पुस्तकांच्या गावाने भाषा समृद्ध होणार नाही. भाषा समृद्ध होईल ती मातृभाषा – प्रादेशिक भाषांच्या जोरावर. अभिजातपण भाषेपुरता मर्यादित नाही, तर मराठी साहित्य, संस्कृती, चित्रपट, प्रदेशावर भाषेचा अभिजातपणा अवलंबून आहे.
प्रविण पवार
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याचा आनंद संपूर्ण मराठी प्रदेशाला आणि महाराष्ट्राबाहेर मराठी भाषेला जपणाऱ्या, जगणाऱ्या माणसांना देखील आहे. हा सन्मान मुकुंदराजांचा, श्रीचक्रधरस्वामींचा, महादंबेचा, ज्ञानेश्वरांचा, नामदेवांचा, चोखामेळांचा, सावतामाळींचा, सेनान्हावींचा, विसोबांचा, बहिणाबाई, जनाबाई, सोयराबाईंचा, शिवछत्रपतींचा, समाजसुधारकांचा, महामानवांचा आहे. हा आनंद मराठी शिलालेख जपलेल्या, ताम्रपट जपलेल्या तसेच विवेकसिंधू, लीळाचरित्र, भावार्थदीपिका, मराठी विश्वकोश लिहिलेल्या आणि युगानुसार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मराठी भाषेला व लोकसाहित्याला पुढे नेत मराठी रंगभूमीला, वृत्तपत्रांचा, वाङ्मयाचा, विद्यापीठांचा, अस्मितेचा आणि मराठी चित्रपटांचा आहे. हा आनंद आहे ज्यांनी मराठी शाळा, महाविद्यालयात, विद्यापीठात शिक्षण घेऊन आजही आपल्या उगवत्या पिढीला मराठी उंबरठ्यावर दाखल केलंय.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पण पुढे काय ? या प्रश्नामागे अनेक उपप्रश्न निर्माण होत जाणारे आहेत. जसे की –
१] असंख्य मराठी शाळा बंद पडल्या त्यांचं काय ?
२] मराठीच्या रक्तवाहिन्या प्रादेशिक आणि मातृभाषांच्या अस्तित्वांचे काय ?
३] मराठी प्रदेशात मराठी लोकांना मराठीप्रति छंद, आनंद, रोजगारांचं काय ?
४] मराठी साहित्याला चालना देण्यासाठी नवीन कुठले उपक्रम, योजना राबविल्या जातील ?
५] मराठी भाषेप्रति मराठी विद्यापीठांची पुढील भुमिका काय असेल ?
६] ओसाड पडलेल्या मराठी ग्रंथालयांचे काय होईल ?
७] मराठी लेखक, प्रकाशक, वितरक, संमेलन आयोजक यांच्यासाठी नव्यापणाची योजना काय ?
८] मराठी भाषेत एम.ए., बी एड, नेट – सेट, पीएचडी, एम फिल झालेल्या सुशिक्षित बेरोजगार प्राध्यापकांचे काय ?
९] मराठी रंगभूमी आणि लोककलेचं पुढं काय ?
१०] मराठी विश्वकोश मंडळात कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणाऱ्या लोकांचं पुढचं भविष्य काय ?
मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे. म्हणून मराठी भाषेचे विद्यापीठे देशाच्या कुठल्याही राज्यात सुरू होतील. आणि त्या ठिकाणी भाषाविषयक संशोधनावर सर्वाधिक भर देण्यात येईल. पण इथं गुणवत्ता धारकांना संधी उपलब्ध झाली पाहिजे. प्रौढांबरोबरच तरूणांना पण विद्यापीठात संधी दिली गेली पाहिजे.
अनुवादाची क्षेत्र विस्तारताना दूर्मिळ व महत्वपूर्ण ग्रंथाचा अनुवाद भारतीय २१ भाषेत झाला पाहिजे. याबरोबरच मूळ भाषेतही ह्या ग्रंथांना पुस्तकारूपी आणले पाहिजे. प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन, समकालीन वाङ्मयाचा, लोकसाहित्याचा प्रकार – प्रवाहाचा अनुषंगाने चालना दिली गेली पाहिजे. अर्वाचीन मराठी, मध्ययुगीन मराठी, समकालीन मराठी ह्या काळातील दूर्मिळ झालेलं साहित्य, कवी, विचारवंत, समाजसुधारक, वृत्तपत्र माध्यामांचाही विचार करून प्रोत्साहन द्यायला हवे.
मराठी विश्वकोश मंडळाने, मराठी भाषा मंडळाने व मराठी विद्यापीठांनी भाषेचे व्याकरण समजून घेताना जुन्या शब्दकोशांबरोबरच नवे प्रवाहातील साहित्य, मातृभाषांचा विकास कसा करता येईल, दूर्मिळ होत चाललेल्या भाषिकांच्या साहित्याला चालना कशी देता येईल, मातृभाषा शब्दकोशांचा अभ्यासक्रमात समावेश कसा करता येईल. याचाही विचार नव्या उपक्रमातून कृतीशील आणले पाहिजेत.
मराठी भाषेचे अनेक पुरस्कार, संमेलने, संशोधने, चर्चासत्र संपन्न झालीत. पण मराठी प्रदेशाला, साहित्याला, पदाला, व्यासपीठांना योग्य सन्मान लाभत विकास झालाच असेही नाही. इथं दर तीन वर्षांनी निवड समितीचे चेहरे बदलले पाहिजेत. नव्या चेहऱ्यांना गुणवत्ता बघून संधी दिली गेली पाहिजे. कारण नवा चेहरा देऊ शकतो आपला बेस्ट मराठी साहित्यात, उपक्रमात, योजनेत. जुन्या चेहऱ्यांचा जरी अनुभव अधिक असला तरी त्यांच्यातला वाचक पण जिवंत तर पाहिजे ना काळानुसार.
मराठी प्रदेशाचा विचार करताना नुसतं मुंबई, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांवर भर देऊन चालणार नाही, तर समग्र प्रदेशाचा विचार करावा लागेल. कोकण, मराठवाडा, विदर्भ, खानदेशाचाही विचार करावा लागेल. ह्या प्रादेशिक विभागातील विचारवंत, जाणकार, लेखकांना निवड समितीमध्ये घ्यावं लागेल.
पुस्तकांच्या गावाने भाषा समृद्ध होणार नाही. भाषा समृद्ध होईल ती मातृभाषा – प्रादेशिक भाषांच्या जोरावर. अभिजातपण भाषेपुरता मर्यादित नाही, तर मराठी साहित्य, संस्कृती, चित्रपट, प्रदेशावर भाषेचा अभिजातपणा अवलंबून आहे.
भाषा :
व्यक्ती भाषा पंडित होऊन जातो एकाच ‘भाषेत’ बी.ए., एम.ए. पूर्ण केल्यावर. बीएड, नेट – सेट, पीएचडी हे निमित्त आहे प्राध्यापक पदाच्या नोकरीला उंचावण्यासाठी. एम.ए. मराठीवरही घडवता येईल मराठी पिढी. हो पण भाषेचा पंडित होण्यासाठी समग्र साहित्य प्रकार, प्रवाह विविध कालीन साहित्य – लोकसाहित्याचा अभ्यास, वाचत राहणं, संदर्भ सुचवत जाणं, उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे. क्युबीचा वापर करून मराठी पिढी घडणार नाही. तर असंख्य पुस्तकात मस्तक घालून भाषेचं विशेषपण, साहित्याची नविनता, प्रवाहांची विशेषतः सांगणं गरजेचं आहे.
विद्यापीठ :
मराठी विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना आकलन होईल असा अभ्यासक्रम लावायला हवा, समकालीन साहित्याबरोबर प्रादेशिक मातृभाषांचाही अभ्यासक्रमात समावेश व्हायला हवा. विद्यापीठाकडून महाविद्यालयात मराठी भाषेत विविध स्पर्धा घ्यायला हवीत. संशोधकांना संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून द्यायला हवीत. डोनेशन भरून नवे प्राध्यापक चांगली मराठी पिढी घडवतीलच असे नाही. सीएचबी धारकांना पण माणूस समजून योग्य मानधन देण्यात यावे.
पुरस्कार :
राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी दर दोन वर्षांनी निवड समिती बदलायला हवी. ह्या समीतीत राज्य व केंद्र शासनाचे पुरस्कार प्राप्त साहित्यिक नकोत, तर अभ्यासू, साहित्य प्रकार – प्रवाहांची जाणीव असणाऱ्या व्यक्तीमत्वाची गरज आहे. ह्या समीतीत मराठी प्रदेशातील प्रादेशिक विभागातील विचारवंत, अभ्यासू मराठी प्राध्यापक हवेत. भाषा अभ्यासक हवे आहेत. यात महाराष्ट्राबाहेरील मराठी साहित्यिक, अभ्यासू प्राध्यापकांचाही विचार होणे गरजेचे आहे.
नोकरी :
एक दशकापासून मराठी प्रदेशात तरूण वर्गाला रोजगार नाही. खानदेशातील बराच तरूण वर्ग मध्य प्रदेश, गुजरात राज्यात रोजगार उपलब्ध होत नाही म्हणून पोटासाठी स्थलांतर झाले आहेत. महाराष्ट्रात जरका मराठी नोकरीच्या संधी असतील तर ते जिल्ह्यांमध्ये दिसत का नाही ? रोजगार, नोकरी उपलब्ध व्हाव्यात ही मराठी शासनाची व सरकारची जबाबदारी आहे. कारण तुम्ही आमचं प्रतिनिधित्व करत आहात. कंत्राटी पद्धतीने मतदान होत नाही म्हणून तशा नोकऱ्याही मराठी आयुष्याला पुरक नाही. भुकेल्या तरूण वर्गाच्या खांद्यावर जरका राष्ट्राचा – महाराष्ट्राचा भार ठेवत असाल त्यांच्यासोबत त्यांची भाषा पण मरणारच आहे. सत्ता कुठलीही असो आम्ही तुम्हाला मत दान केलंय म्हणून तुम्ही तरूणांसाठी भाषेपरात जगण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यायला हवी ! ह्या भारत देशाची सुरूवात प्रत्येक घरातल्या मना मनातून होते मोठ मोठ्या शहरांनी नाही.
साहित्य :
लेखकात अलेखकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रवाहाला, प्रकाराला अनुसरून नसलेल्या साहित्यकृतींना मैलाचा दगड ठरवले जात आहे म्हणजे नेमकं काय ? साहित्यात नविनता पाहिजे आहे म्हणून जुन्या लेखकांनी आपल्यातला वाचक जीवंत ठेवलाय काय ? ते पुस्तक खरेदी करून नव्या लेखकांचे साहित्य वाचतात का ? याचं अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी भाषेला व प्रदेशाला माहीत आहे. समीक्षकांनी ट्रोल करावं म्हणून एखाद्या साहित्यकृतीवर एकाच बाजूने विस्तारू नये. दोन्ही बाजूने विस्तारनं गरजेचं आहे. शेवटी मराठी भाषेचा – साहित्याचा प्रश्न आहे. जी साहित्यकृती वाचली गेली त्या साहित्यिकृतीवर बोललं गेलं पाहिजे. उगाच जुन्या साहित्यिकांचा संबंध नव्या साहित्यिकाला जोडून वैचारिक खच्चीकरण नव्या लिहित्या पिढींचं करू नये. टीका साहित्यावर केली जाते, साहित्यिकावर नाही. जुन्या साहित्यिकांचा प्रभाव नव्या लिहित्या लेखकांवर पडतो, पण सर्वच जुन्या लेखकांच्या साहित्याचा प्रभाव नव्या लेखकांवर पडत नाही! लेखकाचा काळ, मांडणीशैली, त्यांचं अस्तित्व. यांनाही काही महत्त्व आहे की नाही ?
मराठी प्रकाशक :
मराठी साहित्याची सेवा करणारे प्रकाशक किती आहेत ? साहित्य दर्जा पाहून नव्या लेखकाला पुस्तकारूपी आणणारे प्रकाशकांना मी महत्वाचे समजतो. कारण मराठी साहित्याला नवंपण देण्यास व मराठी साहित्य समृद्ध करण्यास त्यांचीही धडपड असते. जून्या लेखकांच्या नावाने पुस्तके विकली जातील परंतु इथे व्यवसायिक दृष्टीने विस्तारता येईल पण भाषा सेवेचा भाव दूर्मिळ होत जातो त्याचं काय ? म्हणून नव्या लेखकांच्या साहित्याचा विचार पुस्तकारूपी करता यायला हवा.
व्याकरण :
मराठी भाषेतल्या नियतकालिके, पुस्तके, वृत्तपत्रे यातील मुद्रित चुका व व्याकरणाकडे दूर्लक्षित केलं गेलंय. ज्यामुळे त्या नियतकालिकांचा, पुस्तकांचा, वृत्तपत्रांचा दर्जा घसरत चाललाय. ही खंत माझी वाचक म्हणून जरी असली तरी दुःख हे मराठी भाषेला लाभत जाणारं आहे. भाषा सौंदर्य, मातृभाषा सौंदर्यातील भाव उच्चारताना व लिहिताना वेगवेगळा अनुभवता येऊ शकतो, आकलन होऊ शकतो. पण मनातला शब्द नजरेला जसाचा तसा असतो असे नाही. इथं पदाचे व जबाबदारीचे भान महत्वाचे आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून वारकरी संप्रदायातील सर्व ह.भ.प. यांनी संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत सेना न्हावी, कान्होपात्रा यांच्या रचनांचा प्रबोधनात उल्लेख करता येईल काय ? उल्लेख व्हायला हवा कारण त्यांनीही मराठी भाषेला आपलं अस्तित्व दिलंय.
मराठी रंगभूमीसाठी आणि लोककलेसाठी काही करता येईल का ? याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काळ जरी सोशल मीडियाचा असला तरी मराठी रंगभूमी, लोककला दूर्मिळ होऊ नये यासाठी प्रयत्न केली गेली पाहिजेत.
मराठी भाषा रेंगाळली पाहिजे महाराष्ट्राबाहेर, देशाबाहेर साहित्यातून, चित्रपट – गीतातून, संस्कृतीतून. यासाठी मराठी मनाचा पारदर्शक वापर आपापल्या क्षेत्रात झाला पाहिजे. पद ज्यांच्याकडे आहे त्यांनीच स्वतःचं भलं करून घेऊ नये. मराठी भाषेची, प्रदेशाची, संस्कृतीची पण जबाबदारी अभिजात दर्जा मिळाल्यानंतर येणार आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.