कामवासना आदी विकार हे मारण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते अधिकच भडकतात. यासाठी या वासनेतूनच, त्या विकारातून यावर उपाययोजले जाऊ शकतात.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तैसे कर्मे कर्मबद्धता । मुमुक्षु सोडविले पंडुसुता ।
जैसा रसरीती मरतां । राखिला विषे ।। १६३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – अर्जुना, मारक जे विष तें रसायनरूपानें दिले असता मरत असलेल्या मनुष्याला जसें वाचवितें त्याप्रमाणें बांधणारी जी कर्मे त्या कर्मानीच मुमुक्षूंना कर्मबंधनापासून सोडविले जाते.
विषावर औषध हे विषापासूनच तयार केले जाते. सापाच्या विषावरील औषध हे त्याच्या विषापासून तयार केले जाते. विषाचा अॅन्टिजीन हा विषापासूनच तयार केला जातो. विषाणूवरील लस ही त्या विषाणूपासूनच तयार केली जाते. म्हणजेच शरीरात पसरलेल्या विषावर विषापासूनच तयार करण्यात आलेल्या औषधाने मात करता येते. विषाणूला मारणारी, त्यावर मात करणारी रोग प्रतिकार शक्ती ही विषाणूपासूनच तयार केली जाते. जे मारणारे आहे त्यापासूनच वाचवणारे औषध तयार केले जाते.
निसर्गाचा हा चमत्कार अभ्यासायला हवा. जे मारणारे आहे त्याच्यापासूनच त्याला वाचवणारे औषध हे तयार केले जाते. म्हणजेच विकारावर विकारांपासूनच उत्पन्न औषधीने, उपायांनी मात करता येते. काम, क्रोध, लोभ, वासना, द्वेष, मत्सर आदी विकारावर त्याच्यापासूनच उत्पन्न औषधीने मात करता येते. युद्धामध्येही अशाच शक्तींच्या विचारांचा वापर केला जातो. युद्धामध्ये आता दहशतवाद हे एक नवे अस्त्र आले आहे. या नव्या दहशतवादी अस्त्रावर दहशतवाद उत्पन्न करणाऱ्यांच्यापासूनच औषधी, उपाययोजना निर्माण करावी लागते. तरच हा दहशतवाद मुळासकट गाढता येतो.
तापलेल्या तव्यावर पाणी टाकले तर ते तडतडते. अॅसिडिक रसायनामध्ये पाणी किंवा अन्य द्रावण मिसळताना विशिष्ट पद्धतीचा अवलंब करावा लागतो. अन्यथा ते अॅसिड अंगावर उडण्याचा धोका असतो. याचाच अर्थ या ज्वालाग्रही विचारांची तीव्रता कमी करण्यासाठी किंवा ते नष्ट करण्यासाठी विशिष्ट पद्धतीचाच अवलंब हा करावा लागतो. विषाणूपासूनच विषाणूवरील लस तयार केली जाते तसेच काम, क्रोध, वासना, द्वेष आदी विकारावर त्यांच्यापासूनच उपाय हे तयार केले जातात.
कामवासना आदी विकार हे मारण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते अधिकच भडकतात. यासाठी या वासनेतूनच, त्या विकारातून यावर उपाययोजले जाऊ शकतात. असे म्हणतात की स्त्री मातृत्वानंतर बदलते. तिच्यातील कामवासना ही मातृत्त्वाच्या प्रेमात बदलते. मनामध्ये उत्पन्न होणारा हा बदल, मनामध्ये उत्पन्न होणारे हे मातृप्रेमच त्या कामवासनेवर मात करते. बाधक ठरणाऱ्या कर्मावर, विकारावर त्या विकारातूनच उपाय योजना करून मात करता येते. तंबाखू खाणाऱ्याला सतत तोंडात काहीतरी चघळण्याची सवय असते. या सवयीतूनच त्याचे तंबाखूचे व्यसन सोडविता येते. काही सवयींना सवयीतूनच बदलता येते. उर्जेच्या नियमाप्रमाणे उर्जा ही नष्ट करता येत नाही तर एकातून दुसऱ्यात परावर्तीत करता येते. तसेच कामवासनेच्या विकारांची उर्जा ही चांगल्या उर्जेत परावर्तीत करता येऊ शकते. वाईटावर चांगल्या वृत्तीनेच मात करता येते. वाईट मनाचे चांगल्या मनात परिवर्तन हाच विकारावर असणारा उपाय आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.