कोकणवाडी म्हणजे एक आनंददायी, संपन्न आणि आपलेपणा जपणारं पर्यटनस्थळ. ज्या ठिकाणी मनापासून परत-परत जावसं वाटतं तेथे रक्ताचं नातं नसलं, तरी अंतर्यामी निर्माण होणारं नातं अधिक भावनाप्रधान असतं.
जे. डी. पराडकर 9890086086
हिरवाईने नटलेल्या सुंदर परिसरात सतत नैसर्गिकरीत्या वाहणार्या पाटाच्या पाण्याचा गारवा, नारळी-पोफळीसह, केळीच्या बागा. घरासमोरील सारवलेल्या अंगणात सावलीसाठी घातलेला पेंढ्याचा मंडप. मे महिन्याच्या हंगामात घराच्या पडवीत रांगेने उभे करून ठेवलेले फणस आणि अढीमध्ये पिकण्यासाठी ठेवलेले रायवळ आंबे हे सारं वर्णन आहे, कोकणवाडी म्हणजे कोकणच्या ग्रामीण भागातील संपन्न घरांचं.
कोकणचा भाग हा विखुरलेला आहे. एका गावात असणार्या विविध भागांना वाडी म्हटलं जातं. कोकणच्या या वाड्या आणि कोकणवाडी यामध्ये फरक आहे. शाळांना सुट्टी सुरू झाली की, अनेकांची पावलं कोकणातील आपल्या घराकडे, नातेवाईकांकडे आपोआप वळतात. यासाठी मे महिन्याएवढा अन्य उपयुक्त हंगाम नाहीच. मे मध्ये जरी उष्णतामान अधिक असलं तरी नदीवर पोहणं आणि निसर्गानं भरभरुन दिलेल्या फळांचा मनसोक्त आस्वाद घेणं यासाठी कोकणवाडी पसंत केली जाते. कोकणात एकदा राहिलेला माणूस यासाठीच परत परत कोकणच्या रस्त्याची वाट धरतो.
ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होत असला, तरी कोकणच्या विविध भागांत आजही एकत्र कुटुंबपद्धती पाहायला मिळते. एकाच घरात जवळपास ४० पर्यत माणसं आजही एकाविचाराने आणि सामंजस्याने आनंदात नांदतायत. एकत्र राहण्याचे अनेक फायदे आहेत आणि याचं महत्व एकत्र राहणारी कुटुंबच अधिक स्पष्टपणे सांगू शकतील. सध्याच्या धावपळीच्या जीवनात नात्यांमध्ये कमालीचा दुरावा निर्माण होताना दिसतो, एकत्र कुटुंबपद्धतीत मात्र नात्यांमध्ये ओलावा आणि कमालीचा हळवेपणा आहे. कोकणात मात्र नात्यांचे हे बंध आजही एकमेकात घट्ट विणलेले पाहायला मिळतात.
कोकणवाडी म्हणजे एक आनंददायी, संपन्न आणि आपलेपणा जपणारं पर्यटनस्थळ. ज्या ठिकाणी मनापासून परत-परत जावसं वाटतं तेथे रक्ताचं नातं नसलं, तरी अंतर्यामी निर्माण होणारं नातं अधिक भावनाप्रधान असतं. मे महिन्यातील काही दिवस हा आनंदाचा ठेवा प्राप्त केला की, पुढं वर्षभर या अविस्मरणीय आठवणींवर दिवस सरत जातात. येथील मेतकूट, कुळथाचं पिठलं, काजुची उसळ, गरम भाकरी, गाऱ्यांची आणि आठळांची भाजी, भाजणीचे वडे, पावट्याची उसळ, गरम मसाल्याची आमटी, झुणका या सर्व पदार्थांमध्ये एक आगळी-वेगळी चव उतरते, याचं कारण हे सर्व मनापासून केलं गेल्यानं करणार्या व्यक्तीचं प्रेमही त्यात उतरलेलं असतं. यासाठीच कोकणातील मुक्काम प्रत्येकाच्या अंतर्मनात घर करून राहतो.
सकाळी उठल्यानंतर पोफळीच्या बागेत सतत राहणार्या पाटाच्या पाण्यामध्ये मनसोक्त आंघोळ करायची घरी आल्यानंतर फणसाचे गरे खायचे, दुपारी डोळ्यावर धुंदी येईपर्यत आमरस संपवायचा , अंगणातील वार्याच्या मंद लहरीवरील वामकुक्षी ओटोपली की, अढीतले आंबे स्वत:च्या हातांनी घेऊन त्यांचा मनसोक्त आस्वाद घ्यायचा, सायंकाळी डोंगरावरील काळी मैना, जांभळं चाखायची. हा सारा आनंद कोकणवाडीतच अनुभवायला मिळतो. कोकणवाडीतील अशा घरातून निरोप घेताना मिळणार्या भेटींपेक्षा अल्पकालावधीत निर्माण झालेला जिव्हाळा, नात्यातील विण घट्ट करण्याची मिळालेली शिकवण, आपलेपणा यामुळे डोळ्यात नकळत अश्रू तरळतात. यासाठीच कोकणातील मुक्काम हा अविस्मरणीय असा समजला जातो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.