या झाडोरा या बालकवितासंग्रहावर लिहिलेले पुस्तक परीक्षण.
जंगलातील औषधी गुणधर्म असणाऱ्या वृक्षांचा परिचय बालविश्वाला व्हावा या उदात्त हेतूने कवी डॉ. श्रीकांत पाटील यांनी ‘झाडोरा’ या काव्यसंग्रहाची निर्मिती केली आहे. ‘झाडोरा’ हा कवितासंग्रह बाल मनाला आकार देणारा आणि जैवविविधता समजून सांगतानाच लहान वयात मुलांच्या मनावर औषधी वनस्पतींचे बिजारोपण करणारा ‘आजीबाईंचा बटवा’ आहे. आपल्या नित्य परिचयातील, गावातील, शेतातील झाडांपासून ते गर्द रानात मिळणाऱ्या दुर्मिळ वृक्षांची माहिती आणि त्यांचे वेगळेपण या कवितासंग्रहातून आपणास अनुभवता येते. पर्यावरण आणि जैवविविधतेचा परिचय बाल वयातच मुलांना होण्यासाठी झाडोरा हे उत्तम माध्यम ठरणार आहे. येणाऱ्या काळात उद्भवणाऱ्या समस्यांचा विचार करून त्याबाबत सजग, सुजाण पिढी तयार करण्यासाठी कवींचा झाडोरा फलदायी ठरणार आहे.
‘झाडोरा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ हिरव्या गर्द घनदाट वृक्षांनी सजलेले असून मलपृष्ठावर कवी परिचय करून दिला आहे. साहित्यिक बबन शिंदे यांनी या कवितासंग्रहाची प्रस्तावना लिहिली आहे. आपल्या अवतीभवती असणाऱ्या असंख्य रान वनस्पतींचा आपल्या जीवनात कसा उपयोग होतो हे आपल्या विविध कवितेच्या माध्यमातून कवीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कवितासंग्रहात एकूण ५३ कविता असून त्याद्वारे अनेक वनस्पतींची नव्यानं आपणास ओळख होते.
आज सारे जग तापमान वाढीने त्रस्त आहे. एक मोठी जागतिक समस्या आपल्यासमोर ‘आ’ वासून उभी आहे. अशावेळी झाडोरा ने वृक्षांचे महत्त्व आणि जागतिक तापमान वाढ नियंत्रित करण्यासाठी वृक्षांची गरज अधोरेखित केली आहे. ‘एक एक झाड लावून ते जगवूया आणि झाडांशी मैत्री करून निसर्ग समजूया’ असे आवाहन कवी बाल मनाला करतात. आज मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे अनेक दुर्मिळ वनस्पतींचा नाश होत आहे. डोंगर उघडे पडत चालले आहेत आणि त्याचे विपरीत परिणाम निसर्गावर होत आहेत. त्यातून बाहेर पडायचे असेल तर बालवयातच संस्कार व्हावेत या भावनेतून कवी डॉ. श्रीकांत पाटील यांचा प्रयत्न अनुकरणीय आहे.
अनेक वनस्पतींचा परिचय या कवितासंग्रहातून होणार आहे.रोग क्षणात बरे करणारा आजीचा बटवा असणारे लिंबाचे झाड घरोघरी असावे असे कवींना वाटते. प्रत्येक झाडाची रचना, त्यांचे औषधी गुणधर्म आणि वेगळेपण या ठिकाणी आपणास अनुभवायला मिळते. पित्ताचे शमन करणारा बेहडा वृक्ष, डोकेदुखी थांबवणारा आणि वातनाशक पांढरा साग, टीबी रोगाचे औषध असणारी वाघाटी, लहान थोरांना बरे करणारा कदंब, अनेक रोगांवर गुणकारी अंकोल,कवठ,वड आदी वृक्ष, औषधाचे भांडार असणारा बहुगुणी उंबर, जीवनसत्वाने भरलेला आवळा, थकवा घालवणारे रामफळ, बहुगुणी हिवरा, रक्त शुद्धी करणारे संत्रे, शरीराचे पोषण करणारी मोसंबी यांसारखे अनेक वृक्ष आपणास या कवितासंग्रहात भेटतात. जणू काही आजीच्या बटव्यातून एकेका वनौषधीची माहिती आपणास मिळावी तसे झाडोरा आपणास प्रत्येक वृक्षाची माहिती देतो. त्यामुळे झाडोराचे वेगळेपण आणि कवीचा नवीन प्रयत्न या ठिकाणी अधिकच उठून दिसतो.
झाडोरा या कवितासंग्रहातून बालमनावर पर्यावरण रक्षणाचे संस्कार आणि रान वनस्पतींच्या औषधी बहुगुणांचा परिचय होत आहे. बालवयात होणारा हा वृक्षांचा परिचय चिरकाल स्मरणात राहणार आहे. झाडांच्या सानिध्यात खेळणे, बागडणे या बरोबरीनेच त्यांचे औषधी गुण समजावून घेताना बालकांची चिकित्सक वृत्ती जागृत व्हावयास मदत होणार आहे. निरागस बालकांना झाडोराच्या माध्यमातून निसर्गातील अनमोल संपत्ती जवळून अनुभवता आणि जाणता येणार आहे. पर्यावरणाचा ढासळलेला समतोल साधण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याची जाणीव अबाल वृद्धांना झाडोरा करून देते. आज मोठ्या प्रमाणात वाढलेल्या शहरीकरणामुळे झाडांची कत्तल होत आहे, जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे अशावेळी पर्यावरण रक्षणाची ढाल बनून झाडोरा उभा ठाकतो.
एक दिलाने आता, निर्धार ठाम करूया
पर्यावरण रूपी परमेश्वराला, सर्वांनी स्मरू या…
अशी शिकवण झाडोरातून आपणास मिळते.झाडोराची शब्दरचना सहज, सोपी असून बाल मनाला आकलन होणारी आहे. सर्वसाधारणपणे १६ ते २० ओळींपर्यंत कवितेची लांबी दिसत असून कविता यमक अलंकारात सजलेल्या दिसतात.कवीची भाषा लहान मुलांना आपलीशी वाटणारी आहे. बालकांना आकर्षित करतील अशी प्रत्येक कवितेत सांगितलेल्या झाडांची रचना, पाने,फुले,फळे आणि तितकीच प्रभावी सजावट आहे. एकूण बालसाहित्यात झाडोरा कविता संग्रह आगळावेगळा असा आपला परिणामकारक ठसा उमटवेल आणि स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करेल यात शंका नाही.
बालकवितासंग्रहः झाडोरा
कवीः डॉ. श्रीकांत पाटील (मो.९८३४३ ४२१२४)
प्रकाशकः रंगतदार प्रकाशन, भिवंडी जि. ठाणे
पृष्ठे -: ६४ मूल्य –:२००/- रु.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.