शोभा नाईक यांच्यासारखी कवयित्री पुरुषाचा बाजार भरवण्याची कल्पना धाडसाने मांडते. तेव्हा आश्चर्य वाटत नाही; तर या धाडसाचं आपल्याला कौतुकच करावसं वाटतं. बाईला तुम्ही वस्तू समजता तर इथे पुरुषालाच वस्तू करण्याचा नवा खेळ खेळला जायला पाहिजे, हे नवे भान यातून ही कवयित्री देते.
अजय कांडर
लेखक विख्यात कवी,व्यासंगी पत्रकार आहेत.९४०४३९५१५५
बाई भाषा भवताल आणि समकाल
प्राचार्य डॉ. शोभा नाईक व्यासंगी व्यक्तिमत्व. संशोधक, समीक्षक, अनुवादक, लेखिका, कवयित्री अशा बहुआयामी साहित्यिक. प्रसिद्धीचा सोस न बाळगता व्रतस्थपणे लेखन करणे हा त्यांच्यातील चांगुलपणा वाचकांना प्रेरित करतो. त्यांचा ‘अधल्या मधल्या ओळी’ हा दर्या प्रकाशनाने प्रकाशित केलेला नवा काव्यसंग्रह. या संग्रहातील सर्व कविता या डॉ. नाईक यांच्या गंभीर विचार चिंतनाचे दर्शन घडवितात आणि वाचकाला अंतर्मुख करायला लावतात. “अधल्या मधल्या ओळी ” मधील समग्र कविता ही बाई – भाषा – भवताल आणि समकाल याच्या केंद्रस्थानी उभी आहे.
कोणत्याही कवीला त्याचा त्याचा काळ माहीत असणे गरजेचे असते. तरच तो उत्तम काव्य लेखनाच्या जवळ जावू शकतो. शोभा नाईक याबाबत उजव्या ठरतात. आज देशात काय चालू आहे याचं पक्क भान या कवयित्रीला आहे.जिथे ज्ञान संस्कृती रुजवायला पाहिजे तिथे यज्ञ संस्कृती रुजविण्याचा आग्रह आज धरला जातोय. जिथे ज्या वर्गाचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवला जायला हवा, तिथे त्या वर्गाला जात आणि धर्मात अडकवलं जातंय. आजच्या या ध्रुवीकरणावर नेमका प्रहारही ही कविता करत आहे.आज कवयित्रींमध्ये लिहिल्या जाणाऱ्या कवितेच्या केंद्रस्थानी या कवितेचं बलस्थान आवर्जून अधोरेखित केले जायला हवे. आजूबाजूच्या भवतालाचं पुनर्वाचन ही कविता करते. गांधी सगळ्यांनाच भेटत असतो. आजच्या काळात तर अधिकच गांधी विचारांची कधी नव्हे एवढी गरज आहे. पण गांधी भेटणे आणि आपल्या आत तो टिकवणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. हे नवं भान कवितेच्या रूपातून शोभा नाईक यांची कविता देत असल्याने आज लिहिल्या जाणाऱ्या मराठी कवयित्रींच्या कवितांमध्ये शोभा नाईक यांच्या कवितेचा पैस विचाराच्या पातळीवर अधिकच विस्तारत जाणारा आहे. म्हणून ही कविता खऱ्या अर्थाने समकालीन आहे.”
अधल्या मधल्या ओळी” मधील कवितेचा बहुसंख्य भाग हा बाईच्या अस्तित्वाची मांडणी करणारा आहे. पण एकूण मराठीत आजवर लिहिली गेलेली स्त्रीवादी कविता आणि या कवितेत खूप फरक आहे. ही कविता बाईच्या हक्काबद्दल फक्त आवाज उठवत नाही, बाईच्या शोषितेबद्दलचे हुंदके देत नाही, तर बाईचं वस्तूकरण केलं जाणाऱ्या पुरुषी प्रवृत्तीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करते. पुरुषांच्याबरोबरीने बाई ही माणूसही आहे हे आवाहन करून तिच्यातलं माणूसपण स्वीकारायचा आग्रह धरते.
बाई एकटी जगू पाहते तेव्हा तिला पुरुषी अहंकार बाई ही सार्वत्रिक वस्तू म्हणून गृहीत धरत असतो. म्हणून शोभा नाईक “बाई म्हणून इथे जगायला जागा नाही”. असा सवाल उपस्थित करतात. घरापासून समाजाच्या विविध स्तरात बाईच्या शरीराचं आजच्या यांत्रिकी जगातही वर्षानुवर्ष बाजारीकरण कसं केलं गेलंय हे तीव्रतेने मांडतात. हे वाचताना वाचक म्हणून आपण आतून ढवळून निघतो आणि अंतर्मुख होत जातो. बाईवर पुरुषाने एकदा मालकी हक्क सांगायला सुरुवात केली, की तिचं म्हणून जे जे आहे ते ते सारं पुरुषाचं होऊन जातं. ही बाईची दुखरी नस या कवितेत अगदी सूक्ष्म पद्धतीने पकडण्यात आली आहे. आजच्या सुधारणावादी जगातही बाईच्या हक्क, जाणिवांबद्दल चळवळी झाल्या आणि या चळवळीचे मालकही पुरुष झाले म्हणजे तिथेही बाईला स्थान नाहीच. हा त्यांचा सवाल वाचकाच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतो. जगातल्या कुठल्याही बाईचं स्वामीत्व जपणं हे जगातल्या कुठल्याही बाईचं कर्तव्यच असतं. ही भावना या कवितेच्या ठाई ठाई दिसते. म्हणून ही कविता जातीच्या- धर्माच्या उतरंडीवर म्हणजेच समाजाच्या कुठल्याही स्तरावर बाईचेच सर्वाधिक शोषण होते याकडे निर्देश करते;पण अशाही स्थितीत बाई खंबीरपणे उभी असते, सगळी पुरुषी सत्ता झिडकारत. म्हणूनच ही कवयित्री म्हणते ” रडले एकांतात/पण डोळ्यातलं पाणी कधी विकलं नाही/ झेलले कैकवार/ कोणाचीच पावळणी पकडली नाही “
ही समग्र कविता वाचताना वाचक म्हणून आपण अधिक प्रौढ होत जातो. खरंतर खऱ्या लेखनाचं हेच प्रयोजन असतं. बाई म्हणून तिच्या आशा आकांक्षा पुरुष धुळीस मिळवतो. तेव्हा बाई तरी कशी संयम ठेवेल आणि त्याला समजून घेईल. भर बाजारात बाईला विवस्त्र केलं जातं आणि तिचं मूल्य पैशाच्या तराजूत मोजलं जातं. तेव्हा बाईने नाही तर पुरुषाने लाज लज्जा विकलेली असते.हे आपण एकदा समजून घेतलं,की मग बाईला आपल्याला नीट समजून घेता येते. पण पुरुष म्हणून आपण आपलं सगळंच विकलेल आहे,याची जाणीव अपवाद सोडता तर बहुसंख्य पुरुषांना नसतेच. मग जाणीव निर्माण करण्यासाठी शोभा नाईक यांच्यासारखी कवयित्री धाडसाने पुढे येते आणि पुरुषाचाच बाजार भरवण्याची कल्पना मांडते. तेव्हा आश्चर्य वाटत नाही तर या धाडसाचं आपल्याला कौतुकच करावसं वाटतं. बाईला तुम्ही वस्तू समजता तर इथे पुरुषालाच वस्तू करण्याचा खेळ नवा खेळला जायला पाहिजे,असे आवाहनही ही कवयित्री करते.यातून या कवयित्रीने बाईच्या शोषणाचे तळ किती खोलवर समजून घेतले आहेत, त्या वेदनेची सलसलती सल आपल्या कवितेमध्ये कशी पकडली आहे हे लक्षात येत.या संदर्भातली त्यांच्या एका कवितेच्या काही ओळी मुद्दामहून तुमच्यासमोर ठेवतो. मी काय म्हणते /पुरुषाला एकदा वस्तू करू /बाजारात ठेवू पुरुषाला विकायला/ विकत घ्यायला मार्केट उभं करू.
खरंतर या जगात बाईसारखं पुरुषाचेही मार्केट भरलेलं असतं; पण हे उच्चभ्रू वस्तीत. बाईचं मार्केट मात्र खेड्यापाड्यापासून शहरापर्यंत सर्वत्रच. अशावेळी पुरुषाचं वस्तुकरण करणे आणि त्याचं मार्केट उभं करणं हे नवं भान देताना ही कविता पुरुषाच्या विरुद्ध बोलताना, प्रतिक्रिया नोंदवताना आवाजी सूर लावत नाही.म्हणून तिचे श्रेष्ठत्व अधिकपणे आपल्याला मान्य करावं लागतं.भाषेच्या ममत्वातूनच भाषेविषयीची एक अप्रतिम कविता या संग्रहातही आपल्याला वाचायला मिळते.या कवितांना कवयित्री ज्या भूमीत वाढत गेली त्या भूमीचा सच्चा स्पर्श आहे. त्यामुळेच त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणातील प्रतीके, प्रतिमांचा प्रभावीपणे कवितेसाठी उपयोग केला आहे.त्यामुळेच ही कविता अधिक बंदिस्त लिहिली गेली.या कवितेतील एखादा शब्द जरी इकडे तिकडे केला गेला तरी संपूर्ण कविता कोसळेल अशी शंका वाटत राहते.आपल्या भूमीशी, आपल्या जगण्याशी प्रामाणिक जी व्यक्ती राहते तेव्हाच एवढं उत्तम लेखन केलं जाऊ शकत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.