एक आशेचा किरण असा की, या वाड्याच्या वारसाच्या नवीन पिढीतील काही (मोजके का असेना) तरुण-तरुणी गावाकडे व शेतीकडे वळायला लागली असून हे ओस पडू पाहणारे, खंडहर होऊ घातलेले, भकास दिसू लागलेले काही वाडे नव्याने आपल्या पूर्व-वैभवा(?)ची अपेक्षा बाळगू लागले आहेत. .
ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902, ता.आमगांव,सजि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
चलभाष क्र. 7066968350
एक ऐतिहासिक, भौगोलिक व सांस्कृतिक वस्तुस्थिती असलेली झाडीपट्टी म्हणजे तत्कालीन सी.पी.ॲण्ड बेरार मधील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली हे संपूर्ण जिल्हे तथा नागपूर जिल्ह्यातील मौदा, रामटेक कडील भाग हा सध्याच्या महाराष्ट्रातील तर बालाघाट आणि शिवनी हे सध्याच्या मध्यप्रदेशातील जिल्हे होत. 1956 च्या एकभाषिक राज्य निर्मीतीनंतर/भाषावार प्रांतरचनेनंतर अशी विभागणी झाली असली तरी आजही ही झाडीपट्टी(पूर्व विदर्भ) ऐतिहासिक, भौगोलिक व सांस्कृतिक दृष्ट्या आपले एक आगळे वेगळे अस्तित्व टिकवून आहे.
या झाडीपट्टीचे आणखी एक वेगळेच वैशिष्ट्य म्हणजे येथील वाडे. नागपूरच्या भोसल्यांना 1750 सालच्या कटक युद्धात मदत करून विजय मिळवून दिल्याप्रित्यर्थ नगरधन (ता. रामटेक, जि. नागपूर) येथील पोवार वंशीय राजाच्या लढवय्या सरदारांना या वैनगंगा आणि वाघ नदीच्या सुपीक प्रदेशात मालगुजारी, जमीनदारी, पाटीलकी देऊन (नागपूरच्या भोसल्यांद्वारे) बसविण्यात आले, असे ऐतिहासिक दाखले मिळतात. 1751 साली नागपूरच्या भोसल्यांनी गणूजी कटरे, (जमीनदार) यांना तिरखेडी येथील जमीनदारी दिल्याची नोंद सापडते. त्याचवेळी या भागातील कामठा – आमगांव परिसरात कुणबी समाजाचे तर हिरडामाली येथील लोधी समाजाचे लढवय्ये जमीनदार/मालगुजार सुद्धा अस्तित्वात होते.
अशा या मूलतः तलवारधारक योद्ध्यांनी, इंग्रजांची सत्ता येता येता, हाती नांगर धरून हळूहळू या सुपीक जमीन असलेल्या परिसरात आपला जम बसवला. 1815 साली इंग्रजांनी सुद्धा येथील पोवार समाजातील माजी लढवय्ये सरदारांना जमीनदारी देऊन गौरविल्याचे दिसून येते. याच सुमारास पुन्हा इंग्रजांद्वारे सुद्धा तिरखेडीच्या कटरेंना जमीनदारीने गौरविण्यात आल्याचे किंवा त्यांची जमीनदारी कायम करण्यात आली असल्याचे दिसून येते. आणि त्यादृष्टीने शेतीव्यवसायासाठी आवश्यक असलेले वाडे बांधण्यास या कुणबी व पोवार समाजातील जमीनदार, मालगुजार, पाटलांनी किल्लेसदृश्य मोठ मोठे वाडे बांधण्यास सुरूवात केली. अशा या वाड्यांची ‘कूळकथा’ इतर भागातील वाड्यांपेक्षा जरा वेगळीच आहे.
या वाड्यांची संक्षिप्त कूळकथा जाणून घेण्यासाठी आपल्याला या भागातील शेकडो वाड्यांपैकी काही निवडक वाडे निवडून त्यांच्या बद्दल जाणून घेणे आवश्यक राहील. त्यादृष्टीने पाहिले असता या भागातील तिरखेडी, गोर्रे, लोहारा, महागाव, जामखारी, लावणी-फुटारा, आमगांव, वळद, फुक्कीमेटा, कामठा, बोरकन्हार, डोंगरगाव (सावली) येथील पोवार व कुणबी समाजाचे वाडे प्रामुख्याने तपासता येतात. (याशिवाय आणखी शेकडो प्रसिद्ध वाडे असून त्याबद्दल पुन्हा कधीतरी लिहावेच लागेल.)
सर्वप्रथम आपण गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा या आदिवासी व वन्यबहुल तालुक्यातील तिरखेडी येथील कटरेंच्या वाड्याबद्दल जाणून घेऊ या. तिरखेडी हे गाव मुख्य रस्त्यावर नसून एका आडवळणाच्या ठिकाणी पण सालेकसा या मुंबई–हावडा या महत्त्वाच्या रेल्वेलाईन वरील रेल्वे स्टेशन पासून जवळच, म्हणजे 3-4 किमी वर स्थित आहे. हा वाडा पाच मजली असून (होता, सध्या पडझड झाली आहे.) या वाड्याचे परिसर सुमारे 6-7 एकर आहे. या वाड्यात प्रवेश करण्यासाठी तीन विशाल दरवाजे होते. त्यापैकी एका दरवाज्याला हत्ती दरवाजा म्हटले जात असे, कारण की तिरखेडीच्या कटरे जमीनदारांकडे हत्ती पोसला होता आणि त्या हत्तीचे आवागमन या दरवाज्यातून होत असे. इंग्रजांच्या काळात युध्दप्रसंगांची पुनरावृत्ती न झाल्याने, युध्दासाठी हत्तीची गरज नव्हती. त्यामुळे नंतर हा हत्ती शोभेसाठीच जणू पोसला जात होता, असे वाटते. या हत्ती विषयीची एक मजेदार हकीकत अशी की, मागच्या पिढीतील जमीनदार झुम्मकलालजी कटरे यांचे लग्न 1943-44 च्या दरम्यान बालाघाट येथील पोवार समाजातील एकमात्र रायबहादूर आणि सेवानिवृत्त डेप्युटी डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर (तत्कालीन छत्तीसगढ संभाग) टूंडीलाल पोवार तुरकर यांच्या ज्येष्ठ कन्येशी झाले. तेव्हा तिरखेडीतून निघालेल्या वरातीमध्ये नवरदेव – झुम्मकलालजी हे हत्तीवर बसून गेले होते.
अशा या ऐतिहासिक कथांना स्थान आणि थारा देणारा वाडा पाच मजली होता. एका मजल्यावर संभावित हमल्याला तोंड देण्यासाठी बंदुकधारी पहारेकरी (सैनिक) यांच्यासाठी व्यवस्था होती. खालच्या मजल्यात कचेरी(!) होती. शिवाय एक तळघर असून त्यात “संपत्ती” ठेवली/साठवली जात असे. या वाड्याच्या भिंती मातीच्या असून पायव्याच्या ठिकाणी ह्या भिंतींची जाडी पाच फूटापर्यंत होती. ही जाडी वरच्या मजल्यावर दोन फूटापर्यंत कमी झाली असली तरी आजच्या तुलनेत अविश्वसनीय वाटावी इतकी होतीच. आज ह्या वाड्याची पडझड झाली असली तरी जुन्या वैभवाच्या खाणाखुणा मात्र सहज ओळखता येतील. या वाड्याच्या सर्व मजल्यांची व तेथील खोल्यांची झाडफूक रोजच्या रोज होत नसल्याने “आमच्या वाड्यात न झाडलेल्या गुह्य(?) जागा सुद्धा असतात” असा भलताच तोरा(!) सुद्धा मिरविला जात असे.
असेच काही वाडे गोंदिया जिल्ह्यातील आमगांव तालुक्यातील बोरकन्हार या गावातही आहेत. या गावातील वाडे व एकमात्र हवेली या तिरखेडीच्या वाड्यासारखे भव्य नसले तरी झाडीपट्टीतील वाडा-संस्कृतीचे रूप समजून घेण्यासाठी मात्र साह्यभूत ठरणारेच आहेत. या गावातील दिवंगत पोलिस पाटील मोहनलाल कटरे यांचा वाडा सुमारे अर्धा-पाऊण एकराच्या परिसरात स्थित आहे. हा वाडा गावाच्या अगदी मध्यभागी असला तरी गावापासून अगदी अलिप्त वाटावा अशी त्याची ठेवण आहे. गावातील एक गल्ली या वाड्यात जाऊनच संपत असल्याने पहिल्यांदा या वाड्यात प्रवेश करणा-यांना आश्चर्याचा धक्काच बसत असल्याचे ते सांगतात. या वाड्याच्या माजघरात धान साठवण्यासाठी असलेल्या ढोलीच्या भिंती मातीच्या असून फक्त चारेक इंच जाडीच्या होत्या. माजघराच्या नूतनीकरणाचे वेळी ह्या ढोल्या तोडताना तीन-चार कुदाळी आणि तीन-चार सब्बली वाकल्या होत्या. भिंती तोडणारे मजूर परेशान होऊन गेले होते. इतक्या त्या फक्त चारेक इंच जाडीच्या मातीच्या भिंती मजबूत होत्या. त्या भिंती उभारताना मातीमध्ये काय मिसळण्यात आले होते, हे कोडे मात्र अजूनही सुटलेले नाही. अशा या वाड्याच्या भिंती सुद्धा तीन फूट रूंद असून मातीच्याच आहेत.
भर उन्हाळ्यातही या वाड्याच्या माजघरात उष्णतेची तीव्रता फारशी जाणवत नाही. आणि हिवाळ्यात एखादा साधा कंबल पांघरुण झोपणे, थंडीपासून बचावासाठी पुरेसे असते. हा वाडा सुद्धा तीन मजली असून वरच्या मजल्याची साफसफाई वर्षातून एकदाच, दिवाळीच्या दिवसातच, केली जात असे. आणि ही बाब गौरवा(?)ची मानली जात असे की, आमचा वाडा एवढा मोठा आणि प्रशस्त आहे की त्याच्या संपूर्ण भागाची साफसफाई सुद्धा करणे कठीण(!) असते. या वाड्यात प्रवेश करण्यासाठी दोन विशाल लाकडी दरवाजे असून या दरवाज्यांमुळे या वाड्याला एखाद्या किल्ल्याचे दर्शनी रूप प्राप्त झाले आहे. या वाड्यातील जोडणी (छत आणि खांबासह) इतकी नाविन्यपूर्ण आणि कल्पक, नाजूक कलाकुसरीची आहे की त्या काळच्या सुतार-लोहारांच्या या कला-निपुणतेपुढे कोणीही नतमस्तक व्हावा. (या वाड्याचे आणि जोडणीचे चित्रीकरण मूळचे बेळगाव (कर्नाटक) येथील संशोधक सुबोध कुलकर्णी यांनी केले आहे.)
याच गावात एक जुनी हवेली असून आज त्या हवेलीच्या मालकांची संख्या दहा पर्यंत पोचली असली तरी हवेलीचा “बाल बाका” झालेला नाही. या गावातून जाणा-या गोंदिया – देवरी या राज्य महामार्गावरून सुद्धा जाणा-या येणा-यांना या हवेलीचे दर्शन होत असल्याने “हवेलीवाला गाव” असे एक टोपण नाव सुद्धा या गावाला दिले गेले आहे.
याच गोंदिया-देवरी राज्य महामार्गावरील डोंगरगाव (सावली) येथील डोये (कुणबी) पाटील यांचा वाडा आपली ऐतिहासिक भूमिका वठवत आपले क्षरित अस्तित्व सांभाळून उभा आहे. गेल्या वर्षी आलेल्या चक्रीवादळाने या वाड्याच्या सौंदर्याला व भव्यतेला काहीसे डागाळले असले तरी “आखिर हम भी कभी जवान थे” असे हा वाडा पाहणा-यांना बजावून जातो. या वाड्याच्या चुलत परिवारातील एका सुविद्य मालकिणीने एकेकाळी (1964-70) तत्कालीन भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात आपला यशस्वी ठसा सुद्धा उमटवला होता. या वाड्याच्या आजच्या मालकांपैकी एक सुप्रसिद्ध काष्ठशिल्पज्ञ कलावंत असून त्यांच्या काष्ठकलाकृती देशविदेशात नावाजल्या गेल्या आहेत. आमगांव चा एक सिनेकलावंत हर्षज आणि त्याच्या सहका-यांनी निर्मिलेल्या, लघुचित्रपट (Short Film) “दारवठा”चे चित्रीकरण या डोये वाड्यातच झाले आहे. अशाप्रकारे हा वाडा यू-ट्यूब च्या माध्यमातून जगभरच्या रसिकांना अनुभवता(!) आला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आमगांव तालुक्यातीलच जामखारी येथील भव्य वाडा सुद्धा अजूनही आपले अस्तित्व चांगल्या प्रकारे टिकवून आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील तत्कालीन जमीनदार कटरे(देशमुख) यांच्या परिवारातील एक व्यक्ती विठोबा हे 1870 च्या सुमारास जामखारी येथे स्थलांतरित झाले आणि आमगांव येथील कुणबी जमीनदार बहेकार यांच्या सक्रिय साथीने जामखारी येथे स्थायिक झाले. त्यावेळी “या” भागात प्रशासनाच्या दृष्टीने असलेली पोकळी लक्षात घेता या विठोबा कटरे पाटील यांना “या” भागात आपला जम बसविणे सुकरच ठरले व आमगांवच्या बहेकार जमीनदारांच्या छत्रछायेत त्यांना शेकडो एकर जंगल व शेकडो एकर शेतीचा मालक होण्याचा त्यांचा मार्ग प्रशस्तच झाला. त्यांनी बांधलेला वाडा आजही सुस्थितीत असून त्याचा परिसर सुमारे पाच एकरात पसरलेला आहे. हा वाडा सुद्धा तीन मजली असून या वाड्यातील दरवाज्यांवरील बारीक व नाजुक कलाकुसर मनमोहक आहे. या वाड्याची जोडणी विशेष आकर्षक व विशेष कलाकुसरीने समृद्ध नसली तरी तिची साधी-सोपी मांडणी व उभारणी नयनरम्य खासच आहे.
या वाड्याशी संबंधित एक कथा अशी की, विठोबा पाटलांनी जामखारीत जम बसवला तेव्हा या गावात शेतीसाठी पाणीपुरवठा करणारे तलाव मात्र नव्हते. म्हणून त्यांनी तलावाचे खोदकाम व बांधकाम सुरू केले असता तिथे जमीनीत गाडलेली एक मध्यम आकाराची हनुमान-मूर्ती आढळून आली. ही मूर्ती आमगांवच्या बहेकार जमीनदारांच्या मूळच्या मालकीच्या जमिनीत सापडल्याने तत्कालीन प्रथेप्रमाणे बहेकारांनी आमगांव येथे नेऊन स्थापित करावी असा सूर निघाला. पण कोणत्यातरी अनाकलनीय कारणांमुळे पुढील काही वर्षे ती मूर्ती तलावाच्या पाळीवरच पूजली जात होती. अखेर विठोबा पाटील यांच्या मुलाने दयाराम पाटलाने तलावाच्या पाळीवरच मंदिर बांधून तिथे त्या हनुमान-मूर्तीची प्रतिष्ठापना केली. आजही ती मूर्ती व मंदिर या भागात सुप्रसिद्ध असून दर मंगळवारी व शनिवारी तेथे भक्तांची रीघ असते.
गोंदिया जिल्ह्यातील आमगांव तालुक्यातीलच आमगांव ते देवरी या राज्य महामार्गावरीलच एक गाव अंजोरा येथील जमीनदार बहेकार यांचा विस्तीर्ण वाडा सुद्धा आपले काहीसे भंग पावलेले वैभव दाखवत उभा आहे. वाड्याच्या काही भागाची स्वाभाविक अशी कालभूत पडझड झाली असली तरी आजही उरलेल्या हवेल्या आणि इमारत पाहून त्या वाड्याच्या एकेकाळच्या वैभवशाली इतिहासाची सहज ओळख पटू शकते. हा वाडा कोणी बांधला याबाबत सध्याच्या पिढीतील प्रकाशभाऊ बहेकार आणि रमेश(छोटू)भाऊ बहेकार यांना कल्पना नसल्याने या वाड्याचे निश्चित असे बांधकाम वर्ष कळू शकले नसले तरी आमगांव येथील जमीनदार मार्तण्डराव बहेकार यांचे वडील बंधू माधवराव यांच्या कारकिर्दीत/हयातीत हा वाडा बांधण्यात आला असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. आणि जामखारीच्या वाड्याच्या वर्णनात असे आढळून आले आहे की, जामखारीच्या कटरे परिवाराला आमगांवचे जमीनदार मार्तण्डराव बहेकार यांनी 1870 मध्ये जामखारी येथे वसवले. त्यावरून हा वाडा 1870 च्या आसपास/दरम्यान बांधला गेला असावा असा कयास करता येतो. या वाड्याच्या भिंती सुद्धा चार-पाच फूट रूंदीच्या असल्याने अजूनही आपली मजबूती सक्षमपणे टिकवून आहेत. या वाड्याचा परिसर सुमारे पाच एकराचा असून वाड्याचे स्थान गावालगतच पण गावाबाहेर असे आहे. वाड्याच्या प्रवेशद्वारावरच द्वाराच्या दोन्ही बाजूला कचेरी सदृश्य ओसरी आहे. वाड्यात प्रवेश केल्यावर मोठ्या विस्तीर्ण अंगणातून सुमारे शे-दिडशे पावले चालल्यावर वाड्याच्या मुख्य इमारतीचे/हवेलीचे नयनरम्य दर्शन होते. आजच्या परिस्थितीत सुद्धा या इमारतीच्या/हवेलीच्या पूर्वश्रीमंतीचा सहज अंदाज बांधता येतो. या वाड्याच्या एका मुख्य इमारतीचे एक अंतर्द्वार अद्भुत अशा नाजूक आणि मोहक कलाकुसरीने समृद्ध आहे. जोडणी सुद्धा अजूनही आपले दमदार अस्तित्व टिकवून आहे. या इमारतीचे छत वादळ वा-यामुळे थोडेसे विस्कळीत झाले असले तरी या कलाकुसरीने समृद्ध अंतर्द्वाराचे आणि मजबूत जोडणीचे दर्शन मात्र, पाहणा-याला या वाड्याच्या पूर्ववैभवाचा व वाड्याच्या तत्कालीन मालकाच्या सौंदर्यदृष्टीचा इतिहास स्पष्ट करून जाते व पाहणारा त्यापुढे अकस्मात नतमस्तक होऊन जातो. या वाड्याच्या मालकांचा संक्षिप्त परिचय असा की, माधवराव –>> मल्हारराव –>> भोलानाथ आणि भोलानाथ यांचे चार पुत्र –>> अनुक्रमे प्रकाश – रमेश(छोटू भाऊ) — सुरेश आणि जगदीश. हे चारही बंधू वर्तमान पिढीचे शिलेदार/वारसदार आहेत. असा हा ऐतिहासिक स्वरूपाचा वाडा अंजोरा गावचे वैभवच मानला जातो.
या झाडीपट्टीतील वाड्यांचे एक मोठे पण दुर्लक्षित वैशिष्ट्य म्हणजे हे वाडे सुमारे 7 एकरापर्यंत परिसर व्यापून असले व वाड्यांचे बांधकाम सुमारे 35 ते 50 टक्के भागात/जागेतच असले तरी उर्वरित भाग/जागा ही रिकामी/मोकळी/वैराण/पडीक नसते. या जागेत विविध प्रकारची, प्रत्येक ऋतुत फळे मिळू शकतील अशी फळझाडे, विविध प्रकारची फुलझाडे आणि बाराही महिने घरचा भाजीपाला उपलब्ध होईल अशी परसबाग “उभारलेली” असते. त्यामुळे या वाड्यांचा भव्य परिसर भकास वा उजाड न वाटता मोहकच वाटतो. आजकाल ग्रामीण भागात मजूर उपलब्ध होत नसून या वाड्यातील बहुसंख्य नवीन पिढी उत्पन्नाच्या विविध उपक्रमात सामील होण्यासाठी/होऊन शहर/नगरवासी झाल्याने/होऊ लागल्याने काही वाडे आता खंडहर होत असून भकास सुद्धा होत आहेत. यातही एक आशेचा किरण असा की, या वाड्याच्या वारसाच्या नवीन पिढीतील काही (मोजके का असेना) तरुण-तरुणी गावाकडे व शेतीकडे वळायला लागली असून हे ओस पडू पाहणारे, खंडहर होऊ घातलेले, भकास दिसू लागलेले काही वाडे नव्याने आपल्या पूर्व-वैभवा(?)ची अपेक्षा बाळगू लागले आहेत.