October 6, 2024
Home » Privacy Policy » गावठी कडवा संवर्धनाची गरज
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गावठी कडवा संवर्धनाची गरज

संगमेश्वरी कडव्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. साखरेचे प्रमाण कमी असल्याने डायबेटिक्स रुग्णांना उपयुक्त असे हे खाद्य आहे. पारंपारिक वाणामध्ये औषधी गुणधर्म आहेत. यामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण अधिक आहे. अशा या पारंपारिक बियाण्यांच्या संवर्धनासाठी नव्या पिढीकडून प्रयत्न होण्याची गरज आहे. अभिजित हेगशेट्ये यांनी त्यांच्या शेतात या हे पारंपारिक बियाणे जोपासले आहे. याबद्दल त्यांनी मांडलेले मनोगत..

माझे वडील भाई यांनी १९६९ साली ऐन तारुण्यात मुंबई सोडून गावाला शेती करण्याचा निर्णय घेतला, ऊस, बटाटा, भेंडी, वांगी, कलिंगड, वटाणा आदी विविध पिकांचे प्रयोग केले. त्यातील आईच्या आग्रहाने सुरु केलेली २० वर्षांपूर्वीची कडवा लागवड आजही तितकीच ताजी आहे. आई आता ८५ वर्षाची इनिंग खेळत आहे. मात्र आजही शेतातील कडव्याच्या पालनपोषणावर तिची करडी नजर असते.

अभिजित हेगशेट्ये

कडवा हे आमच्या शेतातील गेल्या २० वर्षातील खात्रीने नफा कमवून देणारे पीक. संगमेश्वरी कडवा (वाल) या कडधान्याचे खास वैशिष्टय आहे. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा असीम तुरट चवीत. या कडव्याची उसळ, बिरडे, आमटी एकदा का जीभेने आस्वादले की त्याची चव वर्षानुवर्षे श्रावणात हटकून येणारच. त्यातही माझ्या आईच्या हातचे कडव्याचे बिरडे … आ.. हा….हा… त्याची चव तर जगातल्या कोणत्याच स्वयंपाकघरात नाही, असे मला खात्रीने वाटत रहाते.

पारंपारिक बियाण्यांची चवच न्यारी

संगमेश्वरी गावठी कडवा ( पारंपारीक अनेक पिढ्यांकडून दुसऱ्या पिढीकडे जपलेले बियाणे) याची लज्जत तर आणखीनच वेगळी मानली जाते. संगमेश्वर हा सोनवी, शास्त्री या नद्यांच्या संगमावरील आणि जयगड खाडीच्या मुखावरील खाडी पट्टा, या दोन नद्यांचे गोड पाणी आणि जयगड कडून येणाऱ्या अरबी समुद्रातील खारे पाणी या संगमापर्यत येईपर्यत अधिकच मचूळ झालेले, ते या गोड पाण्यात मिसळल्यावर संगमेश्वरी पाण्याची चवच अशी काही अनवट काहीशी तुरट वैशिष्ट्यपूर्ण होते. ही सारी चव या पाण्यातून येथील शेतीत, पिकात आणि अगदी मानवी जिवनाच्या रंधा रंधात उतरते. त्यामुळेच संगमेश्वरी कडवा (वाल) हे रसायनच वेगळे त्याची चव वेगळी आणि ह्या कडव्याची उसळ, आमटी आणि बिरडं याची अफलातून रसोत्कटता एकदा का जिव्हाग्रांना स्पर्शुन गेली की यासम हाच स्वर्गीय आनंदाची झींगच अगदी कोंबडीच्या रस्यासारखीच. खास शाकाहारी खवैंयासाठी स्पेशल. कडू, गोड, आंबट, तिखट, खारट हे प्रामुख्याने चवीचे प्रकार मानले जातात यांत एक खास भर टाकली जाते ती तुरट चवीची आणि याचे श्रेय संगमेश्वरी कडव्याचे . खास संगमेश्वरी चवीचेही.

नव्या पिढीकडून संवर्धनाची अपेक्षा

माझे वडील भाई यांनी १९६९ साली ऐन तारुण्यात मुंबई सोडून गावाला शेती करण्याचा निर्णय घेतला, ऊस, बटाटा, भेंडी, वांगी, कलिंगड, वटाणा आदी विविध पिकांचे प्रयोग केले. त्यातील आईच्या आग्रहाने सुरु केलेली २० वर्षांपूर्वीची कडवा लागवड आजही तितकीच ताजी आहे. आई आता ८५ वर्षाची इनिंग खेळत आहे. मात्र आजही शेतातील कडव्याच्या पालनपोषणावर तिची करडी नजर असते. आमच्या येथे पिकणार्या कडव्याचे आणि त्याच्या चविष्ट रेसीपीची (आईच्या हातच्या) चव इतकी काही नातेवाईक मित्रपरिवारात लौकीकपात्र झाली आहे की, शेतीतला कडवा पीक हाती येण्यापुर्वीच त्याची मागणी नोंदलेली असते. अगदी अमेरिका , मुंबई, पुणे, रत्नागिरी. चिपळूण येथून मागणी असते. त्यामुळे किमान दीडशे किलो तरी कडवा पिकलाच पाहिजे हे बंधन सध्या माझ्यावर असते. ह्यावर्षी बदलते हवामान ऐन जानेवारीत पडणारा पाऊस या वातावरणातही कडव्याचा बहरला मळा पाहतांना या मागण्या पुर्ण करण्याची खात्री वाटते आहे. मात्र संगमेश्वरी कडव्याची लागवड या पट्ट्यात अधिक तरुण शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading