पूर्वी चिपळूण शहर हे तळ्यांचे शहर म्हणून ओळखले जात होते, ती आता चिपळूणकरांसाठी ही आठवणच राहिली आहे. त्या तळ्यामध्ये पूर्वी वेगवेगळ्या रंगाची कमळाची फुले फुलायची. नवरात्रात देवीला वेगवेगळी फुले चिपळूण करांना मिळायची. ते तलाव भरून तेथे अपार्टमेंट उभ्या राहिल्या. हळूहळू तळी कमी होऊ लागली. पूर्वी जास्त पाऊस झाला की प्रथम पाणी तलावात पसरायचे नंतरच चिपळूण शहरात घुसायचे.
विलास महाडिक, अध्यक्ष, चिपळूण तालुका शिक्षक कल्याण मंडळ
चिपळूणला 21, 22 जुलै 2021 ला महापूर आला आणि चिपळूणची बाजारपेठ, आजूबाजूची काही गाव पाण्याखाली गेली. सर्वांचे गोळा केलेल्या मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले. पाऊस प्रचंड झाला, पूर्ण सह्याद्री खोऱ्यातून प्रचंड पाणी चिपळूणच्या दिशेने आले, वरील बाजूस धरणे असल्याने थोडा फटका कमी बसला. या महापुराने डोंगर भागातील वृक्षतोडीमुळे मातीची धूप होऊन माती चिपळूण शहरात व इतर भागात घुसून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. ज्या भागात कधीही पाणी भरले नाही, त्या भागात पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरले. चिपळूणात हाहाकार माजला. बाजारपेठ पूर्ण उध्वस्त झाली. प्रसार माध्यमातून चिपळूणचा महापूर सर्वदूर पोचला. मदतीचा ओघ चारी बाजूंनी सुरू झाला. लोकांच्या खाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कपड्याची, सर्व घटकांनी , संस्थानी मदत करून माणुसकीचे दर्शन दाखविले. अनेकांनी मदत कार्य करून शहरातील रस्ते, घरे सफाई करून दिली. जनजीवन पूर्व पदावर येण्यास काही महिने गेले.

तेव्हापासून चिळूणकरांनी पाण्याचा धसका घेतला आणि नदीतील पाण्याला चिपळूणला थांबू द्यायचे नाही यासाठी चंग बांधला सर्व स्थरावर ताकत लावून नदी साफ करून घ्यावी, नदी गाळमुक्त करून झाल्यावर चिपळूणला पूर येणार नाही असा समज करून घेतला. शासन स्तरावर जोर लावून पोकलेन, जेसीबी, डंपर धडाधड दाखल झाले, नाम फाऊंडेशनने ह्या अगोदर शिव नदीतील गाळ काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर वाशिष्ठी नदीत पोकलेन धडधडू लागले, नदीतील गाळ खरडवून व नदीची रुंदी वाढवून गाळ एकत्र जमा करून नंतर चिपळूणमधील पाणथळ जागा, मोकळी मैदाने गाळांनी भरून टाकली, पूर्वी चिपळूण शहर हे तळ्यांचे शहर म्हणून ओळखले जात होते, ती आता चिपळूणकरांसाठी ही आठवणच राहिली आहे. त्या तळ्यामध्ये पूर्वी वेगवेगळ्या रंगाची कमळाची फुले फुलायची. नवरात्रात देवीला वेगवेगळी फुले चिपळूण करांना मिळायची. ते तलाव भरून तेथे अपार्टमेंट उभ्या राहिल्या. हळूहळू तळी कमी होऊ लागली. पूर्वी जास्त पाऊस झाला की प्रथम पाणी तलावात पसरायचे नंतरच चिपळूण शहरात घुसायचे. पाऊस कमी झाला की पाणी तलावात जिरून जायचे, त्यामुळे पूर जरी आला तरी नुकसान कमी व्हायचे, त्यावेळी चिपळूणच्या नागरिकांना पूर येणे म्हणजे आनंद वाटायचा. व्यापारी वर्गाना पुरामुळे घरी निवांत बसणे असायचे, अनेक मित्रमंडळी एकत्र येवून खाण्याची मेजवानी करायचे.कंबर भर पाण्यात तरुण मुले पोहण्याचा आनंद घेत असत.पण हे पूर्वापार चालत आलेले गणित २००५ मध्ये महापूर आला तेव्हा बदलले.नेहमीपेक्षा चिपळूण मध्ये पाण्याची पातळी वाढली.
प्रथमच व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान झाले, मजरेकाशी गाव पाण्याखाली गेले, तेथील लोकांची घरे-गुरांचे गोठे वाहून गेले. या अगोदर केव्हाही तेथे पूर आलेला नव्हता,त्यामुळे तेथील लोकांची घरे जुन्या पध्दतीची म्हणजे मातीच्या भिंती असलेली होती त्यामुळे पूर जेव्हा आला तेव्हा त्या भिंती पाण्यात विरघळून पडल्या,व लोकांनी जमा केलेला संसार पाण्याबरोबर वाहून गेला,लोकांचे पशुधन गेले,काही जाग्यावर म्हशी, गाई फुगून मेल्या. त्यावेळी आम्ही पेढे गावात असल्यामुळे श्रीधर शिगवण, विलास महाडीक, अभय सहस्रबुद्धे, विवेक वारे, दिपक वारे व इतर अनेक मान्यवर मंडळी यांनी दुसऱ्या दिवशी घराघरात जाऊन त्यांची माहिती संकलित केली,(जनगणना करतात तशी) अभय सहस्रबुद्धे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य यांनी या कालावधीत जेवण्याची व्यवस्था केली. हे संकट आपल्या कुटुंबावर आले आहे हे समजून मदत कार्य केले. त्यानंतर मदतीचा ओघ येऊ लागला, आम्ही सर्वेक्षण केल्यामुळे एका ठिकाणी मदत उतरून घेवून कुटुंबातील सदस्य प्रमाणे वाटणी त्यावेळी ग्रामस्थांनी केली. त्यावेळी आम्ही मदतीसाठी खारीचा वाटा उचलल्यामुळे चिपळूण पंचायत समितीच्या सभेमध्ये आमचा अभिनंदन ठराव करण्यात आला.हे २००५ चे झाले.
सर्व यंत्रसामुग्री चिपळूण मध्ये गाळ काढण्यासाठी दाखल झाली. पोकलेन, डंपर धडधडू लागले, गाळ चिपळूण शहरात मोकळ्या जागेत, मोकळ्या मैदानात, जेथे पूर्वी पाणी भरत होते त्या जागेवर गाळ टाकणे सुरू झाले. नदीच्या एका बाजूला गाळ टाकून रस्ते बनविण्यासाठी वापर होऊ लागला, आता नदीकडे पाहताना नदी मोकळी व विस्तीर्ण अशी वाटू लागली. येणारा जाणारा नदीकडे पाहून चांगले काम झाले अशी चर्चा करू लागले. कोयनामधून सुटणारे अवजल आता सरळ कोठेही न थांबता समुद्राला मिळू लागले,त्याचबरोबर भरतीचे खारे पाणी सरळ शिवनदीपर्यंत विना अडथळ्याशिवाय येऊ लागले. नदीमधील बेटे काढून टाकली गेली, जी अनेक वर्षे पिढ्यानपिढ्या तेथे होती ती सपाट करून टाकली. पूर येण्यास कारणीभूत नदीतील बेटे आहेत हा अनेकांनी निष्कर्ष काढला. पण पूर्वीचे शहर व आताचे शहर पाहिले तर अनेक मोकळ्या जागा होत्या, तलाव होते आता त्यांची जागा अपार्टमेंट नी घेतली आहे. त्यामुळे चिपळूण शहरात पार्किंगची व्यवस्था नाही. पण पाणी व माती पुराबरोबर का येते याच्या मुळाशी कोणी जात नाही.सह्याद्रीच्या पट्यात वृक्ष तोडीमुळे पाण्याबरोबर गाळ घेवून येत आहे, जमिनीची धूप प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. वरील भागातील धरणे गाळानी भरली आहेत. ती मोकळी करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही.

पेठमाप मधील आठ एकरावर असणारे जैवविविधतेने नटलेले बेट पर्यावरणाचा विचार न करता त्यावर असणारी मोठी-मोठी वृक्ष पोकलेन लावून आडवी करण्यात आली, या बेटावर अगोदर एका बाजूला पेठमापची स्मशानभूमी होती, पावसाळ्यात पाण्यातून पलीकडे जाण्यासाठी अडचण होत होती म्हणून पेठमाप वाशीयांसाठी पूल मंजूर झाला होता, पुलाचा एक पिलरही टाकून झाला आहे. त्या पुलाची साक्ष म्हणून तो आजही तेथे उभा आहे .पुढे ते काम का रखडले हे माहीत नाही .या बेटावर बामणे कुटुंब शेती करत होती, गाई-म्हशी त्यांच्याजवळ होत्या,आजही आहेत. गाई- म्हशी चरण्यासाठी याचा उपयोग होत होता. स्थलांतरीत पक्षी विसाव्यासाठी येथील झाडांचा आसरा घ्यायचे कारण तेथे माणसांचा वावर कमी होता, दोन्ही बाजूने पाणी होते. उद मांजरे यांचा वावर होता ती बिनधास्तपणे तेथे बागडत असायची. पुलावरून जाणाऱ्या येणाऱ्यांच्या सहज नजरेस पडायची. काही वेळा बेटाच्या कोपऱ्यात वाळूत मगरी पहुडलेल्या असायच्या. अस हे पर्यावरण प्रेमींच्या नजरेस भरणारे बेट आता पूर्ण मोकळे झाले आहे, ना त्या भागावर पक्षी दिसत आहेत ना उद मांजरे. नदीच्या तीरावर भर टाकून रस्ता मात्र सुंदर बनविला आहे, त्या रस्त्यावर आता माणसांची वर्दळ वाढली आहे. रात्री सुध्दा या रस्त्यावर गाडया लावून नदीचे सौंदर्य न्याहाळत तरुण बसलेले असतात.
२००५ मध्ये असाच चिपळूण मध्ये पूर आला होता. त्यावेळी चिपळूण वाशीयांनी पुराला कारणीभूत जुना फरसी पूल ठरविण्यात आला तो काढून टाकण्यासाठी प्रयत्न करून अखेर तो काढून टाकला गेला, त्याचे पुढे असे परिणाम झाले की चिपळूणातील विहिरींची पाणी पातळी खाली गेली व भरतीचे खारे पाणी वर येऊ लागले. उन्हाळ्यात जेव्हा कोयना जल सोडत नसत त्यावेळी खारे पाणी नदी पात्रात घुसायचे व चिपळूणकर यांना पिण्यासाठी क्षारयुक्त पाणी नळातून यायचे. लोटे एमआयडीसीला फरशी येथून पाणी उदनचन केंद्र आहे, तेथून पाणी सर्व कंपनी यांना पुरविले जाते, फरशी तोडल्यामुळे जॅकवेल जवळ पाणी थांबेनासे झाले,पाणी वरून आले की सरळ समुद्राला जाऊन मिळत असे. त्यामुळे पाण्याचा तुटवडा भासू लागला. तेथील जॅकवेल भरेनासी झाली. पुन्हा प्रयत्न करून अर्धी फरशी बांधली गेली व पाणी अडवून पाणी पुरवठा केला जाऊ लागला. आता हे बेट काढल्यामुळे तेथे पाणी थांबणार नाही, चिपळूणात उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवेल, विहिरींची पाणी पातळी खाली जाईल, खारे पाणी भरतीला आत येईल व पाण्याची चव बदलेल. पावसाळ्यात काय होईल हे मात्र सांगता येणार नाही, कारण समुद्र सपाटी पासून चिपळूण शहर सात- आठ मीटरवर आहे. त्यामुळे आपण समुद्रतर जवळ आणीत नाही ना ? नदीतील छोटी मोठी बेटे ही भरतीचे येणारे खारे पाणी काही प्रमाणात वर येण्यास अडथळा निर्माण करायचे, पूर्ण भरती नदीपात्रात वर येईपर्यंत ओहोटी लागायची. पेठमाप येथील हे बेट पर्यावरण प्रेमींसाठी एक पर्वणीच होती.फरशी पुलावरून दिसणारे हे बेट जाणारे-येणारे आपल्या मोबाईल मध्ये क्लीक करून घेत होते.

बेट म्हणजे काय हे समजून सांगताना चारी बाजूनी पाणी व मध्ये जमीन हे उदाहरण दाखल पुलावर उभे राहून दाखविता येत होते.आपण जर पुलावर उभे राहून पूर्वेकडे पाहिले तर वरील बाजूस नदी पात्र विस्तीर्ण होते व आहे, तसेच पश्चिम दिशेकडे पाहिले तर एनरॉन पूल दिसतो व तेथील नदीपात्र अरुंद दिसते कोणी जरी तज्ञ आणला तरी नदीपात्र खालच्या बाजूला अरुंद आहे त्यामुळे पुराचे पाणी त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने पुढे जाण्यास अडथळा निर्माण होत असणार, याचा परिणाम की काय त्या पुलाला महापुराचा झटका बसून तो पूल मध्ये वाकला आहे. त्यामुळे त्या पुलावरून वाहनांची वहातुक बंद आहे.तो दुरुस्ती साठी प्रयत्न दिसत नाहीत. एका बाजूला परशुराम घाटातील मोठी वृक्ष तोड करून चारपदरी महामार्ग बनविण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे.पेढे-परशुराम येथील लोकांची घरे पायथ्याला व परशुराम वाशीय यांची घरे डोंगर माथ्यावर. मधेच उभे डोंगर कटाई करून पावसाळ्यात दोन्हीही गावांना मानवनिर्मित धोका निर्माण करून ठेवला आहे. डोंगरातील माती कधी खाली येईल सांगता येत नाही.प्रशासन मात्र येणाऱ्या आपत्तीसाठी आपत्तीव्यवस्थापन आराखडा तयार करून सज्ज आहे. आधीच लोकांना नोटीस देऊन तुम्ही स्थलांतर करा तुमच्या घरांना धोका आहे असेही सांगतील.
या परशुराम घाटात गेली अनेक वर्षे एखादा दगड ही डोंगरावरून घसरला नव्हता .पण उभ्या डोंगर कटाईमुळे दगड माती खाली येऊ लागली. वरून धोका वाटला तर नोटीस देऊन त्याला स्थलांतर करण्यास भाग पाडणे, जे पिढ्यानपिढ्या तेथे आपले घर बांधून आहेत,ते आपले घर सहजासहजी सोडतील का?पेढे परशुराम येथील नागरिकांचा असाही सूर आहे की आमची घरे जागा ताब्यात घेऊन हायवे प्रमाणे मोबदला द्यावा. येणारा पावसाळाच ठरविणार आहे की केलेले काम किती टक्के बरोबर आहे.तसेच डोंगर कटाई व केलेली वृक्षतोड मानवाच्या नाशाला किती कारणीभूत ठरते ते ? अशी कोणतीही आपत्ती या पुढील काळात न येवो ही प्रार्थना.