मानवतेचा विचार हिंदवी संस्कृतीत असल्यानेच येथे अन्य संप्रदायही उभे राहीले अन् त्यांनीही या मानवतेच्या विचारांचा स्वीकार केला. मानवाचा जन्म कशासाठी सांगणारा हा धर्म असल्याने याचा स्वीकार केला गेला.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
तैसा श्री गुरु प्रसन्नु होये । शिष्यविद्याही कीर साहे ।
परी ते फळे संप्रदाये । उपासिलीया ।। १४८४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – त्याप्रमाणे श्री गुरू प्रसन्न होतील व शिष्याला खरोखर विद्याही प्राप्त होईल. परंतु त्या विद्येचे संप्रदायाप्रमाणे अनुष्ठान केले तरच ती फलद्रुप होईल.
श्री गुरुकृपेच्या अनुभुतीतून आत्मज्ञान प्राप्ती होते. पण या आत्मज्ञानाचे, विद्येचे अनुष्ठान हे संप्रदायाप्रमाणे करणे आवश्यक आहे. तरच त्याची योग्य फलप्राप्ती होते. यासाठीच संप्रदायाचा अभ्यास हा करायला हवा. गुरू-शिष्य परंपरा ही अनादी कालापासून आहे. पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या या परंपरेच्या भारत भुमीत अनेक शाखा उत्पन्न झालेल्या आहेत. यातूनच विविध धर्म, संप्रदायही अस्तित्वात आले आहेत. या भारत भूमीत बाहेरच्याही संप्रदायांनी, धर्मांनी आपले अस्तित्व स्थापन केले आहे. हिंदूंच्या विविध परंपरा बरोबरच येथे जैन, बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम, शिख अशा विविध जाती-धर्माच्या परंपरानीही आपले पाय घट्ट रोवले आहेत. कारण भारत भूमीतील परंपरा या मानवाच्या कल्याणाच्या परंपरा आहेत. मानवधर्माच्या पुरस्कार करणाऱ्या आहेत.
मानवतेचा विचार हिंदवी संस्कृतीत असल्यानेच येथे अन्य संप्रदायही उभे राहीले अन् त्यांनीही या मानवतेच्या विचारांचा स्वीकार केला. मानवाचा जन्म कशासाठी सांगणारा हा धर्म असल्याने याचा स्वीकार केला गेला. भारत भूमीत आलेल्या अनेक धर्माच्या साधना, उपासना या वेगळ्या आहेत पण विचार मानवतेचा आहे. मानवाच्या कल्याणाचा आहे. मानवाला त्याचे महत्त्व समजावून सांगणारा आहे. जागा करणारा आहे. गुरु-शिष्य पंरपरेतील हे ज्ञान याचमुळे पिढ्यानपिढ्या पुढे चालत आले आहे अन् ते पुढेही चालत राहाणार आहे. चंद्र, सूर्याचे अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत ते असेच विकसित होत राहाणार आहे.
ज्ञानेश्वरांची परंपरा ही नाथसंप्रदायाची परंपरा आहे. परमपूज्य बाबा महाराज आर्वीकर यांच्या मते नाथसंप्रदायाच्या उपासना पद्धतीमध्ये तीन देवतांना स्थान आहे. पहिली देवता गुरू ही सकल कल्याण देणारी देवता आहे. दुसरी शिव ही ज्ञानाची अधिष्ठात्री देवता तर तिसरी कृष्ण ही पूर्णानुभूतीचा मंगल अविष्कार असणारी देवता आहे. याचाच अर्थ शक्ती, शिव व प्रेम या त्रिविध देवतांच्या सान्निध्यात नाथसंप्रदायी उपासक हे उपासना करतात. त्यांचे सकल जीवन हे या देवतांच्या आश्रयानेच असते.
शक्तीदेवतेपासून ते सिद्ध, शुद्ध व बुद्ध होतात. स्वस्वरुप होतात. या शक्तीरुप गुरुपासून त्यांना ही तिन्ही पदे प्राप्त होतात. त्यामुळेच सामर्थ्यसंपन्न, ज्ञाननिष्ठ व प्रेमरूप असे त्यांचे जीवन असते. त्यांची दशा योग, ज्ञान व प्रेम या त्रिविध अनुभवाने समृद्ध असते. त्यांचा जीवनविहार भक्तिमय असतो आणि भक्ती, शक्तिरुप, शक्ति शिवरुप, ज्ञानरुप अशी असते. असा हा संप्रदायाचा भक्ती सिद्धांत समजून घेऊन अधिष्ठान, उपासना करायला हवी. तरच त्याचे उचित फल प्राप्त होईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.