December 5, 2024
Kurul Veerappan ancestral farm Indrajeet Bhalerao article
Home » कुरुल : वीरप्पनच्या पूर्वजांची शेती
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कुरुल : वीरप्पनच्या पूर्वजांची शेती

या लेखाला मी जे शिर्षक दिलेलं आहे त्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले असतील की, खतरनाक डाकू वीरप्पनच्या पूर्वजाची शेती, असं शिर्षक मी का दिल ? त्याचं कारण आहे की, कुरुल ग्रंथ लिहिणारा संत तिरुवल्लूवर हा वीरप्पनच्या जातीतला होता. वीरप्पनने जेव्हा राजकुमार या लोकप्रिय नटाला जंगलात नेऊन ठेवलं आणि त्या बदल्यात काही गोष्टींची मागणी केली, त्यातली एक मागणी अशी होती की, या नटाला सोडण्याच्या बदल्यात माझी तुम्हाला विनंती आहे की, संत तिरुवल्लूवर यांचा पुतळा तीन राज्यांच्या सीमेवर इतका ऊंच उभा करा की शंभर शंभर किलोमीटर दुरून तो दिसला पाहिजे.

इंद्रजीत भालेराव

॥ कुरुल : वीरप्पनच्या पूर्वजांची शेती ॥

मागच्या लेखात आपण मध्यभारतात दोन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या शेतीविषयक धारणा ‘गाथा सप्तशती’ या हाल सातवाहनाच्या ग्रंथाच्या आधारे समजून घेतल्या. आता आपण आणखी थोडं खाली म्हणजे देशाच्या दक्षिण भागात जाणार आहोत. काळ साधारणतः तोच म्हणजे दोन हजार वर्षांपूर्वीचाच आहे. आता हळूहळू भारतीय समाज प्राकृत भाषांकडून प्रादेशिक भाषांकडे प्रवास करतो आहे. संस्कृत सोबतच आता प्राकृत भाषाही मागे पडत आहेत आणि प्रादेशिक भाषांचं युग सुरू होत आहे. तमिळ, कन्नड, तेलगू आणि मल्याळम या दक्षिण भारतातल्या चार भाषा द्रविड कुळातल्या भाषा म्हणून ओळखल्या जातात. त्यातही तमिळ भाषा अतिशय प्राचीन आहे. इसवी सनाच्या चौथ्या पाचव्या शतकापासून लिहिलेली शैव व वैष्णव संतांची तमिळ काव्ये आजही उपलब्ध आहेत. तिकडच्या शैव संतांना नायनार तर वैष्णव संतांना अळवार असे म्हटले जाई. त्यातलेच तिरुवल्लूवर हे शैव संत होते. त्यांनी लिहिलेल्या कुरुल या ग्रंथातील शेती आपण प्रतिनिधिक रूपात पाहणार आहोत.

दक्षिण भारतातला तमिळ समाज इसवी सनापूर्वी दोनशे वर्षे आधीच प्रस्थापित स्वरूपात अस्तित्वात आलेला होता. तत्कालीन ‘तुल का नियम’ या तमिळ ग्रंथात सुपीक मैदानी प्रदेशातील, डोंगराळ भागातील, तसेच समुद्रकिनाऱ्यावरील वाळवंटी प्रदेशाची वर्णने आहेत. त्या काळात निर्माण झालेले संगम साहित्य वाचले की आपणाला कल्पना येते की, विघटित असलेला तमिळ समाज सुसंघटित कसा होत गेला. विणकर कनिष्ठ जातील जन्माला आलेल्या संत तिरुवल्लुवर यांनी लिहिलेला तिरुक्कुरल ग्रंथ तर तमिळ वेद म्हणूनच समजला जातो. तिरुवल्लूवर हे या ग्रंथाचे कर्ते कवी हे सध्याच्या मद्रासचे उपनगर असलेल्या मैलापुर येथे राहत असत. त्यांनी रचलेला हा ग्रंथ वाचताना असं लक्षात येतं की, त्यांचा जैन आणि हिंदू धर्मग्रंथांचा चांगलाच अभ्यास असला पाहिजे.

कुरल या ग्रंथात २६६० ओळी म्हणजे १३३० श्लोक आहेत. या ग्रंथाचा प्रत्येक भाग १० श्लोकांचा आहे. म्हणजे हा ग्रंथ १३३ भागांचा आहे. हा ग्रंथ म्हणजे मनावर ठसा उमटवतील अशा नीतीवचनांचं संकलनच आहे. त्यात सर्वसामान्य संसारी माणसापासून सन्याशापर्यंत आणि गोरगरिबांपासून राजेराजवाड्यांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरतील अशा वचनांचा समावेश आहे. या ग्रंथात अध्यात्मापेक्षा वैयक्तिक जीवनाची प्रगती व सामाजिक सुसंवादावर भर दिलेला आहे. प्रेमाच्या आणि न्यायाच्या मार्गाने जाणाराच्या आयुष्याचं कल्याण होतं, असा एकूण या ग्रंथाचा सार आहे. यात कुठलेही अध्यात्मिक औडंबर नाही. यातलाच एक भाग शेतकऱ्यांविषयीदेखील आहे. त्याविषयी आपण आता थोडक्यात पाहूयात.

तुरुवल्लूवर म्हणतात,

१.

इकडं तिकडं भटकल्याने
काय मिळणार आहे ?
त्यापेक्षा नांगरामागे फिरा
कारण ते पवित्र आणि श्रेष्ठ काम आहे

२.

शेतकरी हा समाजाचा
सर्वात महत्त्वाचा घटक आहे
कारण जे शेती करत नाहीत
पण इतर महत्त्वाची कामं करतात
आणि ज्यांच्याजवळ शेतीच नाही
त्या सगळ्यांना जगवण्याचं काम
शेतीच करीत असते

३.

सर्व इच्छांचा त्याग करून
निरीच्छ झालेल्या साधुसंतांनाही
भोजन केल्याशिवाय
आपली साधना करता येत नाही
आणि भोजनाची अवस्था
शेतकऱ्यांशिवाय
कोणीच करू शकत नाही

४.

पावसाअभावी
ज्याची शेती नष्ट झाली
त्यांच्याकडं राजानं
ते इतर कुणा राजाला
शरण जाण्याआधी
लक्ष दिलं पाहिजे

५.

जे स्वतः कमावलेली भाकरी
उदार अंतःकरणानं
भुकेलेल्यांना देतात
त्या शेतकऱ्यांकडं
एकदा काळजीपूर्वक पहा

६.

जे शेतकरी शेतात न जाता
घरीच बसून राहतात
त्यांचं शेत बायकोसारखं
त्यांना सोडून जातं

७.

ही जमीन नेहमीच
त्यांना हसत असते
जे शेतात काम न करता
आपल्या भुकेचे भांडवल करतात

असे शेती विषयक कितीतरी मौलिक विचार कुरूल या ग्रंथात सापडतात.

या लेखाला मी जे शिर्षक दिलेलं आहे त्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले असतील की, खतरनाक डाकू वीरप्पनच्या पूर्वजाची शेती, असं शिर्षक मी का दिल ? त्याचं कारण आहे की, कुरुल ग्रंथ लिहिणारा संत तिरुवल्लूवर हा वीरप्पनच्या जातीतला होता. वीरप्पनने जेव्हा राजकुमार या लोकप्रिय नटाला जंगलात नेऊन ठेवलं आणि त्या बदल्यात काही गोष्टींची मागणी केली, त्यातली एक मागणी इतकी चांगली होती की, आपल्या भद्रा समाजालाही तशी कल्पना कधी सुचली नाही. अभद्र समजल्या जाणाऱ्या वीरप्पनला मात्र ती कल्पना सुचली. त्यानं असं सांगितलं की, या नटाला सोडण्याच्या बदल्यात माझी तुम्हाला विनंती आहे की, संत तिरुवल्लूवर यांचा पुतळा तीन राज्यांच्या सीमेवर इतका ऊंच उभा करा की शंभर शंभर किलोमीटर दुरून तो दिसला पाहिजे. ही मागणी त्याने राजकुमारला सोडण्याच्या बदल्यात केलेली होती. सध्या कन्याकुमारीला जाणाऱ्या बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की, विवेकानंदांच्या पुतळ्याच्या बाजूलाच हा दाढीवाला एवढा मोठा ऋषी कोण ? तर तो दुसरा तिसरा कोणी नसून तमिळ वेद लिहिणारा संत तिरुवल्लूवर यांचाच पुतळा आहे. म्हणून या लेखाला मी वीरप्पनच्या पूर्वजांची शेती, असं नाव दिलं.

अशा संत तिरुवल्लुवर यांचा आणि त्यांनी लिहिलेल्या कुरुल या ग्रंथाचा परिचय साने गुरुजी यांनी पाऊणशे वर्षांपूर्वीच मराठी माणसांना करून दिलेला आहे. साने गुरुजींनी समग्र कुरूलचा मराठी अनुवाद केलेला असून त्याला चाळीस पानांची प्रस्तावना लिहिलेली आहे. त्या प्रस्तावनेत तामिळनाडू प्रदेश, तिथली भाषा, तिचा इतिहास, संत तिरुवल्लूवर यांचे चरित्र आणि कुरुल ग्रंथाचा अनुवाद अशा स्वरूपात हे लेखन साने गुरुजींनी केलेलं आहे. त्यामुळे संत तिरुवलवर यांच्याइतकंच आपण साने गुरुजींचंही ऋण असायला हवं.

संदर्भ :
१. भारतीय समाज – शामचरण दुबे, अनुवाद – प्रकाश देशपांडे केजकर, नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया, दिल्ली (२०१३)
२. प्राचीन भारत : इतिहास आणि संस्कृती – डॉ. गो. बं. देगलूरकर, अपरांत प्रकाशन, पुणे (२०२२)
३. कुरूल – अनुवाद – साने गुरुजी, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे (१९७८)
४. तिफनसाज – इंद्रजीत भालेराव, मनोविकास प्रकाशन, पुणे (२००८)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading