वाचन चळवळ वृद्धीगत होण्यासाठी लेखमाला – भाग २
सरकारी अनुदानावर चालणारी जी काही वाचनालयं माझ्या वाट्याला आली किंवा मी त्यांच्या वाट्याला गेलो तिथेही चित्र काही फारसं वेगळं आहे; अशातला भाग नाही. अपवाद सोडला तर पुस्तकांच्या कपाटांसमोर उभं राहून कोणतंही पुस्तकं हाताळून हवं ते पुस्तक, तेव्हा घेऊन घरी जाता यायचं. असं कोणतंही पुस्तक विशेषत: नाटकांचं दररोज एक घरी वाचनासाठी म्हणून मी घेऊन जायचो. पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते वाचून परत द्यायचा आणि दुसरं आवडतं पुस्तक घरी आणायचा. हा रतीब बहुतेकदा मे महिन्यात आणि दिवाळीच्या सुट्टीत माझ्याकडून हमखास घातला जायचा. आता इतकं वाचन होतं का आपल्याकडून ? तर अर्थातच नाही. अखंडीत वाचीत जावे… सोडाच. छोडो कल की बातें… पण खंडित का होईना, हवं ते वाचायला थोडीशी उसंत मिळते आहे. तर या अशा आधुनिक काळाचे उपकारच मानले पाहिजेत नाही का?
रमेश साळुंखे, मोबाईल – 9403572527
खूप नटवल्या सजवल्या गोष्टी, खूप स्वस्तात दिल्यासारखं करून वर पत्ताही लागणार नाही अशाप्रकारे माणसांपासून पळवून नेण्याचा चंग बांधलेला काळ हा. माणसांचं केवळ बाहुलं करणारा, वस्तूकरण करणारा. मन, शरीर, आत्मा, नातीगोती, कुटुंब, समाज यांच्याशी निष्ठूरपणे नाते तोडावयास भाग पाडणारा. तीच जीवनरीत ठरू पाहणारा. ‘वाचू नका, विचार करू नका, फक्त आमचं ऐका आणि त्याबरहुकूमच कृती करा’, असं सांगणारा काळ हा. माणसांजवळ भरपूर वेळ आहे; पण निर्भेळ, सात्विक आणि सुंदर असा वेळच नाही कुणाकडे कुणासाठी असा हा काहीसा विचित्र काळ. आणि या अशा काळाची काळीकुट्ट सावली आपल्यावर. ती सावली पसरुन राहिली आहे आपल्यावर याचाचा थांगपत्ता लागू न देण्याचा हा काळ. सर्वसामान्य माणसांकडून खूप काही हिरावून, हिसकावून ओरबडून घेण्याचा काळ हा. म्हणूनच या काळाच्या वाचनाची अपरिहार्यता अधिकच. इतर कशाने कोणत्या माध्यमाने याची पूर्तता होण्याची शक्यता तशी धूसरच. काळाचं अथवा ग्रंथांचं वाचनच या सगळ्यांवरची पुटं खरवडून काढू शकतं; हे अगदी निर्विवाद सत्य. आपल्या सर्वांनाच वाचन स्वस्थ म्हणजे स्वत:मध्ये स्थित ठेऊ शकतं हे खरं… तथापि हा सांगणाऱ्यांचा पक्ष जरूर आहे. पण ऐकणाऱ्यांचा ? त्याबरहुकूम काही कृती करणाऱ्यांचा ?
वाचन हा एक सर्वांगसुंदर छंद आहे, याची जाणीव आपण झपाट्याने विसरत चाललो आहोत. आपलं आणि आपल्या भवतालाचं खरंच भले व्हावं; अशी जर मनापासून इच्छा असेल तर वाचनासारखा पर्याय दुसरा नसावा. आजकाल शाळेत जाऊन लिहिणे-वाचणे शिकलेल्यांची संख्या कमालीची वाढली आहे. प्रत्येक क्षेत्रात शाखा आणि उपशाखांचं पीक जोमानं वाढलेलं आहे. पूर्वी अर्थातच या साऱ्यांचं प्रचंड दुर्भिक्ष होतं. पुस्तकं, दूरदर्शनवरील असंख्य वाहिन्या, मोबाईल, इंटरनेट, किंडल, हजारो अॅप्स असलं काही नव्हतं. जे शाळा महाविद्यालयांमध्ये गेलेले नाहीत किंवा जाण्याची संधी मिळालेली नाही, अशा हजारो लोकांना निरक्षर-अडाणी समजलं जायचं. पण ते व्यापक अर्थानं अडाणी असे नव्हतेच. आपलीच त्यांच्याकडं पाहण्याची दृष्टी कोणती होती. अगदी गावोगावी, वाड्या वस्त्यांवरही भजन, कीर्तन, लोककला, सण समारंभ, चालीरीती, परंपरा अशी मनोरंजनाची आणि प्रबोधनाचीही शेकडो माध्यमं माणसाच्या आयुष्याला अगदी पूर्वापार खेटून उभी होती. हरएक गोष्टींकरिता माणसांना भरपूर वेळ असायचा. हे सारं अनुभवाचं संचित माणसांच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग होता, माणसं डोळाभरून पहायची आणि अनुभवायची हे सारं. माणसं संथ सावकाश चालायची-बोलायची. निसर्गाशी स्वत:शी आप्तस्वकियांशी, पक्षी, पाखरं, फुलं, अगदी गोठ्यातली जनावरं यांच्याशीही माणसं आत्मियतेनं बोलायची. परस्परांच्या सुखानं आनंदून जायची आणि दु:खानं कळवळून जायची माणसं. ही शिकलेल्यांच्या दृष्टिकोनातून आलेली अशी निरक्षरता असूनही आपल्या समाजव्यवस्थेत चांगल्या आचार, विचार आणि उच्चारांची नीट जपणूक व्हायची. आज इतके काही ज्ञान विज्ञानाच्या अनंत रंगी ढगांनी आपलं अवघं आयुष्यच कवेत घेतलेलं आहे; की विचारता सोय नाही. आणि या अशा ढगांना पाहून भरजरी पिसारे फुलवून कोट्यवधी मोर आपल्या घरोघरी आभासी नृत्यात मग्न आहेत. ना साद-पडसाद ना संगीत. या अशा चवचाल माध्यमांच्या सावटात विचारांना, भावनांना आणि संवेदनांना आपण पारखे होऊन बसलेलो आहोत. ना खेद ना खंत, असं होऊन बसलं आहे सारं.तसं पाहिलं तर आपण काहीच वाचत नाही आहोत; असंही नाहीच की! वर्तमानपत्रं, व्हॉट्सअॅप, फेसबुक, किंडल, झालंच तर इन्स्ट्राग्राम इत्यादी माध्यमांवरील असं काहीबाही अखंड वाचतोच की आपण. पूर्वीपेक्षा अधिकच वेळ देतो की आपण वाचनाला. पण अशा वाचनातून किती अभिरूची, किती समाजभान, समाजभान सोडाच किती आत्मभान मिळतं आपल्याला ? शांत बसून आपण विचारतो का स्वत:ला हे ? का हे असं स्वत:शी बोलण्याचा वेळही आपण आपल्या आयुष्यातून कायमचाच हद्दपार करून टाकला आहे ? काय वाचलं पाहिजे आणि कसं वाचलं पाहिजे; हे एकदा नीट समजलं की मग वाचलेल्या गोष्टींचं व्यवहारात उपयोजन कसं करायचं, ही गोष्ट नंतरची. नीट वाचन करणारे शेकडो लोकच मग वाचून विचारात मुरविलेलं नीट आचरणात आणण्यासाठी जिवाचं रान करतात. म्हणून किती वाचलं यापेक्षा वाचलेलं किती वाचन आपल्या आकलनाच्या कक्षेत आलं आहे; हे महत्त्वाचं. शिवाय विचारांची किती उलथापलथ झाली आपल्यात ? काही बदल घडताहेत का आपल्यात ? काही नवी जाणीव होतेय का आपल्या आत ? हे महत्त्वाचं. त्यामुळं अशा प्रकारच्या केवळ पाठांतराला तसा काहीच अर्थ नाही. अन्यथा अर्थेविण पाठांतर । कायसा करावे । व्यर्थची मरावे । घोकूनिया ।। असा सज्जड दम तुकोबांनी भरलेलाच आहे की. वाचनापेक्षा अनुभवणं कधीही चांगलंच की ! त्याच्याही आधी ज्ञानेश्वरांनीही वाचे बरवे कवित्व । कवित्वी रसिकत्व । रसिकत्वी परतत्व । स्पर्शू जैसा।। असं अनुभूतीच्या संदर्भातला निर्वाळा दिला आहे.चांगल्या ग्रंथांचं आणि त्याच्या वाचनाचं महत्त्व पूर्वापार अनेकांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि त्याबरहुकूम तसा कित्ताही त्यांनी गिरवलेला आहे. म्हणूनच ते मोठे, थोर लोक. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास आदी संतांनी ग्रंथांच्या उपयोजनाचे महत्त्व चांगलंच जाणलं होतं. मातृभाषेचाही या साऱ्यांना सार्थ असा अभिमान होता. उगीच नाही म्हणून ठेवलं नामदेवरायांनी, ‘नामा म्हणे ग्रंथ । श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी । अनुभवावी।।’ ओवी नुसती वाचावी, असं नाही म्हटलेलं त्यांनी. तर ती अनुभवावी – आचरणात आणावी असं त्यांचं प्रेमळ सांगणं आहे. शब्दांना रत्नं आणि प्रसंगी शस्त्रंही केलेल्या तुकारामबुवांनी शब्दांनाच जीवीचे जीवन असं म्हणून शब्दांचेच धन जनलोकांमध्ये उदार हस्ते वाटून दिलं आहे. ही धनसंपदा अखंड मानवजातीच्या उद्धाराकरिता अजरामर असे विसाव्याचे क्षण ठरलेले आहेत. अशा विभूतीमत्त्वांनी वाचलेलं-लिहिलेलं प्रत्यक्ष आचरणात आणलं, त्यामुळं ते थोर आणि वंदनीय ठरले. रामदासांनीही हाच कित्ता गिरवला अखंडीत वाचीत जावे । दिसामाजी काहीतरी लिहावे ।। अशी त्यांचीही शिकवण आहेच की. तथापि या त्यांच्या सांगण्यालाही चारशे वर्षे उलटून गेलीत; पण अजूनही आपल्या समाजात वाचन संस्कृती रुजली नाही ती नाहीच. उत्तरोत्तर ती अधिकच क्षीण ठरते आहे. कधी पाहणार आपण गांभिर्यान साऱ्यांकडं?याच्याही आधीच सांगायचं तर आपल्याला मम्मटाची साक्ष काढता येते. लिहिण्याच्या आणि वाचनाच्या संदर्भात या गृहस्थाने यश, अर्थप्राप्ती, व्यवहारज्ञान, जिज्ञासा, आनंद वाचन-लेखनाच्या संदर्भातील आपली मते नोंदवून ठेवलेली आहेत. शिवाय जिज्ञासापूर्ती, जीवनानुभूती, आत्माविष्कार, इच्छापूर्ती, स्वप्नरंजन, पलायनवाद असेही अनेक मुद्ये अगदी प्राचीन काळापासून चर्चिले गेले आहेत. इतका भला मोठा आपल्या सर्वांच्याच ‘काखेत भरलेला कळसा’ असूनही… आता तर प्रचंड वेगाने वाचनच गैरलागू आणि निरर्थक होऊ लागले आहे. याची ना खेद ना खंत असे सगळे होऊन बसले आहे. स्पर्धेने (ज्याचा तसा आपल्या खऱ्या आयुष्याशी कोणताच संबंध नसतो.) केवळ आपल्याला अंधच नाही तर मुकं आणि बहिरंही करून सोडलेलं आहे. समाजातला विचार संपून भावनेचं थैमान सर्वत्र दिसू लागलं आहे. भावना आणि विचार हातात हात घालून चालू लागले; की ते केवळ चालणे रहात नाही; तर त्याचे गीत, संगीत, नृत्य आणि नितांत सुदंर शिल्पही बनते. ते तनामनाला खूप अवीट असा आनंद देते आणि शांतवतेही आपल्याला आतून. वर्तमान सामाजिक, राजकीय वातावरणात जिथे भावना आहेत तिथे विचार नाहीत आणि जिथे विचार आहेत तिथे भावनांचा, संवेदनशीलतेचा मागमूसही नाही. या दोहोंमधील एकात्मतेचा अभाव आपलं अवघं जगणं-मरणं विरजवून टाकतो आहे. भडकलेल्या भावनांमध्ये केव्हाही विचारांना सोयिस्कर तिलांजली दिलेली असते. पूर्वी खंडण-मंडण, पूर्वपक्ष-उत्तरपक्ष, पूर्वरंग-उत्तररंग असे छान शब्द होते. एकमेकांची बूज राखून माणसं विचारविनिमय करायची. आता हे अत्यंत अभावानं दिसतं आहे. ती परंपरा होती आपली. भावनातिरेकाच्या गदारोळात आज ती अस्तंगत होते आहे. विचारांची लढाई हातघाईवर येऊन ठेपली आहे. मुद्यांची चर्चा गुद्यांवर केव्हा येऊन ठेपेल याचा काहीच भरवसा राहिला नाही.आणखी एक सांगायचं, तर सजग इतिहासदृष्टी असेल तर वर्तमानातला आणि भविष्यातलाही प्रवास सुखाचा होण्याची शक्यता निश्चितच दुणावत असते. वाचनामुळे भूत, भविष्य आणि वर्तमानाची प्रखर आणि सत्य अशी जाणीव होते. हे असे वाचन करणे ही अत्यंत निकडीची गरज असते सर्वांसाठीच. पण अशाही प्रकारच्या वाचनाच्या अभावामुळे तीही कमीच होऊ लागली आहे. इतिहास-पुराणांचं वाचन करण्याऐवजी आपण लोकप्रियतेचा सवंग हव्यास असलेल्या दूरदर्शन मालिका घरबसल्या पाहण्याचा चंगच जणू काही बांधलेला आहे की काय ? असा संशय घ्यायला भरपूर जागा आहे. इतिहास-पुराणादिकांचं उदात्तीकरण करणं, वस्तुनिष्ठतेला फाटा देणं, आभासी वास्तवाचा मारा करून वास्तवातील समस्यांपासून दूर नेणं आणि जाहिरातींच्या माध्यमातून बक्कळ नफा कमावणं हा हेतू बऱ्याचदा या मालिकांच्या प्रसारणामागं असतो. हा कावा लक्षात घेऊन आपण आपला सांस्कृतिक-सामाजिक बचाव करणं आपल्या सर्वांच्याच हिताचं आहे. तर अशा प्रकारच्या समाज माध्यमांचा आणि प्रसार माध्यमांचा विवेकीपद्धतीने वापर झाला पाहिजे. खरे तर या माध्यमांनीच विवेकनिष्ठ जीवनपद्धतीचा स्वीकार करायला हवा. पण नजीकच्या काळात तरी ते प्रचंड दुरापास्त वाटतं आहे. जीवघेणी स्पर्धा, रटरटत असलेला चंगळवाद आणि हव्यासी अर्थकारण अशा बदफैलीपणाच्या गर्तेत अडकलेल्या माध्यम संस्कृतीचा अश्व जोपर्यंत स्वत:ला स्वत:च आवर घालत नाही; तोपर्यंत हे सुदिन येण्याची शक्यता खूप धूसर आहे. ही शक्यता समाजधार्जिणी बनून प्रकटण्याची चिन्हे आपण कायमची गमावून बसलेलो आहोत की काय ? अशी धास्ती वाटावी अशा वातावरणात दुदैवाने आपण जगतो आहोत.आई, बाबा, आजी, आजोबा यांच्याकडून गोष्टी ऐकत ऐकत महापुरूष घडले; हा केवळ आपल्याच देशातला नव्हे; तर जगभरातला आवर्जून सांगितला जाणारा इतिहास आहे. हा इतिहासही आपण झपाट्याने विसरू लागलो आहोत. हे आपल्याकडून विसरले जाऊ लागले आहे; याचेही आपणास आता काही वाटेनासे झाले आहे. विभक्त कुटुंब पद्धतीच्या नावाखाली आजी आजोबांपासून लहानगी मुलं दुरावली आहेत. जिथं आजी आजोबा आहेत त्यांच्याकडे गोष्टी आहेत; पण तिथं मुलांना सुनांना आणि नातवंडांना गोष्टी ऐकण्यास वेळ नाही. मोबाईल आणि दूरदर्शनवरील आभासी कार्यक्रमांनी त्यांचा पुरता वेळ भस्मासुरासारखा खाऊन टाकलेला आहे. उरल्यावेळेचं ऑनलाईन शिक्षणाचं रहाटगाडगं निष्पाप मुलांच्या माथ्यावर फुटतं आहे. यातून मुलांचा बौद्धिक, भावनिक आणि मानसिक विकास किती झाला, समाजभानाचं घोडं कुठं पेंड खातं; असे प्रश्न अलहिदाच ठरत आहेत.चांगल्या वाचनाच्या सवयींकडे पुरूषवर्गाचे दुर्लक्ष होते आहे; हे खरेच. पण त्याहून काकणभर अधिकच दुर्लक्ष स्त्रियांचं होते आहे का ? आणि ते तसे असेल तर अधिकच चिंता करण्याजोगं आहे. ज्या समाजात स्त्रियांचे वाचनाकडे अक्षम्य दुर्लक्ष होते; त्या संस्कृतीची निकोप वाढ निश्चितच खुंटते. अपवाद सोडला तर खूप जुजबी झालं आहे स्त्रियांचंही वाचन आता. पूर्वी स्वयंपाक बनवण्याशी संबंधित खूप पुस्तकं मिळायची. आताही कमी प्रमाणात का होईना पण प्रकाशित होतात तसली पुस्तकं. तथापि त्यांचीही जागा आता यूट्यूबने घेतलेली आहे. जगभरातला कोणताही पदार्थ घरबसल्या कधीही करता येतो आपल्याला. ही तशी चांगलीच सोय आहे की. अशा नवनव्या समाजमाध्यमांना नाकारण्यात काहीच अर्थ नाही. पण चांगले ग्रंथ विकत वा ग्रंथालयातून आणून सवड काढून ते वाचण्यातला जो आनंद आहे; तो कोणत्याही पर्यायी माध्यमांमुळे भरून निघणं शक्यच नाही. पुस्तकांना स्वत:चं म्हणून एकप्रकारचे विशिष्ट असं व्यक्तिमत्त्व असतं. रंग, रूप, रस, गंध, नाद अशा साऱ्या संवेदना एकजीव होऊन पुस्तकाच्या रूपात, आकारात, घाटात आनंदानं नांदत असतात. आणि त्या संवेदनाही तितक्याच आनंदानं आपल्याला हळूवारपणे आपल्यात सामावून घेत असतात. या अशा जागा अन्य कोणतंही माध्यम घेऊ शकत नाही. ही आजतरी काळ्या दगडावरची स्वच्छ अशी पांढरी रेघ आहे.चांगल्या वाचनाचा संबंध थेटपणे चांगल्या संस्कारांपाशी येऊन ठेपतो. लहान मुलांचा अधिकांश वेळ आईच्या आगेमागे घुटमळण्यात जात असतो. अर्थातच आतातर बहुसंख्येनं दोघेही कमावते असल्याने आई-बाबांच्या सहवासाचीही वानवा आहेच. म्हणून तर या प्रश्नाकडं अतिशय गांभिर्यानं पाहण्याची कधी नव्हती इतकी गरज निर्माण झाली आहे. धावपळीच्या आणि धकाधकीच्या या अशा जगण्यानं आपले पुरते बेहाल करून सोडलेले आहे. या अशा सगळ्या धबडग्यात त्या आई म्हणवून घेणाऱ्या मातेच्या वाचनाची काय परवड होत असेल; याची कल्पनाच न केलेली बरी. किती वेळ टी.व्ही. पाहतो आपण? किती वेळ देतो मोबाईलसाठी? पार्लरसाठी किती वेळ खर्च करतो आपण? अभ्यासिकेत अथवा वाचनालयात किती जातो आपण? आता मग ती पुस्तकं वाचणार कधी आणि रामायण, महाभारतातल्या, इसापनीती वगैरेतल्या गोष्टी सायंकाळी लवकर घरी येऊन, सगळे कामकाज आटोपून, तो मोबाईल कुठेतरी दूर फेकून देऊन, निजताना आपल्या मुलांना गोष्टी सांगणार कधी? मग प्रश्न उरतो कार्टून शो मधल्या गोष्टी पाहून कोणते कसे आणि केव्हा संस्कार करणार आपण आपल्या लहानग्यांवर? इथे प्रश्न केवळ स्त्रियांचा आहे असे नव्हे. आधुनिकीकरणाने जे आणि जसे जीवन आपल्याला जगायला भाग पाडलेले आहे; ते तसे जगूनसुद्धा पालकांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत. गोष्ट ऐकण्याची प्रंचड तहान लागली आहे मुलांना. आपण मात्र अशाप्रकारच्या तहान भुकेच्या सकस अन्नापासून त्यांना निर्दयपणानं तोडतो आहोत. त्यामुळे मुलांच्या आचार विचारांवरही आजारपणात चढते तशी संस्कारांची, चुणचुणीतपणाची आणि बाह्य पोशाखी नटवेपणाची सूज दिसू लागली आहे केवळ. हे बळकट, बलदंड असे बाळसे नाही; सूज आहे ही. हे ओळखलं नाही ना आत्ताच आपण; तर भविष्यात आपल्यासमोर काय वाढून ठेवलं असेल; याची कल्पनाच न केलेली बरी.शास्त्रीय साहित्य किंवा सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या माणसांचं ललित साहित्याचं वाचन कितपत आहे? हाही एक महत्त्वाचा प्रश्न. ग्रंथालयात पुस्तकांसाठीच्या सभासदतत्त्वाचं खातं आहे आपलं? ग्रंथालयातली बात तर सोडाच मोबाईलवर किती चांगली पुस्तकं डाऊनलोड केली आहेत आपण? त्यातली सलग अशी किती पुस्तकं वाचून झालीत आपली? किती वाचायची शिल्लक आहेत? आकाशवाणीवर वाचनाचे किंवा रंगमंचावर अभिवाचनाचे प्रयोग होतात हल्ली. खूप वेळ देऊन मोठ्या परिश्रमपूर्वक एकएक शब्द जिवंत करत अप्रतिम वाचन करताता कितीतरी लोक. बहुतेकदा हे असलं सारं अक्षरसंचित विनामूल्यच असतं. जाऊन शांतपणे बसून ऐकायचं एवढंच करायचं असतं श्रोत्यांना. पण अशा कार्यक्रमांना श्रोत्यांची संख्या किती असते? तुम्हीच निवडा पुस्तकं, ती वाचाही तुम्हीच आणि तुमचं तुम्हीच ऐका! असा सगळा आळशी कारभार आपला.
दरवर्षी विविध प्रकारच्या सभा-संमेलनात खूप पुस्तकं खपतात. हौसेनं विकत घेतली जातात ती. पण घेतलेली पुस्तकं कितपत वाचली किती जातात ? चर्चा होते वाचलेल्या पुस्तकांवर ? या सर्वांचे कोणतेही कोष्टक अथवा आकडेवारी हाताशी लागत नाही. तथापि हा सारा उल्हासातल्या फाल्गुन मासातलाच प्रकार आहे; असे चित्र जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी दिसते आहे. हा असा सार्वत्रिक आढळणारा वाचनाच्या संदर्भातला साराच नन्नाचा पाढा असेल; तर मग खुंटलेच की सगळे! हे परवडण्यासारखे नाही आपल्याला. वाचणारे काही सन्माननीय अपवाद असतीलही. आहेतही अगदी निश्चितपणानं. पण त्यांची संख्या किती? तर तीही हाताच्या बोटांवर मोजता येण्याजोगी. वाचन ही गरजच आपल्या आयुष्यातून हद्दपार होऊ लागली आहे का?
(क्रमशः)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
घोषणा आणि वल्गना…