अन्नदात्या शेतकऱ्यांची नैतिकता आणि भ्रष्टाचाऱ्यांची अनैतिकता यातील फरकातून, समाधानाची पेरणी करणारा अंतर – मंतर सकारात्मकतेचा संस्कार करताना अधिक मार्गदर्शक ठरतो. वितुष्टाला शमविण्यासाठी शोधलेले निदानात्मक पेटंटच म्हणावे लागेल.
लक्ष्मण खोब्रागडे
चारोळी संग्रहात चारीही दिशेचे अनुभवविश्व
समाजजागृतीसाठी
दिवा हो तू उजेड धर,
अनिष्ट अंधारमय परंपरावर
तू जबरदस्त प्रहार कर.
ग्रामगीतेतील चिकित्सक विचाराची जडणघडण झालेले व्यक्तिमत्त्व ; बंडोपंत बोढेकर. अफवांवर विश्वास न ठेवता , प्रत्यक्ष अनुभवाला समाजजागृतीचे शस्त्र बनवता येते . वास्तव मांडले की , घाबरण्याचा प्रश्नच उरत नाही . त्यासाठी असत्याला पिळून सत्याचा उत्तम अर्क काढण्याची धमक , चारित्र्यात असावी लागते. अंतःकरणाचा शुद्धपणा विचाराला बळ पुरवते . म्हणूनच चारोळीसंग्रहातून बंडोपंत बोढेकर नावाचा वणवा , अंतर-मंतर मधून अनिष्टाला मुळासकट जाळत नेण्याची धग प्रसवतो .
विष आणि अमृत याची
करता यावी पारख,
मानवतेची किमान तू
ठेव बाबा ओळख.
अंतर-मंतर मध्ये चारोळीतुन बंडोपंत बोढेकर यांच्या , चारी दिशेचे अनुभवविश्व एकवटलेले आहे . फोफावलेल्या मतलबात वाढलेले अंतर कमी करण्यासाठी , नैतिकतेचा मंतर चारोळीतुन तेजस्वी करणारे बंडोपंत बोढेकर , प्रबोधनाच्या परंपरेतील मुकुटमणी ठरतात. शब्दांची खोली आणि आशयाचा सामर्थ्य ; विवेकाचा पैलू देण्यासाठी संजीवनी ठरते . चार ओळीचा प्रहार महान ग्रंथाची जागा घेत , परिवर्तनाची नांदी देताना दिसते .
आपण सारे भारतवासी
सर्वांचा राहो एकच मंतर,
स्नेहपूर्ण संवाद साधत
मिटवू मनामनातले अंतर.
शब्दातील प्रवाहिपणा अंतर-मंतर चे वैशिष्ट्य मानावे लागेल . अंतर दाखवून मंतर देण्यापेक्षा , मंतर देत अंतर वाढणार नाही यासाठी दक्ष राहण्याचा खटाटोप विलक्षण आहे . चारोळी म्हणजे भावनांची भरती . परंतु भावनांना जोपासत संस्कृती संवर्धनाचा मार्ग बंडोपंत बोढेकर यांची वेगढी शैली उद्धृत करते . झगमगाटाच्या वर्दळीत सात्विकतेच्या चोखाळलेल्या मार्गाची दखल साहित्याला घ्यावीच लागेल .
गळ्यात पडला हार
देह झाला ईश्वरार्पण ,
असे कर्म कर जगात
घडावे माणुसकीचे दर्शन .
राष्ट्रसंताची विचारमाला धारण केल्याने, चारोळीतून संतपरंपरेचा वसा चालताना दिसतो. हा चारोळीसंग्रह प्रेरणास्रोत म्हणून वापरता येईल. विचारांशी प्रामाणिकपणा जोपासत , श्वास आणि शब्दाची गुंफण बंडोपंतांची प्रतिभाउंची वाढवते. भोगात रमलेले भोंदू जंत समाजस्वास्थ्य बिघडवू नये, त्यांचा संसर्ग थांबविण्यासाठी अंतर-मंतर प्रतिबंधात्मक उपाय आहे.
संतवृत्तीची संगत
माणूसपण जागवते ,
दुर्जनांची संगत मात्र
माणुसकीला नागवते .
सदविचाराची झेप प्रगतीचे दार खोलते. अंतर-मंतर मधून हाच मंत्र ऊर्जा देत राहते. आधुनिक जीवनशैलीत आलेली अनिष्ट विचाराची मरगळ झटकण्याचे काम, बंडोपंतांनी चोख बजावल्याचे प्रतिबिंबित होते. त्यांची वैचारिक परिपक्वता चारोळीच्या सौंदर्याला अधिक खुलवते. उत्तम चारित्र्याचे साफल्य कोणत्याही वादात अडकणार नाही, यासाठी कोठेही मुखवट्याचे सोंग शोधूनही सापडणार नाही. बढाईला फाटा देत, सकारात्मकतेचा ताठा म्हणून चारोळीसंग्रह समजदारीचा उत्कृष्ट नमुना आहे.
ध्येय नसेल जीवनात तर
अभ्यासात नसते लक्ष ,
अशांना कधीही कुणीही
करतात सहज भक्ष्य.
बिघडलेल्या संस्कारात अर्धसत्याने सारे नियोजन बिघडते. ही खंत पुन्हा उदभवु नये म्हणून, अंतर-मंतर धोक्याची सूचना देत सावध चालीचा इशारा देते. मानवी प्रवृत्तीतील गुणदोषावर उतारा देण्याचे बंडोपंत बोढेकर यांचे कसब, चारोळीसंग्रहाच्या प्रकाशात स्वतःला ओळखणारा आरसा स्वच्छ करत जाते. काटेरी वाटेवरून संघर्ष करण्यात खरा आदर्श निर्माण करण्याची स्फूर्ती, अंतर-मंतर देत जाते. बंड करीत बंडोपंत बोढेकर, अराजकतेची चिरफाड करताना दिसतात.
प्रामाणिक आजी देवाघरी
जाऊन देव झाली ,
न चुकता पाच वर्षांनी
मतदान करून गेली.
सदभावनेची पायमल्ली क्लेश उत्पन्न करते. सात्विकतेतून वैश्विक सुखाचा आदर्श ठेवणारी प्रतिभा घेऊन, अंतर-मंतरने आशा निराशेला सुंदररित्या उलगडले आहे. यौवन-वार्धक्यातील चढउतार स्मृतीच्या कोशात न गुंडाळता, बंडोपंतांनी विकृतीचा समाचार घेतला आहे. आधुनिकीकरणात गहाण होत चाललेली सौजन्यशीलता, विनोदातून सरळ करण्याची बंडोपंतांची हातोटी प्रत्येकाच्या आवाक्यातील नाही.
चार सुना नांदायला आल्या तेव्हा
कौतुक सासूचे फार झाले,
चौघींनी आघाडी करून पुढे
बिचाऱ्या सासूचे फार हाल केले.
मानवी कुटील बुद्धी सर्पाच्या विषापेक्षाही भारी असते. स्वार्थाच्या दिपवणाऱ्या तेजात डोळे झाकून जवळच्यांनाच डंख मारल्या जाते. संसारातील अनागोंदी टाळण्यासाठी चारोळीसंग्रह नीतिमूल्याचा साज धारण करते. निसर्गाच्या लिलेतून डोळ्यावरील झापड दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न, अंतर-मंतर मधून झालेला दिसून येतो.
क्रोधी माणसाला
धर्म कळत नाही,
सत्यवादी माणूस
धर्म पाहत नाही.
चराचरात उमगलेले सत्य, बंडोपंतांनी उत्स्फूर्तपणे चारोळीतुन व्यक्त केलेले दिसते. दहांगी वास्तवाचा दृग्गोचर अंश, कोणतीही हातराखणी न ठेवता प्रकटलेला दिसतो. अंतरातील मंतर चमत्कार नसून, अनुभवविश्वाचा साक्षात्कार आहे. दुसऱ्याचा पाय ओढत घबाड जमा करणारे ; समता साधण्याचा ढोंग रचतात, तेव्हा चारोळीतून कानपिचकी द्यायला बोढेकरांची लेखणी कचरत नाही.
गुटख्याच्या जाहिरातीतून
अभिनेत्याने प्रचंड पैसे कमावले,
अनुकरण करून फॅन्सनी
व्यसनात जीव गमावले.
गुरूंदीक्षा मिळावी म्हणून अनुग्रहासाठी कित्येक अंधभक्त तयार असतात. त्यामुळे त्यांना जन्मभर लुटणारे भोंदू , जागोजागी मिळतात. अंतर-मंतरने कर्माचा पुरस्कार करून, कष्टात समाधानाची परंपरा रुजवलेली दिसते. असत्याची कास धरून मायाजालात अडकलेला मानव सत्यात उतरावा म्हणून, चारोळीतुन कर्मवादाचे समर्थन केल्याचे स्पष्ट जाणवते. बासरीच्या सुरांनी पोटाची भूक भागत नसून, फुकणीच्या वाऱ्याने भाकर शिजते. हाच अंतर-मंतरचा गाभा. चारोळीच्या गाभाऱ्याला सजवताना, बंडोपंतांनी वापरलेल्या विविध उपमा आणि अलंकार त्यांच्या वैचारिक श्रीमंतीची साक्ष देते.
‘ये दिन बदल जायेंगे’ हे समशानातील शब्द
ज्यांनी ज्यांनी वाचले ,
गरिबांना झाली खुशी
श्रीमंतांच्या चेहऱ्यावर उदासपन साचले .
अन्नदात्या शेतकऱ्यांची नैतिकता आणि भ्रष्टाचाऱ्यांची अनैतिकता यातील फरकातून, समाधानाची पेरणी करणारा अंतर-मंतर सकारात्मकतेचा संस्कार करताना अधिक मार्गदर्शक ठरतो. वितुष्टाला शमविण्यासाठी शोधलेले निदानात्मक पेटंटच म्हणावे लागेल. निरोगी समाजनिर्मितीसाठी, माणुसकीत आलेले अंतर कमी करण्यासाठी, मानवतेचा मंतर प्रत्येक घरात वाचल्या जावा, हीच नम्र अपेक्षा ।
चारोळीसंग्रह :- अंतर-मंतर
रचनाकार :- बंडोपंत बोढेकर
प्रकाशक :- शब्दजा प्रकाशन , अमरावती
किंमत :-१७० रुपये
ग्रंथाकरीता संपर्क – ९९७५३२१६८२