विलास माळींच्या कवितेला करंबळीच्या मातीचा वास – डॉ. राजन गवस
गडहिंग्लज – ‘करंबळी या गावानं अनेक कलावंतांना जन्म दिला असून विलास माळी यांची कविता या मातीची भाषा गुणवैशिष्ट्ये घेऊन जन्माला आली आहे. त्याची कविता उत्तरोत्तर गुणवत्ती होत गेली आहे. ती अधिक परिपक्व झाली आहे. हा या मातीचा अभिमान आहे. इथे मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया या योग्य आहेत, असे प्रतिपादन साहित्य अकादमी प्राप्त कवी डॉ. राजन गवस यांनी केले. ते करंबळीचे कवी विलास माळी यांच्या’ झांझरझाप’ या चौथ्या कविता- संग्रहाच्या प्रकाशन समारंभी बोलत होते.
गडहिंग्लज येथील डॉ. धाळी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे संचालक अँड. विकास अण्णा पाटील होते. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक प्रवीण बांदेकर, लेखक, संपादक कवी, चित्रकार मंगेश नारायणराव काळे, प्राचार्य गोविंद काजरेकर, कवी एकनाथ पाटील, भीमराव धुळूबुळू, दि. बा. पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. गोविंद काजरेकर म्हणाले, ” कविता कविचे चरित्र असते. विलासच्या कवितेतून त्याचे चरित्र दिसते. या कवितेतून कवीच्या मनाची घुसभर व्यक्त होते. भवतालच्या काळोखात तगून जगण्याची इच्छा प्रत्येक कवितेतून जाणवते’
प्रवीण बांदेकर म्हणाले, कविता या जीवघेण्या प्रकारात हा कवी गेली ४० वर्षे कसा काय गुंतून पडतो असा प्रश्न पडतो. ही बाब सोपी नाही, आपल्याला को सांगायचं ते स्पष्ट आणि रोखठोक असा सकारात्मक भाव या कवीकडे आहे. यातील बऱ्याच कविता एकाच सूत्रात बांधल्या आहेत. या संग्रहातून अतिशय उत्तम कविता मराठीला मिळाली आहे.
मंगेश काळे म्हणाले,’ गावाकडची कविता अस्सल असते अशी विलास माळींची कविता आहे. कोणत्याही प्रयोग प्रतिमांच्या आहारी न जाता ती थेट आपल्य बोलले, जगण्याच्या दाहक वास्तवासमारे नेऊन उभे करते. या कवितेतून खूप नवे शब्द मराठी भाषेला दिले आहेत. त्यासाठी त्या मातीतले संस्कार, तिथली भाषा तिचा बाज कविने जपला आहे. ही कविता अधिक परिपक्व आणि भवतालाचे भान जपणारी आहे”
प्रारंभी श्री. विलास माळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ” गेल्या १०-१२ वर्षात आपल्या आयुष्यात ‘झालेल्या पडझडी, भोवती घडणाऱ्या घडामोडी संवेदनशील मनाने या कवितांतून मांडल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. पी. डी. पाटील यांनी स्वागत केले. आभार प्रा. सुभाष कोरे यांनी मानले. सूत्रसंचालन नामदेव यादव यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सुरेश पवार, प्रा. डॉ. निलेश शेळके, अनंत पाटील, तानाची चौगुले आदींनी केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.