June 6, 2023
Advice to Farmer through poem by Kantilal Sakala Aurangabad
Home » फक्त पोटापूरतंच पेर..!
कविता

फक्त पोटापूरतंच पेर..!

फक्त पोटापूरतंच पेर..!

भरमसाठ देऊन खतं
कर्ज वाढवून घेतो
महाग महाग औषधाची
फवारणीबी करतो

सांग गड्या कश्यापाई
खर्चाचे हे थेर
पडीत ठेव रान फक्त 
पोटापूरतं पेर
गड्या पोटापूरतं पेर 

मोसंबी  नि संतराची
नको कलमं लावू
डाळींब आनी द्राक्षं
तुले बुडवून टाकतीन भाऊ

केळी अन् ऊसाचीबी
नको लावूस मेर
वलीत बिलीत इसर फक्त 
पोटापूरतं पेर
दादा पोटापूरतं पेर 

इथून तिथून सर्व्या शेतात
पेरू नको मका
मार्केटात होईल गर्दी
आडत्या देईल धोका
खर्चापूरतं पिकंव

जास्त घालू नको घेर
सांगेल तेव्हंढ ऐक 
फक्त पोटापूरतं पेर
दादा पोटापूरतं पेर

पेरतो तू नंबर नंबर
पीक महामूर येतं
तेच धान मजूराले
दोन रूपये मियतं

तू झाला शेळी अन्
मजूर झाले शेर
म्हणून म्हनतो राजा फक्त
पोटापूरतं पेर
आता पोटापूरतं पेर

शेतो शेती पिकवलं 
इकलं सोयाबीनं सस्त
कष्ट तुनं केले
झाला बेपारीचं मस्त

ऐतखाऊ पोसायचे
हे बंद कर थेर
संसाराले लागीन 
तेव्हढं पोटोपूरतं पेर
दादा पोटापूरतं पेर 
     
फक्त बिघा दोन बिघा
यंदा पहाय तू पेरून
टंचाईनं धान्याच्या
येईन तेंची घेरून

भाव वाढींन सव्वादिढी
व्हतीन सारे जेर
तेव्हढ्या साठी ऐक
फक्त पोटोपूरतं पेर
राजा पोटापूरतं पेर

लगीन बिगीन पोराह्यचं
करू नको थाटात
नको करु मोठाईकी
मग रहाशील टेचात

कर्जमुक्त जगायला
नको करु देर
पडीत ठेव बाकी
फक्त पोटोपूरतं पेर
तुह्या पोटापूरतं पेर 
     
राजा राजा म्हनून तुले
येडं बनवलं
कर्जाच्या खाईत तुले
ढकलूनं देलं

धडा त्यांना शिकव
त्यांचा कमी कर घेर 
दर साल राजा
फक्त पोटापूरतं पेर

राजा पोटापूरतं पेर..
दादा पोटापूरतं पेर..!

कवी - कांतीलाल सांकला, छत्रपती संभाजीनगर

Related posts

प्रेम चिरंतन…

कोरड्या मातीचे वर्तमान बदलावे म्हणून…

कधीच कवितेचा शेवट होत नाही…

Leave a Comment