March 19, 2024
Katalshilp found in Kot ratnagiri distirct article by Sudhir Risbud
Home » झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख
संशोधन आणि तंत्रज्ञान

झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख

पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालय कोंकण विभाग व निसर्गयात्री संस्था यांच्यावतीने तसेच पुरातत्व संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने 26 व 27 मार्च 2022 रोजी थिबा पॅलेस, रत्नागिरी येथे कातळशिल्प पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने …

सुधीर रिसबुड,
निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी

लांजा तालुक्यातील कोट (जि. रत्नागिरी) गावातील ग्रामस्थांच्या उस्फुर्त सहभागातून अश्मयुगीन कातळशिल्प उजेडात आणण्याचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाला. 23 फूट लांब व 10 फूट उंच गवा रेडा, 18 फूट उंच व 6 फूट रुंद पक्षी आपण कधी पाहिला आहे का? आम्ही पाहिला कोट गावात असलेल्या कातळशिल्पांच्या रुपात. आणि हे शक्य झाले ते निव्वळ प्रतिसादाला कृतीची जोड देत कोट गावातील ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे.

जानेवारीच्या शेवटच्या दिवशी कोट गावात जाणे झाले. हे गाव झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या सासरकडचे मूळ गाव म्हणून सर्व ज्ञात आहे. या गावात कातळशिल्प सारखे काहीतरी आहे ही बाब गावचे ज्येष्ठ व्यक्ती शांताराम उर्फ आबा सुर्वे यांनी निदर्शनास आणली. आणि मग सुरू झाली ती मोहीम.ठरल्या वेळेपेक्षा जरा अधिकच उशिरा या गावात पोहचलो. तरीदेखील गावाचे सरपंच संजय पाष्टये आणि काही गावकरी वाट बघत थांबले होते. त्यांचे बरोबर गावच्या जवळच्या भल्या थोरल्या सड्यावरील कातळशिल्प परिसरात पोहचलो. हा परिसर शेतीचे दळे, मांगर, भाताच्या उडव्या, गवताच्या वरंडी, लाकडाच्या मोळ्या अशा गोष्टीने व्यापलेला. मध्येच असलेल्या मोकळ्या  जागेवर शेतीच्या कामासाठी सारवण घालेलेले होते. या सर्वांमधून कातळशिल्प आपले अस्तिव दाखवत होती. खूप मोठ्या प्रमाणात आणि कित्येक वर्ष मानवी हस्तक्षेप या परिसरात होता. या सर्वांतून कातळशिल्प शोधून ती संरक्षित करणे म्हणजे खूपच मोठे आव्हान होते. पण गावाचे सरपंच आणि गावकऱ्यांनी आमच्या हाकेला प्रतिसाद दिला.



जिथे गवताची एक काडी देखील इकडची तिकडे करायची झाली तर महासंग्राम उभा राहातो, तिथे गावकऱ्यांनी स्वत:हून परिसरातील गोष्टी बाजूला करण्याचे ठरविले ही बाब निश्चितच आनंदाची होती. सर्वांच्या सोयीचा दिवस ठरवून कातळशिल्प साफसफाई मोहीम ठरली. मी (सुधीर रिसबुड), धनंजय मराठे, केदार लेले, मकरंद केसरकर, अजिंक्य प्रभुदेसाई, विजय हटकर आणि योगायोग म्हणजे आमच्या कातळशिल्प शोध संरक्षण आणि संवर्धन या विषयावर शॉर्ट फिल्म करण्याची इच्छा असलेले सायली खेडेकर, राहुल नरवणे आणि त्यांची टीम देखील आम्हाला सामील झाली. ठरल्याप्रमाणे गावात पोहचलो. आम्ही पोचायच्या अगोदरच गावातील आबालवृद्ध, महिला यांची 50 /52 जणांची टीम ठिकाणी हजर होती. खरे तर आम्हाला हा धक्काच होता.



काय काय करावे लागणार आहे याचा अंदाज होता. जागेवर पोहचल्यावर सर्व गावकऱ्यांशी एकत्र संवाद झाला. कामाची रूपरेषा, काय करायचे आहे आणि काय करायचे नाही याबाबत माहिती दिली. त्यांच्या शंकांचे निरसन केले आणि मग आम्ही सर्वजण कामाला सुरवात केली. भाताच्या उडव्या, गवताच्या वरंडी, भराभर बाजूला होऊ लागल्या, परिसरात पसरलेली माती आणि अन्य बाबी बघता बघता बाजूला झाल्या. एकावेळी 100 पेक्षा अधिक हात काम करत होते. दिलेल्या सूचनांचे पालन करत सर्व गावकरी खूपच सफाईने काम करत होते. त्यांचे काम खरोखरच थक्क करणारे होते.

एक एक करत कातळशिल्प आपले अस्तित्व दाखून लागल्या. पहिल्या टप्यातील परिसराची साफसफाई आटपल्यावर मग सुरू झाली कातळशिल्पांची प्राथमिक टप्यातील साफसफाई आणि मग कातळशिल्प बोलू लागली. 2.5 फूट लांबीपासून 7 फूट लांबीपर्यंतचे विविध प्रजातीतील मासे, 6 फूट लांबीची घोरपडी सदृश्य आकृती, विविध प्रजातींचे प्राणी, पक्षी, मोठ्या आकाराची चौकोनी उठावाची रचना आणि काही अनाकलनीय तसेच लहान आकाराच्या भौमितिक रचना अशा 30 पेक्षा अधिक खोद चित्र रचनांचा समूह. या समूहातील वैशिष्टयपूर्ण रचना म्हणजे 3 फूट लांबी पासून 18 फूट लांबी पर्यंतच्या शिकारी पक्षांच्या रचना लक्षवेधक आहेत. पक्षाच्या डोक्यावरील आकर्षक तुरा, मजबूत पाय, 6 इंच लांबीच्या नख्या यावरून या पक्षाची भव्यता जाणवते. त्याच बरोबर तब्बल 23 फूट लांब व 10 फूट उंचीच्या गवा रेड्याची चित्ररचना एका नजरेत मावत नाही.  या गवा रेड्याची 2 फूट लांबीची वक्राकार शिंगे पाहिल्यानंतर नंतर त्याच्या ताकदीची कल्पना आपण करू शकतो. या सर्वांसोबत असलेली 12 फूट लांब व जवळपास तेवढीच रुंद भौमितिक रचना आपले लक्ष वेधून घेते.आमच्या कातळशिल्प संशोधनातील काही ठोकताळे, नवीन विचारधारा या दृष्टीने कोट गावातील कातळशिल्प निश्चितच महत्वपूर्ण आहेत.



गावकऱ्यांना काहीतरी आहे याची कल्पना होती. पांडव कालीन काहीतरी असावे असा त्यांचा याविषयी समज. सर्व चित्र रचना जेव्हा आम्ही त्यांना समजून सांगितल्या तेव्हा ही मंडळी चकित झाली. ‘सर आपण सांगाल त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करू, आमचे संपूर्ण सहकार्य आपल्याला असेल’ सर्व गावकऱ्यांनी एका सुरात सांगितले.

खरे म्हणजे या परिसरात आणखीही चित्र रचना असाव्यात याची खात्री, त्याबद्दल गावकऱ्यांना अधिक सूचना दिल्या. परिसरात अधिक सर्वेक्षण करणे गरजेचे आहे टप्याटप्याने त्या गोष्टी पूर्ण होतीलच. अनेकांकडून मिळणाऱ्या कोरड्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर कोट गावातील सरपंच संजय पाष्ट्ये आणि गावकऱ्यांनी प्रतिसादाला कृतीची जोड देत दाखवलेला विश्वास लाख मोलाचा आहे. त्याबरोबर एकंदरच कोंकणातील कातळशिल्प विषयावर नानाविध कामे, अधिक संशोधनात्मक काम यांची नितांत गरज आहे. त्यासाठी आर्थिक स्वरूपाची मदत मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. शासन प्रशासन स्तरावरून अद्यापपर्यंत निराशाच आहे.

कोट गावाचे सरपंच संजय पाष्ट्ये आणि गावकरी यांचे अप्रतिम सहकार्य आणि आदरातिथ्य यासाठी आभार मानावेत तेवढे थोडेच. कोट गावातील कातळशिल्प परिसरातील भूभाग त्यावरील गावकऱ्यांचे शेतीभातीचे काम हे त्यांच्या मूलभूत जिविकेचे साधन. या सर्वांमध्ये हस्तक्षेप न करता, त्यांच्याच मदतीने हे कसे जपता येईल, येथील मांगर आणि अन्य वास्तू यांचा वापर करून येथील कातळशिल्प रचनांचे कसे संरक्षण करता येईल, यातून गावातील गावकऱ्यांना उपजीविकेचे साधन कसे निर्माण करता येईल या विचारांनी आणि चर्चेने आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.

Related posts

सामाजिक उपचारची दवाई : चारोळीसंग्रह अंतर -मंतर

महुआ मोइत्रा वादाच्या भोवऱ्यात…

आनंदभान अभंगसंग्रह एक जीवन संजीवनी

Leave a Comment